श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या २०१ ते २५०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


निद्रा नाहीं अवघी रात्र । बसतो एकांतीं स्वतंत्र ।
याचें सामर्थ्य अति विचित्र । दीसताहे मजलागीं ॥२०१॥
पिता म्हणे वो सुंदरी । तीर्थरूपांचे स्वप्नांतरीं ।
आला होता सिंदुरारी । गणपति नामें विख्यात ॥२०२॥
त्यानें कथिलें स्वप्नांतरीं । त्रै अवतार आमुचे उदरीं ।
उत्पन्न होतील कलि माझारीं । कीर्ति प्रगट करावया ॥२०३॥
भृगुपार्वतीपंचवदन । तेहि दीसती तिघेजण ।
तपश्चर्या पूर्वपुण्य । फळासि आली आमुचे ॥२०४॥
हे उभयताहि लेंकुरें । सांभाळावें निरंतर ।
निघोनि जातिल नाहींतर । आमुचिया हातींचें ॥२०५॥
जैसा कार्तिकस्वामी उठोन । गेला मातापितरें सांडून ।
किंवा व्यासाचा नंदन । शुक उठोनि पैं गेला ॥२०६॥
तैसे हे जातिल निघून । आम्हांसी दु:ख होईल दारुण ।
वारंवार माझें मन । याचि परी चिंतीतसे ॥२०७॥
मागील सहा घटिका रात्री । उठोनिया उभय पुत्रीं ।
जावें अरण्यामाझारी । अनुष्ठाना लागुनी ॥२०८॥
माध्यान्हींसी घरीं यावें । सवेंचि मागति आणिक जावें ।
ऐसें नित्यानित्य बरवें । व्हावयासि लागलें ॥२०९॥
सुमुहूर्त तिथी पाहून । उभयतांचें चौलोपनयन ।
उत्तम द्विज मेळवून । यथाविधी पैं केलें ॥२१०॥
भर्ता पाहुनी सुलक्षण । जीऊबाईचें केलें लग्न ।
देवोनिया वस्त्रें भूषणें । गौरविलें कन्येसी ॥२११॥
तंव तया क्षेत्रामाझारी । कन्या होत्या ज्यांचे घरीं ।
ते द्विज पुसावया सत्वरीं । येते जाले रव अंगें ॥२१२॥
म्हणती तुमच्या उभयनंदनां । देतों आम्ही आपुल्या ललना ।
अलंकार भूषणें नाना । देवोनिया गौरवूं ॥२१३॥
गणेश भट जीसीं मानलें । ब्राह्मणांसेसे अभय दिधलें ।
तिथिनिश्चयातें नेमिलें । साहित्यातें करोनी ॥२१४॥
प्रथम तिथीप्रति जाण । नारायणाचें लाविलें लग्न ।
जोडा नेटका सुलक्षण । वधुवरें शोभलीं ॥२१५॥
तंव दुसरे तिथीचें संधान । नेम ठरवून करिती जाण ।
हें साद्यंत वर्तमान । रघुपतीसीं कळालें ॥२१६॥
निशी जाली दोन प्रहर । एकांत पाहुनि परिकर ।
सोडोनिया मातापितर । निघते जाले एकाकीं ॥२१७॥
सोडिलें ग्रामा आणि देशा । लंघित चालिले उतरदिशा ।
सरोनि गेली समग्रनिशा । मार्गीलागी चालतां ॥२१८॥
उदयाचळासी तमारि । प्रकट जालासे भास्करी ।
मग एक्या उपवनामाझारीं । जाऊनिया राहिले ॥२१९॥
लोकांसी पुसती वर्तमान । ग्राम किती राहिला एथून ।
ते ह्मणती पंचयोजन । ग्राम एथून राहिला ॥२२०॥
ऐसें पुसोनि तयालागून । निघते जाले तेथून ।
दिननिशी प्रती जाण । मार्गाप्रती चालावें ॥२२१॥
भंयकर गिरि - कंदर । मार्गीं श्वापदें आढळती फार ।
वृक व्याघ्रादि अति उग्र । मनुष्य आहारीं सर्वही ॥२२२॥
तयाचें भय अंतरीं । न धरितां जावें वनांतरीं ।
तीव्रकंटक पाया माझारीं । वेळोवेळा रूतती ॥२२३॥
उपानहावीण पादचारी । एक धोत्र अंगावरी ।
लहान लोटी हस्ता माझारी । समागमें इतुकें ॥२२४॥
पंचदिन पर्यंत जाण । नाहीं केलें जलप्राशन ।
सहावे दिवशीं सेवन । वनफळाचें पैं केलें ॥२२५॥
मार्गानें चालतां । सांगाती भेटले अवचिता ।
नाशिकासी जावयाची वार्ता । एकमेकांसेसे बोलती ॥२२६॥
तयांनीं याजप्रति पाहून । एकमेकांसी करिती भाषण ।
दिसतो वय करूनी लहान । परि योगीश्वर आहे हा ॥२२७॥
वय द्वादश वरुषें असतां । लंघित चालिला गिरिपर्वता ।
हा मानवी नव्हे तत्वतां । महा पुरुष दीसतो ॥२२८॥
ब्रह्मयाचे नंदन । सनत्कुमारादि चौघे जण ।
त्यांतील एक हा नंदन । आह्मांलागीं दीसतो ॥२२९॥
तरी याजप्रती पुसावें । आपुले सेवे घेवोनि जावें ।
कदापि न सोडावें । समागमें याचिया ॥२३०॥
ते पुसति अजि स्वामी । कवण्या देशा जातां तुम्ही ।
मार्गक्रमनीं बहुतगामी । दिसतसां बहुतची ॥२३१॥
तरी तुम्ही आहांत कवण । हें सांगावें आम्हांलागुन ।
ध्रुव - प्रल्हादा समान । वैराग्यशीळ दिसतसां ॥२३२॥
धाकुटें वय वामन । किं ब्रह्मकुमर अहाती जाण ।
काय तुमचें अभिधान । आम्हां लागीं सांगावें ॥२३३॥
रघुनाथ माझें अभिधान । जातों गंगातीरालागून ।
ऐसें तयांप्रति सांगून । निघते जाले त्वरेनें ॥२३४॥
ऐशी पाहून उदासीनता । चमत्कार वाटला द्विजांचे चित्ता ।
मग त्याचे पृष्ठ भागीं तत्वता । निघते जाले सत्वरीं ॥२३५॥
माध्यान्हीं पातला दिनकर । क्ष्धित जाले ते द्विजवर ।
स्वामीप्रती जोडोनि कर । विनंति करिते जहाले ॥२३६॥
आम्हांसी पंक्तीस घेऊन । करावें दीनाचें उद्धरण ।
प्रसादसमयो दैवें करून । प्राप्त आजी जहाला ॥२३७॥
स्वामी म्हणती मी निराहारी । भोजन न करी मार्गांतरीं ।
जाउनिया गंगातीरीं । पारणियातें करूं पैं ॥२३८॥
ऐसें ऐकोनि द्विजवर । करिते जाले नमस्कार ।
सर्वहि जोडोनिया कर । वारंवार विनविती ॥२३९॥
आग्रहाचा अति गौरव । पाहोनि त्यांचा दृढ भाव ।
भोजन सारिलें बरवें । सहा दिनाम शेवटीं ॥२४०॥
मागें अशोक क्षेत्रा आंत । काय जालासे वृत्तांत ।
तो श्रोते जनीं सावचित्त । श्रवण केला पाहिजे ॥२४१॥
प्रात:काळीं माता उठून । पाहूं गेली निज नंदन ।
रघुनाथ रघुनाथ म्हणून । हाका मारूं लागली ॥२४२॥
तंव न दिसे कोठें सांचल । होवोनि पाहे उतावेळ ।
घरदार शोधिलें सकळ । परि वेल्हाळ दिसेना ॥२४३॥
नित्य जातो वनांतरीं । म्हणवुनि अरण्या माझारीं ।
शोध केला बहुता परी । ग्रामांतील लोकांनीं ॥२४४॥
लग्न परवाचें नेमिलें । लेंकरूं उठोनि कोठें गेलें ।
न कळे तयासि काय झालें । कोणें ठायीं जाऊनी ॥२४५॥
पाहोनि तयाचे मातापितर । त्यातें वृत्तांत सांगती समग्र ।
बहुत शोधिलीं वनान्तरें । परि किशोर कोठें न दिसेचि ॥२४६॥
ऐसें ऐकतां वर्तमान । पिता धरणीसी करि शयन ।
उभे असताचि मातेनें । अंग धरणीसी टाकिलें ॥२४७॥
शोक करितसे फार । हाका मारित वारंवार ।
अहा अहारे रघुवीर । गेलासि आह्मां टाकुनी ॥२४८॥
माझ्या तान्हुल्या पाडसा । गेलासि तूं कवणिया देशा ।
तुजविण शून्य दाही दिशा । मजलागी दीसती ॥२४९॥
रघुवीरा तुला पाहिल्यावीण । जाऊं पाहे माझा प्राण ।
ऐसें वारंवार म्हणून । शोक करीत बहुतसा ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP