मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|साक्षात्कार| अध्याय दुसरा साक्षात्कार अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा साक्षात्कार - अध्याय दुसरा वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी अध्याय दुसरा Translation - भाषांतर श्रीमन्महागणाधिपतयेनम: । श्रीदिगंबरायनम: । जयजयाची सद्गुरु समर्था । ज्ञानार्णवा रघुनाथा । कैवल्यप्राप्तीची सत्ता । चढे हाता तुझेनी ॥१॥मज लेकुराची विनवणी । परिसुनिया निजश्रवणीं । दिधलीं जे कवित्ववाणी । प्रवाहिनी असावी ॥२॥येच विषयीं वारंवार । विनवितसे जोडिल्या कर । या ग्रंथीचें पैलतीर । पाविणार तूं स्वामी ॥३॥प्रथम अध्यायीं कथा गहन । सद्गुरु आज्ञा ते घेऊन । त्र्यंबक क्षेत्रा झालें येण । शिवदर्शन घेतलें ॥४॥स्वामीनीं पाठविलें पत्र । तें वाचुनिया स्वतंत्र । सगुणध्यान अतिविचित्र । मस्तकावरी पहातसे ॥५॥श्रोतीं होईजे सावधान । करावें निजभावेंसि श्रवण । हेंचि मागतों तुह्मांसी दान । देऊनि दीन सांभाळा ॥६॥स्वामींनीं पत्र पाठविलें । तें मी वाचुनिया वहिलें । शेवटीं निजमुखें भक्षिलें । तांबूलपर्णाचिये वर्णना ॥७॥स्वामिप्रस दें कवित्व रचना । केलें तेथेसि वर्णना । कळतां समस्त ब्राह्मणां । धावोनी येती श्रवणासी ॥८॥एक पायां लागती येऊन । एक करिती स्तुतिस्तवन । धन्य जी सद्गुरू निधान । पावलेति ह्मणोनिया ॥९॥एक ह्मणती एथें रहावें । कदापि कोठें नच जावें । तुमचे शुश्रूषेसि बरवें । करूं आम्ही सर्वही ॥१०॥एक ह्मणती तुमचे संगें । येऊं होवोनी नि:संग । करुनिया प्रपंचत्याग । परमार्थ चांग संपादू ॥११॥एवं त्र्यंबकींचे जन । स्तुतिपर बोलती वचन । त्यांसी राहवोनिया जाण । कवित्व लेहून दीधलें ॥१२॥तेथें दत्तात्रयमूर्ती दर्शन । घेउनिया केलें स्तवन । प्रेमाश्रु नयनीं येऊन । श्रीगुरुगुण वर्णिले ॥१३॥सवेंचि करूनिया नमन । पुढारा केलें असे गमन । कुशाव्रतातें वंदून । मार्गाप्रती चालिलों ॥१४॥बोळवीत आले द्विजगण । क्षेत्राबाहेर येऊनि जाण । तयांसि करूनिया नमन । सर्व परतोनि लाविले ॥१५॥घेऊनि श्रीदत्ताचें नाम । ध्यानहि धरिलें यथाक्रम । सगुण भेटीचा संभ्रम । आर्त पोटीं धरूनिया ॥१६॥महाराष्ट्र देशाप्रती सोडून । दृष्टीसी देखिलें कोंकण । अति भयानक वन । वृक्ष सघन लागले ॥१७॥अनएक जातीचे वृक्षगण । भेदोनि चुंबीत गेले गगन । भानु तेजा आच्छादून । छाया धरूनि राहिले ॥१८॥मार्गीं चालतां कितेक दिन । नाहीं सूर्याचें दर्शन । तम भरलासे दारुण । मार्ग गहन न लक्षए ॥१९॥पुसावया नाहीं ठिकाण । नाहीं मनुष्याचें दर्शन । मार्गीं तृण दाटलें पूर्ण । उगेंचि भ्रमण करावें ॥२०॥वृक्षासि वस्त्र आटकोनिया । फाटोनि झाल्यासे चिंधिया । कंटक शरीरीं भेदूनिया । रुधिर वाहे भडभडा ॥२१॥वृकव्याघ्रांचिया जाळिया । आंतोनि देती आरोळिया । वाचविता तया ठाया । कोण गुरुपाया वांचूनि ॥२२॥करुनि दत्तात्रयस्मरण । पर्वतअग्रीं करावें गमन । ग्राम शोधितां अवलोकून । कोठें ठिकाण न लागे ॥२३॥प्रातर पासुनि मध्यान्हीं । बहुत शोधिली अवनी । परि मार्ग न पडे ठिकाणीं । बहु प्रयत्नें शोधितां ॥२४॥मनीं चिंता उदेली बहुत । क्षुधेनें पीडिलों अत्यंत । फळमूळालागीं शोधीत । तंव औदुंबर देखिला ॥२५॥तयाचें न करितां फळछेदन । जीं फळें खालीं झालीं पतन । तया फळांतें वेंचून । केलें भक्षण ते काळी ॥२६॥सवेंचि करितां मार्गशोधन । तंव पश्चिमेसि झाला अस्तमान । पडिला अंधार गेला दिन । वृथा शीण जहाला ॥२७॥एक्या वृक्षाचिये तळवटीं । करुनिया पाषाणओटी । भयानक नदीचिये काठी । वृक्षातळीं नीजलों ॥२८॥अव्यग्र क्रमिली यामिनी । तंव उदयाचळा आला तरणी । प्रात:स्नानातें सारूनी । मार्ग शोधीत चाललों ॥२९॥शरीरीं श्रम जहाले बहुत । तेणें अंतर खेदयुक्त । स्मरोनिया श्रीदत्तातें । बहुत हाका मारिल्या ॥३०॥धाव धाव रे करुणाकरा । कां श्रमविसी मज लेकुरा । हे पूर्णब्रह्म परात्परा । दिगंबरा स्वामिया ॥३१॥तूं आमुचे शिरीं असून । दासासि व्हावा इतुका शीण । हें असह्य दिसे बोलणें । तुझीया थोरीवपणासी ॥३२॥कंठ होवोनि सद्गदित । वारंवार हाका मारीत । तंव एक शबर अकस्मात । येवोनी उभा ठाकला ॥३३॥ह्मणे रे तूं अहासी कवण । हिंडसी मार्गातें सांडोन । पल पर्वताचे शेजारून । मार्ग आहे पाहे पां ॥३४॥ऐसें ऐकोनिया पुढती । मी चालिलों सत्वरगती । फिरोनिया पाहतां मागुती । तो शबर गुप्त जहाला ॥३५॥असो ज्या रीतीं कथिलें त्यानें । तया संकेताचिया प्रमाणें । पर्वतापलीकडे जाऊन । मार्गाप्रती लागलों ॥३६॥तंव मार्गी चालतां चालतां । तिघे बैरागी अवचिता । द्वारके जावयाची वार्ता । परस्पर करिताती ॥३७॥त्यांनीं पाहून मजप्रती । कोठें जाणें ऐसें पुसती । म्यां कथिलें तयांप्रती । गिरनार व्यक्ती पाहों जातों ॥३८॥ते ह्मणती गिरनारावरोन । आह्मांसी द्वारकेसि आहे जाण । तुमचे सांगाती होऊन । आह्मी येतों स्वामिया ॥३९॥असो तयांचे संगतीन । बहुत मार्ग केला क्रमण । तंव समय पाहुनि माध्यान्ह । येता झाला तमारि ॥४०॥एक्या ग्रामामाजी जाण । प्रवेशते झालो चौघे जण । दृष्टीसी पाहुनी हनुमान । त्यापाशीं मी बैसलों ॥४१॥तिघे ग्रामस्थांकडे गेले । त्यांजप्रती बोलते जाले । आमुचे गुरुस्वामी बैसले । त्यांचे भेटीस चलावें ॥४२॥ते आहेत बहुसमर्थ । जातात कराव्यासी तीर्थ । त्यांचे भोजनाप्रीत्यर्थ । साहित्य दिलें पाहिजे ॥४३॥बारीक चांगले तांदूळ । सुंदर कणिक आणि डाळ । बहुत द्यावें जी तूपगूळ । शाखा आदि करूनी ॥४४॥ऐसें ग्रामस्थांसी छेडून । बहुत आणिलें शुष्क अन्न । जैसें बाळगिवलें श्वान । आमिष घरा आणिती ॥४५॥असो त्याचा स्वभाव गुण । अति झालें हीनपण । प्राप्त झाला तमोगुण । संगतीनें तयांचे ॥४६॥संगति भल्यानें न करावी । असो गृहस्थ वा गोसावी । संग करितां जिवेंभावीं । बहुत कष्टी जहाले ॥४७॥जयविजय द्वारपाळ । तयांनीं ऋषींचा केला छळ । श्राप जहाला तात्काळ । मृत्युलोकीं जन्मणें ॥४८॥तयांचे संगें करून । कष्टी झाला नारायण । अवतारादिक जन्म घेणें । स्वामीप्रती लागलें ॥४९॥देवादिकांची ऐसी गती । तेथें मानवी बापुडे किती । नष्ट होवोनिया मती । भ्रष्ट होती क्षणार्धें ॥५०॥जैं व्याघ्रासि देती थोरपण । फकीर सेवक होती आपण । श्रृंखळा गळ्यासि बांधून । घरोघरीं फिरवीती ॥५१॥कां गारुडिया सर्प थोरला । खांदा वाहुनिया वहिला । उदराकारणें तयाला । घरोघरीं फिरवीती ॥५२॥कां साधूची ऐकुनिया कीर्ती । शिष्य उदंड गोळा होती । परिचर्या करूं लागती । पुढें धावती लगबगा ॥५३॥कोणी ग्रामामाजी जाती । गांवचे जनासि छळिती । आह्मांसी पाठविलें महंतीं । साहित्यासी आणावया ॥५४॥कोणी भाविकाकडे जाती । त्याज लागूनी सांगती । आमचे सद्गुरू जाणती । भूतभविष्य सर्वही ॥५५॥तुह्मांसि नाहीं पुत्रसंतान । दीन दिसतां तेणेंकरून । स्वामीसी जाऊनिया शरण । पुत्रसंतान मागावें ॥५६॥लोक आलिया दर्शनासी । कोणी लागती परिचर्यासी । कळवावया सर्व जनासी । शिष्य यांचे ह्मणवूनी ॥५७॥प्रपंच करून विळभर । शेखीं परमार्थाहि सादर । घ्याव्यालागीं उपचार । शिष्य शिष्य ह्मणवूनी ॥५८॥एवं धूर्त शिष्याचें लक्षण । गुरुसि देऊनि थोरपण । आपुले प्रपंचाचें साधन । करोनि घ्यावें त्याहातीं ॥५९॥गुरु असला जरि भाबड । शुश्रूषा लागू लागली गोड । तरि मग होवोनि माकड । नाचविती तैसें नाचावें ॥६०॥आपण असला ब्रह्मचारी । शिष्य मिळाला घरबारी । तरि मग त्याचे संसारीं । चित्त घालणें लागलें ॥६१॥तयाचे कुटुंबा कारणें । स्त्रिया शूद्र आदिकरून । उपदेश देउनि घ्यावें धन । करावें पोषण तयांचें ॥६२॥श्रीमंतांलागीं भेटून । जहागीर इनामातें मागून । करोनि प्रतिग्रह धारण । शिष्यालागीं पोसावें ॥६३॥एवं उपाधीच हे सारी । परमार्थ नघडे क्षणभरी । बुडाला परतोनि संसारीं । जन्म फेरी चुकेना ॥६४॥याचि प्रकारें मजलागून । होते झाले तीन दिन । बहु त्रासून गेलें मन । दिधला सोडून संग त्यांचा ॥६५॥मार्गें एकलेंचि चालावें । दत्तात्रयाचें नाम घ्यावें । गुणानुंवाद बहुसद्भावे । वर्णित जावें दिननिशीं ॥६६॥मार्ग दुर्घट भयंकर । उभारिलें पर्वत - शिखर । त्यामाजी व्याघ्र थोरथोर । मनुष्य आहारी हिंडती॥६७॥ऐसिया कठिण मार्गांतून । जात असावें निर्भयपण । भयभीत न होतां मन । एकटें गमन करावें ॥६८॥सांडूनी दुर्घट कोकण । गुर्जर देशीं केलें गमन । तों दृष्टी पाहिली राजधान । धर्मपूर नगरी पै ॥६९॥एक्या ब्राह्मणाचे घरीं । जाऊनि राहिलों ओसरीवरी । तों दुसरे दिवशीं प्रथम प्रहरीं । चमत्कार एक जाहला ॥७०॥स्वामी नारायण सांप्रदायी । आपणासी ह्मणोनि विदेही । तया राजियाचे गेहीं । उपभोग घेत राहिला ॥७१॥मी एक ब्रह्मज्ञानी प्रचंड । ह्मणवोनि गावांत माजवी धेंड । शास्त्रयुक्ति ही उदंड । मुखोद्रत तयासी ॥७२॥तयांनीं मजलागीं येऊन । पुसता झाला वर्तमान । तुह्मी कोठील आहांत कोण । मजलागुनी सांगिजे ॥७३॥तयासि केलें मी उत्तर । आह्मांसी नाहीं घरदार । आह्मी नि:संग निराकार । कैचा विकार आह्मांसी ॥७४॥त्यानें हें ऐकोनि वचन । ह्मणे ऐसें ब्रह्मज्ञान । बहुत बोलती येऊन । बोलोनिया न करती ॥७५॥मग म्यां तयासी करोनि नमन । विनीत झालों कर जोडून । स्वामी सांगावें मजलागून । मुख्य ज्ञान आहे तें ॥७६॥तंव ते बोलते झाले ज्ञान । केलें होतें जें कां पठण । पुसूं जातां अंतर खूण । ठावें नाहीं तयासी ॥७७॥ज्ञान तो बोले बहुत । शब्दशास्त्रीं बहु पंडित । परि सद्गुरुचा जो गुह्यार्थ । पुसतां त्यांतें न सांगवे ॥७८॥आणि जगामाजी प्रतिष्ठा फार । ब्रह्मज्ञानी बहुत चतुर । ऐसें स्तविती वारंवार । लोक येवोनी तयासी ॥७९॥जरी ब्रह्मज्ञानी कोणी आला । तरि वाद घालावा तयाला । भवति न भवति करुनि वहिला । निर्भर्त्सूनि टाकावें ॥८०॥कोणाचें नायकावें वचन । आणि आपुलें मिरवावें ज्ञान । ठाउकी नाहीं मुख्य खूण । काय कैसी आहे ते ॥८१॥जैसें लोकाचें उदंड लेण । घातलें अंगावरी आणून । जगीं दिसे शोभायमान । परि आंगीं सुख नसे तें ॥८२॥कां दरिद्री चोहाटा बैसोन । राजियाचे सांगे गुण । परि राजपदवी प्रती जाण । कदा काळीं न बैसे ॥८३॥कां साखर लिहितां कागदावरी । वाचोनि दाखवी लोकाचारीं । परि गोडी तयाचे जिव्हाग्रीं । न लागेचि सर्वथा ॥८४॥एवं गुरूसी न जातां शरण । कोणीं केलें शास्त्रपठण । तें जगीं दिसे शोभायमान । परि जन्ममरण न चुकेची ॥८५॥न करितां गुरूचें वंदन । शास्त्रपठणें होय ज्ञान । तरि मग घरोघरीं आपण । ब्रह्मज्ञानी बहु होती ॥८६॥शास्त्रयुक्ति बहु शिकला । उलटा संशयापन्न झाला । जैं घर करोनि कोसला । शेखीं गुंतला आपणचि ॥८७॥असो तो स्वामिनारायण । शास्त्रव्युत्पत्ती बोलून । आपणा जीवन्मुक्त ह्मणवून । हिणवीत सर्वांसीं ॥८८॥असा संवाद झालियावरी । तो उठोनि गेला आपुले घरीं । मी तया ग्रामाभीतरी । सात दिन राहिलों ॥८९॥नित्य करावें कवित्व नूतन । मागील त्या द्यावें लिहून । पद अभंग भूपाळ्या करून । बहुता जनां दीधलें ॥९०॥तंव एक आला ब्राह्मण । तो ह्मणे मज नाशिकाप्रती जाण । पत्र करुनिया लेखन । देणें असेल तरी द्यावें ॥९१॥मग मी अभंगें करून । पत्र लिहिता झालों जाण । आठवूनि सद्गुरूचे चरण । अंतरीं ध्यान आणिलें ॥९२॥पत्र लेखनीं मांडीवरी । आसुवें चालिलीं नेत्रांतरीं । आक्रंदोनी दीर्घस्वरीं । खेदभरीत जहालों ॥९३॥हे हे स्वामी रघुनाथा । सद्गुरूराया कृपावंता । कधीं भेटशील आतां । मज अनाथा लागुनी ॥९४॥अरे म्यां पूर्वीं दोष केले । ते ये काळीं फळासि आले । ह्मणवोनिया अंतरले । गुरुचरण मजलागीं ॥९५॥कां केली कवणाची तडातोडी । मायलेकुरा केली विघडी । ह्मणवूनिया ऐसी घडी । प्राप्त झाली मजलागीं ॥९६॥अहो सद्गुरू माउली । मज कृपेची साउली । दूर देशासी राहिली । कैसें करूं या समयीं ॥९७॥केव्हां होईल माझें येणें । पाहीन किंवा नाहीं चरण । ह्मणवुनिया अंत:करण । वेळोवेळां कालवे ॥९८॥आणखी मनासी निश्चय केला । सद्गुरू महाराज बोलिला । तुझे सांगातीं मी वहिला । आहे जाण सर्वदा ॥१९॥या वचनाची आठवण । करूनि केलें स्थिर मन । पत्र दिधलें लिहून । तयासी वचन बोलिलों ॥१००॥पत्र देऊनि सत्वर । सद्गुरूसी माझा नमस्कार । आंग करूनी दंडाकार । तुह्मी तेथ घालिजे ॥१०१॥ऐसें सांगुनी तयाप्रती । मार्गस्थ केलें सत्वरगती । दत्तात्रयाचें ध्यान चित्तीं । करुनिया राहिलों ॥१०२॥सदासर्वदा नामस्मरण । स्वमुखें वर्णीत असावे गुण । ऐसें असतां कीर्तीसी कारण । झालें तेथें सर्वत्रीं ॥१०३॥सर्व मंडळीनें दर्शना यावें । पक्वान्न भोजना करवावें । ऐसें नित्यानित्य बरवें । व्हावयाप्रती लागलें ॥१०४॥सर्व मिळूनिया जन । विनंति करिती कर जोडून । स्वामी एथेंचि रहाणें । अक्षयीं तुह्मी सर्वदा ॥१०५॥या प्रकारीं सर्वहि मंडळी । ह्मणवोनि राहवी वेळोवेळीं । उठूनिया जातां तये काळीं । पायातळीं लोळणी ॥१०६॥असो भाविक तेथीचे जन । तयांसी न पुसतां जाण । गुप्तरूपें उठून । जाता झालों पुढारीं ॥१०७॥गुर्जर देश पाटांगण । भूमि लागली समसमान । बहुत होतसे मार्गक्रमण । गुरुकृपें करूनी ॥१०८॥रघुनाथ पूर्णब्रह्म अवतारा । तूंचि परात्पर सोइरा । निरंजन - हृत्कोश - विहारा । करुणाकर गुरुमूर्ति ॥१०९॥इतिश्री साक्षात्कार ग्रंथ । संमत सद्गुरुं रघुनाथ । दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥११०॥॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP