श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या २५१ ते ३००

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


ऐकिजे वो श्रोतेजन । तया शोकाचें वर्णन ।
करितां मज आलें रुदन । तें माझियानें न वर्णवे ॥२५१॥
असो ती माता शोकभरित । वाराणाशीस जावोनि त्वरित ।
देह ठेवोनि भागीरथींत । समाधिस्थ जहाली ॥२५२॥
इकडे द्विजांबरोबर । स्वामी माझे रघुवीर ।
शोधित शोधित गंगातीर । जनस्थाना पातले ॥२५३॥
करोनिया नमस्कारा । द्विज गेले आपुल्या घरा ।
आपण गंगेचिया तीरा । निकट भागीं बैसले ॥२५४॥
गंगास्नानातें करून । आहारालागीं जळप्राशन ।
याचिपरी सप्तदिन । निघोनिया पैं गेलें ॥२५५॥
क्षेत्रामाजील द्विजवर । घ्यावया येती समाचार ।
पुसती समग्र प्रकार । कोण कोठील म्हणोनि ॥२५६॥
तयांसी न देतां उत्तर । मौन रहावेम सुस्थिर ।
क्वचित बोलावें मृदु उत्तर । कोणी एका द्विजासी ॥२५७॥
तंव बाजीराव बळवंत । फडके उपनांव विख्यात ।
त्यांनीं आग्रह करोनिया बहुत । घेवानिया पैं गेले ॥२५८॥
स्नान संध्या सारोन । नित्य करावें तेथें भोजन ॥
जगीं लीलामात्रेम करून । अध्ययन पैं करिती ॥२५९॥
रघुनाथ दीक्षित जोगळेकर । त्यांपाशीं दशग्रंथ समग्र ।
थोडके दिवसांत सत्वर । मुखोद्रत पैं केले ॥२६०॥
त्याचे एथें पढत असतां । चमत्कार दाविला समस्ता ।
मार्गानें चालत असतां । आकाशीं गमन करावें ॥२६१॥
यजमानाचे गृहापर्यंत । पाउल न लागतां भूमीतें ।
सर्व विद्यार्थी आश्चर्य करित । विद्यागुरूतें सांगती ॥२६२॥
तैसेंच यजमानाचे घरीं । देवपूजेसी खोलीमाझारी ।
बैसले असतां प्रथम प्रहरीं । चमत्कार वर्तला ॥२६३॥
देवपूजा करीत असतां । गुप्त जाले अवचिता ।
खोलीमाजी शोध करितां । ठिकाण नाहीं लागला ॥२६४॥
प्रचीति पहावया लागून । प्रयत्न करिती यजमान ।
दोन्ही कपाटें लावून । खोली माजी कोंडिलें ॥२६५॥
परतोनिया अन्त पाहती । तंव गुप्त होवोन न दिसती ।
सवेंचि दीडा प्रहराप्रती । जैसें तैसें पाहिलें ॥२६६॥
आसना वरुतें जप करित । बैसले असतां ध्यानस्थ ।
आसन उडावें दोन हस्त । एकाएकीं ते समयीं ॥२६७॥
त्याचिये माडीवरी । क्रीडा करिती जार - जारी ।
आपण असतां देवघरीं । ओळखावें तेथुनी ॥२६८॥
सवेंचि त्या उभयतांनीं । येवोनि लागावें चरणीं ।
क्षमा करावी म्हणोनि । वारंवार विनवावें ॥२६९॥
गृहीं असोनि विळभरीं । रात्रीं जावें वनांतरीं ।
तेथें दत्तात्रयाची फेरी । येती झाली अकस्मात ॥२७०॥
होवोनि दर्शन संभाषण । जालें पूर्व देहाचें स्मरण ।
ब्रह्मावरी समरसून । एकरूप जहालें ॥२७१॥
श्रीदत्त पुसती वर्तमान । कोठें जालें आहे राहणें ।
ध्यानस्थ बसावयाचें स्थान । दाखवावें आह्मांतें ॥२७२॥
मग उभयतां हात धरूनि । येते जाले ध्यानस्थानीं ।
जेथें बैसत होते निशिदिनीं । माडीवरी एकांतीं ॥२७३॥
गंगातीरीम अति निकटीं । माडीवर गुंफा नेटकी ।
प्रतिदिनाप्रति एकाकी । ध्यानस्थ तेथें बैसावें ॥२७४॥
तें स्थान दत्तात्रयासी । दाखविलें अतिसायासीं ।
नित्य नित्य त्या स्थळाशीं । श्री दत्तांनीं पैं यावें ॥२७५॥
ऐसें प्रतिदिनीं बरवें । येथोनि संभाषण गौरवें ।
तत्वविवरण करावें । कोणालागीं न कळतां ॥२७६॥
जगामाजि कीर्ति अपार । व्हावया लागली वारंवार ।
लीलामात्रें चमत्कार । सर्वांलागीम दीसती ॥२७७॥
पूर्व दिशेसि कचेश्वर । क्षेत्राहोन योजनें चार ।
कोणे एके दिनीं सत्वर । दर्शनासीं पै गेले ॥२७८॥
तेथें आरंभिल्या प्रदक्षिणा । तंव चमत्कार जाला तया स्थाना ।
तो मी सांगतों श्रोतेजनां । श्रवण केला पाहिजे ॥२७९॥
प्रदक्षिणा करित असतां । माध्यान्हीसी यावा सविता ।
ऐसें प्रतिदिनीं तत्वता । व्हावयासी लागलें ॥२८०॥
मस्तकासी लागावें उष्ण । चालती भाजती चरण ।
तंव चमत्कार वर्तला जाण । तये काळीं ते स्थानीं ॥२८१॥
कचेश्वर मूर्ति आपण । फडकियांचे स्वप्नीं येऊन ।
सांगते जाले वर्तमान । अंतरींचें आपुले ॥२८२॥
मजलागीं लागतें उष्ण । कष्टी होतो रे रघुनंदन ।
तरी देई छाया करून । तया ठाया येऊनी ॥२८३॥
मग फडकियानें सत्वर गती । छाया करोनि दिधली निगुती ।
आपण जाऊनिया प्रतीती । देवापाशीं पाहिली ॥२८४॥
तेथें अनेक ब्राह्मण । करित होते अनुष्ठान ।
त्यांचे स्वप्नीं कचेश्वरानें । रात्रीं येवोनि कथियेलें ॥२८५॥
रघुनाथ बावा यया स्थानीं । तपस्वियांमाजीं शिरोमणी ।
ते समजोनि माझे स्थानीं । सांगतील तें ऐका ॥२८६॥
ऐसा रात्रीसी दृष्टांत । होता जाला त्या विप्रांतें ।
मग त्यांनीं जाला जो वृत्तांत । स्वामीपाशीं कथियेला ॥२८७॥
वारंवार कर जोडून । द्विज करिती साष्टांग नमन ।
ह्मणती आह्मांसी आज्ञा प्रमाण । ज्या रीतीनें कराल ती ॥२८८॥
तयातें सांगती महाराज ! तुमचे निश्चयीं सर्व काज ।
मनोगत असतील ते सहज । पूर्ण होतील निश्चयीं ॥२८९॥
द्विजवरांनीं आज्ञा घेऊन । निघते जाले तेथून ।
गृहासी जातां कार्यसाधन । सर्व जालें तयांचें ॥२९०॥
असो स्वामी तये स्थानीं । काहीं काळ प्रदक्षिणा करूनी ।
जनस्थानाप्रती फिरोनी । येते जाले मागती ॥२९१॥
महादेव बावा यतीश्वर । जे ब्रह्मविद्येचे रत्नाकर ।
शांति क्षमेचे मेरुमांदार । अचळपनें सर्वदा ॥२९२॥
जयाची कीर्ती - मंदाकिनी । चालिली जगत्स्वर्गा वरूनी ।
भागीरथी निर्मळ पाणी । दया तेचि पैं वाहे ॥२९३॥
असो तयाप्रती शरण । जावोनि वंदिले चरण ।
लोक संग्रहाकारणें । शिष्यत्वलीला दाविली ॥२९४॥
असो ते स्वामी पंचवटींत । रहात होते मठिके आंत ।
प्रतिदिनीं तयाचे दर्शनातें । जात असावें एकलें ॥२९५॥
तव येता आला वर्षाकाल । गंगोजळें भरूनि तुंबळ ।
चालिली असे उतावेळ । रांत्रदिवस सारखी ॥२९६॥
पैलतीरा जावयासी । उतार नाहीं गंगेसी ।
मग उदकावरोनी चरणचालीसी ॥ जाते झाले परतीरा ॥२९७॥
जो काळ गंगेची भरती । अक्षईपणें राहिली होती ।
तो काळ ऐसिया रीती । गुरुदर्शना पैं जावें ॥२९८॥
कोणी एक्या समयांतरीं । बसले असतां आसनावरी ।
रात्र जाली प्रहरभरी । निबिड अंधारी पडिलीसे ॥२९९॥
दर्शनासी विप्रमंडळी । येती जाली तयेकाळीं ।
तंव एकाएकीं नेत्रकमळीं । प्रकाश दिसे शोभायमान ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP