मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|आर्याभारत|आदिपर्व|
अध्याय अकरावा

आदिपर्व - अध्याय अकरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


होय ऋत्मती सुमती शर्मिष्ठा, व्याकुळा वराधीनें;
चित्तीं म्हणे, ‘ सहावें किति दुःख कळेवरें पराधीनें ? ॥१॥
प्रियतम सहाय नसतां, यौवनवहनेंकरूनि जो सीण,
तद्गणनीं कुठितमति होयील स्वरस्वतीहि जोशीण. ॥२॥
शुशु पाळण्यांत घालुनि हालवितां, निजवितां, सुखें ‘ जो जो ’
धात्री म्हणति, सखीला अमृतरसचि तो, निघे मुखें जो जो. ॥३॥
‘ काय करूं ? एकांतीं जरि होती भेटि, वाटतें मतिला,
विनउनि वरित्यें पुत्रप्राप्त्यर्थ, तरि, स्वयें सखीपतिला. ॥४॥
न उपेक्षील कदापि क्षितिपति, धर्मज्ञ, शरण आलीला.
मजही व्हावे, झाले कामद ते जेंवि चरण आलीला. ’ ॥५॥
नृपहि उपवनीं गेला; एकांतीं तीहि दृष्टिला पडली;
न घडावीच कधीं, परि दोघांची गांठी विधिबळें घडली. ॥६॥
देतां द्रुलभ दर्शन एकांतीं, करुनियां दया, तेतें
कळला प्रसाद; मग ती विनवी मंजु स्वयें ययातीतें. ॥७॥
‘ द्वारीं मृगपतिहस्तांतूनि अहो वीरराय ! जी मुक्ता,
ती सेविजेल इतरें सिंहावांचूनि काय जी ! मुक्ता ? ’ ॥८॥
नृपति म्हणे, ‘ जें वदसीं, जाणतसें मीं यथार्थ, सुंदरि ! तें.
सरस असोचि; मधुपबहुमत जरिहि रसेंकरूनि कुंद रितें. ॥९॥
‘ तुज शयनीं न बहावें, ’ वदला कवि; मज अलंघ्य आज्ञा ती.
माझे तुझेहि न पुन्हा मुनिच्या क्षोभें म्हणोत ‘ हा ! ’ ज्ञाती. ’ ॥१०॥
शर्मिष्ठा त्यासि म्हणे, ‘ गम्यस्त्रीविषयकानृतें पाप
न शिवे धर्मज्ञाला; आर्तजनाचा निवारिजे ताप. ॥११॥
वरिलासि मत्सखीनें; म्यांही वरिलासि तूं मनें; मातें
पापापासुनि रक्षीं; या माझ्या चालवूनि नेमातें. ’ ॥१२॥
भूप म्हणे, ‘ व्रत माझें, कोण्ही जन जें अभीष्ट मागेल,
तें द्यावें त्यासि असें; मज तत्त्यागेंहि दोष लागेल. ’ ॥१३॥
ऐसें वदे, मग नृपति, द्याया त्या सुंदरीस मुदतिशय,
हांसे; म्हणे, ‘ धरूं दे, सुंदरि ! रंभोरु ! सुभ्रु ! सुदति ! शय. ’ ॥१४॥
केली कृपा नृपानें, प्रथम स्वमनीं नमूनि त्या ऋषितें.
प्याली तीहि चकोरी पतिमुखचंद्रामृता मनें तृषितें. ॥१५॥
स्वप्रसवें सुखशोभा दे क्षितिस परांहि जेंवि सुक्षितिचा;
प्रसवोनि सुतासि, तसा सुखशोभा दे विशुद्ध कुक्षि तिचा. ॥१६॥
शर्मिष्ठेला झाला सुत, नाम द्रुह्यु ठेविलें आहे;
ऐसें कळतां, चित्तीं चिंतेला कावकन्यका वाहे. ॥१७॥
भेटुनि तिला म्हणे, ‘ हें कर्म उचित सुभ्रु ! काय गे ! हा ! तें
विमळ कुळ मळविलें कीं लावियला अग्नि या ! गेहातें. ॥१८॥
धवळांबरासि कज्जळ, तैसें जें शुचिकुळासि पाप डसे;
तें धूतां श्रम बहु; गुरु भाजति दुःखाग्निमाजि पापडसे. ’ ॥१९॥
येरि म्हणे, ‘ ऋषि आला, श्रुतिपारग, धर्मशीळ वरदा त्या
प्रार्थूनि, याचिला म्यां ऋतुकाळीं पुत्रकामवर दात्या. ’ ॥२०॥
देवी म्हणे, ‘ खरें हें जरि, तरि शोभनचि, मानलें मजला;
मज नाम सांग त्याचें, सुंदरि ! जो वरद ऋषि तुला भजला. ’ ॥२१॥
दैत्यपतिजा म्हणे, ‘ ऋषि गमला रविसाचि; नामगोत्रास
कैंची शक्ति पुसाया ? सांगों मीं देवि ! काय तो त्रास ? ’ ॥२२॥
राज्ञी म्हणे, ‘ बरें; मज नाहीं कोप त्वदीयसुतलाभें.
जन न उतला जगीं जो, तो पावे नित्य भद्र, उतला भें. ’ ॥२३॥
वदल्या दोघी प्रेमें, झाल्या सानंद, हांसल्या आली;
आलिंगिलें परस्पर; मग निजसदनासि भार्गवी आली. ॥२४॥
त्यावरि दुसरा झाला, तो तुर्वसु शुक्रकन्यकातनय.
अनु पूरु पुत्र दोघे, शर्मिष्ठेला. करी न घात नय. ॥२५॥
कविकन्येचे दोघे, शर्मिष्ठेचे तिघे सुत, नुरविते
पितृचिंतातिमिर, सुहृन्नयनाब्जें सुखविते सुतनु, रवि ते. ॥२६॥
एका समयीं देवी पतिसह गेली अशोकवनिकेला;
‘ क्रीडावें तेथ सुखें ’ संकल्प असा तिणें स्वमनिं केला. ॥२७॥
शोभे सती उपवनीं पतिसह, जसि शंभुसह उमा रमणी.
तों देखिले तिणें सुरगर्भसमप्रभ तिघे कुमारमणी. ॥२८॥
देवी राज्यासि पुसे, ‘ सुरकलभांची हिरून गति घेते,
कोणाचे शिशु ? जैसे देवांचे चालते नग तिघे ते. ॥२९॥
दिसति तुम्हांसम रूपें, श्रीचे संकेतकुंज ते ज्यांचे
काय रुचिर; काय सुचिर झाले हे प्रकट पुंज तेजांचे ? ’ ॥३०॥
पाचारुनि त्यांसि म्हणे, ‘ कोणाचे बाळ हो ! तुम्हीं ? धाम
कोठें तुमचें ? सांगा. कुळ तुमचें कोण ? काय हो ! नाम ? ॥३१॥
अंकीं तुम्हांसि घेउनि, आलिंगुनि, हृष्ट कोण होतात ?
कोणासि माय म्हणतां ? तुमचा कृतसुकृत कोण हो ! तात ? ॥३२॥
माता सांगुनि, पुसतां तात, ययातीस दाविती बोटें.
खोटें कर्म नृपचें जाणुनि, ती दुःख धरि मनीं मोटें. ॥३३॥
गेले शिशु जवळि परि, न त्यां तो करुणासुधानदीपति घे.
ते त्या क्षणींच रुचले स्वकुळाचे त्या बुधा न दीप तिघे. ॥३४॥
उत्सुक झाले होते अंकारोहार्थ पुत्र, पर तो न
प्रभु घे, मग मातेप्रति गेले रोदन करीत परतोन. ॥३५॥
पतिकृतकपटें पावे, आणुनि नेत्रांसि वारि, खेदासी.
तीस म्हणे, ‘ कां ? गे ! हे ऋषिसुत तरि नृपतिसारिखे दासी ! ॥३६॥
त्वां हा भूप भुलविला, केला माझा दहांत अपमान;
बटिक लटिक तूं दुष्टे ! वद, लंघ्य तुला मदीय तप, मान ? ’ ॥३७॥
राजसुताहि म्हणे, ‘ तूं, कमळाला मधुकरी जसी तृषिता,
ज्या भाळलीस ऋषिजा; त्या सत्पुरुषीं कसी नसे ऋषिता ? ॥३८॥
जो त्वत्पति, तो मत्पति, देवि ! पहा धर्म, मीं तुझी आली.
त्वां म्यांहि मनें वरितां, ऋषिता पतिता प्रभुकडे आली. ॥३९॥
तूं ज्येष्ठा विप्रसुता, राजसुता मीं सये ! कनिष्ठा हो !
जैसी तुझी नृपपदीं, माझीहि तसीच एकनिष्ठा हो. ॥४०॥
वदल्यें सत्यचि पूर्वीं, देवि ! पहातां, ऋषीच पति, तत्वें;
क्षोभों नको वृथा तूं, हा जन दूषूं नकोचि पतितत्वें. ॥४१॥
जी स्मरहता, पदनता, त्यजिल न शशिवंशसदनदीप तितें;
भेटेल नदी जी जी, ती अनुकंप्याचि नदनदीपतितें. ’ ॥४२॥
शुक्रसुता पतिसि म्हणे, ‘ हें विप्रिय काय उचित महिम्यातें ?
त्यजिलें आजि तुझें जें श्रीपद्महि सद्म शुचितमहि म्यां तें. ’ ॥४३॥
आरोपूनि स्वशिरीं, दासीसंगें करूनि विटलीला,
पंडितवर परि न शके समजावाया ययाति विटलीला. ॥४४॥
गुण वावडीस, सुदृढ प्रेमाचि स्त्रीस, आवरायाचा;
तो तुटतां यत्न नसे कांहीं; गेलाचि आव रायाचा. ॥४५॥
जाय पित्याच्या सदना, करुनि परित्याग बायको पतिचा;
पुत्रांतेंहि न पाहे. सांगावा उग्र काय कोप तिचा ? ॥४६॥
नाहींच कांतवचना, हृदयांत धरूनि तें असुख, वळली.
वाटे नृपासि धरितां, सोडीलचि आपुले असु, खवळली. ॥४७॥
भूप म्हणे तीस, ‘ परिस माझें सुखसंपदे ! विनवणें, हो
चित्त सुवृत्त; न पावो विश्लेषें कंप; देवि ! निवणें हो ! ’ ॥४८॥
दावार्ता जेंवि मृगी कासारीं जाय, ती स्वमाहेरीं;
पावे नृपहि, म्हणे तों नमुनि गुरुसि, तापसोत्तमा ! हेरीं. ॥४९॥
ताप्दिला जेणें, तो हा कामी तापसा ! हतांस दया
उठवि तुझी, किति मारूं हाका ? मीं तप साहता सदया ! ’ ॥५०॥
‘ माझी दासी मजहुनि बहुमान्या, यास्वि बा ! दया तीची;
तीन तिला सुत दिधले, दोघे मज, ती प्रिया ययातीची. ’ ॥५१॥
स्वतपाच्या तीव्रत्वें लाजविता योगिराज जो पविला,
तो स्वातिक्रम कळउनि, सुरयानीनें क्षणांत कोपविला. ॥५२॥
‘ वृंदावनासि मानिति, अव्हेरिति मूर्ख मत्त पनसा; हे
तीच गति; अतिक्रम परतप साहो; लवहि मत्तप न साहे. ॥५३॥
जेणें अधर्म घडला, नाशो बळवीर्य आजि राया ! तें;
वपुला आतांचि जरा ग्रासो; हा दंड साजिरा यातें. ’ ॥५४॥
भूप म्हणे, ‘ शाप दिला उग्र विपत्पातहेतु; म्हातारा
झालों पहा; अहा जी ! जोडितसें हात हे तुम्हां, तारा. ॥५५॥
ऋतुदान धर्म कीं जी ! हा यास्तव हाय ! काय शापावा ?
कन्येकडे तरि पहा, रक्षा मुनिनायका ! यशा, पावा. ॥५६॥
म्हणतां सत्यचि देवा ! जें, हें न विचारिलें तुम्हां चुकलों;
परि शापें तुमच्या प्रिय दुहितेच्या मीं समागमा मुकलों. ॥५७॥
करुणा करा सुतेवरि, गुरुजि ! प्रभुजि ! स्वशाप हा फिरवा;
मिरवा प्रसाद लोकीं, जिरवा मनिं रोष, मज इला निरवा. ॥५८॥
मीं यौवनीं अतृप्तचि; ईच्या आतांचि भर विलासाचा;
शापमिषें त्वां तापचि आम्हां दोघांसि भरविला साचा. ’ ॥५९॥
शुक्र म्हणे, ‘ नरनाथा ! नाहीं होणार शाप हा लटिका;
तेज पहा वचनाचें, ज्यासि फळाया न लागली घटिका. ॥६०॥
परि मद्वरें तयाप्रति जाइल, देसील हे जरा ज्यातें;
येथील तुजप्रति, जें त्याचें तारुण्यतेज, राज्या ! तें. ’ ॥६१॥
भूप म्हणे, ‘ दोघींला दिधले म्यां पांच तनय निजरेतें;
तो राजा हो, देइल यौवन जो त्यांत घेउनि जरेतें. ’ ॥६२॥
काव्य म्हणे, ‘ हेंहि दिलें जा; परि होऊनि वीर्यमत्त नया
न विलंघीं; धर्मातें रक्षीं; दुखवीं पुन्हां न मत्तनया. ’ ॥६३॥
गुरुची आज्ञा, कन्या घेउनि, जाउनि गृहासि तो जीन
आणी मनीं असें कीं, ‘ यदुच्या देहीं जरेसि योजीन. ’ ॥६४॥
त्यास म्हणे, ‘ स्वजरा घे ’ यौवन दे; अयश न नुत न यदो ! घे; ’
तो तें न करी; तुर्वसुही; तेहि द्रुह्यु, अनु, तनय दोघे. ॥६५॥
पूरूनें आज्ञेचा केला स्वीकार; ते जरा याला
स्पर्शे, काव्यवरबळें याचें तारुण्यतेज रायाला. ॥६६॥
करितां आज्ञाभंग, क्षोभाचें पात्र जाहले चवघे;
पूरु प्रसाद गुरुचा पावे; सत्कीर्तिची सदा चव घे. ॥६७॥
पूरुप्रति भूप म्हणे, ‘ वत्सा ! मत्सार्वभौमपदवीतें
तूंचि सुपात्र; मज तुझें साधुत्व तव स्तवासि वदवीतें. ॥६८॥
तूं धन्य, अन्य न असा, कैंची सर्वत्र साधु सुतरीती ?
बापा ! प्रजा असी, जी पितरांसि भवार्णवांत सुतरी, ती. ’ ॥६९॥
धर्मार्थकाम सेवी पुत्रवयें नृप सहस्र वत्सर तो;
मग मनिं म्हणे, ‘ पुरे हें; या श्रीसंगीं मदीय वत्स रतो. ॥७०॥
स्वल्पचि एकहि स्रक्चंदनवनितादि सर्व विषय मही;
कळले मज हे भोगचि मारक, न व्याळ, शस्त्र, विष, यमही. ॥७१॥
श्रीसेव्या ! सदलिमता ! वस राज्यसरीं, न मज्ज, राजीवा !
वत्सा ! बहु कष्टविलें त्वां, स्वीकारूनि मज्जरा, जीवा. ’ ॥७२॥
जाय नृप, श्रीकरवीं धरवुनियां पूरुहस्त, वनवासा.
न गमे प्रजांसि पति तो, गुणजित - सुरभूरुह - स्तव, नवासा. ॥७३॥
जाउनि तपोवनातें, सेवी राजा महातपा पवना;
जाळी ज्ञानदवें तो चित्ताजाचा महात पापवना. ॥७४॥
गेला स्वर्गासि अमित सुकृतें जोडूनि राय; तें नाकीं
होय सुदुःसह शक्रा, जैसें बाळासि रायतें नाकीं. ॥७५॥
एका समयीं सुरपति त्याचेंचि महत्त्व तन्मुखें वदवी;
ऋजुभावें नृप नेणे कीं, आत्मस्तोत्र कुगतिची पदवी. ॥७६॥
‘ स्वतपें तूं कवणासीं तुल्य ? ’ असें हरि पुसे ययातीतें.
त्यातें नाहुष राजा सत्यचि सांगे मनें भयातीतें. ॥७७॥
‘ देवेंद्रा ! कोण्हीही स्वतपें मत्तुल्य जन असेना कीं.
काय वदों ? नर ते किति ? न महर्षिजनीं असे, नसे नाकीं. ’ ॥७८॥
शक्र म्हणे, ‘ बहु भास्वर रविसम ज्याचे तपोगुणें काय,
त्वत्तुल्य त्वदधिकही आहेत तपोनिधी; उणें काय ? ॥७९॥
हें काय उचित तुजला ? साधु न कोणासही अव्हेरीती.
अभिमानें स्वतपःक्षय केला कीं; हे बरी नव्हे रीती. ॥८०॥
झाला सर्व तपःक्षय, पाव प्रक्षीणपुण्य तूं पतन.
बहु तप करिता तापस धन्य नव्हे; धन्य करिल जो जतन. ’ ॥८१॥
नाहुष म्हणे स्वपतनावसरीं प्रार्थूनि नाकपाळाला,
‘ हा जन संतांत पडो, जरि आलें पतन या कपाळाला. ’ ॥८२॥
इंद्र म्हणे, ‘ तुज राया ! संतांत घडेल पात, कमळाला
रविसे ते हर्ष तुला देतील, हरूनि पातकमलाला. ’ ॥८३॥
पडतां, स्वर्गासि पुन्हां गेले घेउनि संत राज्याला,
नृप अष्टक, प्रतर्दन, वसुमान्, शिबिनामक स्वआज्याला. ॥८४॥
तरला ययातिराजा, दर्शन होतांचि संतरायांचें;
सद्दर्शनचि सुदर्शन करि गट चट कटक अंतरायांचें. ॥८५॥
जे दुरिततृणचया दव यादव यदुचे; हरी अरिगजांचे.
त्या पूरुचेहि पौरव; पौर वदति नाकगोष्ठिहि न ज्यांचे. ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP