मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|साक्षात्कार| अध्याय सातवा साक्षात्कार अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा साक्षात्कार - अध्याय सातवा वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी अध्याय सातवा Translation - भाषांतर श्रीएमन्माहुरगडनिवासायनम: । जयजयाची गुरुराया । रघुनाथस्वामी प्रतापवीर्या ।कृपासिंधु करुणालया । धन्यधन्य तूं एक ॥१॥तुझेनि देवासि देवपण । तुझेनि मायेंसि चळणवळण । स्थावर जंगम आदि करून । तुझे रूपीं रहाती ॥२॥तुझिये रूपाचा अंतपार । पाहतां शिणला चतुर्वक्त्र । तवगुण वर्णितां फणिवर । सह्स्त्रमुखें शिणला ॥३॥चारी वदती नेति नेति । साहींस न पवे तुझी स्थिती । कुंठित जाहलीसे मती । अठरांची वर्णितां ॥४॥तूं अक्षयी आणि निर्विकार । क्षणेक होसी तूं साकार । दत्तात्रयादि चोवीस वार । घेसी अवतार स्वइच्छे ॥५॥क्षणेक मानवी वेष धरून । जढमूढां करिसी उद्धरण । तोडोनिया मायाबंधन । मुक्त करिसी संसारीं ॥६॥आतां श्रोतें होइजे सादर । चित्त करोनिया उदार । मागें बोलिलों कथासार । दत्तात्रय भेटले ती ॥७॥एकाकार वृत्ति होऊन । खालीं उतरलों पर्वताहून । गोसावी यासी वर्तमान । झालें तितकें कथियेलें ॥८॥ते म्हणती आम्ही एथ बसून । बहुत केलें तपालागून । आम्हांसी न झालें दर्शन । तुज कैचें होयासि ॥९॥यद्यपि तुज झालें दर्शन । तरि काय सिद्धी घेतली मागून । त्यासी दाखवावी खूण । आम्हांलागीं ये काळीं ॥१०॥तयासी वदलों मी उत्तर । निरामय तो दिगंबर । त्याजसी मायिक व्यवहार । बोलूं नये सर्वथा ॥११॥सिद्धि सामर्थ्य आणि धन । आयुष्यातें बहु मागण । हें तों अवघें मायिक जाण । मागूं नये सर्वथा ॥१२॥श्रीहरिगुणाचें वर्णन । सर्वांभूतीं एक पाहण । हेंचि मागोनी मागण । घेतलें म्या देवासी ॥१३॥सद्गुरुनें कृपा करून । कवित्ववाणी दिधली जाण । आत्मज्ञानहि पूर्णपणें । पूर्वींच मज दीधलें ॥१४॥आतां दत्तात्रय भेटून । आणखी दिधलें वरदान । कवित्ववाणी ब्रह्मज्ञान । वृद्धिकर होऊं का ॥१५॥इतुकेंचि पुरे मजलागून । बहुत कासयासी मागण । वरकड प्राप्त दैवें कडून । होईळ तें तें होवो सुखें ॥१६॥दत्तात्रयाचें प्रसादवसन । पादुका द्वयातें काढून । दाखविता झालों जाण । तया तपेश्वरासी ॥१७॥तयांनीं ते खूण पाहून । ह्मणती रे तूं धन्य धन्य । श्रीगुरुप्रसाद पावून । कृपापात्र जाहलासी ॥१८॥असो तयासी नमून । निघता झालों मी तेथून । कमंडलू तीर्थ करुनि स्नान । फळें भक्षण पैं केलीं ॥१९॥रघुनाथगुरुचरण - स्मरण । करुनि केलेंसे प्रयाण । वाटे जाऊं काय उडून । पर लावूनि ये काळीं ॥२०॥केव्हां पाहीन त्यांचे चरण । जो आनंदसिंधु करुणाघन । सर्वभूतीं कृपा समान । करित जसे सर्वदा ॥२१॥जो सर्वयोगी यांचा राव । दगद्गुरु श्रीदत्तात्रय । तोहि जयाचे गुण गाय । धन्य धन्य ह्मणवोनि ॥२२॥तेथें मानवीं बापुडीं । सह्रण रिघती तातडी । स्तुति करिती लवडासवडी । नवल काय तयाचें ॥२३॥जो ब्रह्माचा आजा झाल । सर्वांतरीसे व्यापला । इंद्रहि जरि त्या शरण आला । नवल काय तयाचें ॥२४॥ऐसा माझा गुरुराय । केव्हां पाहीन त्याचे पाय । मग अंतरीं सुचला उपाय । त्वरित जाणें होईसा ॥२५॥तेथूनि उत्तम स्थळ पवित्र । अष्ट योजनें प्रभासक्षेत्र । समुद्रतटाकीं स्वतंत्र । ऐलतीरीं आहे पां ॥२६॥तथवरी पायीं चालून । बैसावें वाहनीं जाऊन । होईल तिसरे दिनीं जाण । आपुलिया देशासी ॥२७॥सवेंचि सद्गुरुचे चरण । दृष्टीसी पडतील जाण । ऐसा निश्चय ठरावून । निघता झालों तेथुनी ॥२८॥घेतलें तुळशीशाम - दर्शन । जे कां द्वारका पुरातन । वृंदेचे वियोगें करून । भगवान तेथ लोळले ॥२९॥हें रुक्मिणीनें पाहून । बहुत झाली क्रोधायमान । मग तेथूनिया रुसून । पर्वतावरी बैसली ॥३०॥नहात असतां गेली उठून । ह्मणवोनिया पाणी ऊन ऊन । सात कुंडें उदक भरोन । अद्यापि असती ते स्थानीं ॥३१॥वृंदेच्या स्मशानीं वहिली । तुळशी तेथें निर्माण झाली । तुळशी - शाम ऐसी बोली । तैंपासुनी बोलती ॥३२॥घेऊनि विष्णूचें दर्शन । तप्तकुंडीं केलें स्नान । रखुमादेवीसी वंदून । निघता झालों सत्वरीं ॥३३॥सौराष्ट्रदेश अवलोकून । झालें प्रभासासी येण । सोमनाथलिंग प्राचीन । दृष्टीलागीं पाहिलें ॥३४॥ त्रिवेणीचें केलें स्नान । श्रीकृष्ण झाले जेथ निधन । देह ठेविला तो ठिकाण । दृष्टीलागीं पाहिला ॥३५॥सरस्वतीनें आपण । वडवाग्नी मुखीं धरून । सागरीं दिधला सोडून । तें अग्निकुंड पाहिलें ॥३६॥यादव समग्र मिळून । पाळीचें शस्त्र करून । परस्परें पावलें निधन । तेंहि ठिकाण पाहिलें ॥३७॥सवेंचि सोमनाथ - दर्शन । घेउनि सारिलें भोजन । जहाजीं बैसता झालों जाण । समुद्रामाजी जाऊनी ॥३८॥तंव त्या जहाजवाल्यांनीं । माल भरला तिये ठिकाणीं । मनुष्य पुष्कळ बैसवोनि । वोझें बहुत पैं केलें ॥३९॥वारे हळुचसे सुटले । ह्मणोनि जहाजातें लोटिलें । बंदरापासुनिया गेलें । योजन तेरा पर्यंत ॥४०॥वायू नाहीं ऐसा झाला । जहाजास भार बहुत केला । प्रळयकाळ उभा ठेला । अकस्मात ते काळीं ॥४१॥जहाज डगमगुनि वहिलें । सर्व बुडावयासि लागलें । शंखध्वनि करिती आवले । बुडालें बुडालें ह्मणवूनि ॥४२॥रात्र झाली दोनप्रहर । निबिड पडलासे अंधार । झाला एकचि हाहा:कार । रांडा पोर आरडाती ॥४३॥मी उभा ठाकोनि तये वेळीं । दिधली मोठियानें आरोळी । धावे धावे हो या काळीं । गुरूरघुनाथ स्वामीया ॥४४॥तुवां भवसिंधूमाजी तारिलें । एथें दुसरें विघ्न आलें । तुज वाचुनिया वहिलें । कोणा आतां आठवूं ॥४५॥सर्व दैवतें सोडून । जोडिले गुरु तुमचे चरण । आतां तुह्मांविण धावण । कोणासी धावा ह्मणावें ॥४६॥मी भीत नाहीं आपुल्या मरणा । परि इच्छा राहिली आहे जाण । एकवेळा स्वामीचरणा । येवोनिया पहावें ॥४७॥आतां लाविसी उशीर । तरी बुडालों आह्मीं समग्र । धावें धावे हो सत्वर । वायुरूपें करोनि ॥४८॥ऐसें ह्मणोनि आक्रंदत । तंव एकाएकी अकस्मात । सुटला झुंजात मारुत । जहाज चाली लागलें ॥४९॥तेव्हां बहुत आनंद झाला । सर्वांलागीं प्राण आला । गजेंद्राच्या आकांताला । श्रीहरी जेवि पावले ॥५०॥तयापरी रघुनाथ गुरू । धावण्या धावले सत्वरू । तारुनिया पैलतीरु । पाववीलें सत्वरीं ॥५१॥धन्य धन्य हो गुरुराय । उतराई मी होऊं काय । मजसि तारक तुझे पाय । सर्वापरी जहाले ॥५२॥असो एक्या प्रहारामाझारी । जहाज लागलें येवोनि तीरीं । मुंबादेवीचिये क्षेत्रीं । येवोनिया राहिलों ॥५३॥तेथुनि तिसरिये दिवशीं । येता झालों नाशकासी । येवोनिया मठापाशीं । सद्गुरुचरण पाहिले ॥५४॥करोनिया साष्टांगनमन । उभा ठेलों हात जोडून । सप्रेमे भरोनिया नयन । कंठ दाटोनि पैं आला ॥५५॥झाला बहुतचि आनंद । उचंबळला ब्रह्मानंद । सांडोनिया सर्व खेद । सुखरूप जहलों ॥५६॥वाटे आजि उगवला सुदिन । पाहिले सद्गुरुचे चरण । आंगींचा सर्व गेला शीण । पायीं लीन होतांची ॥५७॥सद्गुरु देउनि आशीर्वचन । बोलते झाले हास्यवदन । कार्य तुमचें परिपूर्ण । झालें काय सर्वही ॥५८॥सांगितलें त्याप्रमाण । केलें होतें कीं साधन । श्रीदत्ताचें दर्शन । प्रत्यक्षपणें झालें कीं ॥५९॥ऐसें बोलतां गुरुमूर्ती । मी वदता झालों तयाप्रती । स्वामीप्रसादाचीं ख्याती । सर्व झाली सफळता ॥६०॥मग श्रीदत्ताचें प्रसादवसन । दुजा पादुकांचा जोड जाण । जो गिरनारीं दिधला दिगंबरान । तो स्वामीपाशीं ठेविला ॥६१॥मग मी बोलता झालों वचन । स्वामी आशीर्वादाचें देण । त्याचें मुखानें महिमान । न सांगवे मजप्रती ॥६२॥आज्ञा होईल तरी जाण । करोनी ग्रंथाचें लेखन । पायाप्रती निवेदन । वर्तमान करीन मी ॥६३॥सद्गुरु तथास्तु म्हणून । आज्ञा देती मजलागून । करावें ग्रंथाचें लेखन । साक्षात्कार या नामें ॥६४॥तो हा ग्रंथ वरदी जाण । केले सात अध्याय लेखन । जैसे सप्त समुद्र परिपूर्ण । ब्रह्मरसें भरियेले ॥६५॥किंवा हे सप्तद्वीपें विशाळ । त्यावरि गुरुपादुका सुढाळ । कथाभाग अतिसोज्वळ । विराजमान शोभले ॥६६॥किंवा ह्या सप्तपुर्या संपूर्ण । तेथें सद्गुरु दैवत आपण । कथाभाग हे तीर्थाटन । श्रवणद्वारें करावी ॥६७॥श्रोते होऊनि सावधान । करावें यायचें मनन । जयासि आवडेल त्यानें । साधन ऐसें करावें ॥६८॥सर्व प्राप्तीसी कारण । मुख्य सद्गुरुचे चरण । सगुण अथवा निर्गुण । रूप प्राप्ती व्हावया ॥६९॥असो जो असेल अंतर्भूत । त्यानें पाहुनि गुरुसमर्थ । तयासी जावें शरणागत । आपुलें काज साधावया ॥७०॥शके सत्राशें चवतिशीं । अंगिरा नाम संवत्सरासी । कार्तिक शुद्ध एकादशी । भानुवासर ते दिनीं ॥७१॥गंगेचे तटाकीं जाण । सद्गुरु सांनिध्य बैसून । करूनिया आत्मचिंतन । ग्रंथ समाप्ति पैं केली ॥७२॥दाखवोनि रूप सगुण । केला संशय निरसन । सर्वांभूतीं एकपण । अनुभवासी आणिलें ॥७३॥ह्मणोनिया ग्रंथालागून । साक्षात्कार नामाभिधान । गुरूनें उपवनीं बैसून । स्वइच्छेनें ठेविलें ॥७४॥आउट हाताचें रम्यस्थान । तेचिं सुंदर आनंदवन । षड चक्राचे बहु सघन । वृक्ष तेथें लागले ॥७५॥घंटारवादि समग्र । दशनाद उठती वारंवार । तेचि कोकिळा सुस्वर । गायन करिती स्वच्छंदें ॥७६॥हंसपक्षी तेजाकार । उंची बैसोनि वृक्षावर । सोहंभावाचा हुंकार । देवोनि सुखें डोलती ॥७७॥सत्रावीचिये सरोवरीं । रघुनाथ पदकमळें साजिरीं । सुंदरसहस्त्र पत्राकारीं । स्वयंप्रकाश विकसलीं ॥७८॥तेथें निरंजनरूपें भ्रमर । अनुभवआमोद वारंवार । सेवोनिया निरंतर । रुंझी करी पूर्णत्वें ॥७९॥रघुनाथ आदि अंतीं जाण । रघुनाथ ग्रंथासी कारण । मृदंगरूपी निरंजन । वाजविला तयांनीं ॥८०॥॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP