श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या ५१ ते १००

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


लोटतां बहुत संवत्सर । तंव होता झाला चमत्कार ।
भृगुक्षेत्रींचा एक विप्र । ज्ञानवर्धन नाम त्याचें ॥५१॥
अमंद नामें त्याची पत्नी । पतिव्रता आणि लावण्यखाणीं ।
उभयता स्त्री - पुरुषें मिळोनि । विचार करिते जाहले ॥५२॥
आपणांतें पुत्र संतान नाहीं । संपतीं असोनि करावें काई ।
जयाचेनि पुत्र प्राप्ती व्हावी । तोची उपाव करावा ॥५३॥
मग तया द्विजवर्यानें । क्षेत्रांतिल ब्राह्मण मेळवून ।
सर्व संपत्ती लुटवून । दिधली तये अवसरीं ॥५४॥
नर्मदा संगमीं जाऊन । उभयतांनीं स्नानें करून ।
सोडिलें संकल्पालावून । आपुलाले देहाचा ॥५५॥
मग सवेंचि पार्थिवलिंगें । मृत्तिकेचीं करोनि वेगें ।
मानसपूजा यथासांग । विध्युक्तेसी पै केली ॥५६॥
शेवटीं करोनि नमस्कार । वदते झाले स्पष्ट उत्तर ।
हे शिव हर कर्पूरगौर । विनंती आमुची परियेसा ॥५७॥
हे देह तुह्मांसी अर्पून । मागणें इतुकेंची वरदान ।
भृगुऋषी ऐसा नंदन । जन्मो आमुचे कुळीसी ॥५८॥
कीर्तिमंत व्हावा फार । करावा जगाचा उद्धार ।
हेंचि मागणें वारंवार । मृडानीवरा तुजप्रती ॥५९॥
ऐसे बोलोनि उभयतांनीं । एकमेकाचा हस्त धरूनी ।
धर्मडोहींत तत्क्षनीं । उडी घातली सत्राणें ॥६०॥
तळीं बैसले जावोन । सोडिते झाले प्राणोत्क्रमण ।
तंव अकस्मात शिवगण । तये स्थानीं पातला ॥६१॥
हा पाहोनि चमत्कार । तो कैलासातें जावोनि सत्वर ।
शिवापाशीं वृत्तांत समग्र । जाला होता कथियेला ॥६२॥
तये क्षणीं शिवदर्शनासी । मिळोनि गेले होते ऋषी ।
त्यांची नामें अनुक्रमेंसि । श्रवण केलीं पाहिजे ॥६३॥
दत्तात्रय याज्ञवल्कि वसिष्ट । व्यास आणि अत्री वरिष्ठ ।
शुक्र कपिलार्य श्रेष्ठ । वामदेव आठवा ॥६४॥
इतुके बैसले असतां जाण । शिवगण सांगे वर्तमान ।
हे शिवसांब त्रिलोचन । विनंती माझी परियेसा ॥६५॥
गुर्जर देशाचिये माझारी । समुद्र संगमीं रेवातीरीं ।
भृगुऋषी शिष्यसहपरिवारीं । अनुष्ठानीं बैसले ॥६६॥
मी तया स्थानीं जाऊन । घेतलें ऋषींचें दर्शन ।
करित त्यासीं संभाषण । सन्मुख उभा राहिलो ॥६७॥
तंव द्विज आणि त्याची पत्नी । उभयतांनीं संकल्प करूनी ।
शिव कर्पूर ऐसें स्मरोनि । देहालागीं त्यागिलें ॥६८॥
त्या उभयतांचे मनोरथ । पुरविणें असे तुह्मांस प्राप्त ।
ह्मणोनि सांगावयासी त्वरित । स्वामीपाशीं पातलों ॥६९॥
तुह्मी तव अंतरसाक्षी जाण । ठाउकें सर्व वर्तमान ।
परि करावया त्यांचे मनोरथ पूर्ण । विलंब होईळ सर्वथा ॥७०॥
ह्मणवुनिया लवडसवडीं । धांवत आलो मी तांतडी ।
विलंब न करावा याची घडी । तेथें गेली पाहिजे ॥७१॥
ऐसे ऐकोनि गणाचें भाषण । सदाशिव निघे त्वरें करून ।
तंव ऋषी पुसती वर्तमान । कोठें जातां ह्मणवूनी ॥७२॥
तंव ऋषींप्रती जाण । सांगतां जाला पंचवदन ।
नर्मदातीरा लागून । आह्मांते जाणें त्वरेसी ॥७३॥
मग ऋषी बोलती तये वेळीं । हे नागभूषण चंद्रमौळी ।
तुह्मांसवें ऋषी मंडळी । आह्मी सर्व येतों पैं ॥७४॥
रेवा संगमीं करूं स्नान । घेऊं भृगुऋषींचें दर्शन ।
मनोगत करूं निवेदन । तया मुनिश्रोष्ठासी ॥७५॥
शंकर ह्मणे अहं विशेष । पाचारिला नंदिकेश ।
आरूढोनिया उमा महेश । निघते जाले त्वरेनें ॥७६॥
न लागतां पातियासी पाती । ऋषींसहित उमापती ।
येवोनिया समीर गती । रेवातटा पावले ॥७७॥
भृगुमुनी आदि ऋषिगण । नेत्रीं पाहोनिया त्रिनयन ।
देवोनिया अभ्युत्थान । तृणासनीं बैसविले ॥७८॥
सांब ह्मणवो मुनिसत्तमा । धन्य आजीचा दिवसमहिमा ।
तुमच्या दर्शनाचा आह्मां । लाभ जाला ह्मणवूनी ॥७९॥
परस्परें हाची लाभ । भृगु ह्मणे वो शिवसांब ।
तूं भक्तरक्षक उमावल्लभ । करुणाकर सर्वांसी ॥८०॥
द्विजपत्नी आणि द्विजवर । करोनि तव नामाचा उच्चार ।
हात धरोनि परस्परें । देहालागीं त्यागिले ॥८१॥
मग बोलता जाला पंचवदन । ठाऊकें जालें वर्तमान ।
तयाचे उदाराप्रती जाणें । लागेल तुह्मां आह्मांसी ॥८२॥
स्त्रीपुरुषांनीं निश्चयो केला । उभयतांनीं संकल्प सोडिला ॥
ह्मणवुनि तयांचे उदराला । जाणें लागे निश्चित ॥८३॥
ऐसा ऐकोनि विचार । बोले हिमनगाची कुमार ।
हे शिवसांब नागेंद्र - हार । नीलकंठ पिनाकी ॥८४॥
तुह्मी आह्मी उभयतां । तिसरे भृगुमुनि तत्वतां ।
द्विज करोनि मातापिता । जन्म घेऊं त्याउदरीं ॥८५॥
ऐसें भवानीचें उत्तर । ऐकोनि वदती मुनी समग्र ।
दत्तात्रयादि थोर थोर । संगें आले होते जे ॥८६॥
ह्मणती ऐके हो भृगुराजश्रेष्ठा । तूं सर्वार्थ साक्षीद्रष्टा ।
तुझीये ठायीं आमुची निष्ठा । एकभावें लागावी ॥८७॥
असावा तुमचा समागम । गंगावासहि अति उत्तम ।
स्नानसंध्या यथाक्रमे । सारूं आह्मी सर्वही ॥८८॥
भृगु ह्मणे तुह्मांलागून । जन्म घ्यावयाचें कारण ।
सहसाही नाहीं जाण । सर्व मुनिश्रेष्ठहो ॥८९॥
तंव मुनि बोलते जाले वचन । आह्मांसी कैचें जन्ममरण ।
अंशत: लीलामात्रें करून । कलीमाजी अवतरूं ॥९०॥
आह्मी देही असोनि देहातीत । विदेहपणें अविन्मुक्त ।
विचरुनिया निजध्यानातें । सोडित नाहींत कदापि ॥९१॥
तेथ कलियुगाचें भय । वृथा भ्रमरूप संदेह ।
अंतरीं धरावी काय । एक देशीचे परी ॥९२॥
भृगु ह्मणे वो बहुत बरें । परि कलिचे मानव अनिवार ।
पीडतील नानाप्रकारें । कीर्ती प्रगट जालीया ॥९३॥
तरी तुह्मी इतुकें करावें । शिष्यांतें सांगीतलें बरवें ।
तैसें तुह्मी आचरावें ठायीं ठायीं जन्मूनी ॥९४॥
पूर्व देहाचें विस्मरण । तुह्मां सर्वांसी पडेल जाण ।
मग तत्वविद्येतें बोलून । मोहपाश छेदीन मी ॥९५॥
बरें ह्मणूनी मुनीश्वर । करिते जाले जयजयकर ।
प्रेमानंदें अतिनिर्भर । होवोनिया मानसीं ॥९६॥
ऐसें सर्वांसीं सांगून । एक निश्चय केला जाण ।
कलियुगामाजी अवतरण । व्हावयालागीं सर्वांनीं ॥९७॥
कांहीं काळ तप आचरून । अनुक्रमें होतेल अवतीर्ण ।
श्रोते होवोनि सावधान । पूर्वानुसंधान परिसिजे ॥९८॥
अधिक मासाचियें माझारीं । उभयतांनीं अपुले करी ।
पार्थिवें पूजोनिया साजरीं । देह त्यागिले होते पै ॥९९॥
तो चमत्कार अद्यापिवरी । अठ्ठाविसावे संवत्सरीं ।
अधिक मासाचिये मझारी । लिंगें अनेक निघती पै ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP