स्वात्मप्रचीती - अध्याय चवथा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


ॐ नमोजी श्री दिगंबरा ! । विवेकबुद्धीचिया दातारा !
करुणालया ! दयासागरा ! । पूर्ण अवतारा ! धन्य तूं ॥१॥
पूर्वाध्यायीं कथानुसंधान । करुनि प्रपंचविटंबन ।
जालें नासिकाप्रती येणें । गंगादर्शन घेतलें ॥२॥
गुरुरायाचे भेटीलागून । आलों घाटावरी फिरून ।
जेथें उभे ठेले ब्राह्मण । तया ठाया पातलों ॥३॥
तयांमाजी अच्युतरावजी । तेज:पुंज सर्वांमाजी ।
जयालागीं उपमा दुजी । दृष्टीलागीं दिसेना ॥४॥
जो कवीश्वरांमाजी श्रेष्ट । बृहस्पतीसम वक्ता स्पष्ट ।
वसिष्ठासम कर्मनिष्ठ । इष्ट अनिष्ट जाणता ॥५॥
जयाची प्रज्ञा विशाळ गहन । कर्मकांडीं अतिविचक्षण ।
प्रतिसृष्टि करितां निर्माण । विश्वामित्र दूसरा ॥६॥
ऐसा विर्पमंडळीमाजी । दृष्टीसी देखिला रावजी ।
तयासी विचारिलें सहजीं । सद्गुरु कोठें रहाती वो ? ॥७॥
तयांनीं मजवरी कृपा करून । दाखविले गुरुचरण ।
मग समर्थांसी अवलोकून । साष्टांगनमन पैं केलें ॥८॥
सद्गुरु बोलती कृपावचन । कोठून जालें तुमचें येणें ।
माध्यान्हकाळ भोजन । जालें किंवा न जालें ॥९॥
तंव म्यां द्वय कर जोडून । बोलता जालों नम्रवचन ।
ग्रामांत माधोकरी मागून । भोजनातें सारिलें ॥१०॥
आपुले दर्शनाची इच्छा मानसीं । बहुत होती आसोसी ।
ते येतांचि पायापाशीं बहु तृप्ती जहाली ॥११॥
बालेघाट माझें स्थान । पुणियाहून जाहलें येणें ।
गिरनारावती आहे जाणें । दत्तदर्शन घ्यावया ॥१२॥
ऐसें बोलतां वचन । सद्गुरू जाहले हास्यवदन ।
ह्मणती दत्तात्रयाचें स्थान । एथेंच दृष्टी पहावें ॥१३॥
मग मजलागीं देवालयीं नेऊन । दाखविलें रूप सगुण ।
दत्तात्रय अवतार पूर्ण । सावळी मूर्ति साजिरी ॥१४॥
षड्भुजमूर्ति प्रस्पन्नवदन । शंखचक्रमालाकमडंलूधारण ।
मध्यपाणी त्रिशूळ डमरु जाण । नयन आकर्ण साजिरे ॥१५॥
भाळ रुंद अति विशाळ । मध्यकटी बारीक चिवळ ।
कर्णनाशिक अति सोज्वळ । समपद उभी ठाकली ॥१६॥
पाहून रूप अति सुंदर । वेधून गेलें मनभ्रमर ।
पदपंकजीं गंध परिकर । सेवून तृप्त जहालों ॥१७॥
मग गुरुप्रती वदलों वचन । हर्षयुक्त जाहलें माझें मन ।
दत्तात्रयरूप आनदंघन । आपुलें दर्शन घेऊन ॥१८॥
सद्गुरु ह्मणती अहंविशेष । एथें वसावें चार दिवस ।
दत्तजयंती अनायास । आली तेही करावी ॥१९॥
तयांप्रती वदलों उत्तर । आजींचा दिन आहे स्थिर ।
रात्रीं देवासि पुसोन विचार । आपणालागीं सांगेन पैं ॥२०॥
ऐसें होऊन भाषण । गुरूंनीं अरण्यांत केलें गमन ।
मी पंचववटीचें बिर्‍हाड घेऊन । दिगंबरापाशीं पैं आलों ॥२१॥
कार्तिकवद्य चतुर्दशी । शके सत्राशें तेहतीसीं ।
प्रजापती नाम संवत्सरासी । ते दिनीं एथें पातलों ॥२२॥
रात्रौ पंचपदी करून । देवालयीं केलें शयन ।
मध्यरात्रीं ब्राह्मण होऊन । दत्तात्रय स्वप्नीं पैं आले ॥२३॥
ह्मणती ऐक रे ! सावधपण । एथें रहावें पंधरा दिन ।
जें जें होईल तें तें पाहणें । स्थिर मन करोनिया ॥२४॥
सवेंच जालें दुजें स्वप्न । अकस्मात् गंगोदकीं पडलों जाण ।
तंव जान्हवीजळ बरी येऊन । मजलागून तारिलें ॥२५॥
त्वरितचि प्रात: समय जाला । तमारी प्रकाशातें प्रसवला ।
मग मी गेलों स्नानाला । स्वर्धुनीचे तटाकीं ॥२६॥
करोनि यथोक्त संध्यास्नान । देवालयाप्रती येऊन ।
श्री दत्तात्रयाचें पूजन । यथाविधी पैं केलें ॥२७॥
माध्यान्हीं पंचवटीस जाऊन । होऊनी आनंदयुक्त मन ।
माधोकरीतें मागून । गंगातीरीं भक्षिती ॥२८॥
सांयकाळीं संध्या करुनी । सहज गेलों गुरुदर्शनीं ।
मग द्वय करपुटें जोडुनी । नमन गुरूतें पैं केलें ॥२९॥
तंव सद्गुरु कृपाळुपण । मज वामभागीं दिधलें स्थान ।
उठुनी गेले सर्वजण । निशी बहुत जाहली ॥३०॥
समर्थ पुसती मजप्रती । सांप्रदाय कवण गुरुमूर्ती ।
कृपा संपादिली कवणें रीती । ते मजप्रती सांगावी ॥३१॥
कवण मुद्रा कवण ध्यान । ध्यातां निराकार कीं सगुण ।
कवण धारणा धरुनी मनीं । उदासीन पै केलें ? ॥३२॥
ऐसें पुसती मजप्रती । मग मी निष्कपट होउनी चित्तीं ।
बोलता जालों वचनोक्ति । सत्य शरीरीं होत्या ज्या ॥३३॥
ऐके वो सद्गुरु समर्था ! । माझी पश्चातापी कथा ।
अग्निज्वाला नखादि शिखा । व्यापुनिया राहिल्या ॥३४॥
ह्मणूनि भ्रमिष्टाकृती होऊन । फिरत आलों देशाटन ।
परि स्थिर नव्हे अंत:करण । उदासीन सर्वदा ॥३५॥
गुरुकृपा नाहीं संपादिली । धारणा अद्यापि नाहीं धरिली ।
संतमुखें कीर्तनीं ऐकिली । ते सगुण मूर्ती ध्यातसे ॥३६॥
मुद्रा चाचरी ना भूचरी । खेचरी ना अगोचरी ।
कवण नामीं वनउरी । हे मज नाहीं ठाउकें ॥३७॥
दत्तात्रय मूर्ती सगुण । द्वितीय अध्यार्थी केलें कथन ।
तयाप्रकारें करून केलें ध्यान । हृदयामाजी पहातसे ॥३८॥
सद्गुरु ह्मणती बहुत बरवें । याचिप्रकारें ध्यान करावें ।
परी सर्वांतरी पहात जावें । सच्चिदानंद स्वरूपातें ॥३९॥
मग मी बहु नम्र होऊन । पुसता लागलों गुरुलागून ।
सच्चिदानंद हें ध्यान । सर्वीं कैं पहावें ॥४०॥
ऐसें देतां प्रत्युत्तर । सद्गुरु चातुर्यरत्नाकर ।
मग होऊण बहु उदार । आनंदलहरी प्रसवले ॥४१॥
ह्मणे एक वो चातुर्यभरिता । सोडुनी पश्चात्तापव्यथा ।
मनइंद्रियांचा करोनि लोथा । वचन माझें परियेसी ॥४२॥
टाकोनिया शब्दविभाग । सांडूनि पोकळी दिशावलंब ।
त्यागोनि आधार प्रकाश । चिदाकाश तें घेईं ॥४३॥
आकाश सर्व व्यापक आहे । बाह्य दृष्टीसी न दिसताहे ।
जवि हृदयांतरीं पाहे । ज्ञानदृष्टी करुनिया ॥४४॥
मग मी तैसाच पाहूं गेलों । पाहतां तदाकारचि जालों ।
देहस्फूर्तीतें विसरलों । कोठें आहे नेणवे ॥४५॥
कवण ध्याता कवण ध्यान । कोण श्रोता वक्ता करून ।
पाहतां हारपुनी गेलें मन । तीव्र ध्यान लागलें ॥४६॥
शरिरामाजी आकाश भरलें । वाटे मस्तक भेदुनी गेलें ।
ब्रह्मकटाहामाजी मीनलें । स्वरूप माझें सर्वही ॥४७॥
ऐसें चार घटिका करितां ध्यान । वाचेसी पडून गेलें मौन ।
तंव सद्गुरु ह्मणती सावधान । ध्यान विसर्जन करी कां ॥४८॥
तंव अंतरीं काढूं गेलों ध्यान । वाटॆ कोठें ठेवूं काढून ।
याजला ठेवितां ठिकाण । यावेण नाहीं दुसरा ॥४९॥
अंतरीं एकचि जाला गोळ । वाटे हृदयींच आहे भूगोळ ।
खालीं वरी मध्यें निर्मळ । मीच अवघा व्यापिलों ॥५०॥
स्वरूपीं नाहीं देहभान । गुरुसी न बोलवे वचन ।
ऐसे वृत्तीतें पाहून । सद्गुरु जाले बोलते ॥५१॥
हेंचि ब्रह्म निराकार । निरंजन निराधार ।
नि:प्रपंच निर्व्यापार । हेंचि तुझें स्वरूप पैं ॥५२॥
निष्कळंक निर्गुण । अनादि स्वरूप चैतन्यघन ।
स्वप्रकाश आत्मा अनंदघन । तें हें स्वरूप तुझें पैं ॥५३॥
तुझें स्वरूप निराकार । तुझेंचि रूप अजरामर ।
तुज जन्ममृत्यूचा घोर । एथून आतां नसेचि ॥५४॥
आतां निर्भय होय अंतरीं । सांडी द्वैताची कर्तरी ।
नांदे एकपणाचे घरीं । स्वानंदेंसी सर्वदा ॥५५॥
ऐसें ऐकुनि गुरुवचन । हर्षयुक्त जाले मन ।
मोठ्यानें हास्य करून । प्रेमटाळी पीटिली ॥५६॥
याप्रकारे भाषणें करितां । दोनप्रहर रात्रि झाली अवचिता ।
गुरु ह्मणती खालीं जाई आतां । जाउनी नीजीं निजावें ॥५७॥
मग सद्गुरुतें वंदून । देवालयीं येऊन केलें शयन ।
परि देहीं नाहीं भान । कोठे निद्रा केली हें ॥५८॥
नेत्रासी बहु ताठा चढला । अंतरींचा अग्नी शीतळ जाला ।
स्वप्न - सुषुप्तीव्यापार निमाला । स्वात्मसुखें करूनी ॥५९॥
वाटे जागा ना निजलों । ठायीं नसे ना कोठें गेलीं ।
देहीं आहे कां नाहीं जालों । दोन्ही भावना उडाल्या ॥६०॥
मागील एकप्रहर रात्रीं । वाटे स्वप्न पडलें अंतरीं ।
सद्गुरु येऊन हृदयांतरीं । मजलागी सांगती ॥६१॥
सखया ऐक सावधपण । माझें राहतें स्थान ।
मनोरम कोण कोण ।  तें मी तुज सांगतों ॥६२॥
माडी हेंचि निरंजनस्थान । मठ तो भृगुस्थान ।
गंगातीरीं आनंदवन । वृक्षवेली साजिरे ! ॥६३॥
ऐसें मजलागीं बोलून । अदृश्य जाले गुरु आपण ।
मग म्यां उठोनिया भजन । श्रीगुरुचें आरंभिलें ॥६४॥
सवेंचि गंगेसी करुनि स्नान । आरंभिलें देवतार्चन ।
दत्त पाहिला दृष्टी भरून । तंव पाषाणमूर्ती हालली ॥६५॥
तो पाहुनी चमत्कार । अंतरीं आनंद जाला फार ।
तया सुखासी अंतपार । कोठें पाहतां न दिसेची ॥६६॥
ते दिवशींचिये रात्रीस । लक्ष्मी आली स्वप्नास ।
सांगती जाली आत्मप्रचीतीस । गुरु उपदेश आपला ॥६७॥
ह्मणे ‘ शुकभृगुपासून । म्यां संपादिलें आत्मज्ञान ।
आकाशवत् चिंतन करून । हृदयांतरीं पहावें ’ ॥६८॥
ऐसें बोलुनियां वचन । अदृश्य जाली सुवासीन ।
मग प्रत:काळीं उठून । गुरुपाशीं कथियेलें ॥६९॥
गुरु ह्मणती ‘ उत्तम जालें । रात्री दत्तात्रय स्वप्नीं आले ।
मजप्रतीही सांगून गेले । बजिमंत्रास सांगावें ’ ॥७०॥
ऐसें ह्मणतां गुरुमूर्ती । मज आठव जाला चित्तीं ।
अकोलियांत एकातीं । मज उपदेश जो जाहला ॥ ७१॥
हृदयीं कथिला अत्रिपुत्र । मुखीं लावून माझा श्रोत्र ।
सांगितला अष्टाक्षरी मंत्र । तो गुरुप्रती कथियेला ॥७२॥
मग सद्गुरु जाले कृपावंत । सांगितलें मूळ बीजातें ।
ह्मणती ‘ जोडुनिया यावें । नव अक्षर ह्मणत जा ’ ॥७३॥
अष्टाक्षरी तोचि बाण । नवम अक्षर अग्र लावून ।
मनोवेगाचें धनु ओढून । भवकुरंग विंधिला ॥७४॥
श्रीदत्तात्रय रघुनाथ एकचि जाला । नवाक्षराची नवरत्नमाला ।
गुरुनें माझे घातली गळां । आत्मसोहळा देऊन ॥७५॥
मग आनंदयुक्त होऊन । सद्गुरूसी केलें नमन ।
जयजयकार स्तुती करून । स्वस्थळाप्रती पैं गेलों ॥७६॥
पंचमीस एक येऊन ब्राह्मण । अभंगाची वही देऊन ।
पंचवीस पान विडा करून । सुपारीसह दिधला ॥७७॥
पाहिलें जागृत होऊन । अदृश्य जाला ब्राह्मण ।
तेचि काळी कवित्वाचें स्फुरण । मजलागीं जहालें ॥७८॥
सवेंच स्वप्नीं विहिरींत पडलों । भोंवतें पाहोन भयभीत जालों ।
पारंबियातें वळंघलों । वरती आलों चढूनिया ॥७९॥
बाहेर येऊन जंव पाहे । तों ब्राह्मण एक बैसला आहे ।
जटायुक्त शोभताहे । भस्म सर्वांगीं लावितो ॥८०॥
करीत बैसला देवतार्चन । एकाग्र चित्त करूनि ध्यान ।
................................ । भोवतें सैन्य बहुतसे ॥८१॥
विहिरी तोचि भवकूप होय । ब्राह्मण तोचि दत्तात्रय ।
मज काढुनिया लवलाहें । कृपादृष्टी तारिलें ॥८२॥
सवेंचि दिनमणी जाहला प्रहर । चंपाषष्ठी दिवस युक्त ।
पंचवटीमाजी वेदांत । श्रवणालागीं पैं गेलों ॥८३॥
तेथें गुरुशिष्यांचें भाषण । निघालें ब्रह्मनिरूपण ।
एकाग्र चित्तीं करितां श्रवण । उन्माददशा पैं जाली ॥८४॥
नेत्र भृकुटी एकचि जाली । मस्तकाप्रती कळ लागली ।
आकाशमय वृत्ति जहाली । भान नाहीं देहाचें ॥८५॥
वाटे आकाशींच उडावें । कीं समुद्रपलीकडे जावें ।
कीं ब्रह्मांडचि गिळावें । तोंड पसरून आवघें ॥८६॥
जैं वीर निघे युद्धाप्रती । भाट सवाया बोलती ।
स्फुरण चढे वीराप्रती । बाहु उडती तटतटा ॥८७॥
तैसें झालें मजलागून । वाटे मीच ब्रह्म निर्गुण ।
शास्त्र वेद आणि पुराण । माझे गुण वर्णिती ॥८८॥
ऐकुनि ब्रह्मींचा सोहळा । हास्य येतसे वेळोवेळा ।
कंठ दाटून आला सगळा । नेत्रालागीं दिसेना ॥८९॥
पुराण न होतां समाप्त । तेथुनि निघालो त्वरित ।
जैसा मद्यपी दिसे भ्रांत । तैसी गती जहाली ॥९०॥
बाहेर येतां जये वेळा । मार्ग कांहीं न दिसे डोळां ।
वाटे ब्रह्मांडाचा गोळा । एकचि अवघा जाहला ॥९१॥
आपुलें न दिसेचि शरीर । अवघें दिसे निर्विकार ।
सृष्टी जाहली धूम्राकार । नाहीं आकार कोठेंही ॥९२॥
क्षणक्षणिं नेत्र उघडुनि पाहे । तंव तें तैसेंचि दिसताहे ।
भूमीवरी पाय न राहे । वाटे उडूनि चालिलों ॥९३॥
ऐसा जाहला विचार । अंतरीं भय उदेलें फार ।
मग काढुनीया दीर्घस्वर । रुदनातें आरंभिलें ॥९४॥
मार्गीं चालतां नाहीं भान । न दिसे रहाता ठिकाण ।
क्षणक्षना व्याकुळ होतसे प्राण । मुख घ्राण सूकलें ॥९५॥
ऐसा मार्गीं पडत झडत । येता जाहलों मठा आंत ।
तेथें येऊन रुदनातें । मोठियानें पैं केलें ॥९६॥
सद्गुरु बैसले भोजनीं । कैसें जावें मोकळेन चरणीं ।
हे आशंका न धरितां मनीं । कपाट उघडून पैं गेलों ॥९७॥
स्फुंद स्फुंद असे रडत । पोटांत तिडक उठती बहुत ।
वायू उर्ध्वपंथें चालत । शेंबूड येतसे बहुतसा ॥९८॥
एक घटिकापर्यंत । अंतरी होउनी भयाभीत ।
उठूनि भूमीसी पडत । उभा राहत क्षणक्षणीं ॥९९॥
तंव गुरू पहाती कृपादृष्टी । ह्मणती ‘ जाहली संतुष्टी ।
आतां उघडुनिया पाही दृष्टी । देहावरी येई कां ॥१००॥
ऐकुनि ऐसें कृपावचन । सवेंचि केलें हास्यवदन ।
सर्वशरीर शीतळपण । होऊनिया राहिलें ॥१०१॥
तंव नेत्रीं बहुत निद्रा आली । मग तेथेंचि क्षणैक शय्या केला ।
गाढ समाधि लागली । तुर्या ह्मणती जियेसी ॥१०२॥
ऐसा गुरुप्रसाद जाला । राज्यीं अभागी स्थापिला ।
किं रोगिया जीवन्मुक्त केला । तैसें मजला जहालें ॥१०३॥
पुढें कथेचें अनुसंधान । कथा रसाळ आहे गहन ।
कृपा करून श्रोते जन । अवधानातें देईजे ॥१०४॥
इतिश्री आत्मप्रचीतिग्रंथ । संमत दत्तात्रय अवधूत ।
निरंजनीं आत्मप्रचीत । गुरुकृपें जहाली ॥१०५॥
॥ श्रीगुरुदत्तात्रयार्पणस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP