मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय छत्तिसावा

आदिपर्व - अध्याय छत्तिसावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


प्रभु राम कृष्ण दोघे गेले शाळेसि त्या कुलालाच्या;
तद्भस्मभाग्य, भाळीं न बुक्याच्या तें न वा गुलालाच्या. ॥१॥
सांगुनि नाम, युधिष्ठिर नमिला यमिलालसाकरयशानीं;
भ्यावें श्रिताशिवांहीं ज्यांप्रति, जैसें हरिप्रति शशानीं. ॥२॥
म्हणति पृथेला, ‘ आत्याबाई ! नमिताति हे तुला भाचे. ’
यत्पदरजांहुनि उणे इष्टाच्या सर्व हेतु लाभाचे. ॥३॥
हरि भीमासि नमी, दे आलिंगन जिष्णुला, तया यमळ
नमिति; वृकोदर भेटे रामा, यच्चिंतनें चि जाय मळ. ॥४॥
कुंति म्हणे, “ असे तों ताप न, अमृताब्धिची हरी लहरी,
झालेम चि, म्हणत होत्यें मीं जें कीं, ‘ व्यसन हें हरील हरी. ’ ॥५॥
या दिनतुळेसि पावे न दिवाळी, पाडवा हि न, न दसरा;
आम्हांसि भेटला, हें तेंवि, जसा वाळतां चि वन - द सरा. ॥६॥
हे द्वारका, न भार्गवशाळा, मज भेटलें चि माहेर;
आहे रक्षाव्र्तरुचि करुणा तुमच्या चि आंत बाहेर. ” ॥७॥
ज्याच्या स्वरोमकूपीं सतत सुखस्वस्थ सत्यपांड वसे,
धर्म म्हणे त्या प्रभुला, ‘ कळलों हे केंवि सत्य पांडवसे ? ’ ॥८॥
कृष्ण म्हणे, ‘ असतां ही गूढ कसा अग्नि भारता ! कळतो ?
आकळिला मृगमद जरि बहुयत्नें वास काय आकळतो ? ॥९॥
लोपे कवि न कुवासें, पावे ख्यातीस मंद न सुवासें,
कळतो चि जाणत्याला सर्वतरुश्रेष्ठ चंदन सुवासें. ॥१०॥
आहेत वीर बहु जरि, परि भेदाया पणा असाध्या या
निपुण तुम्हीं च, मज इतर नाहीं जी ! आपणाअसा ध्याया. ॥११॥
व्यसन चुकविलें, पहिला लोकीं हा लाभ साजिरा, ज्या जी
प्रथम असावी ती ही कीर्ति मिळाली च आजि राज्याची ! ॥१२॥
वाटे, म्हणेल त्याची मति त्यांला कीं, ‘ तुम्हीं नभा उखळा ’
मूर्ख भलतें चि करिती, सज्जन ही आवडे न भाउ खळा. ॥१३॥
वृद्धि असावी तुमची, शत्रूंचे सर्व गर्व हरपावे;
व्यसनीं बुडवूं पाहति खळ ज्यां, त्या सज्जनांसि हर पावे. ॥१४॥
द्यावा निरोप आम्हां, झालों भेटोनि आज सानंद.
धर्म तुम्हांला व्यसनीं रक्षक, मज साग्रजा जसा नंद. ॥१५॥
प्रिय आमुचे बहिश्चर पंचप्राण चि तुम्हीं; न अस्वहित
कोण्ही ही होवूं दे; भवदवन स्वहित, अन्य अ - स्वहित. ” ॥१६॥
ऐसें वदोनि ते प्रभु करिते कोणांसि न कळतां गमन;
मग भिक्षान्नें केलें रात्रौ त्या साधुनीं क्षुधाशमन. ॥१७॥
राहोनि गुप्त धृष्टद्युम्नें तच्छोध लाविल आंगें.
त्यातें द्रुपदनृप पुसे, ‘ वत्सेची गति कसी ? सुता ! सांगें. ’ ॥१८॥
धृष्टद्युम्न म्हणे, ‘ ज्या पुरुषें नेली स्वसा महाभागे,
गेलों कुलालशाळेप्रति शोध करावया तयामागेम. ॥१९॥
ते पांच बंधु, आहे माता त्यांची जसी सुरी तीतें
त्यांतें पाहुनि झालों हृष्ट विलोकूनि ही सुरीतीतें. ॥२०॥
त्यांचें विलोकिलें म्यां तैसें कोठें हि दिव्य तेज नसे;
आश्चर्यरूप पांच हि न पहावे ते धरापते ! जनसे. ॥२१॥
भिक्षान्न त्यांसि वाढुनि, मग कृष्णा तें चि जेविली नमुनी,
गमलें नसेल तैसें सुख त्यां, ब्रह्मीं हि जे विलिन मुनी. ॥२२॥
त्यांच्या चि पायथां ती निजली; ते राशि रत्न - हेमाचे
गणिले कुशशयनोन चि कृष्णेनें हे पलंग, हे माचे. ॥२३॥
मज त्यांच्या शब्दादिव्यवहारीं क्षत्रियत्व आढळलें;
जर्‍हि भिक्षुवेष शिव तरि, तेज तया त्यजुनि काय गा ! ढळलें ? ॥२४॥
न जळाले पांडव ते, होईन चि सत्यतर्क बहुधा मीं;
न विशेष विप्रवेषीं त्याच्या दिसतो, विशेष बहु धामीं. ’ ॥२५॥
राजा म्हणे, ‘ असो हा वत्सा ! तव सत्य तर्क रे ! तें हो,
जें दमयंतीजनका सुख; मुख हें पात्र शर्करेतें हो. ’ ॥२६॥
प्रातःकाळीं धाडी मग पार्षत त्यांकडे पुरोध्यास.
‘ देवद्विजप्रसादें ’ तो हि म्हणे, ‘ नृपतिचा पुरो ध्यास. ’ ॥२७॥
त्यांसि उपाध्याय म्हणे, ‘ स्वयशोर्थ करा कृपा, सकळ वाहो
आधि महासुखपूरें, कुळ नाम तुम्हीं नृपास कळवा हो ! ॥२८॥
झाला द्रुपद बहु सुखी, आजि तुम्हां न्हाणणार, कनकानें
पूजील, पूजिले ते जैसे दशरथकुमार जनकानें. ॥२९॥
वाटे, होता अर्जुन वर व्हावा, तो चि काम पुरला हो !
बुध हो ! निजकुळ कळवा, हें मिथिळेच्या यशासि पुर लाहो. ’ ॥३०॥
पूजुनि धर्म म्हणे, ‘ कां नृप करितो खेद ? जें गत न ये तें.
हा पण, कीं लक्ष्याचा भेदक जो, तो चि योग्य तनयेतें. ॥३१॥
जालें तें चि, मनोरथ पुरला असतां किमर्थ हा शोध ?
समजा मनीं, कसें यश मेळविता अकुळ भलतसा योध ? ’ ॥३२॥
यापरि धर्म वदे, तों द्रुपदें प्रेषूनि आप्त ‘ जेवा या, ’
ऐसे प्रार्थुनि नेले, गेल स्वरथीं बसोनि जेवाया. ॥३३॥
ऐकुनि धर्मोक्त पुरोहितवदनें हृष्ट होय तो लेश,
चिंताब्धिमग्नमतिभूद्धारा योजी उपायकोलेश. ॥३४॥
ज्या ज्या वर्णा जें जें व्यवहारा योग्य वस्तु सर्व हि तें,
तद्दष्टीस पडेसें मांडविलें पार्षतें सुधी - महितें. ॥३५॥
वर्णपरीक्षार्थ असें केलें कीं वस्तु जें तयां इष्ट
त्यावरुनि जाति त्यांची जाणावी ते अशिष्ट कीं शिष्ट. ॥३६॥
पाहुनि त्यांसि जन म्हणति, ‘ अहा ! पहा हो अहो ! अजि ! नरहि तें
उडविति सुरत्व रूपें; करितिल हे काय कीं अजि नरहितें ! ’ ॥३७॥
द्रुपदा ते द्रुप दाते स्वर्गींहुनि वाटले गृहा आले;
आधीं तें आधींतें तद्दर्शन नुरवि, सर्व ही धाले. ॥३८॥
बसतां वरासनीं कीं भोजन करितां न शंकले चुकले.
श्रीमद्गुणवत्त्वें ते पांडुतनय जिष्णु - विष्णुसीं तुकले. ॥३९॥
त्या विविधवस्तुमध्यें जें जें धनुरादि वस्तु समर - हित,
तिकडे चि ते पहाति, जैसे विषयांकडे चि शमरहित. ॥४०॥
असकृत् भागवत जसें मुमुक्षुहीं धीरजनकृतस्तुतिहीं,
अवलोकिलें, धरुनियां बहु आदर संगरार्ह वस्तु तिहीं. ॥४१॥
नृपु, तच्चेष्टित पाहुनि विप्र न ते, पांडुसुत, असें समजे.
सुज्ञासि झांकिले ही कळति गुण ख्यात मृगमदासम जे. ॥४२॥
धर्मासि मग म्हणे, ‘ हो ! पूर्ण करा सर्व कामना, मातें
सांगा स्वनाम, सांगति जैसे गुरुराज रामनामातें. ॥४३॥
माझें मानस आहे तुमच्या बहु साभिलाष कुलनामीं,
पावेन श्रवण करुनि पीतामृततुष्टपुष्टतुलना मीं. ॥४४॥
विधिनें करीन कन्यादानमहोत्सव, ह्मणून कामातें
पुरवा हो ! पुर वाहो सुखपूरीं पर ह्मणू नका मातें. ’ ॥४५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP