श्रीगोपालकृष्णाय नमः । गोविंदसद्गुरुकृपादृष्टि । केवळ कैवल्यसुखाची वृष्टि । शुद्धसुकृतसंग्रहकोटी । तैं ते पुष्टि त्याजोगी ॥१॥
येरा अवघड कानडें । उघड प्रेमचि नावडे । म्हणोनि विषयांचिये चाडे । सदा वावडे भवस्वर्गीं ॥२॥
विसरोनियां निजात्मठेवा । करी अन्यत्र वैभवहेवा । स्वार्थें भजोनि देवीदेवां । धांवा पावा म्हणतसे ॥३॥
आपुली आपणामाजीं चोरी । होय नसतां सुकृत पदरीं । यालागीं सुकृतीं तो सिदोरी । नित्य आदरी स्वसुखाची ॥४॥
सत्य विसरोनि असत्य भरी । तोचि दुष्कृति दुराचारी । सत्यसंग्रहें असत्य वारी । तो निर्धारीं पुण्यात्मा ॥५॥
आपुलोनि अनित्य पालटे । नित्यवस्तूचें करी साटें । तैंचि त्याचें सुकृत भेटे । दुष्कृत आटे कामना ॥६॥
तैं देहव्यापार श्रुतिसंमत । परंतु इहामुत्रार्थीं विरक्त । ईश्वराज्ञेतें अतंद्रित । तैं ते सुकृत निष्पादी ॥७॥
आज्ञाभंग तें दुष्कृत । आज्ञापालन हें सुकृत । येर विधीचा वृत्तांत । पाहतां अंत न लागे ॥८॥
एवं इहामुत्रप्रद । तें सुकृतचि विरुद्ध । विषयलोभें करी बद्ध । जें निषिद्ध सकाम ॥९॥
सविषभोजनें क्षुधा हरणें । पाकीं प्राणें अंतरणें । तेवीं इहामुत्रार्थ सुकृताचरणें । जन्ममरणा न चुकती ॥१०॥
मित्र आणि जो घे प्राणें । तरी शत्रुपणा कायसें उणें । सुकृत करोनि नरकीं पचणें । दुष्कृत म्हणणें कां ना त्या ॥११॥
ऐशीं पापात्मकें पुण्यें । करिती वेदाज्ञेप्रमाणें । आपुलेनि सकामपणें । नरक भोगणें चुकेना ॥१२॥
निष्कामकर्में ईश्वरभजन । सविश्वासें विहिताचरण । तैं तो होऊनि सुप्रसन्न । ओपी साधनचतुष्टय ॥१३॥

॥ श्लोकसंमतिर्योगवासिष्ठे ॥
यावन्नानुग्रहः साक्षाज्जायते परमेश्वरात् । तावन सद्गुरोः प्राप्तिः सच्छास्त्रश्रवणे रतिः ॥१॥

प्रसन्न न होय परमेश्वरु । तोंवरी न भेटे सद्गुरु । येर भेटे गुरूंचा भारु । जो संसारदायक ॥१४॥
परमेश्वराचिये कृपेवीण । सहसा नावडे सच्छास्त्रश्रवण । चौदा विद्या नवरस पूर्ण । अध्यासेंवीण उमजती ॥१५॥
ईश्वरानुग्रहें सद्गुरुप्राप्ति । साधनचतुष्टयसंपत्ति । प्रबोधें बाणे आत्मस्थिति । फार व्युत्पत्ति न करितां ॥१६॥
ब्रह्मावबोधें निश्चयात्मक । वृत्ति उपरमे स्वरूपोन्मुख । विवर्तरोधें चिन्मात्रसुख । नित्य निर्दोष स्वतःसिद्ध ॥१७॥
शुद्धसुकृत यया नांव । येर दुष्कृत विषयमाव । येणें सुकृतें सद्गुरुराव । दास्य सद्भाव उपजवी ॥१८॥
नरदेह धरूनि करणें कृत्य । तें इतुकेंचि जाणिजे सत्य । इतुकें केलिया कृतकृत्य । म्हणोनि सुकृत या नांव ॥१९॥
ऐशिया शुद्ध सुकृतकोटी । भाग्यें असती जरी गांठीं । गुरुदास्याची आवडी पोटीं । कृपादृष्टि तैं होय ॥२०॥
झालियाही सद्गुरुप्राप्ति । झालियाही ज्ञानसंपत्ति । परी गुरुकृपा न चढे हातीं । दास्यीं रति जंव नुपजे ॥२१॥
शतमखें इंद्र होती जाती । इंद्रश्रीची अगम्य स्थिति । तैसे गुरु अनेक भेटती । गुरुकृपाप्राप्ति बहुपुण्यें ॥२२॥
अवो सद्गुरु कृपादृष्टि । मी तान्हुलें तुझ्या पोटीं । पूर्णस्नेहची करूनि वृष्टि । सप्रेमपुष्टि वाढवीं ॥२३॥
अद्वैतसुखाची ओंवाळणी । करूनि द्वैतें सद्गुरुचरणीं । दास्यसुखाचीं लेववीं लेणीं । माझी धनी बाणे तों ॥२४॥
माझीं सप्रेमें सर्वही करणें । गुरुदास्यांचीं अलंकरणें । लेती ऐसें तुवां करणें । अंतःकरणें तुजमागें ॥२५॥
तूं स्नेहाळ अत्यंत जननी । ऐकोनि लडिवाळ विनवणी । माझे आवडीची पुरवीं धणी । लोटांगणीं तुज वंदीं ॥२६॥
आपुल्या अपांगस्नेहपल्लवें । झांकूनि संतोषें स्तन्य द्यावें । चिद्रसपानें मी सुखावें । पुष्टि यावी प्रेमाची ॥२७॥
येर अपवर्गादि जीं जीं सुखें । भवभीरवें मागती मूर्खें । मज निववाएं दास्यें एकें । सप्रेम पोषे तें करीं ॥२८॥
सद्गुरुदास्यनिमेषासाठीं । कैवल्यसुखही लागल्या पाठी । तेणें माझी न झाके दृष्टि । ऐशी पुष्टि तूं करीं ॥२९॥
कैवल्यसुखाची ओंवाळणी । करीन सद्गुरुदास्याचे क्षणीं । ऐशी माझिये अंतःकरणीं । निश्चयकरणी पैं तुझी ॥३०॥
सर्व सुखांचा कळवळा । एकवटूनि आपुल्या डोळां । स्नेहें अवलोकीं मज बाळा । ग्रंथसोहळा दाखवीं ॥३१॥
ऐशीं लडिवाळ कलभाषणें । कळवळूनि स्नेहाळपणें । अवलोकितां सुखाचें लेणें । सर्वही करणें लेइलीं ॥३२॥
मग म्हणे बाळा सप्रेमळा । घेईं कृपामृतगळाळा । तेणें तोषें तोषवीं सकळां । ग्रंथ मोकळा विस्तारीं ॥३३॥
श्रीमद्भागवत अपार । त्यामाजीं अठरासहस्र सार । त्यांतही दशमस्कंध निजसार । जन्मचरित्र हरीचें ॥३४॥
त्यामाजीं हा सप्तमाध्याय । प्रश्न करील उत्तरातनय । तये कथेचा अन्वय । कथिता होय ममाज्ञा ॥३५॥
ऐशी आज्ञा धरूनि मुकुटीं । वंदूनि सद्गुरुकृपादृष्टि । शुक बोलिला ते परिपाटी । टीका मर्‍हाठी अवधारा ॥३६॥
सप्तमाध्यायीं निरूपण । शकटतृणावर्तभंजन । मातेसि विश्वरूपदर्शन । प्रकटी जृंभण करूनि ॥३७॥
परीक्षितीचे पंक्तिकर । श्रवणामृताचे जेवणार । शुद्धमानसश्रोत्रपात्र । मांडूनि सादर ते होत ॥३८॥
ऐकोनि पूतनामोक्षण । परीक्षितीचें अंतःकरण । विस्मयानंदें दाटलें पूर्ण । शुकासि प्रश्न तो करी ॥३९॥
कथूनि कीर्तनरसविशेष । श्रवणसुखाचा फलादेश । प्रश्नामाजीं ओपी तोष । प्रश्न निर्दोष तो ऐका ॥४०॥


N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP