तास्तथाऽवनता दृष्ट्वा भगवान्देवकीसुतः । वासांसि ताभ्यः प्रायच्छत् करुणस्तेन तोषितः ॥२१॥

जो कां देवकीचा सुत । भगवान् षड्गुणैश्वर्यवंत । गोपी देखोनि नम्र बहुत । तोष पावत तत्कर्में ॥६८॥
जो कां केवळ करूणामूर्ति । तैशा प्रकारें गोपीप्रणति । देखोनि संतोष पावला चित्तीं । वस्त्रें त्यांप्रति अर्पिलीं ॥६९॥

दृढं प्रलब्धास्त्रपया च हापिताः प्रस्तोभिताः क्रीडनवच्च कारिताः ।
वस्त्राणि चैवापहृतान्यथाप्यमुं तानाभ्यसूयन्प्रियसंग्निर्वृताः ॥२२॥

भुवन जीवन कांचन । परीक्षाल्छलना करितां सहन । गोपींसहीत भगवज्जन । वंद्य पावन हरितोष ॥१७०॥
सच्छिष्य कां पतिव्रता । नानाछळणीं परीक्षितां । शुद्धभावें सहन करिता । स्वामी भर्ता प्रिय होय ॥७१॥
कुळव नांगर फणी तिफणी । भूमि छळितां नानाखननीं । अनेक अपराध न गणी मनीं । अक्षोभपणीं सुशांत ॥७२॥
लत्ताप्रहारें तुडविताती । मलमूत्रादि निक्षेपिती । घट मळ दुर्गें करिती । तरी अक्षुब्ध क्षिति शुद्धत्वें ॥७३॥
तिचें जाणोनि अभ्यंतर । धरी अर्धांगीं कमलावर । धरारक्षणीं धराधर । धरी अवतार अघटित ॥७४॥
तेवींच विशुद्ध जाणिजे आपा । क्षालिती जगाच्या पापतापा । विश्वजीवनीं अनुकंपा । छलनत्रपा त्यागूनी ॥१७५॥
नाना मठी करिती समळ । माजी टाकिती अमंगळ । प्रक्षाळिती नाना विटाळ । परी तें निर्मळ सबाह्य ॥७६॥
यालागीं आपोनारायण । म्हणवी सर्वांगें आपण । जल सबाह्य नांदे पूर्ण । करूनि सदन स्वानंदें ॥७७॥
वरकलावरी लाविती कसीं । ताविती तोडूनि कानसीं । नाना परीचे परीक्षेसी । परीक्षकांहीं छळितां ही ॥७८॥
तुच्छ फुटकी कांचवटी । तयेसमान तुळितां सृष्टीं । तरी विषाद न मनी पोटीं । पूर्ण दृष्टि निजतेजें ॥७९॥
गुंजेसमान जरी केलें । जतुकासंगीं नियोजिलें । नीचप्रसंगें हिनावलें । गौरव आपुलें न संडी ॥१८०॥
जों जों जाळूनि घालिती पुटीं । तों तों शुद्धता धरी मोठी । यालागीं देवोत्तमामुकुटीं । श्रवणीं कंठीं मिरवतसे ॥८१॥
जरी विशुद्ध झालें रत्न । तरी तें एकदेशी गौण । नेणे कांचनासमान । न्यून पूर्ण संपादूं ॥८२॥
घनाचें घायही साहूनी । प्रवर्ते पुढिलांचे कल्याणीं । ऐसी सुशांति सुवर्णीं । म्हणोनि जनीं प्रिय झालें ॥८३॥
तैसाचि चंदन निज सुवासें । वेधी सर्पांचीं मानसें । परंतु त्यांच्या कृतघ्नदोषें । लिप्त नोहे कदापि ॥८४॥
नीचकाष्ठें आपुल्या पाडें । पालटूनियां गर्वा न चढे । शस्त्रीं खंडूनि करिती खोडें । तरी न मोडे सौरभ्य ॥१८५॥
क्रूरपाषाणीं झिजविती । पाणियापरी पातळ करिती । तर्‍ही तयांची तापनिवृत्ति । करूनि विश्रांति देतसे ॥८६॥
यालागीं नरपति सुरपति । प्रेमें ललाटीं चर्चिती । पूज्य पावन परम भक्ती । वंद्य त्रिजगतीं चंदन ॥८७॥
तैसेंच दुर्जनीं करितां छलन । अथवा विपत्ति त्रितापजन्य । सज्जन समत्वें करिती सहन । धन्य पावन हरि तोषें ॥८८॥
सद्गुरुदास्य सच्छिष्यासी । समीं विषमीम दुर्घट क्लेशीं । नाना त्रासीं कां उपहासीं । शुद्धभावेशीं गुरुतुष्टि ॥८९॥
तैसीच जाणा पतिव्रता । अनन्यभावें भजे भर्ता । त्याचें वैगुण्य न मनी चित्ता । ते उभयतां कुळ तारी ॥१९०॥
इत्यादि कसितां उतरलीं कसीं । म्हणोनि अर्ह दृष्टांतासी । एथ तैसीच गोपिकांसी । कृष्णप्राप्तीसी योग्यता ॥९१॥
कृष्णें छळितां नानापरी । गोपी विशुद्ध अभ्यंतरीं । जेणें तुष्टला श्रीहरि । तें छलन अवधारीं कुरुवर्या ॥९२॥
कृष्णप्राप्तीसि करितां यत्न । ईषणादिकीं जें असहिष्ण । दैवी मानुषी विविध छलन । साहिल्यावीण फल कैंचें ॥९३॥
दृढ म्हणिजे अतिशयेंशीं । कृष्णें छळितां गोपिकांसी । परी साहती उत्साहेंशीं । प्रेम मानसीं निःसीम ॥९४॥
जें जें सकाम अनुष्ठान । तेथें अवश्य होय छलन । सहिष्णु पावे फळ संपूर्ण । कीं असहिष्णें कैवल्यें ॥१९५॥
परम सलज्ज स्त्रियांची जाति । लज्जेसाठीं प्राण देती । गोपींसी स्वमुखें श्रीपति । विवस्त्रस्मृति अर्पूनी ॥९६॥
तुम्हीं नग्न केलीं स्नानें । म्हणोनि सलज्जा केल्या स्मरणें । एथें येऊनि वस्त्रें घेणें । आग्रहें येणें कोंडिल्या ॥९७॥
तेणें उत्साहित मनीं । सांडवल्या पैं लज्जेंकरूनी । असत्य नोहे माझी वाणी । व्रतविधानीं उपहासिल्या ॥९८॥
गोपाळ जाणती म्हणोन । दिधलें साक्षिबाहुल्यस्मरण । नग्न येऊनि वसनग्रहण । शंका सांडूनि करवी त्यां ॥९९॥
आल्या जाणोनि कदंबातळीं । मस्तकीं ठेवूनि बद्धांजलि । प्रायश्चित्ताचेनि छळीं । त्यां वनमाळी उपहासी ॥२००॥
ऐशा छळिल्या नाना परी । लज्जा सांडविलीव दुरी । प्रस्तोभिल्या विनोदगजरीं उपहासोत्तरीं नाचविल्या ॥१॥
तरी गोपिका वाडेंकोडें । दोष न लाविती कृष्णाकडे । अभीष्ट मानूनि रोकडें । प्रेम गाढें हरिचरणीं ॥२॥
कांहीं आमुचा अपराध नसतां । वस्त्रें हरिलीं कां नंदसुता । ऐशी न करिती विरोधवार्ता । आनंदभरिता हरिसंगें ॥३॥
जैशी प्रथमगर्भिणी नारी । क्लेश साहे नानापरी । परमसंतुष्ट अंतरीं । प्रसूतिगजरीं पुत्रफळें ॥४॥
तैशा गोपी अभीष्टसुख । पावल्या म्हणोनि छळणें हरिख । तें वाखाणी वक्ता शुक । तो हा श्लोक परिसावा ॥२०५॥

परिधाय स्ववासांसि प्रेष्ठसंगमसज्जिताः । गृहीतचित्ता नो चेलुस्तस्मिल्लज्जायितेक्षणाः ॥२३॥

परमानंदें निर्भरचित्ता । अनुसरोनि कृष्णानुमता । घेऊनि स्ववसनें समस्ता । परिधान करित्या जाहल्या ॥६॥
वस्त्रें नेसूनि गोपकुमरी । परमप्रियतम पाहती हरि । कृष्णवेधें अभ्यंतरीं । गोष्टी दुसरी स्मरेना ॥७॥
लोह वेधे अयस्कांतीं । कीं पारदा मोही कृत्रिमयुवति । तेवीं स्ववेधें श्रीपति । वेधी निश्चितीं व्रजकुमारी ॥८॥
एवं प्रेष्ठसंगममात्रें । निश्चेष्ट जालीं गोपीगात्रें । अचेतन चळती सूत्रें । दारुयंत्रें परवशें ॥९॥
जैशा प्रियसंगमें करूनी । गोपी केल्या वशवर्तिनी । चित्तें घेतलीं हिरोनी । यालागुनी न चळती ॥२१०॥
हरीनें हिरोनि नेलीं मनें । यालागीं विषयपरिज्ञानें । हरिहित सबाह्य सर्वकरणें । विवर्तभानें सांडवलीं ॥११॥
कृष्णीं मात्र एकाग्र झाल्या । बाह्यप्रपंचा मूकल्या । सलज्जदृष्टी घनसांवळा । पाहती डोळां सप्रेमें ॥१२॥
बाह्यप्रपंचा लोप झाला । स्वरूपानंदही फावला । असामरस्यें भेद उरला । तेणें लाजला वधूनिचय ॥१३॥
विराम आराम कषाय भेद । इदंत्वादि रसास्वाद । लय विक्षेप पृथगानंद । इहीं स्त्रीवृंद सलज्ज ॥१४॥
पुढें पाहूं न कळे हरि । प्रपंचा मिथ्यात्वें बाहेरी । ऐसिये अवस्थेमाझारी । गोपकुमारी सलज्जा ॥२१५॥
सप्रेमकटाक्षबाणसुटी । प्रेष्ठोपलब्धि हातबोटीं । श्रोत्रीं नेत्रीं न फवे गोठी । तेणें हिंपुटी सत्रपा ॥१६॥
साधनयुक्ति याहूनि पुढें । पूर्वाराधनावीण न चढे । व्रत सुकृत विशुद्ध गाढें । तेणें निवाडें सुखलब्धि ॥१७॥
जेथवरी शिडियेच्या पायर्‍या असती । चढणारातें तोंवरी गति । ऊध्वगवाक्ष वरिला हातीं । ओढूनि घेती तै वळघे ॥१८॥
तेवीं होतां स्वरूपावबोध । सहज प्रपंचा होय बाध । चिन्मात्रैकरसास्वाद । सूक्ष्मभेद हा नसे ॥१९॥
एथ पूर्वील सद्गुरुभजन । विशुद्ध उपास्याराधन । निष्काम सविराग कर्माचरण । तों तें क्षीण तत्पुण्यें ॥२२०॥
भूपतीचा बाळमित्र । वियोगें झाला विपत्तिपात्र । पुन्हा सुकृप नृपाचे नेत्र । करिती स्वीकार आप्तत्वें ॥२१॥
तैंचि त्याची विपत्ति टळे । येर्‍हवीं श्रमोनि भूपाजवळें । गेलिया त्याचे अनोळख डोळे । तो नाकळे तन्मयता ॥२२॥
तैशी जाणोनि प्रेष्ठप्राप्ति । परंतु दुर्लभ संगावाप्ति । सलज्ज अचळा गोपयुवति । हें जाणे श्रीपति सर्वज्ञ ॥२३॥

तासां विज्ञाय भगवान् स्वपादस्पर्शकाम्यया । धृतव्रतानां संकल्पमाह दामोदरोऽबलाः ॥२४॥

गोपिकांची पूर्वस्मृति । कीं या निगमोत्तमांगश्रुति । ब्रह्मवरदें निर्जरयुवति । इये भागवतीं प्रसिद्ध ॥२४॥
अनंतकल्पें विरक्त यति । क्षमार्जवेंशीं तपःसंपत्ति । निष्काम सप्रेम भगवद्भक्ति । चित्सुखप्रपति अभिलाषें ॥२२५॥
त्या या गोपिका व्रतधारिणी । मदंघ्रिस्पर्शकामनेकरूनी । त्यांचा दृढ संकल्प मनीं । पूर्णज्ञानी हरि जाणे ॥२६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । अबाधित त्रिकालज्ञ । यालागीं तो श्रीभगवान । संकल्प जाणोन गोपींचा ॥२७॥
दाम बांधिलें असतां उपरीं । गुह्यकांतें जो उद्धरी । भक्तवत्सल तो श्रीहरि । सदय अंतरीं गोपींतें ॥२८॥
म्न्हणे आह्लादें दामोदर । तुमचा संकल्प जो मत्पर । मदर्चनातें अभ्यंतर । वांछी साचार सुभगांहो ॥२९॥

श्रीभगवान् उवाच :- संकल्पो विदितः साध्व्यो भवतीनां मदर्चनम् ।
मयाऽनुमोदितः सोऽसौ सत्यो भवितुमर्हति ॥२५॥

चिरकाळ तुम्हीं जो संकल्प केला । तोही म्यांचि अनुमोदिला । सत्य होऊं शके भला । विश्वास धरिला पाहिजे ॥२३०॥


N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP