मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २२ वा| श्लोक १६ ते २० अध्याय २२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ अध्याय २२ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर श्रीभगवान् उवाच - भवत्यो यदि मे दास्यो मयोक्तं वा करिष्यथ ।अत्राऽऽगत्य स्ववासांसि प्रतीच्छन्तु शुचिस्मिताः ॥१६॥हांसोनि बोले मधुसूदन । तुम्ही दासी हें सत्य वचन । तरी माझी आज्ञा अभिवंदून । एथें आगमन करावें ॥४३॥लब्धानंदें हास्यवदनें । स्वेच्छा घ्यावीं आपुलीं वसनें । शंका सांडूनि प्रशस्तमनें । आज्ञा करणें हे माझी ॥४४॥ततो जलाशयात्सर्वा दारिकाः शीतवेपिताः । पाणिभ्यां योनिमाच्छाद्य् प्रोत्तेरुः शीतकर्शिताः ॥१७॥ऐसें ऐकोनि कृष्णवचन । थरथरां कांपती शीतेंकरून । निघाल्या जलाशयापासून । आंग झांकुनि करयुग्मीं ॥१४५॥प्रबळ शीताची न सोसवे पीडा । यास्तव सांडूनि तिहीं व्रीडा । आज्ञापालनीं झाल्या दृढा । आल्या झडझडां हरीपाशीं ॥४६॥भगवानाह ता वीक्ष्य शुद्धभावप्रसादितः । स्कंधे निधाय वासांसि प्रीतः प्रोवाच सस्मितम् ॥१८॥ईषरारहित वसनाविणें । हर्याज्ञेतें निःशंकपणें । अनुसरल्या हें जगज्जीवनें । अंतःकरणें ओळखिलें ॥४७॥श्रीकृष्णाज्ञा वंदूनि शिरीं । लोकलज्जा सांडूनि दुरी । शुद्धभावें जळाबाहेरी । गोपकुमारी पातल्या ॥४८॥ऐसा आज्ञेसि देऊनि मान । शुद्धभावें श्रीभगवान । केला होत्साता प्रसन्न । परमामृतघन ओळला ॥४९॥भगवत्प्राप्तीचीं कारणें । योनि ऐसें तयासि म्हणणें । अच्छिद्र गोपींचीं कृतपुण्यें । पाहोनि कृष्ण तोषला ॥१५०॥गोपिकांचीं अंगद्वारें । अक्षत देखोनि जगदीश्वरें । तोष मानिला हें व्यासकुमारें । कथिलें म्हणतां न लाजिजे ॥५१॥झणें हें वाखाणिती अल्पज्ञ । म्हणोनि श्रीशुक परम सुज्ञ । ज्ञानवैराग्यादिगुण । श्लोकीं भगवान पदें वदला ॥५२॥त्रैलोक्यींचा त्रैकालिक । द्रष्टा सर्वज्ञ यदुनायक । कीमं नग्न अंग पाहोनि सम्यक अक्षतविवेक त्या कळला ॥५३॥ज्ञानैश्वर्यसंपन्न । आणि नग्न अंग विलोकून । अक्षत जाणें हें म्हणतां वदन । कुष्टीं होऊनि झडेना ॥५४॥अन्यकामनारहितमनें । स्वपर गोपींचीं व्रताचरणें । स्कंधीं ठेवूनि गोपीवसनें । हास्यवदनें बोलत ॥१५५॥यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता व्यगाहतैतत्तदु देवहेलनम् ।बद्ध्वांजलिं मूर्ध्न्यपनुत्तयेंऽहसः कृत्वा नमोय़्धोवसनं प्रगृह्यताम् ॥१९॥तुम्ही सकामा व्रतधारिणी । परंतु विवस्त्रा स्नानाचरणीं । प्रवर्तलां देहहेळणीं । पापकरणी हे तुमची ॥५६॥व्रतादेष्टा आदिपुरुष । साङ्ग असाङ्ग विदित त्यास । तो फलदाता श्रीपरेश । नेदी फळास हेळितां ॥५७॥लोभें अज्ञानें क्लेशभयें । प्रमादें जें न्यून होय । तोचि देवांचा परमान्याय । वृथा जाय तें कर्म ॥५८॥तुम्हीं नग्न केलें स्नान । तेणें घडलें देवहेलन । तदर्थ प्रायश्चित्ताचरण । करा संपूर्ण मद्वाक्यें ॥५९॥तेंही प्रायश्चित्त सोपें । निरसी देवावज्ञापापें । व्रतसाङ्गता सफळरूपें । मद्वाक्यदीपें वर्ततां ॥१६०॥मूर्ध्नीवरी बद्धांजलि । करूनि नमितां कदंबातळीं । व्रतवैगुण्या होय होळी । सफळितफळीं व्रतसिद्धि ॥६१॥ऊर्ध्वहस्तें बद्धांजलि । नमन करूनि कदंबातळीं । आपुलीं वसनें घ्या हो सकळी । म्हणे वनमाळी सस्मित ॥६२॥ऐसें बोलतां मधुसूदन । गोपी सकंपा रहितवसन । व्रतवैगुण्यनिरसन । अलोट आज्ञा मानिती ॥६३॥इत्यच्युतेनाभिहितं व्रजाबला मत्वा विवस्त्राप्लवनं व्रतच्युतिम् ।तत्पूर्विकामास्तदशेषकर्मणां साक्षात्कृतं नेमुरवद्यमृग्यतः ॥२०॥अच्युताचें अच्युतवचन । व्रजअबळांहीं ऐकोनि पूर्ण । नग्नस्नानें व्रतवैगुण्य । सत्य मानूनि शंकल्या ॥६४॥तया व्रतादि अशेषकर्मा । माजीं जोडल्या अनेक जन्मा । तया सद्गुणपूर्तिकामा । पुरुषोत्तमा वंदिती ॥१६५॥अशेषसत्कर्मांचें फळ । तो हा श्रीकृष्ण प्रणतपाळ । वैगुण्यमार्जक केवळ । नमिती तत्काळ फलदाता ॥६६॥यज्ञादिकें कर्माचरणें । प्रमादें घडलीं अंगहीनें । साङ्ग होती ज्याच्या स्मरणें । याकारणें पापमृक् ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP