श्रीकृष्ण कथामृत - बारावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( मनोरथपूर्ति )

व्योमानिलानलजलावनि सोमसूर्य
होत्रीभिरष्ट - तनुभिर्जगदेक नाथः
यस्तिष्ठतीह जनमंगलधारणाय
तस्मैनमोस्तु निरपेक्षहृदे शिवाय ॥१॥
ज्ञानप्रेमपुटांत मौक्तिक निघे भक्तीचिया शिंपलीं
बांधी ज्यास गळ्यांत वत्सलपणें तीं श्री विठूमाउली
भक्ताचार्य खरेच जे उभविती पंजाबदेशी ध्वज
त्या श्रीसद्गुरुनामदेव चरणीं ठेवी शिरा मी निज ॥२॥
वानामे किति कैसे वाचें
वसंत वैभव रैवतकाचें
तरुणपणाचें रसरसलेला
दिसे जसा युवराज निराळा ॥३॥
तांबुस कोमल तरुचीं पानें
शोभविती केशरी उटीनें
जाई जुइ मालती नवाळी
फुलें सुगंधी भूषण घाली ॥४॥
पुष्पराज पाचूंत खुलावा
सुवर्ण चांफा तसा दिसावा
खरेंच समजुन मणी तयासी
भ्रमर न येई जवळ मधूसी ॥५॥
प्रथम पदें पळसावर पडली
वसंत शोभा जयीं उतरली
म्हणुनी लाली येत फुलांतें
रक्त अशानें कवण न होतें ॥६॥
किरण पिउन आरक्त रवीचे
हर्ष फुलें जणु मुखीं लतांचे
दंव बिंदूंचें झालें मोतीं
न कळे कसली किमया होती ॥७॥
प्रतान पसरुन कोमल वेली आलिंगिति वृक्षांतें
पतिच्या आधारें जणु युवती सुखकर जीवन जगतें ॥८॥
कांत टाकिलेल्या सर्पासम
तेज दिसे त्या गिरिचें अनुपम
विपुलधनाच्या लाभें सहसा
प्रसन्न निर्धन गुणिजन जैसा ॥९॥
रान पांखरांची मधु किलबिल
अति सुख दे परि त्यांतहि कोकिल
बहुविध वाद्यांच्या समुदायी
सारंगी जणु सुखकर होई ॥१०॥
उसळत अदळत शिलांशिलावर
खळखळ करिती मंजुळ निर्झर
दरींत लपती मधेंच कोठें
लपंडाव कीं खेळति वाटे ॥११॥
लोभ धरूनी आम्र फलांचा
फिरे नभासी थवा शुकांचा
उत्सवार्थ जणु काय वसंतीं
छत दिधलें हें हिरवें वरतीं ॥१२॥
प्रणय चंचला - भ्रू ललनेची
तशा मनोहर उठती वीची
डुलती कमलें हृदयें कीं ही
रसिक मनासी उमगत नाहीं ॥१३॥
सरोवरीं नच समावली का म्हणुनी कुंजलतासी
गिरिकुहरीं वा वृक्षतलीं ये प्रसन्नता कमलासी ॥१४॥
तसें न हो हें पुरजन सगळे
जेथें द्वारावतिचे जमले
मदनोत्सव साजरा कराया
सवें घेउनी श्री यदुराया ॥१५॥
सात्यकि उद्धव विपृयु विदूरथ
चारुबाहु, प्रद्युम्न भीमरथ
भैमी, भामा सती रेवती
शुभा सुभद्रादिक युवयुवती ॥१६॥
प्रसन्न चित्तें विलास नाना
कला नृत्य संगीत तनाना
परस्परां कुणि उटणीं लावी
फुलें कुंतलांतुन माळावी ॥१७॥
सनाल कमलें घेउन हातीं
चिंब करावी जलें प्रिया ती
चषक करावे रिते सुरेचे
कुंज फिरावे रानफळांचे ॥१८॥
असे सकलही गिरिवरती त्या रंजविती चित्ताला
सूर्य टेकला अस्तगिरीवर रंग उत्सवा चढला ॥१९॥
रविकिरणांचा झोत सुवर्णीं
मेघांमधुनी उमटे गगनीं
दृश्य मनोरम वाटत होतें
येत कल्पना रसिक मनांते ॥२०॥
चित्रकार रवि या जगताचे
पद्मपत्र घनरूप तयांचें
त्यांत खोचिल्या वर्णशलाका
सरल्यावर निज कार्य जणूं का ॥२१॥
मावळतीचे उरले अंशुक
धारण करिती श्याम बलाहक
शोभा भासत करुणरम्य ती
विभक्तवसना नलदमयंती ॥२२॥
प्रदोष - लोहित - रंग निमाला
नभीं चमकती मग उडुमाला
डमरूयंत्रा जडले साचे
उडुनी हिंगुळ कण पार्‍याचे ॥२३॥
झिरझिरीत रेशमी पटासम पसरे प्रभा शशीची
दिसे वनश्री रम्य तयांतुन नवयुवती परि साची ॥२४॥
लक्ष सुभद्रा वेधुन घेई
सुंदरशा त्या जन समुदायीं
शुक्राची चांदणीच जैसी
असुन तारका विपुल नभासी ॥२५॥
यौवन अजुनि न पुरे विकसलें
अरुणोदयिची जणुं का कमलें
कोमलता पाहुन अंगाची
शिरीष सुमनें कठोर साची ॥२६॥
सरळ नासिका सतेज डोळे
ओठ जणूं का दाडिम फुटले
गाल लालसर भिवया रेखिव
विपुल कुंतला शोभा अभिनव ॥२७॥
उरोज उन्नत सिंहकटी ती
कृशोदरीं त्रिवली खुलताती
अंक तियेचे धरिती शोभा
सुवर्ण केळीचा जणु गाभा ॥२८॥
खुले चंद्रिका जललहरीवर
लालडीस ये कांती सुंदर
मोहक वसनांनीं त्यापरि ती
वरतनु रमणी शोभत होती ॥२९॥
हरिभगिनी ती अशी सखीसह खेळत नर्म विनोदें
तेजस्वी कुणि तरी प्रवासी निरखी दुरुनी मोदें ॥३०॥
तदाकृतीसी साजत नव्हता
वेष तयें जो धरिला होता
वीर तपवी म्हणु का भार्गव
छटा विलासी परि नयनीं लव ॥३१॥
उंच भव्य ती शरीर - यष्टी
खांद्यावर धनु भाता पृष्ठीं
विशाल उन्नत भरली छाती
भुजा दीर्घ मांसल, दिसताती ॥३२॥
रम्य सांवळा वर्ण घनासम
तेज अलौकिक सुचवी विक्रम
तापस वेषा धरी विसंगत
बघे सुभद्रा - विलसित विस्मित ॥३३॥
संगीता स्वर्गीय भुलावें
निश्चल त्यानें तसें असावें
रातराणिच्या मदगंधा वा
मोहित झाला तसा दिसावा ॥३४॥
वदत सुभद्रा रम्य कितीही वनस्थलीं या शैली
इथेंच गमते सदा करावी उत्सव कार्यें सगळी ॥३५॥
हांसुन गाली म्हणे सुवेषा
“ बरी तुझी ही कळे मनीषा
करीन विनती मी बलदेवा
लग्नोत्सव येथेंच करावा ” ॥३६॥
“ खरेंच कां गे सर्वहि ठरलें ”
“ काय न तुजसी अजुनी कळलें ?
पदवी भारत सम्राज्ञीची
सखीस आपुल्या मिळावयाची ॥३७॥
राजेश्वर दुर्योधन यासी ”
तोच भामिनी रोधी तिजसी
बोल न पुढती एकहि अक्षर
मग कवणातें इच्छित अंतर ॥३८॥
“ लोभविती नच वैभव सत्ता
मोह गुणांचा पडतो चित्ता
पराधीन मी लाभ न बोलुन
रूचे वृद्धx या तीर्थाटन ॥३९॥
दुःखित हर्षित शंकित चित्तें इकडे व्यथित प्रवासी
भक्तवरद हरि उभा राहिला येउन तो पाठीसीं ॥४०॥
सस्मित ठेवी कर तत्पृष्ठीं
दचकुन मनिं तो वळवी दृष्टी
बघतां हरिसी तच्चरणावर
विनम्र भावे वांकविलें शिर ॥४१॥
प्रेमभरें त्या धरिले पोटीं
एक तपानें ही तव भेटी
गंहिवरूनी तो वदे प्रवासी
ओळखिलेंसी मज हृषिकेशी ? ॥४२॥
विचारिसी हें कैसें अर्जुन
जाइन मी मग मलाच विसरुन
त्यांतुन बघण्या उचलुन पाते
धजे दुजा का मम भगिनीते ॥४३॥
चुकलों कृष्णा मला क्षमा कर
बावरलें मम खरेंच अंतर
मर्यादेचें भान न उरलें
हरिनें त्यावर हांसुन म्हटलें ॥४४॥
छे छे सखया क्षमा कशास्तव उलट इष्ट मजसी हें
सुभद्रेस तरि कोण तुझ्याविण साजेसा वर आहे ॥४५॥
दादांनीं परि सुयोधनातें
देण्याचें योजियलें हीतें
म्हणुनी हित तूं हरूनी नेई
क्षत्रियास उचिता रीती ही ॥४६॥
इच्छित तेंची मम भगिनीचें
कारण नाहीं लव शंकेचें
मनांतुनी अनुरक्ता युवती
पराक्रमी पुरुषावर असती ॥४७॥
पार न विजयाच्या हर्षासी
बघे चाचपुन निज बाहूसी
अधरा किंचित चावुन दातीं
श्वास घेतला भरूनी छाती ॥४८॥
दुसरे दिवशीं परतायाची
एकच धांदल हो सकलांची
संधी पाहुन धनंजयानें
सुभेद्र्स उचलिले बळानें ॥४९॥
रथावरी चढवुनी ती ललना प्रत्यंचा धनुवरती
निघे त्वरेनें वीराग्रणि मग परिजन ओरड करिती ॥५०॥
आनंदांतहि छटा भयाची
चंचल वृत्ती हो रमणीची
तदा सुभद्रा दिसे मनोरम
उदयापूर्वीं पूर्व दिशे सम ॥५१॥
गोंधळ उडवी अवचित घटना
शस्त्र सावरी यादव - सेना
लाल जाहला इलधर सारा
खैराचा जणु काय निखारा ॥५२॥
भीम - गर्जना घुमें नभातें
कापे भूतल चरणाघातें
कुठे चोर तो उद्धट अर्जुन
मुसळा घातें करितो कंदन ॥५३॥
गरुडध्वज परि दिसला नाहीं
राम मानसी शंकित होई
सहाय्य आंतिल असल्यावरतें
काय वेळ घर फुटावयातें ॥५४॥
वैद्य आपुली आज्ञा दादा कृष्ण वदे परि कांहीं
क्षत्रिय धर्मा सोडुन अनुचित घडलें वाटत नाहीं ॥५५॥
असेंच केलें आपण मागें
अतांच का मग येतां रागें
सुयोधनाहुन माझा अर्जुन
श्रेष्ठ सर्वथा आहे शतगुण ॥५६॥
युद्धीं करि त्याचा प्रतिकार
कोण दुजा वगळिल्यास शंकर
प्रिया सुभद्रा वांच्छीत हेची
दैना करिता काय तियेची ॥५७॥
वृत्ती निवली बलरामची
बरें खरें होउं दे तुझेंचि
लिखित विधीचें कुठुन चुकावें
जा त्या सत्वर घेउन यावें ॥५८॥
करुन महोत्सव बहु थाटानें
विधिपूर्वक मग बलरामानें
दिएले सुभद्रा अर्जुन हातीं
हर्ष सागरा आली भरती ॥५९॥
बोळविलें त्या सन्मानाने विपुल धनें अर्पुनिया
विनवी भगिनी पाठराखणी तूंच येइ यदुराया ॥६०॥
तसाच आग्रह धरीत अर्जुन
सवें निघे मग शशिकुल भूषण
मोडवतें ना प्रिय - शब्दातें
सार गर्भ जणु लोहाहुन तें ॥६१॥
इंद्रपस्थीं अति हर्षानें
केले स्वागत युधिष्ठिरानें
द्वारावतिपति दे आलिंगन
वधुवर करिती सलज्जवंदन ॥६२॥
कुरवालुन मुख धरुन उरासी
वत्सल कुंती देत शुभाशी
नववधुसी पाहुन पांचाली
परिहासें अर्जुना म्हणाली ॥६३॥
दुजा तिढा पडतां भार्‍याते
पहिले बंधन ढिलेंच होतें
नवीं भूषणें येतां हातीं
धूळ साचते पहिल्या वरतीं ॥६४॥
तसे न होवो, ऐकून अर्जुन सस्मित उत्तर देई
मुरलेल्याची सरी कदापि न नव्या आसवा येई ॥६५॥
फार दिसाच्या प्रिय भेटीस्तव
धर्मे केला थोर महोत्सव
श्रीकृष्णाच्या प्रिय सहवासी
नित्य नवा ये बहर सुखासी ॥६६॥
मय - निर्मित - मंदिरांत सुंदर
असतां हरिसह भूप युधिष्ठिर
वदत तयासी एके दिवसीं
“ राजसूय करूं कां हृषिकेशीः ” ॥६७॥
नारद म्हणती कर हें राया
परलोकीं पितया सुखवाया
होय म्हणालों करण्या राजी
शक्य परी हें होईल का जी ॥६८॥
गमेल मत्सर सकलहि भूपा
यज्ञाचा या मार्ग न सोपा
म्हणुन याचा विचार तूं कर
उड्या आमुच्या तुझ्या बळावर ॥६९॥
तुझीच कृपा म्हणुनीच भोगतों वैभव हे इंद्राचें
तूं पाठीसी असतां अवघड वाटत नाहिं कशाचें ॥७०॥
फारचि उत्तम अत्यानंदें
शब्द काढिले तदा मुकुंदें
अवश्य करि हा राजसूर्य तूं
त्रिखंड कीर्तीचा जो हेतु ॥७१॥
साधतील कीं अनेक गोष्टी
लवहि न व्हावें मनांत कष्टी
प्रयत्नास नच अशक्य कांहीं
तव भाग्यासी उणीव नाही ॥७२॥
यज्ञ न हा सम्राटपदाविण
मगधेश्वर ही तयास अडचण
धरुनी हेतू नरमेधाचा
जयें बंधिला गण राजांचा ॥७३॥
अपार त्याच्या बलसंभारा
द्वंद्वयुद्ध हा एक उतारा
यास्तव घेउन भीमार्जुन मी
स्वयेंच जातो बघ या कामी ॥७४॥
वेळ न लावावा शुभकार्या धर्मा यास्तव अंगें
मगधपुरा जायाची अमुची करी सिद्धता वेगें ॥७५॥
आज्ञा हरिची वंद्य मानिली
सर्व सिद्धता धर्में केली
वदे देत हें बंधू माझें
तुझ्या करी प्रिय जीवाहुन जें ॥७६॥
अग्नि तीन जणु दीप्त जहाले
तसे वीर पूर्वेंस निघाले
कानन सरिता गिरि ओलांडित
सरोवरांच्या शोभा लक्षित ॥७७॥
मगधीं आले ब्राह्मणवेषी
अद्वारें मग राजगृहासी
जरासंध मनिं शंकित झाला
पुसे कोण तुम्हि कां तरि आलां ॥७८॥
तेज तुमचे गमें निराळें
सत्य वदसि भगवान म्हणाले
वासुदेव मी हे पृथुनंदन
परमविक्रमी भीम नि अर्जुन ॥७९॥
स्वागतपूजा नको अम्हासी दे भिक्षा युद्धाची
द्वंद्व तिघांतुन कुणासवें कर कीड मरो जगताची ॥८०॥
वदे जरासुत दर्पे दुःसह
भीम बरा हा लढतो यासह
उसळुनि केला गर्ज भयंकर
कल्पांतीचा जणु का सागर ॥८१॥
मत्त गजासम देती धडका
प्रलय मेघ जणु आदलती का
पुरजन ते बघती भय कंपित
लोळविला शेवटीं जरासुत ॥८२॥
अमर वर्षती फुलें अपार
बंधमुक्त नृप जयजयकार
उपकारासी धरुन शिरातें
सर्वहि झालें अनुयायी ते ॥८३॥
जरासंधसुत सहदेवासी
बसवी राज्यावर हृषिकेशी
युद्ध घडे हें खलनाशास्तव
धन सत्तेचा लोभ नए लव ॥८४॥
वदे हरी धर्मास येउनी विजयासह माघारी
दिग्विजयासी अतां सुखें जा निष्कंटक भू सारी ॥८५॥
भीमें वधिले मगधेशासी
कृष्णबळावर हें सकळासी
कळतां बहुता सुख हो निर्भर
भय सर्वासी कुणास मत्सर ॥८६॥
धर्म पाठवी दिग्विजयातें
चहुबंधूंना चार दिशातें
बाळेष्ठ बाहू जणु विष्णूचे
भीमार्जुन नी सुत माद्रीचे ॥८७॥
बहुत नृपानी वाकवुनी शिर
अर्पण केला निजकरभार
बळें दंडिले परि ते राजे
झाले उद्धट गर्वभरें जे ॥८८॥
यश संपादुन चार दिशांतुन
पय जनु कां गाइच्या सडांतुन
अर्थ संपदा बहु मेळविली
चहु वाणींतुन जणु त्या कालीं ॥८९॥
कुबेर भासे रंक असे धन गिरिसम तेथें पडलें
जमले कौरव यादव तेवीं नृणगण मुनिजन आले ॥९०॥
वे द शा स्त्र सं प न्न वि प्र ग ण
याज्ञवल्क्य धौम्यादिक मुनिजन
व्यास निदेशें यज्ञा बसले ’
मन अग्नीचें प्रसन्न झालें ॥९१॥
दिधली वाटुन कामें नाना
बघून योग्यता सर्वजणानां
उणीव जेथें पडेल कांहीं
उभा त्या स्थलीं श्रीहरि राही ॥९२॥
उच्चनीच नच म्हटलीं कामें
विप्रपदांसीं धुतलें प्रेमें
सादर काढियलींही उष्टीं
निजभक्तास्तव हरि नच कष्टी ॥९३॥
राजसूय - मख - दिक्षित धर्मा
बधुनी गंहिवर आला भीष्मा
सार्थक झालें मम विद्येचे
द्रोणाचार्या गमले साचें ॥९४॥
यज्ञधूम तो पावन भिंगल घोष श्रुतिमंत्राचा
पुण्यविभव ते अपूर्व गाया शक्त न अनंतवाचा ॥९५॥
विप्र दक्षिणें देव हवेनें
तृप्त जाहले याचक दानें
अपूर्व सन्मानानें नृपगण
मिष्टान्नें सेवून इतरेजन ॥९६॥
हविर्धूम - निर्धूत - मनो - मल
सकलहि झाले परि शिणले खल
पांडवकीर्ति श्रवुन अलौकिक
मत्सर करिती सुयोधनादिकि ॥९७॥
यज्ञोत्सव तो संपत आला
सत्कारा आरंभ जहाला
भव्य सभागृह फुलुनी गेलें
स्वर्णासन सर्वां दिधलेलें ॥९८॥
नृत्य - वाद्य - संगीत - कलांनीं
तोषविले सर्वा कुशलांनीं
नंतर राहुन उभा युधिष्ठिर
विनती भीष्मा करीत सादर ॥९९॥
पितामहा मज आज्ञा व्हावी पूजूं प्रथम कुणासी
सद्गुणमंडित सर्वहि म्हणुनी विकल्प ये चित्तासी ॥१००॥
सर्व सभासद उत्सुक चित्तीं
खिळली दृष्टी भीष्मावरतीं
गांगेयाची गिरा जशी का
स्वयंवरातिल शुभा कन्यका ॥१०१॥
प्रसन्न परि गंभीर जसा घन
भीष्म तसे मग करिती भाषण
योग्य पूजना पूर्ण विचारीं
सर्वोत्तम गोविंद मुरारी ॥१०२॥
साधुसाधु हा योग्य निवाडा
वेदहि याचा गात पवाडा
सुख होउन बहु सज्जन वदले
पांडव हर्षा हृदय न पुरलें ॥१०३॥
भीष्म गिरा परि हो ठिणगी ही
जणु कोठारी ज्वालाग्राही
शिशुपालादिक जे जळफळले
ते या वचने भडकुन उठले ॥१०४॥
चळले बुद्धि भीष्माची या ? सर्प ओकला गरळा
काय पाहुनी या गवळ्यासी मान तुम्ही हा दिधला ॥१०५॥
मान न शोभे वडिलपणाचा
बसला येथें पिता तयाचा
योग्य न हा आचार्य पदासी
गुरु द्रोण आहेत सभेसी ॥१०६॥
ज्ञानी ऐसें म्हणाल या जर
व्यास इथें हे वेदविदांवर
शौर्य असे कीं विदित जगाला
हा मथुरा सोडून पळाला ॥१०७॥
विप्र न हा नच वृद्ध न ऋत्विज
धरुं नच शकतो छत्र शिरीं निज
प्रिय तुमचा म्हणुनी यां भजतां
थोर अम्हासम येथें असतां ॥१०८॥
सोडुन देतां गरुड मयूरा
घुबडाच्या करितां बडिवारा
काय असा अपमान कराया
पाचारण आम्हास मखीं या ॥१०९॥
फूत्कारें या शिवशिव म्हणती बुधजन, हसले पापी
राजसू य शेवटा सुखानें जात नसेच कदापी ॥११०॥
भीष्में धिक् म्हटलें शिशुपाला
टाकिलें न परि शांतपणाला
डोकें तव दिसतें न ठिकाणीं
म्हणुन अमंगळ वदसी वाणी ॥१११॥
थोर असूं दे कुणी कितीही
श्रीहरिची सर तयास नाही
इतर आम्र वा चंपक चंदन
कल्पतरू हा परि यदुनंदन ॥११२॥
विशाल याचें ज्ञान शिवासम
विष्णु तसा हा अद्भुत विक्रम
सागर जणु हा ऐश्वर्याचा
असे रक्षिता भयभीतांचा ॥११३॥
धरी कौतुकें मानव वेषा
म्हणुन उणें नच मान परेशा
वंद्य सेव्य हा सुरासुरातें
काय आमुची वार्ता तेथें ॥११४॥
मूर्खाची या बडबड धर्मा आणु नको चित्तासी
अर्घाहरणी अग्रमान दे विशंक यदुनाथासी ॥११५॥
भाषण हें झोबलें खलाला
क्रोध विलक्षण ये शिशुपाला
भकूं लागला अद्वातद्वा
भानरहित मद्यपी जसा वा ॥११६॥
भीष्म दिसे हा पुरता वेडा
म्हणुन गाढवा म्हणतो घोडा
अधम दुजा ना या काळ्याविण
जवळी वसती सर्वहि दुर्गुण ॥११७॥
कपट हाच कीं धर्म जयाचा
वेदपठण हें असत्य - वाचा
कर्म जयाचें दुष्टपणा हें
परोत्कर्ष या लवहि न साहे ॥११८॥
कंसाचा वध कपटें केला
स्त्रियांसही हा घातक झाला
धरीत पौंड्रक यत्समवेषा
तयांस वधिले करुनी द्वषा ॥११९॥
भ्याड मूर्ख शठ दुरात्म्यास या परमात्मा म्हणताती
त्याच्या मागुन मंदमतीचे इतर आंधळे जाती ॥१२०॥
मान्य करी तूं धर्मा माझें
तेंची होइल तुझ्या हिताचें
शाल्व भूप दुर्योधन वा मी
अधिकारी या पूजन कामीं ॥१२१॥
भीष्माची या कुजली बुद्धी
स्तवितो नीचा शठास वंदी
सहन न झाले वच भीमातें
हात घातिला तयें गदेतें ॥१२२॥
आवरती परि भीष्म धरुन कर
भीमा धरणें शांती क्षणभर
समर्थ माधव, करि तो साची
गणती याच्या पराधांची ॥१२३॥
घडा पुरा भरतां पापाचा
बंद सदाची होईल वाचा
पुण्य शेष या अपशब्दांही
सरुनी जाया विलंब नाहीं ॥१२४॥
आयू उरले पळची कांहीं या अधमाचें भीमा
मरणें मरती दुष्ट आपुल्या मग कां कोप करा मा ॥१२५॥
शिशुपालाच्या संतापासी
पार न उरला या वचनासी
ठेचुन दगडानें मारा रे
थेरड्यास या मिळुनी सारे ॥१२६॥
गर्व जाहला पंडुसुतांनां
षंढासम सहता अपमाना
उठा वीर हो या वाक्याहीं
दुष्ट नराधन चळले कांहीं ॥१२७॥
अर्जुन - धनु परि बघतां चढलें
शौर्य तयांचे मनींच जिरलें
गजशुंडेसम बळकट बाहू
भीमाचे नच शकले पाहूं ॥१२८॥
भीषं म्हणति मी इच्छा - मरणी
रोम वक्र करुं शके न कोणी
अम्ही पूजितो इथें चक्रधर
करा विरोधा बल असलें तर ॥१२९॥
खवळुन धांवे खल कृष्णावर निर्लज्जा पशुपाला
पूजन घेसी वृद्ध - सभेसी हरितों तव गर्वाला ॥१३०॥
उठुन सिंहसा निजासनाहुन
पुरूषोत्तम हरि करीत भाषण
वचन दिलें मी तव मातेला
आज संपलें तें शिशुपाला ॥१३१॥
क्षमाच केली शत अपराधा
दोषांची मज अतां न बाधा
चिडला खल तो हरिवचनें या
क्षुद्रा पुरते निमित्त वायां ॥१३२॥
आहे ठाउक तुझा पराक्रम
चिरडुन टाकिन तुला किड्यासम
मथुरेशाचा मगधेशाचा
सूड उगवितों कपटवधाचा ॥१३३॥
वदुन असें खल शस्त्र उगारी
स्तंभित झाली परिषद सारी
सुदर्शनानें तोंच हरीचे
उडवियलें शिर नराधमाचें ॥१३४॥
अमर्याद जे मदांध होती विसरुन नय - नीतीतें
निज कृत्याचें असेंच भीषण लाभतसे फल त्यांतें ॥१३५॥
कोसळतां सुत दमघोषाचा
सज्जन करिती स्तव जयवाचा
प्रशंसिले माधवा मुनींनीं
जळती परि ते खल जन मानी ॥१३६॥
जगदीशा मग युधिष्ठिरानें
सादर नमिलें प्रेमभरानें
अर्घ्यपाद्य अर्पिले समंत्र
जल धरिलें तें शिरीं पवित्र ॥१३७॥
यथाधिकारें यथाक्रमानें
पूजियलें सकलां सन्मानें
धृतराष्ट्रासह निजबंधूंचा
विशेष आदर केला साचा ॥१३८॥
बघुन तेथली वैभव सत्ता
विषाद धरिली कौरव चित्ता
मत्सर वाटे सुयोधनातें
सर्प - शरीरीं पय विष होतें ॥१३९॥
तशांत एके दिवशीं मंदिर, मय - निर्मित बघतांना
हांसलि बघुनी फजिती त्याची परिहासानें कृष्णा ॥१४०॥
जल मानुनि भूसी स्फटीकाचे
भिजतिल म्हणुनी आवरि ओंचे
मणिमय - भू समजून जलाला
सुत अंधाचा पुरता भिजला ॥१४१॥
तेणें सहजचि हसले पांडव
हा चिडला तंव थट्टेनें लव
डंख धरी या अपमानाचा
होत नायटा कीं कांट्याचा ॥१४२॥
या ठिणगीचें पुढें भयंकर
वणव्यामाजीं हो रूपांतर
क्षत्रियकुलवन जयें जळावें
दुष्टासह बहु जपुन असावें ॥१४३॥
राजसूयमख समाप्त झाला
सन्मानानें जन वोळविला
दातृत्वाची अपार कीर्ती
दिशादिशांना याचक गाती ॥१४४॥
मुगुट ठेवुनी हरिचरणावर धर्मराज तइं वदला
गद्गदकंठें, “ मम तनु मन - धन अर्पण परमेशाला ॥१४५॥
गोप - जन - प्रिय हे यदुनाथा
गाउं कसा मी तव गुण - गाथा
भक्त जनांचा तूं कैवारी
कमलावर हे कृष्ण मुरारी ॥१४६॥
उपकारासी तुलना नाहीं
कसा तुझा होइन उतराई
वैभव हें धन हे यश उज्वल
तुझ्या कृपेचें सत्यसत्य फल ॥१४७॥
थोर थोर बल - धन - युत राजे
छत्र चामरा धरिती माझे
चढलों मी चक्रेशपदावर
तू पाठीसी म्हणुन रमावर ॥१४८॥
मी नांवाचा राज - पदासी
पालक रक्षक तूं हृषिकेशी
पर्वतास जरि म्हणती भूधर
भार खरा परि शेष शिरावर ॥१४९॥
सद्धर्माचा उपदेशक तूं वरदकरा शिरिं धरणें
दुजी न इच्छा जड पडतां मज जननीसम सांवरणें ॥१५०॥
प्रेमें उचलुनि वृकोदराग्रज
जवळी बसवी त्यास अधोक्षज
स्निग्ध रवें हरि वदला त्यासी
मोहविते तव सद्गुणराशी ॥१५१॥
पूर्ण काम मम असतां वृत्ती
लोभ उपजतो तुमचा चित्तीं
प्रेमरूप हें बंधक - जाळें
असुनी मज परि सुखकर झालें ॥१५२॥
धर्मा पुतळा सत्याचा तूं
नयनीतीचा आश्रय हेतू
तुज बोधावें असें न कांहीं
राजपदी परि सावध राही ॥१५३॥
दोष इथें मोहादिक राया
टपले असती सुयश गिळाया
विशाल पावन असुनी सागर
आंत असे कां हिंसक जलचर ॥१५४॥
सत्ता वैभव अतुलरूप बल यांतिल एकहि धर्मा
सच्छीलाही भ्रष्टविताती करुं देती न सुकर्मा ॥१५५॥
मजसम कोणी उरला नाहीं
अशी अहंता हृदयीं येई
उपदेशक ते शत्रू गमती
हितचिंतक जे ‘ हां, जी ’ म्हणती ॥१५६॥
सदैव कर जोडुन जे स्तविती
थोर पदावर तेची चढती
नर्तक गायक विट चेटांना
भाव येत चुगली करि त्यांना ॥१५७॥
गुरु वडिलांची होत अवज्ञा
मान न मिळतो द्विजाश्रुतिज्ञां
उपेक्षिले जाती नित सज्जन
अस्थिर दीनांचे धन जीवन ॥१५८॥
सदाचार उपहासा विषय
ज्ञानाचा मग तुटतो आश्रय
शुद्ध नुरे स्त्रीविषयक वृत्ती
अपहाराची आवड चित्तीं ॥१५९॥
असे किती तरि सांगूं यास्तव सावधता बहु ठेवी
दाशरथी रामासम कीर्ती दिगंत तव पसरावी ॥१६०॥
पारखुनी मंत्री निवडावे
सखे सोयरे म्हणुन नसावें
कोषवर्धना राही तत्पर
परि नच लादुन नवे नवे कर ॥१६१॥
तूं न करी अन्याय कुणासी
अवसर देई नच कवणासी
करितो टीका म्हणुनी द्रोही
असे नृपा समजेन कधीही ॥१६२॥
वर्ण चारही अपुली सीमा
त्यजतिल ना, या लावी नेमा
संकर व र्णा श्र म ध र्मा चा
रोग भयद हा मानवतेचा ॥१६३॥
बहुतांशीं मानवी प्रवृत्ती
कामार्थातुन उगमा घेती
स्वतंत्रता परि त्यास नसावी
शांततेस ती वणवा लावी ॥१६४॥
अधिष्ठान नी ध्येय या परी घर्म मोक्ष दो अंगा
असल्यानें उन्नतीस - सहसुख - देती करिति न दंगा ॥१६५॥
दक्ष असावें तव अधिकारीं
निर्लोभी सप्रेम विचारी
असोत शेतें अदेवमातृक
विमुख न जावें परतुन याचक ॥१६६॥
लक्ष असे मजवर भूपाचें
सदा करी तो रक्षण माझें
असें गमावे प्रत्येकासी
स्थिरता येते मग राज्यासी ॥१६७॥
द्यूत तसे मदिरा मदिराक्षी
क्षणांत सारें वैभव भक्षी
पाश तयांचें अतिशय दुर्धर
गवसावे ना तयांत पळभर ॥१६८॥
शील सुरक्षित जेथ सतींचें
सज्जन - धन जीवन दुबळ्याचें
धर्माचरणा संकट नाहीं
लक्ष्मी तेथें सदैव राही ॥१६९॥
असंतोष पसरतां प्रजेसी सर्वनाश ओढवला
विदित असेना तुज वेनाचा शेवट कैसा झाला ॥१७०॥
कुणि नसो राज्यांत उपाशी
सुखी वीतभय असो प्रवासी
औषध रुग्णा योग्य मिळावे
रामराज्य मग हेच म्हणावे ॥१७१॥
एक आणखी ठेवी ध्यानीं
उदात्ततेसी व्य व हा रा नीं
मोजित जावे तरीच होतें
जनतेचें कल्याण नृपा तें ॥१७२॥
उदात्ततेची पोकळ भाषा
पराक्रमाच्या करिते नाशा
राजानें भू व्यवहाराची
त्यजूं नये, ती स्थिती यतीची ॥१७३॥
दुष्टासी करितांना शासन
म्हणतिल कायी मज परकेजन
भीड नसावी अशी नृपासी
बाध तयें ये प्रजाहितासी ॥१७४॥
असो पुरें हे इथेंच वर्णन
असेंच आहे तव सद्वर्तन
तुझेंच पाहुन मुनिही शिकती
धर्मराज तुज यास्तव म्हणती ॥१७५॥
येउन येथें बहुदिन झाले
कामहि आतां कांहीं नुरले
निरोप द्यावा सुखें अता मज
युधिष्ठिरासी वदे अधोक्षज ॥१७६॥
कान करोनी सर्वांगाचे
श्रवती पांडव वचन हरीचे
अवगाहन करि की गंगेसी
तान्हेला तापला प्रवासी ॥१७७॥
गमे तया बोलता असाची राहो हा हृषिकेशी
पुरे वाटलें काय सुधेचे आरोगण कवणासी ॥१७८॥
निरोप द्या मज सहसा माधव
वदतां, तरळे नयनीं आसव
विह्वल झाली बहु पांचाली
तया शांतवी मग वनमाली ॥१७९॥
नानारींती पंडुसुतांनीं
पूजियला हरि आभरणांनीं
गंहिवरलेल्या अंतःकरणें
वदला अर्जुन करुनी नमनें ॥१८०॥
ना जाई म्हणणें अमंगळ हरी जाजा म्हणू रे कसें
तूंते थांब म्हणों तरी तुजवरी सत्ताच तीं होतसे
इच्छे येइल ते करी जरि वदूं ती तो उदासीनता
ठेवी आठव आमुचा न वदवे यावीण कांहीं अतां ॥१८१॥

‘ मनोरथपूर्ति ’ नांवाचा बारावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
वैशाख शके १८७१

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP