मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३७ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ३७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३४ अध्याय ३७ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर स लब्धसंज्ञः पुनरुत्थितो रुषा व्यादाय केह्सी तरसाऽपतद्धरिम् ।सोऽप्यस्य वक्त्रे भुजमुत्तरं स्मयन्प्रवेशयामास यथोरगं बिले ॥६॥दैत्य आदळला पृथ्वीवरी । तेणें मूर्च्छा दाटली शरीरीं । ते सांवरूनियां झडकरी । कृष्णावरी धांविन्नला ॥६७॥कृष्ण गिळावया सक्रोध हटें । विकराळ पसरूनि मुखवटें । सवेग धांविला कडकडाटें । कृष्णा निकटें संघटला ॥६८॥प्रथम वदळा केल्या विफळ । तेणें हृदयीं दुःख बहळ । कृष्णावरी पडला खळ । परि तो अढळ न ढळेचि ॥६९॥पसरलें देखोनि दैत्यवदन । वामबाहु मधुसूदन । वदनीं घाली हास्य करून । उरग लीन जेंवि बिळीं ॥७०॥निर्भय सर्प रिघे बिळीं । दैत्यमुखीं तेंवि वनमाळी । वामबाहु घालूनि समूळीं । वदनकमळीं हासतसे ॥७१॥मुखीं सांपडतां हरिहस्त । दैत्यें तोष मानिला बहुत । डसों जातां दशनपात । झाला त्वरित तें ऐका ॥७२॥दंता निपेतुर्भगवद्भुजस्पृशस्ते केशिनस्तप्तमयः स्पृशो यथा ।बाहुश्च तद्देहगतो महात्मनो यथामयः संववृधे उपेक्षितः ॥७॥कक्षेपर्यंत बाहु वदनीं । घालूनि निर्भय चक्रपाणि । केशी डसतां कडकडोनी । दंत उन्मळोनि गळाले ॥७३॥तप्तलोह सिंदूरवर्णीं । तैसा बाहु स्पर्शितां दशनीं । दंत पडले उन्मळोनी । दैत्या नयनीं दुःखाश्रु ॥७४॥कीं तप्तलोह जैसें पोळे । तिखटा दशनीं तैसा बळें । डसों गेला तंव मोकळे । दशन जाले दैत्याचे ॥७५॥वज्रापरीस बाहु निबर । बळेंचि क्रोधें रगडी असुर । तेणें दशन जाले चूर । नेत्रीं पाझर सोटले ॥७६॥आत्मशब्दें बोलिजे देहो । महात्मा जो हरिविग्रहो । त्या कृष्णाचा दैत्यें बाहो । ग्रासितां पहा हो वाढला ॥७७॥वायु प्राशूनि फुगे नाग । कीं द्रव्यविशेषें स्फुलिंग । कीं तें त्रिविक्रxxचें आंग । वाढे त्रिजग मोजावया ॥७८॥किंवा जलोदरनामा रोग । जठरीं उद्भवला सवेग । वाटे उपेक्षिलिया मग । यमलोकमार्ग दाखवी ॥७९॥तैसा दैत्याचिये शरीरीं । कृष्णबाहु वाढला भारी । पुढें कैसी वर्त्तली परी । ते अवधारीं कुरुवर्या ॥८०॥समेधमानेन स कृष्णबाहुना निरुद्धवायुश्चरणांश्च विक्षिपन् ।प्रस्विन्नगात्रः परिवृत्तलोचनः पपात लेंडं विसृजन्क्षितौ व्यसुः ॥८॥कृष्णबाहु वाढला कंठीं । तेणें खुंटली प्राणराहटी । वायुरोधें भरला पोटीं । दुःखें आपटी चरणांतें ॥८१॥सर्वांगासी आला घाम । विकळ झाला तनुविक्रम । नेत्र वटारिले विषम । प्राणोत्क्रम वोढला ॥८२॥बाहुचर्वणीं न चले शक्ति । पलायनाची खुंटली गति । विकळ झाल्या इंद्रियवृत्ति । देहस्मृति मावळली ॥८३॥मूर्च्छना दाटली गाढमूढ । पोटीं वायु कोंडला वाड । झाला ऊर्ध्व मार्ग अवघड । मग फोडिलें कवाड वायूचें ॥८४॥जैसा अदत्त कवडा जोडी । गांडींवाटे प्राण सोडी । केशिदैत्यातें परवडी । झाली रोकडी प्राणांतीं ॥८५॥गांडीवाटे सांडितां लेंडा । सरिसा निघाला प्राणलोंढा । शरीर उघडलें तडतडां । झाला उघडा हरिबाहु ॥८६॥तद्देहतः कर्कटिकाफलोपमाद्व्यसोरपाकृप्य भुजं महाभुजः ।अविस्मितोऽयत्नहतारिरुत्स्मयैः प्रसूनवर्षैर्दिविषद्भिरीडितः ॥९॥पक्क कांकडी साद्यंत उकले । तैसीं तनूचीं भासतीं शकलें । कृष्णें बाहूतें काढिलें । प्रेत पडलें भूपृष्ठीं ॥८७॥सुरनरासुरां जो अद्भुत । तो मारिला केशी दैत्य । परंतु विस्मयें नोहे दृप्त । गर्वरहितजगदात्मा ॥८८॥कृष्णमाया अघटित घटी । निमिषें निवटी ब्रह्मांडकोटी । तेथ कायसी भिंगुरटी । दुष्ट कपटी हयरूपी ॥८९॥महाभुज या पदाचा अर्थ । कृष्णप्रताप अत्यद्भुत । यत्न न करितां मारिला दैत्य । गर्वा न शिवत अविस्मयें ॥९०॥बुद्धिबळीं कां सारिपाटीं । सारी मारितां गर्व उठी । परी कृष्ण प्रतापी जगजेठी । अगर्व सृष्टीं अक्षोभ ॥९१॥हें देखोनि सुरसमुदाय । विमानीं मानूनि परमाश्चर्य । परम उत्कट करिती विस्मय । कुसुमनिचय वर्षती ॥९२॥मग ते श्रीकृष्णाचीं यशें । निर्जर वर्णिती संतोषें । उत्साह करिती दुंदुभिघोषें । प्रेमोत्कर्षें नाचती ॥९३॥परस्परें देव वदती । अचाट केशिदैत्याची शक्ति । कृष्णें मारिला कवणें रीतीं । हा विस्मय चित्तीं बहु वाटे ॥९४॥कांहीं परजिलें नाहीम शस्त्र । कांहीं न करितां प्रतिकार । अयत्नें मारिला दुष्ट असुर । ज्याचा आधार कंसातें ॥९५॥फळोदयातें सूचक प्रसून । कीं सूर्योदया जाणवी अरुण । तैसें कंसासुरा असन्मरण । केशिमरणॆं प्रबोधिलें ॥९६॥येथूनि झाला दृढनिश्चय । दैत्यां राक्षसां दानवां क्षय । आम्हां निर्जरां ऊर्जित विजय । कल्याण अभय त्रिजगातें ॥९७॥भर उतरला मानूनि मनीं । आनंदभरित झाला अवनी । कृष्णपवाडे गाती गगनीं । देव विमानीं उत्साहें ॥९८॥ऐसा झाला केशिवध । श्रोतीं होऊनि पुढें सावध । कृष्णा भेटेल मुनि नारद । तो संवाद परिसावा ॥९९॥कृष्णदयार्णव प्रार्थना ऐसी । श्रवणीं बैसतां सप्रेमेंसी । चिंता न कीजे कोणेविषीं । सर्व हृषीकेशी संपादी ॥१००॥ऐसा प्रभाते वधिला केशी । त्यानंतरें श्रीहृषीकेशी । पुरस्करूनि गोधनासी । गेला वनासि सहगोप ॥१॥शुक म्हणे गा नृपोत्तमा । नारद देवर्षि महात्मा । वनीं भेटला पुरुषोत्तमा । ते कथेची गरिमा अवधारीं ॥२॥देवर्षिरूपसंगम्य भागवतप्रवरो नृप । कृष्णमक्लिष्टकर्माणं रहस्येतदभाषत ॥१०॥म्हणसी आधीं कंसापाशीं । सांगोनियां त्र्यक्षरीसी । मग कां भेटला कृष्णासी । हे शंका मानसीं न धरावी ॥३॥कंसाचिये अंतकाळीं । ध्यानरूपें श्रीवनमाळी । बिंबवावया हृदयकमळीं । गोष्टी त्याजवळी चावळला ॥४॥अतींद्रियद्रष्टा महामुनि । भूतभविष्यवर्त्तमानीं । कंसाधिकार विचारूनी । स्वहितकथनीं प्रवर्तला ॥१०५॥कंस आसुरीप्रकृतिमंत । त्यासि अनोळख भक्तिपंथ । यालागिं विरोधभजनासक्त । मुनि तदुचित त्या बोधी ॥६॥प्रह्लादाचा जो अग्रज । तो हा कंस नामा भोज । त्यासि कथिला अधोक्षज । सांगोनि गुज विश्वासें ॥७॥आसन्नमरण जालिया प्राप्त । विवेकनिष्ठ जिवलग आप्त । जेंवि कथिती प्रायश्चित्त । तेंवि गुह्यार्थ हा वदला ॥८॥हें ऐकोनि कंसचित्त । कृष्णीं जडलें विरोधार्थ । तेणेंचि तयाचा परमार्थ । मुख्य पुरुषार्थ लक्षिला ॥९॥एवं भागवतप्रवरमुनि । नमनीं त्र्यक्षरी लांछनी । सर्वसुहृदस्वहितकथनीं । कळवळूनि प्रवर्त्तला ॥११०॥वर्में कथूनियां कंसासी । मग कां आला कृष्णापासीं । ऐशी शंका कांहीं धरिसी । तरी येविषीं अवधारीं ॥११॥क्लिष्ट म्हणिजे निंद्य कर्म । जो नातळे पुरुषोत्तम । त्या कृष्णातें मुनिसत्तम । गुह्य सप्रेम हें वदला ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : May 05, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP