मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय अडतिसावा

आदिपर्व - अध्याय अडतिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


इंद्रप्रस्थीं, राया ! धर्माला म्हणति लोक ‘ हा राम,
साधु, विवेकी, कामद; अधिक न जड कल्पभूरुहाराम. ’ ॥१॥
न पराचें, आवडलें धर्माचें त्या प्रजेसि नव राज्य;
रसनेसि वराज्य जसें गव्य चि, माहिष गमेल न वराज्य. ॥२॥
तेथें नारद आला, पूजुनियां त्यासि धर्म तन्नमना
कृष्नेसि आणवी, ती वंदी, मुनि होय सुप्रसन्नमना. ॥३॥
तीस म्हणे, ‘ सति ! पतिमतिरतिदा हो, राज्ञि ! पुत्रि ! हा राजा
सानुज नांदो तुजसीं चिर, विरह नसो, करा विहारा, जा. ’ ॥४॥
कृष्णा जाय, मग म्हणे श्रीनार पांडवांसि, “ पौरव हो !
नयशीलधर्मरक्षाप्राप्त तुम्हां सत्सभेंत गौरव हो. ॥५॥
एक स्त्री पांच तुम्हीं, भेद घडेना असी करा नीति;
प्रीतिक्षतिकरविषयापासुनि बहु साधुमानसीं भीति. ॥६॥
धर्मा ! एकस्त्रीच्छु भ्राते भेदासि पावले मागें,
एकात्मे ही मेले, ऐकावें तें तुवां महाभागें. ॥७॥
कनककशिपुकुळसंभव होते सुंदोपसुंद, ते देहें
कीं नामें भिन्न, मनें एक चि, विख्यात अद्भुतस्नेहें. ॥८॥
ब्रह्मांडाचा स्वतपस्तेजें अतितप्त करुनि ते मध्य,
परमेष्ठिवरें झाले अतुळबळ स्वेतराखिलावध्य. ॥९॥
त्रस्ततरसुरप्रार्थितविधिवचनें चतुर विश्वकर्मा तें
व्यसन हराया, द्याया निजकौशल्ये सुरांसि शर्मातें, ॥१०॥
लोकत्रयस्थ तिळतिळ उत्तम लावण्य मेळउनि यत्नें
स्त्रीरत्न रची, जाणों अवयव ते न खचिलीं च तीं रत्नें. ॥११॥
नामें तिळोत्तमा ती, लावण्य तिचें नृपा ! अपार चि तें,
जेणें वेधावें चि क्षण तरि, जें मन महातपा रचितें. ॥१२॥
तीस म्हणे द्रुहिण, ‘ अये ! देवि ! त्रैलोक्यसुंदरि ! पुनीते !
वारीं ताप, जगा जे दिधले सुंदोपसुंदरिपुनीं ते. ’ ॥१३॥
ती, भुलले सुर हरिहर पाहुनि लोकैकसुंदरा ज्याला,
ब्रह्मनियोगें दावी तें मोहक वदन सुंदराज्याला. ॥१४॥
विंध्यवनीं ललनाजनपरिवृत ते दैत्यराज पीतसुर,
स्वर्गाधिपत्य साधुनि होते स्वबळेंकरूनि भीतसुर. ॥१५॥
पुष्पावचयव्याजें, जैसी चपळा घनीं, वनीं चपळ
फिरतां तिला पहाती, स्थिर पाहुनि बैसती न नीच पळ. ॥१६॥
अवलोकितां चि चित्तें तद्रूपीं जेंवि सुंद रमला हो !
उपसुंद ही म्हणे, ‘ हें प्राप्त स्त्रीरत्न सुंदर मला हो. ’ ॥१७॥
धावुनि धरिति कर तिचे सोडुनि सुंदोपसुंद रीतीतें,
दोघांचें हि कटाक्षें अनुमोदी कृत्य सुंदरी ती तें. ॥१८॥
सुंद म्हणे, ‘ म्यां वरिली, सर परता, त्यजुनि हात तो डावा;
गुरुदारधर्षणोद्यत जो, तो लागेल हात तोडावा ’ ॥१९॥
उपसुंद म्हणे, ‘ माझी न करावी धर्महानि, करकरुनीं
कां धरिला मृदुकर ? सर, हर ! हर ! मरशील हा निकर करुनीं. ’ ॥२०॥
सुंद जसा, उपसुंद हि दे, देत्या दे जसें गगन गाळी,
ज्यासि अमर्ष रुचे, तो अंध विवेकासि कां मग न गाळी ? ॥२१॥
सुंदीं जैसा काम क्रोध उठे, तदनुजीं तसा चि तदा.
बिंबप्रतिबिंब चि तें; घे ज्येष्ठ, कनिष्ठ ही तसीच गदा. ॥२२॥
सुंदाचे उपसुंदीं, उपसुंदाची गदा पडे सुंदीं,
तन्मरणमुदुद्धासें गणपतिच्या कळ नुठेल कां तुंदीं ? ॥२३॥
परम सखे होते, परि एकस्त्रीरत्नभोगकामुक ते
मेले चि, जरि न ऐसें करिते, तरि जीवनासि कां मुकते ? ॥२४॥
म्हणुनि तुम्हीं स्वस्नेहप्राणयशोव्यय न होय, सुख वाढे,
ऐसें वर्ता बुध हो ! कटु हि सदुपदेश हित, जसे काढे. ” ॥२५॥
पांडव म्हणति, ‘ गुरुवरें हित कठिलें, अमृत पाजिलें कानीं,
अवलोकिला बहुदिसां राजर्षी पांडु आजि लेंकानीं. ॥२६॥
आम्हांत जो द्रुपदजासहिता पाहेल केलिच्या भवनीं,
तो ब्रह्मचारिधर्में वर्तेल द्वादशाब्दकाळ वनीं. ’ ॥२७॥
समय असा करउनि मुनि गेल्यावरि एकदा असें घडले.
गोधन कोआण एका विप्राचें दस्युच्या करीं पडलें. ॥२८॥
तो द्विज शक्रप्रस्थीं हाका मारी म्हणे, “ अगा ! राया !
संरक्षितोसि राष्ट्राप्रति, कीं तूं आपुल्या अगारा या ? ॥२९॥
दुष्टविनाशें यश बहु वाढो म्हणती, न तें खचो, राजे;
ते साधु भूप, देती सुख साधुजनासि, दुःख चोरा जे. ॥३०॥
चोरापहृत - ब्राह्मणगोधन, निजकीर्तिधन, उठा, राखा,
न ह्मणो पुनरपि भगवान् राम, ‘ क्षत्रियकुळा कुठारा ! खा. ’ ॥३१॥
न द्विजगोधन केवळ नेलें, तुमचें हि सुयश, धांवा हो !
धांवा रे पांडव हो ! म्हणतां रक्षार्ह वस्तु कां वाहो ? ” ॥३२॥
तें ऐकतां चि, ‘ मा भैर्विप्र ! ’ म्हणे सदवनैकरस कृष्ण.
परि तैं शस्त्रागारीं होता श्रीधर्मभूवर सकृष्ण. ॥३३॥
वासवि पडे विचारीं कीं, ‘ कैसा स्वकृतनियम मोडावा ?
रक्षण न करुनि कैसा विप्राचा अप्रसाद जोडवा ? ॥३४॥
विप्रार्थ चि रक्षावा; लागो निजनियमलंघनें शब्द.
बारा सारावे वनवासीं, बुध शत हि सारिती अब्द. ’ ॥३५॥
निश्चय करुनि असा तो शस्त्रागारीं शिरे, नमूनि नृय्पा,
धनु घेउनि, चोर वधुनि, संपादी कार्य करुनि विप्रकृता. ॥३६॥
मग बहुकष्टें धर्में आज्ञा दिधली, सुखें न, वनवासा.
तीर्थाटनीं धनंजय उत्सव पावे सदा नवनवासा. ॥३७॥
त्या तीर्थपरा प्रभुला बहु मानवती सुरर्षिनाकर्षी;
कामाकुळा उलूपी गंगाद्वरीं जळांत आकर्षी. ॥३८॥
ती ऐरावतनागपवंशजकौरव्यकन्यका आर्या
नेऊनि नागलोकीं पितृगेहीं होय जिष्णुची भार्या. ॥३९॥
चित्रांगदा हि वरिली मणिपूराधीश - चित्रवाहन - जा
ज्ञात्यासि न व्रतच्युति, विषयांचा वाहवि प्रवाह न ज्या. ॥४०॥
तैश्या चि पावल्या ज्या होत्या ग्राहत्व अप्सरा शापें,
त्या पांच हि उद्धरिल्या, तीर्थीं पार्थें हरूनियां पापें. ॥४१॥
तीर्थें पाहत पाहत गेला तो वासवि प्रभासा जों,
भेटुनि कृष्ण म्हणे, ‘ ये दोघे सुखऊनि यदुसभा साजों. ’ ॥४२॥
जो देवाश्रयगर्वितमनिसानुप्रति हि रैवतक दापी;
तेथें ने, न विसंबे क्षण ही तें इष्ट दैवत कदापी. ॥४३॥
मिरवीत स्वपुरींत प्रभुनें नेला सिताश्व वासवसा.
वृष्णि म्हणति, ‘ अर्जुनजी ! येथें चि पुरे करा प्रवास, वसा. ’ ॥४४॥
वसुदेवें आदरिला बहु करुनि तदात्मरंजना भाचा;
सर्वत्र मान पावे साधु सखा भक्त कंजनाभाचा. ॥४५॥
कुंतीसुतें सुभद्रा नवरी वसुदेवकन्यका सुरुची
देखिलि अनुजा मनुजाकारधरा त्या विरंचिच्या गुरुची. ॥४६॥
अमृतांशुची अहंकृति सर्व जिच्या नाशिली मुखानें ती
तद्धृतिस होय हृदयीं हाणुनि नयना शिलीमुखा नेती. ॥४७॥
जाणोनि भाव भक्तप्रियकर हांसे, म्हणे, ‘ मन कुलीनें
त्वां न दिलें, परि नेलें करुनि बळ पहा कसें पटु मुलीनें. ’ ॥४८॥
पार्थ म्हणे, ‘ तूं चेतश्चोर, तसी च स्वसा तुझी देवा !
मोहावा स्मरहर, हर ! हर तेथें आमुचा किती केवा ? ’ ॥४९॥
करुनि कृपा कृष्ण म्हणे, ‘ अर्जुनजी ! तरि मुलीस पळवा हो !
पळ वाहो कोपें बळ, हे तनु अतनु - ज्वरें न पळवा हो. ’ ॥५०॥
शीघ्रचर चर प्रेषुनि, धर्माज्ञा आणवूनि, मग तीतें
पळवी; पळ वीशानें, हरिलीसें वाटवूनि जगतीतें. ॥५१॥
रेवतनगोत्सवीं ती हरिली ऐकोनि राम कर चोळी,
नुरवी रिपुद्रारजनीं जो तच्छोभाविरामकर चोळी. ॥५२॥
यादव सर्व हि झाले सिद्ध, परि हरि स्वयें न लेश वदे.
बळभद्र म्हणे, ‘ ऐका यादव हो ! न मन यांत केशव दे. ॥५३॥
बसला उगाच मौनव्रत धरुनि, स्वस्थ कुतुक पाहतसे,
थांबा यासि पुसो द्या, कां हा स्वातिक्रमासि साहतसे. ’ ॥५४॥
ऐसें म्हणोनि बळ, बळ पळभरि तें स्थिर करूनि, भावाला
आपण पुसे, ‘ उगा कां ? वद, जाणों दे त्वदीयभावाला. ॥५५॥
माझ्या मतें वधावें त्या यदुकुरुकीर्तिनाशका पापा,
जेणें भलें म्हणविलें पाजुनि पय पाळिल्या खळा सापा. ॥५६॥
आम्हीं, तुझा सखा, या भावें तो पूजिला सदा सुरसा;
सर्पा अर्पावें जे, विषपण येतें तया पया सुरसा. ॥५७॥
ज्यांत सदन्नें जेवी, भंगी हाणोनि दुष्ट लत्ता तें,
न कृतघ्न उपेक्षावा, शीघ्र वधावें अशा प्रमत्तातें. ॥५८॥
स्वयशोघ्न जो, वधावा, तुज आजि उपेक्षणीय कां गमला ?
करिसी काय विचार ? स्पष्टतर स्वमत शीघ्र सांग मला. ’ ॥५९॥
कृष्ण म्हणे, ‘ दादाजी ! पडला आहे असा विचार मला,
कीं भगिनीहरणास्तव जिष्नु तुम्हां दुष्ट वध्यसा गमला ! ॥६०॥
कन्येच्या लाभाचा निश्चय नाहीं स्वयंवरीं स्पष्ट,
घ्यावें दान, दिलें तरि तें कर्म हि मानधनजना कष्ट. ॥६१॥
धन देउनि घ्यावी, तरि न अपत्याचा भला करी विकरा,
चित्तीं या दोषांच्या आणुनि त्या पंडितोत्तमें निकरा, ॥६२॥
युक्त प्रसह्यहरण क्षत्रप्रभवांसि, या चि भावानें,
यदुकुरुकुळकीर्तिकरें नवरी हरिली महाप्रभावानें. ॥६३॥
मज तों ऐसें दिसतें कीं, जो धर्मज्ञ शुद्ध कुळ ज्याचें,
तो अन्याय करीना; धर्मीं च मन प्रसन्न कुळज्याचें. ॥६४॥
किं च, पराभव त्याचा श्रीकंठ करूं म्हणेल, तरि त्याला
नाहीं अशक्य कांहीं, दृक्पातें भुवन भस्म करित्याला. ॥६५॥
शक्ति पुरहरावांचुनि पार्थपरिभवीं नसे चि अन्यास;
पण न घडतां मरण, कीं मानधनजनास युक्त सन्यास. ॥६६॥
न सुचे, कन्या अन्या धन्या कवणा वरासि अर्पावी;
क्षितिधर एक चि, न दुजा, कद्रू हि तशा दुज्या न सर्पा वी. ॥६७॥
यास्तव मज वाटतसे सुज्ञ प्रेषूनि पार्थ फिरवावा,
जिरवावा कोप मनीं, भगिनीसह तो पुरांत मिरवावा. ’ ॥६८॥
केलें तसें चि रामें; वृष्णिपुरीं लग्नकार्य साधूनीं
पार्थ स्वपुरा आला, गौरविला बंधु पौरसाधूनीं. ॥६९॥
कुंतीतें नमुनि, तिची आज्ञा घेउनि, फार शंकितसा
कृष्णेकडे हळूहळु एकाकी जिष्णु जाय अंकितसा. ॥७०॥
प्रणयें प्रिया प्रियातें स्मित करुनि म्हणे तया नरमणीतें,
‘ दृष्टि निवविली, जा जी ! स्ववियोगें द्या भया न रमणीतें. ॥७१॥
हा प्रेमबंध पहिला, दुसरा तो प्रेमबंध, दृढ अन्य;
भाराचा ही बंध प्रथम श्लथ होय जाणती वन्य. ॥७२॥
मधुप नव्या नलिनीला सोडुनि पहिलीस काय सेवील ?
कां सद्यः पक्कान्न त्यजुनि रसिक यातयाम जेवील ? ॥७३॥
जिष्णु म्हणे तद्रचितें मज मिळतिल हे न गोडवे दास्यें;
लागति तुझ्या मुखें हे बोल, जसे शब्द गोड वेदास्यें. ॥७४॥
दास्यें तुझी सुमति हे सुखविल, सुरसिंधु जेंवि गौरीची;
मूर्ति धरूनि त्जकडे आली हे प्रीति जाण शौरीची. ’ ॥७५॥
बहु रंजवी प्रियेच्या करुनि परोपरि सुसांत्वन मनातें.
गोपीवेषें प्रेषी, सुशिवेला द्रुपदजांघ्रिनमनातें. ॥७६॥
कृष्णेसि पट्टमहिषीवेषें यावा न कोप या भावें
वेष तसा करवी, कीं, आवृत लावण्य तें तिचें व्हावें. ॥७७॥
परि ती फार चि शोभे, गुंजाशिखिपिच्छधातुधर तीचे
भ्राते झाले चेतोहर सांगा कोणत्या न गरतीचे ? ॥७८॥
‘ देवि ! तुझी प्रेष्या मीं ’ नमुनि असें ती म्हणे स्वसवतीतें.
कृष्णा बहु मानवली त्या नम्रपणें तिच्या प्रसवतीतें. ॥७९॥
कृष्णा भेटोनि म्हणे, ‘ नित्य असो निःसपत्न तव नवरा,
नव नव राज्यसुख पहा, पाव सुताद्यखिलभव्यभवनवरा. ’ ॥८०॥
साक्रूरोद्धवसात्यकिवृष्णिकटकयुक्त रामकृष्ण मग
आले आंदण घेउनि, भक्तांचे मूर्तिमंत देवनग. ॥८१॥
भरिलें तिहीं धनें पुर, राष्ट्र हि बहु धर्मगृह न केवळ तें;
चातकमुख चि भरी कीं अभ्र भरायासि भूमिके वळतें. ॥८२॥
बळ जाय, कृष्ण राहे, ठेवी न सुत, न वधु, न सेना, कीं
जें सुख भक्तगृहीं या हरिस, तया हरिस तें नसे नाकीं. ॥८३॥
शक्रप्रस्थीं असतां झाला नरवेष विष्णुला भाचा.
फार चि कामुक हो त्या स्वसख्यासह त्या चि जिष्णु लाभाचा. ॥८४॥
ह्मणति, ‘ पितृकृतध्यानें झाल अतो बाल कृष्ण साच ’ कवी.
आजवळीं निजचित्रें जो भासे बाळकृष्णसा, चकवी. ॥८५॥
धरिली प्रभुनें, बहु निजरूपनिरत जिष्णु म्हणुनियां, तनु ती,
हा तर्क फार बरवा, एक असो दोष, फार यांत नुती. ॥८६॥
तो अभिमन्यु बहिश्चर साक्षात् स्वप्राण पद्मनाभाचा,
आत्मा हि तसा त्याच्या वल्लभ न गमे, जसा मना भाचा. ॥८७॥
प्रसवे कृष्णा पांचापासुनि सुत पांच, त्यांत जो ज्येष्ठ
तो प्रतिविंध्य महात्मा, दुसरा सुतसोम गुरुजनप्रेष्ठ. ॥८८॥
श्रुतकर्मा आणि शतानीक श्रुतसेननाम एवं च
धर्मज भीमज जिष्णुज नकुळज सहदेवज क्रमें पंच. ॥८९॥
दोघां कृष्णांसि जसा आवडला तद्गुणांस ही फार,
विद्या कळा मग न कां सौभद्रगळांत घालिती हार ? ॥९०॥
प्रतिविंध्यादि कुमार स्वपितृसम ज्ञानशौर्यरूपगुणें;
अत्याग्रहें पहातां, दिसलें वय एक मात्र त्यांत उणें. ॥९१॥
एके समयीं ससुह्रुज्जन ते  सद्देवतरु निके लीला
दाविति विषयिजनांच्या, त्या श्रीयमुनेंत करुनि केलीला. ॥९२॥
तेथें द्विजरूप अनळ एकांतीं त्या प्रभूंसि भेटोनिं,
मागे खांडववन तो व्हाया नीरोग त्यांत पेटोनीं. ॥९३॥
श्वेतकिनृप घृतधारा द्वादश वर्षें मुखीं सतत ओती,
बहु धा म्हणों न देती झाली निजसेवनीं हळु हि ‘ ओ ’ ती. ॥९४॥
श्वेतकिची ब्रह्मांडीं अप्रतिमा कीर्ति हे, तुपा प्याला
झाला रुग्ण अनळ; असि न दुजी पूतत्वहेतु पाप्याला. ॥९५॥
चक्र दिलें गुरु कृष्णा, कुरुकृष्णा अक्षयेषुधर भाते,
गांडिवधनु, कपिध्वजरथ, हय जे हरिति शीतकरभा ते. ॥९६॥
दिव्यरथीं बैसुनि ते कृष्ण म्हणति, ‘ भय तुला न वाटावें,
आरोग्यार्थ ज्वलना ! खांडववन - भेषजासि चाटावें. ’ ॥९७॥
रक्षिति दहना गहनासह नानाजातिसत्वरस खात्या;
होतां सहाय ईश्वर, भेटे धांवोनि सत्वर सखा त्या. ॥९८॥
माधवपांडव खांडवगहना दहनासि देति भक्षाया.
यत्न करी परि सामर शक्र न झाला समर्थ रक्षाया. ॥९९॥
आला सर्वांचा हि प्राणघ्न महोग्र एकदा समय,
खग च्यार, पांचवा अहि, वांचे तैसा चि एक दास मय. ॥१००॥
मातेनें वांचविला तक्षकसुत अश्वसेन, जनकानें
शार्ङ्गकपक्षी, पार्थें मय, हें परिसो हितार्थि जन कानें. ॥१०१॥
शरणागतासि हे चि व्यसनीं देणार शर्म परम तिघे.
या तत्वातें येथें मूर्ख न घे, स्वहित धर्मपरमति घे. ॥१०२॥
श्रीरामनामगुरुपद सुनिपुणवादक, मयूरमुख वाद्य,
श्रीरामदया गाती, गीत जयग्रंथ, पर्व हें आद्य. ॥१०३॥
ऐका सज्जन हो ! भवद्वच खरें, आश्चर्य म्यां पाहिलें,
वाल्मीकिप्रभृतिस्वबंदिनिकरीं दीना मला बाहिलें. ॥१०४॥
केलें प्राकृत काव्य, ईश्वरपदीं धत्तूरसें वाहिलें,
सांगों काय वरप्रसाद ? अजि ! तें व्यासें हि कीं साहिलें. ॥१०५॥

--------------------------------------------------

इति श्रीमहाभारते श्रीरामनंदनमयूरेश्वरविरचित आदिपर्व संपूर्णम् ॥
॥ श्रीरामचंद्रार्पनमस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP