साक्षात्कार - अध्याय पहिला

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्रीमन्महागणाधिपतयेनम: । श्री सरस्वत्यैनम: ।
श्रीमद्रेवताचळनिवासि दत्तात्रयायनम: ॥

ॐ नमोजी गजवदना । आदिमायेचिया नंदना ।
ग्रंथ वदावयासी स्फूर्णा । द्यावी मज मूढाप्रती ॥१॥
तूं सर्वांसी आधार । तुजलागी स्तविती सुरासुर ।
गमनागमनीं वारंवार । सर्व तूंतें आठविती ॥२॥
आतां नमू जी सरस्वती । जे मूळमाया भगवती ।
आत्मप्रकाश चिच्छक्ति । देई मती बाळका ॥३॥
ॐ नमोजी श्रीगुरुदत्ता । परात्पर स्वामी अवधूता ।
परब्रह्मा कृपावंता । येई आतां धावूनी ॥४॥
मायबाप तूं दिगंबर । तुझेनि ग्रंथासी आधार ।
तूंच एथें लिहिणार । दुजा विचार नसेचि ॥५॥
तुझिया कृपेचें लेखन । करावया उदित झालें मन ।
आतां देवोनि कृपादान । बुद्धि पूर्ण करावी ॥६॥
आतां नमो जी सद्गुरु । रघुनाथस्वामी परात्परू ।
ब्रह्मविद्येचे कल्पतरू । अकल्पित वरू देते जे ॥७॥
जो आत्मप्राप्तीचा नादनिधी । जो भवभ्रमातें उच्छेदी ।
स्वप्रकाशकर्ता तेजाब्धि । द्वितीय भानु उगवला ॥८॥
जे जे उपमा देऊं जाण । ते ते स्वामिपदीं दिसे गौण ।
सर्वोत्कर्ष गुरुचें देणें । उपमा आन असेचिना ॥९॥
उपमेसि परिस देऊं जाण । तरी तो लोहाचें करी सुवर्ण ।
 न देववे परिसपण । हे उणीव त्या आंगीं ॥१०॥
तैसा नोहे हा सद्गुरू । ज्याचे मस्तकीं ठेवीत करू ।  
त्यासी करी बिंबाकारू । उणीव कांहीं न ठेवी ॥११॥
गुरुकृपा ज्यावरी झाली । त्यापासुनी बहुत प्राप्ति जाली ।
परंपरा वंशवेली । असे चालिली पुढारी ॥१२॥
असो उपमेसी देऊं नारायण । तेहि उपमा दिसे गौण ।
भक्तकाजासी स्वयें आपण । धाऊनि जात निजांगें ॥१३॥
गुरु समर्थ त्याचियाहून । ज्यालागीं पाहे कृपाकरून ।
ज्याचें काज तया करून । करवोनि मन निववीतसे ॥१४॥
झाली उपमेसी सीमा । सर्वोत्कर्ष गुरुचा महिमा ।
कोण करी त्याची नेमा । पुरुषोत्तमा वंद्य जो ॥१५॥
गुरु परब्रह्म अवतार । गुरु निर्गुण निराकार ।
गुरु निष्कळंक निराधार । गुरु सार सर्वत्रीं ॥१६॥
तयासी माझें साष्टांगनमन । ग्रंथांतरीं करोनि स्तवन ।
जैं दीपकें भानुप्रती जाण । न लाजून ओवाळिजे ॥१७॥
आतां नमोजी कुळदैवता । जे ह्मैसासुरमथनी कृतांता ।
दुजी परशरामाची माता । माहुर - गडवासिनी ॥१८॥
आतां नमोजी मातापितर । जें मुख्यदैवतांचें सार ।
माता लक्ष्मी पिता श्रीधर । लेखन करणार ग्रामाचे ॥१९॥
दक्षिणदेश उच्च स्थान । बालाघाट नामाभिधान ।
बंजरातीर पाहून । दृढ वतन साधिलें ॥२०॥
कळंब ग्रामासि अभिधान । परळीवैजनाथ तेथून ।
पूर्वेप्रती चार योजन । संतीं खूण ओळखिजे ॥२१॥
पूर्वनाम माझें अवधूत । असोनि संसारीं निरत ।
दैवयोगें अकस्मात् । विराग देहांत उदेला ॥२२॥
सोडोनिया रोजगार वतन । त्यागोनि आप्त दारा धन ।
उत्तर दिशा अवलोकून । गंगातीरा पातलों ॥२३॥
पाहुनी क्षेत्र जनस्थान । सोडोनिया मानापमान ।
गुरु रघुनाथ स्वामीचरण । दृढ येवोनी धरियेले ॥२४॥
ते दयाळ कृपाघन । समद्रष्टे सर्वदा पूर्ण ।
त्यांनीं होऊनी उत्तीर्ण । मजलागीं ज्ञान बोधविलें ॥२५॥
मस्तकी ठेविला प्रसादकर । कवित्वरचनीं दिधला वर ।
करावयासी परोपकार । प्राकृतपर वदविलें ॥२६॥
दीडमास पर्यंत जाण । राहिलों गुरुआश्रयें करून ।
परि घ्यावया श्रीदत्तदर्शन । उद्विग्न मन होतसे ॥२७॥
वाचेला दत्तात्रयस्मरण । शरिरीं रोमांच उठून ।
क्षणक्षणा करावें रुदन । बाष्प दाटून येतसे ॥२८॥
वाटे जावें रेवताचला । दिगंबर मूर्ति पहावी डोळां ।
साक्षातदर्शन सोहळा । दृष्टीलागीं पहावा ॥२९॥
ऐसें पाहुनिया चिन्ह । सद्गुरु पुसती वर्तमान ।
स्वस्थ आहे कीं तुझें मन । सांडूनी मौन सांग पां ॥३०॥
ऐसा पुसतां वृत्तांत । निवेदन कीं म्यां हृद्रत ।
सगुण दर्शनासी चित्त । असे उदित स्वामियां ॥३१॥
जाणूनिया भविष्योत्तर । स्वामी देती प्रत्युत्तर ।
तुज भेटेल दिगंबर । भाव दृढतर पाहूनी ॥३२॥
एथोनि साता महिनिया जाण । वरती संख्या एकादश दिन ।
रेवताचळासी जाऊन । तुज दर्शन होईल ॥३३॥
जेथें दत्ताद्रयाचें स्थान । तेथें त्रयदिन बैसे जाऊन ।
करूनिया अनुष्टान । अंतरीं ध्यान करावें ॥३४॥
चतुर्थ दिन उगवलियावरी । निश्चयता पाहुनिया बरी ।
पड्भुज मूर्ति साजिरी । साक्षात्कारीं भेटेल ॥३५॥
न मोडी निश्चयाचें आसन । उच्छिष्ट करूं नको मन ।
सिद्धीहि आलिया चालून । त्यागीं मन असूं दे ॥३६॥
सिद्धीसी इच्छित असेल मन । तरि सांगे मौनातें सांडून ।
तयासारिखें संधान । करितां येईल सत्वरीं ॥३७॥
अरे पाहे पां सिद्धींचा पाळा । झाला मजभोवता गोळा ।
लात हाणोनी त्यांचे कपाळा । पैलीकडे लोटितों मी ॥३८॥
ऐसी वचनोक्ति बोलून । क्षणैक रहाते झाले मौन ।
ह्मणती पाहे रे निरंजन । वामभागीं माझिया ॥३९॥
निशी झालीसे दोनप्रहर । माध्यान्ह पातला शीतकर ।
दीप उजळोनिया सत्वर । पाहता जालों निजदृष्टीं ॥४०॥
तंव स्वामींचिया वामभागीं । सिद्धी चालिल्या लागवेगीं ।
शुचिष्मंतपणें सर्वांगीं । छायारूपें देखिल्या ॥४१॥
जैं स्त्रिया जाती मार्गेंकरून । छाया चालती भिंतीवरून ।
त्यापरि सिद्धी सचिन्ह । दृष्टीलागीं देखिल्या ॥४२॥
ऐसा पाहुनी चमत्कार । विस्मयें भरलेंसे अंतर ।
दुसरेंन पाहे त्याचिप्रकार । तंव त्या दृष्टी न दीसती ॥४३॥
करुनि स्वामींसी नमस्कार । स्तुति करीत वारंवार ।
योगियांत श्रेष्ठ शंकर । त्याचेनि धैर्य नव्हे हें ॥४४॥
सिद्धी आलिया असतां चालून । त्यागीं उपजेल कवणाचें मन ।
पाहतां त्रैलोक्यहि शोधून । ऐसा पुरुष न देखों ॥४५॥
जें राजया एकटएकला । बहुत दिसा पुत्र झाल ।
तो जरि मुळावरी आला । तरि त्याग न करवे ॥४६।
तैसें करितां आत्मचिंतन । जरि सिद्धी झाली प्रसन्न ।
तिचे त्यागाविषयीं मन । उदित नोहे कदापि ॥४७॥
सद्गुरु ! तुमचा महिमा पूर्ण । वर्णू न शके चतुरानन ।
तेथें मी मंदमती करून । वर्णूं शके कोठोनी ॥४८॥
ऐसें करूनि स्तवना । सवेंचि केली विज्ञापन ।
स्वामी नावडे माझिया मना । सिद्धीलागी मागणें ॥४९॥
परि एक आहे जी विनवणी । देहू ग्रामीं येतां क्षणीं ।
इंद्रायणीचें सोडिलें पाणी । गुंतली वाणी तें ऐका ॥५०॥
हा देह दत्तासी अर्पण । एक संवत्सर सप्तदिन ।
इतुकियांत झालिया दर्शन । ठेवीन प्राण आपुला ॥५१॥
नाहींतरी देह ठेवणें । वांचून प्रेताचिया समान ।
जैसें छेदलिया घ्राण । मुख दावणें जगातें ॥५२॥
आणि झालिया दत्ताचें दर्शन । वर इतुकाचि मागेन ।
देई आद्य इत तत्वज्ञान । आणि वर्णन तव गुणां ॥५३॥
इतुकिया वरि जरि मागेन । तरि मज होवो अध:पतन ।
गुरुनिंदेचें पातक पूर्ण । मजलागून घडो कां ॥५४॥
ऐसें वदोनिया निष्टंक । त्रिवार सोडिलें मी उदक ।
मग येऊनिया नाशिक । दृष्टीलागीं पाहिलें ॥५५॥
दैवें जोडिले स्वामीचरण । संतुष्ट झालें माझें मन ।
दत्तात्रयासी वर मागेन । हें चिंतन नेटविलें ॥५६॥
आतां इतुकें असे माझे मनीं । श्रीदत्त पहावा निजनयनीं ।
चरणीं लागुनिया धणी । पुरवावी मनाची ॥५७॥
स्वामी पूर्ण कृपाकर । जाणोनी पुढील विचार ।
आज्ञा दिधली सत्वर । जावयासी गिरनारा ॥५८॥
ह्मणती ऐक रे निरंजना । पुरवोनि येई का वासना ।
वावळूं देऊं नको मना । आणिका देशा जावया ॥५९॥
तथास्तु ऐसें वदून । स्व आमीप्रती केलें नमन ।
मठिकेभीतरीं जाऊन । केलें शयन एकांतीं ॥६०॥
तंव ब्राह्मणाचें रूप धरून । स्वप्नीं श्रीदत्त आले आपण ।
ह्मणती ऊठ रे निरंजन । आहे जाण तुजप्रती ॥६१॥
मजलागी त्र्यंबका लागून । आतांचि आहे कीं रे जाण ।
तरि तूं करुनिया स्नान । सत्वर गती चाल कां ॥६२॥
जंव पाहे जागृत होऊन । तंव तो न दिसे ब्राह्मण ।
विस्मययुक्त झालें मन । मग उठोनी बैसलों ॥६३॥
सवेंचि गंगेप्रती जाऊन । उरकूनिया संध्या स्नान ।
घेतलें सद्गुरु - दर्शन । साष्टांग नमन करोनी ॥६४॥
मस्तकीं वंदिली चरणधुळी । रोमांच उठिले तयेवेळीं ।
असुवें आलीं नेत्रकमळीं । बाष्प कंठीं दाटला ॥६५॥
स्फुंद स्फुंदोनि करी रुदन । गुरुमुखातें अवलोकून ॥
वाटे केव्हां होईल येणें । गुरुचरणा जवळिकें ॥६६॥
गुरु ह्मणती निरंजना । खेद कांहीं न मानी मना ।
मी करीन तव संरक्षणा । दुर्घटा वना माझारीं ॥६७॥
परतोनिया वंदिले चरण । गुंफेचे खालीं उतरून ।
सर्वांप्रती वंदन करून । मार्गाप्रती लागलों ॥६८॥
मार्गीं चालतां गहिंवर । हृदयीं दाटे वारंवार ।
नेत्रीं वाहतसे नीर । खेद फार जाहला ॥६९॥
पश्चिमेसि केलें गमन । त्र्यंबकक्षेत्रा माजी जाऊन ।
घेतलें त्र्यंबकेश्वर दर्शन । त्याचे गुण आठवूनि ॥७०॥
द्वितीय दिन उगवतां जाण । केलें कुशाव्रताचें स्नान ।
शिवालयामाजी जाऊन । केलें नमन शिवासी ॥७१॥
गिरिप्रदक्षिणा जाऊन । सायंकाळीं झालें येणें ।
कुशाव्रतासी जाऊन । केलें स्नान मागुती ॥७२॥
गंगाधरपंत भक्तनिधान । जयासी सदाशिव प्रसन्न ।
तयाचें घेउनिया दर्शन । भोजन केलें त्यावरी ॥७३॥
त्रैदिन पर्यंत । तया स्थानीं राहिलों निश्चित ।
तंव नाशकाहून अकस्मात । पत्र आलें स्वामींचें ॥७४॥
सद्गुरु कृपाळ दयाघन । न पडे तयासि विस्मरण ।
अज्ञान लेंकरूं ह्मणून । दया उदेली अंतरीं ॥७५॥
होईल दत्ताचें दर्शन । ह्मणोनि दिधलें आशीर्वचन ।
परि न सांगितलें साधन । दत्तात्रय प्राप्तीचें ॥७६॥
ऐसें करोनिया मनन । पाचारिला एक ब्राह्मण ।
करोनिया पत्रलेखन । पाठविलें त्या हातीं ॥७७॥
आशीर्वाद रे निरंजना । परिपूर्ण हो तवकामना ।
व्हावया सगुण दर्शना । साधन लिहिलें तें ऐक ॥७८॥
षड्भुज मूर्तीचें ध्यान । साळंकृत प्रसन्नवदन ।
तेजस्वी दैदीप्यमान । श्यामवर्ण सर्वांगीं ॥७९॥
रत्नभूषणें मंडित । वस्त्रें उत्तम शुचिष्मंत ।
मस्तकीं मुगुट शोभिवंत । विद्युल्लतेचियेपरी ॥८०॥
कर्णामाजी रत्नकुंडलें । भाळी चंदन परिमळ ।
केशर - कस्तूरीचा मेळ । करोनिया लावावा ॥८१॥
भोवया सरळ सुरेखा । आकर्ण नयन विशाल देखा ।
सरळ सुंदर नासिका । मुखशोभा त्या खालीं ॥८२॥
तयामाजी दंतपंक्ति । पहात जाव्या अपूर्वगती ।
चंद्रसूर्याची दीप्ति । तयास्थानीं योजावी ॥८३॥
आरक्त प्रवाळ बारिक अधर । हनुवटी चंद्रबिंबाकार ।
जैसा द्वितीयेचा शीतकर । सोज्वळपणें दिसतसे ॥८४॥
तैसी आतिशयिक सान । उंच कपोला संलग्न ।
तयाखालीं ग्रविचें स्थान । लंबायमान योजावें ॥८५॥
तयामाजी कंठमणि । विशाळ तेजे फाके गगनीं ।
शोभायमान एकरणीं । गळ्यामाजी योजावें ॥८६॥
तयाखालीं मुक्तमाळा । सुरेखपणीं अति सोज्वळा ।
पदकलग जडित विशाळा । अति मृदुळ पहाव्या ॥८७॥
सुवर्ण पुतळियांच्या माळा । अनेक प्रकारीं बोरमाळा ।
त्याचिये खालीं जवमाळा । साकळ्या गळा शोभती ॥८८॥
तयावरुते पुष्पमाळा । आपाद पर्यंत अति कोमळा ।
टवटवीत बहु परिमळा । शुभ्रवर्ण चांगल्या ॥८९॥
यज्ञोपवीत त्या आंतून । सर्वांगीं चर्चिला चंदन ।
पट्टकुळ तेजायमान । तयावरई शोभतसे ॥९०॥
कासे कसिला पीतांबर । सुवर्णवर्णी तेजाकार ।
रत्न खचित शोभती पदर । काआठी आणि दुभागी ॥९१॥
त्यावरि कटिसूत्र सरणी । घावर्‍या वाजती किणिकिणी ।
अति सोज्वळा उभय जघनीं । रत्न कोंदणी शोभती ॥९२॥
षड् हस्त कीं बहु सम्यक । मुद्रिका कंकणें तेज अमूप ।
आयुधें शोभती पृथुक । सर्वहस्तांमाझारी ॥९३॥
उर्ध्वहस्ताचिये ठायीं । शंखचक्र शोभती दोही ।
मध्यहस्तामाजी पाही । त्रिशूल डमरू विराजे ॥९४॥
अधो कमंडलू घेऊन । सव्यहस्तीं माळा जाण ।
फिरती जैसे ग्रहगण । एकसरे सारिखी ॥९५॥
पायीं वाळे रुणझुणती । अभिनव तयांची दीप्ति ।
पादांगुळ्या उत्तम गती । सुंदरपणें शोभल्या ॥९६॥
पादुका रत्नखचित सुंदर । चरणीं जडिल्या तेजाकार ।
तयावरुते श्रीकरधर । विराजमान शोभती ॥९७॥
भोंवतें शोभे उपवन । पूजा उपचार बहुविधपण ।
छत्रचामरें आदिकरून । पारतत्यकार करिताती ॥९८॥
यापरीची मूर्ती सगुण । उंची आपुलिया समान ।
निजमस्तकावरी ध्यान । ज्ञानदृष्टीनें पहावें ॥९९॥
प्रादेश अंतराय ठेवून । मस्तकीं रोमरंध्रांतून ।
भूचरी मूद्रेचें लक्षणें । दृष्टीलागीं पहावी ॥१००॥
चालतां अथवा बोलतां । उभे अथवा बैसले असतां ॥
षण्मास हें ध्यान करितां । श्रीगुरुदत्ता पाहसी ॥१०१॥
अंतरीं चिंतोनिया ध्यान । मुखीं कीजे नामस्मरण ।
विषयभोगावेगळें मन । व्रतस्थपणें ठेवावें ॥१०२॥
ऐसें आज्ञापत्र वाचून । आनंदयुक्त झालें मन ।
वाटे दत्तात्रय येऊन । आतांचि मजसी भेटला ॥१०३॥
मग शुचिष्मंत होऊन । अंतरिक्ष करी ऐसें ध्यान ।
निश्चयाकार करोनि मन । नामस्मरण करीतसे ॥१०४॥
असो यापरि करितां ध्यान । होईल श्रीगुरुदर्शन ।
श्रोते घेईजे ऐकून । पुढील कथा रसाळ जे ॥१०५॥
कविता हेचि मंगळरत्न । ग्रंथीं ओवोनी निरंजन ।
भाविक श्रोतियांचे कर्ण । सुशोभित करीतसे ॥१०६॥
इतिश्री साक्षात्कार ग्रंथ । संमत सद्गुरु रघुनाथ ।
दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥१०७॥
॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP