स्वात्मप्रचीती - अध्याय दुसरा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


उदारधीरा गुणगंभीरा ! । प्रसन्नवरदा कृपासागरा ॥
श्रीदत्तात्रया पूर्णावतारा । मज निजमंदिरा नेई कां ॥१॥
तुझें गृह तें चिदाकाश । मी तेथेंचि राहीन सावकाश ।
निशिदिनीं हेंचि मानस । इच्छितसे गुरुराया ! ॥२॥
प्रथम अध्यायीं निरूपण । पुण्यग्रामीं पश्चात्ताप होऊन ।
जुन्नराप्रती झालें येणें । तें निरूपण कथियेलें ॥३॥
पुढें चालिलें अनुसंधान । कोतुळ ग्रामासि झालें येणें ।
समय पाहुनी माध्यान्ह । भिक्षाटन पै केलें ॥४॥
जन मुखाकडे पाहती । येउनि पायासी लागती ।
कित्येक स्तुतीतें करिती । तुह्मीच देव ह्मणवूनि ॥५॥
हे पाहुनी जनाची करणी । आश्चर्य वाटलें माझे मनीं ।
देवाधिदेवा ! काय करणी । विचित्र तुवां केलीसी ? ॥६॥
मजला दिधलें नाहीं दर्शन । जगासि कैसें दाविसी चिन्ह ।
सद्गुरु नाटकी तूं पूर्ण । मजलागून दिससी ॥७॥
ऐसें करितां अंतरीं स्तवन । धडाडिलें अंतकरण ।
देवा ! भेटसी मज लागून । किंवा नाहीं कळेना ॥८॥
मग आरंभिलें स्तवना । प्रेमाश्रु पातले नयना ॥
दीर्घस्वरें करूनि रुदना । टाहो मोठा फोडिला ॥९॥
लोक ह्मणती ‘ काय झालें । कोण निष्ठुरत्वें बोलिलें ।
किंवा कोणीं ताडण केलें । सांगा वहिलें आमुतें ! ’ ॥१०॥
एक म्हणती ‘ पिसा दिसतो ! ’ ।  एक ह्मणती ‘ असा कां करितो ! ’ ॥
एक म्हणती ‘ उगाचि रडतो । व्यर्थ वेड्यासारिखा ! ॥११॥
एक म्हणती ‘ धन्य ! धन्य ! । दृष्टी दिसतो परिपूर्ण ।
ईश्वरप्राप्ति आनंदघन । पुरुष दृष्टी दीसतो ॥१२॥
कित्येक करिती साष्टांगनमना । कित्येक करिती प्रदक्षिणा ।
कित्येक करिती स्तवना । कोणी भोजना चला ह्मणती ॥१३॥
अस्तु भक्तिमान तेथींचे जन । नेत्रीं प्रेमाश्रु पाहोन ।
कित्येक करिते झाले रुदन । देहाभिमान सांडूनि ॥१४॥
दुसरे दिवशीं तेथून । न पुसतांच केलें गमन ।
दृष्टीसी पाहिलें जाऊन । अंकुल ग्राम योग्य जें ॥१५॥
तेथें चंडीदास बोवा समर्थ । गीर्वाण वदे जो स्पष्टार्थ ।
सर्वकाळ करी परमार्थ । दुजा अर्थ नेणेची ॥१६॥
तयाचे घराप्रती गेलों । नमन करूनि उभा ठाकलों ।
हात जोडोनी विनीत झालो । मग वदलो स्तुतीतें ॥१७॥
चंडीरास बोवा सज्ञान । बोलता झाला गीर्वाण ।
स्वामी ! कोठुनि केलें येणें । योगीश्वर दीसतां ॥१८॥
कवण सांप्रदाय कवण ठिकाण । येथें किमर्थ झालें येणें ॥
माध्यान्हिक भोजन । झालें किंवा नाहीं हो ? ’ ॥१९॥
ऐसें पुसतां वस्त्रें काय झालीं । जेथें असतील ठेविलीं ॥
तीं कोणी नेईल वहिलीं । जाउनि त्यांतें पहावें ॥२१॥
तयांसी म्यां केलें उत्तर । मी तों इतुकाचि दिगंबर ॥
सहस्त्रथिगळी कंथा परिकर । शिवालयीं ठेविली ॥२२॥
तयाचें ऐका हो वर्णन । विंचा सर्पांचें जें स्थान ॥
लोक पळती तयासी भिऊन । ऐसी कंथा योग्य जे ॥२३॥
ती ठेविली शिवाचे शेजारीं । तीतें पाहुनी अभिलाष करी ॥
ऐसा कवण हो दरिद्री । तुमचे गांवीं जन्मला ? ॥२४॥
ऐसा कंथेचें करितां स्तवन । तयांनीं केलें हास्यवदन ॥
ह्मणती याचें हो घेऊन । दर्शन घेऊं तयेचें ॥२५॥
तुह्मी एथेंचि येऊनि रहावें । पुराणश्रवणातें करावें ॥
दत्तात्रयानें गुरु अनुभवें । यदूप्रती कथियेले ॥२६॥
तेंचि आजि अनुसंधान । तुह्मी गुरुभक्त दिसतां जाण ॥
अत्यादरें करावें श्रवण । येऊनिया सत्वरीं ॥२७॥
ऐसें करितां भाषण । तों सवेंचि पुराणिक येऊन ॥
आदौ संहिता करुनि पठण । अर्थांतर सांगतसे ॥२८॥
ह्मणे ऐका हो ! सावधपण । दत्तात्रयें चोवीस गुरु करुन ॥
एक एकाचा घेतला गुण । थोर सान न ह्मणतां ॥२९॥
एकादश स्कंद पुराण । नित्य करावें तेथें श्रवण ॥
गांवांत करुनि भिक्षाटण । स्वस्थ तेथें राहिलों ॥३०॥
बाप होणार बलवत्तर । दत्तात्रययदूचें उत्तर ॥
हृदयकमळीं धरितां परिकर । मन मधुकर वेधला ॥३१॥
श्रवण करितां तीन दिन । सवोंचि उद्विग्न झालें मन ॥
वाटे दत्तात्रयरूप सगुण । केव्हां दृष्टी पाहीन मी ॥३२॥
ऐसें करितां तीव्र ध्यान । सर्वरात्र केलें स्तवन ॥
आलस्य निद्रा गेली पळून । सद्गुरुगुण आठवितां ॥३३॥
मग प्रात:काळीं उठोन । प्रवरे जाउनी केलें स्नान ॥
सवेंचि बिराडा आलों परतोन । तो दिन कोण परियेसा ॥३४॥
शके सत्राशें तेहत्तीस । प्रजापति संवत्सरास ॥
शुद्धपक्ष कार्तिकमास । नवमी दिवस पैं होता ॥३५॥
दिनमणी आला एकप्रहर । जाऊनि एकांतीं माडीवर ॥
ध्यानस्थ बैसलों क्षणभर । मूर्ति चिंतन पैं केली ॥३६॥
नाभिकमळ अधोवदन । तें ऊर्ध्व केलें मनेंकरून ॥
त्यावरि षोडशदळ सूर्य नेमून । द्वादशपत्र चंद्र तो ॥३७॥
तया चंद्राचिया वरी । अग्नी योजिला दशचक्रीं ॥
मग तया अग्नीवरी । दिव्य पादुका योजिल्या ॥३८॥
मनोरम्य रत्नखचित । दैदीप्यमान शोभायुक्त ॥
वरती पाउलें मंडित । तळवे आरक्त योजिले ॥३९॥
घोटिया सुरेख मवाळ । पायीं वाळे रत्नप्रवाळ ॥
त्यावरी पैंजणाचा खळाल । मनोरम्य योजिला ॥४०॥
गुडघे मांडिया जानुस्थळ । कौपीनधारी बहु सुशीळ ॥
माजेस कटिसूत्र देतसे ढाळ । तेज अळुमाळ फांकलें ॥४१॥
कटि बारीक सिंहवत । हृदय विस्तीर्ण सुशोभित ॥
नाभीपासूनि कंठपर्यंत । रोमलतिका साजिरा ॥४२॥
षड्भुजमूर्ति सुलक्षण । उच्चग्रीव सुहास्यवदन ॥
सरळ नासिक लंबायमान । कर्णयुग्म साजिरें ॥४३॥
नेत्रकमळद्वयाकर्ण । भ्रुकुटि बारिक बहु संगीन ॥
ललाटस्थान अति विस्तीर्ण । जटामुकुट साजिरे ॥४४॥
मूर्ति प्रादेशमात्र सगुण । कंबुकंठ गौरवर्ण ॥
सुप्रसन्न विभूतिभूषण । सर्वांगा जी साजिरी ॥४५॥
मस्तकीं मुकुट शोभायमान । अत्यद्भुत प्रभा गहन ॥
चंद्रसूर्य जयाचे किरण । शोभायमान साजिरा ॥४६॥
मैलागिरि चंदन सुगंध बहुत । केशरादि अष्टगंधयुक्त ॥
त्रिपुंड्र आडवे अक्षतासंयुक्त । कस्तुरिच्या साजिर्‍या ॥४७॥
श्रीकृष्ण चतुर्भुजमूर्तिध्यान । दत्तात्रयाचें घेउनि दर्शन ॥
भाळीं लावुनि चंदन । वैकुंठासी पैं गेला ॥४८॥
दत्तात्रयमूर्तीचें ध्यान । पहातां वेधलें माझें मन ॥
जैसा आमिषालागीं मीन । न सोडीच सर्वथा ॥४९॥
कर्णद्वय कुंडलें युक्त । शोभायमान झळाळित ॥
क्षणक्षणा विद्युल्लता तळपत । तैसे कर्ण चमकती ॥५०॥
कंठीं मेखळा शुभ्रवर्ण । जानुपर्यंत लंबायमान ॥
जैसें ग्रीष्मऋतूचें चांदण । तैसी शोभा दाटली ॥५१॥
कंठी अनेक रत्नमाळा । बोरमाळा जवमाळा ।
बहुत पुतळियांच्या माळा । जांबूनद सुवर्णी ॥५२॥
त्यावरी मौक्तिकांच्या माळा । रुद्राक्षमिश्रित सुढाळा ॥
नाभीपर्यंत लांब सरळ । मनोरम्य योजिल्या ॥५३॥
अनेक रत्नमाळा सुरंग । शुभ्रवर्णादि सहा रंग ॥
बहुतेजस्वी हेमलग । माळा कंठीं घातल्यी ॥५४॥
त्यावरी पुंगीचें भूषण ॥ खङ्खपात्रीं शुभ्रवर्ण ।
चतुरांगुली सुलक्षण । गळ्यामाजी साजिरी ॥५५॥
सर्व हस्तकीं रत्नकंकण । पृथक् पृथक् शोभायमान ॥
मुद्रिका सर्वांगुळ्यांलागून । बहु सुंदर योजिल्या ॥५६॥
षङ्हस्तकीं षड्भूषण । ऊर्ध्वहस्तकीं शोभायमान ॥
शंखचक्र चिमणें ध्यान । दैदिप्यमान साजिरें ॥५७॥
मध्यपाणी त्रिशूळ डमरू । रत्नखचित अतिसुंदर ॥
मौक्तिक झालरी परिकर । चिमणी चिमणी योजिली ॥५८॥
अधोपाणी कमलाकृती । सव्यपाणी माला फिरती ॥
कमंडलू धारण वामहस्तीं । रत्नखचित साजिरा ॥५९॥
ऐसें हृदयांतरीं ध्यान । मूर्ती चिंतली सुलक्षण ॥
मग रत्नखचित आलय निर्मून । कर्पूरदीप लाविले ॥६०॥
सभोंवतीं केळी तोरण । बकुळ मैलागिरी चंदन ।
घमघमित सुगंध पूर्ण । हृदयांतरीं दाटला ॥६१॥
पुष्पवाटिका अनेक जाती । जाई मोगरा आणि मालती ।
गुलाब चापा आणि सेवंती । मनोमय निर्मिल्या ॥६२॥
देवालयाचे सन्मुख । सभामंडप अतिसुरेख ।
माजी हंस मयोरें उचलूनि पांख । बहु आनंदें नाचती ॥६३॥
कोकिळा सुस्वरें गर्जती । शुक उंच स्वरें गाती ।
बदक पाणियामाजी फिरती । हौदकारंजे निर्मिले ॥६४॥
तेथें सूर्यप्रभा निर्मून । कमळिणी विकसित झाल्या तेणें ।
हेमरौप्य चूर्ण करून । उपरीवरूनि झोकती ॥६५॥
नारदतुंबर घेऊनि वीणा । सुस्वर गाती गंधर्वगायना ।
आलाप आलविती राग नाना । यशकीर्ति वर्णिती ॥६६॥
तेथें मनाची मूर्ति निर्मून । पायीं घागर्‍या बांधून ।
नामघोष आनंदें करून । देवापुढें नाचतीं ॥६७॥
कीर्तन करी प्रेमयुक्त । क्षणक्षणा देवातें न्याहाळित ॥
नखापासुनि शिखापर्यंत । ध्यान दृष्टी विलोकीं ॥६८॥
याप्रकारें करितां ध्यान । चित्त स्वरूपा गेलें वेधून ॥
आसनीं बैसलों असतां जाण । नाहीं भान देहाचें ॥६९॥
हृदयांतरीं करितों ध्यान । हें देही गेलों विसरून ॥
तेथिंचा आनंद पाहून । वृत्ति शून्य पैं झाली ॥७०॥
ऐसें एक घटिकापर्यंत । वाटे पाहतों स्वप्नांत ॥
जे कां रचना मूर्तिमंत । मनोमय योजिली ॥७१॥
ऐसें पाहताम तेचि वेळीं । कर्मरेषा विचित्र बळी ॥
दत्तात्रयमूर्ति हृत्कमळीं । मातें जाली बोलती ॥७२॥
तेथें मनाची मूर्ति सान । ते श्रीगुरूंनीं हृदयीं आलिंगून ।
मुखासि लावूनि माझा कान । मंत्र झाले बोलते ॥७३॥
अष्टाक्षरमंत्र संपूर्ण । अर्थ जयाचा गूढज्ञान ।
तयेवेळीं मातें सांगून । हास्यवदन जहाले ॥७४॥
तयेवेळीं आनंद समरस । एकचि जाला उल्लास ।
ब्रह्मपुरीं विष्णुस्थानास । सुख नसेल ऐसें पैं ॥७५॥
सवेंचि देहावरी येऊन । पहाता झालों नेत्र उघडून ।
तों आंतबाहेरी तें ध्यान । तेजयुक्त देखिलें ॥७६॥
मग ध्यानासि विसर्जिलें । आपुले मनांत ह्मटिलें ।
देवा ! त्वां इतुकें केलें । परि मी न समजेची ॥७७॥
तुजला मज कायसी चोरी । जाणोनी आलासी हृदयांतरीं ।
मंत्र सांगणें वरचेवरी । स्वप्न पडल्ल्या सारिखा ॥७८॥
असो त्वां आपुली केली थोरी । परि म्यां नेमिली जे अंतरीं ।
तया निश्चयातें कोण वारी । कृतसंकल्पा माझिया ॥७९॥
आतां गिरनारासी जाईन । एक संवत्सर सात दिन ।
भरतां करूनि निर्वाण । प्राण त्यागीन आपुला ॥८०॥
ऐसा निश्चय करून । खालें उतरलों माडीवरून ।
हृदयीं करूनि तेंचि ध्यान । नामस्मरण करीतसें ॥८१॥
एकादश दिन पर्यंत । तेथें राहिलों आनंदयुक्त ।
श्रवण करूनि भागवत । सुखसंतुष्ट राहिलों ॥८२॥
तेथें एक ब्राह्मणाची कुमरी । वय तारुण्य अति सुंदरी ।
तयेचा भ्रतार देशावरी । टाकुनी बहुदिन पैं गेला ॥८३॥
ती ब्राह्मणी आपुले माहेरीं । राहिली बहुत काळवरी ।
चिंता करितसे अंतरीं । भ्रताराच्या वियोगें ॥८४॥
तयेनें मजलागीं पाहोन । मातेसी जाउनि सांगे खूण ।
ह्मणे दृष्टी पाहिला ब्राह्मण । आपुले भ्रतारासारिखा ॥८५॥
ह्मातारी तैशीच उठूनी । आली पुराण - श्रवणा लागूनी ।
दृष्टी मातें अवलोकुनी । गेली सदनीं आपुल्या ॥८६॥
आप्तवर्गासी मेळवून । तयासी बोलती झाली वचन ।
माझा जामात गेला उठून । तो म्यां दृष्टी देखिला ॥८७॥
ते सर्व मजला पाहूं येती । आश्चर्य करैती आपुलें चित्तीं ।
जवळ येऊनि पुसती । कवण ग्राम तुमचें  ॥८८॥
कवण कुळ कवण गोत्र । गृहस्थाश्रमी किंवा स्वतंत्र ।
त्यागुनीया वस्त्रपात्र । ब्रह्मचारी देसतां ॥८९॥
तुह्मी तों आच्छादिलें स्वरूप । परि आह्मी ओळखिलें तुमचें रूप ।
सोडोनिया सर्व संताप । सत्य आह्मांसी वदावें ॥९०॥
मग त्यासी बोलतां झालों उत्तर । बालाघाटीं कळंबनगर ।
तेथील मी वतनदार । कुलकर्णवृत्ति आमुची ॥९१॥
आश्वालायन गोत्र कौशिक । स्त्रियाबंधु आप्तमित्र ।
गृह सानकूळ आणि स्वातंत्र्य । नाहीं कोणीं गांजिलें ॥९२॥
हृदयीं उठला अति संताप । वाटे बहुत झालें पाप ।
आतां पहावें आत्मस्वरूप । गुरुकृपें करूनी ॥९३॥
नको नको हा संसार । याचें करितां हित फार ।
वय वेंचुनि गेलें फार । नाहें आधार कोठें ही ॥९४॥
प्रपंचीं धरूनि अभिमान । करवें नीचाचें सेवन ।
बहु करावें दोषाचरण । द्रव्यालागीं ॥९५॥
प्रपंचालागीं सर्व त्यजावें । सांडोनि परदेशी व्हावें ।
एकलेंचि निघोनिया जावें । मरण आल्यासारखें ॥९६॥
घरचे ह्मणती सत्वर जावें । मुहूर्त आहे आजची बरवें ।
बाहिर प्रस्थान ठेवावें । मग यावें घरासी ॥९७॥
तंव प्रस्थानासि ठेविलें । निघावयाचें खचित झालें ।
सर्व घरचीं आनंदले । ह्मणती केलें उत्तम ॥९८॥
घरचे पापड देठवे काडून । केलीं गोड गोड मिष्टान्नें ।
मुरड कानवले करून । मातोश्रीनें घातले ॥९९॥
ह्मणे हे कानवले खादल्यानें । फिरूनि लवकर होतसे येणें ।
आणिक दहीभात कालवून । तोहि सवेंचि घातला ॥१००॥
जैसा चोरटा धरावा । सुळी घालावयासीं न्यावा ।
दहींभात त्यासि भक्षवावा । तैसें केलें मजलागीं ॥१०१॥
ऐसें करूनि बाहेर घातलें । वस्त्रपात्रही नाहीं दिलें ।
ह्मणती जातां वाट चाले । ओझें होईल तुह्मांतें ॥१०२॥
बंधु मातोश्री आप्त सोयरीं । घालवीत आले बाहेरीं ।
गळा पडाती मैंदापरी । आक्रंदोनि रडताती ॥१०३॥
मित्र ह्मणे हा बरा होता । आमचे कामास पडत होता ।
सोइरे ह्मणती तुह्मी जातां । घरचे कैसें करोनि ? ॥१०४॥
बहिण ह्मणे ‘ वो बंधुराया ! । मज लुगडें नेसावया ।
छीट चांगलें रे सखया ! । मजलागीं पाठवीं ’ ॥१०५॥
बंधु हात जोडोनिया पुढा । ह्मणे ‘ मज चांगला धोतरजोडा ।
पैका वेंचोनिया रोकडा । घेउनिया पाठवा ’ ॥१०६॥
माता सांगे बहू परवडी । मज धाबळी आणि घोंगडी ।
बारिक चांगली खडखडी । आसनालागीं पाठवी ॥१०७॥
स्त्रिया बोले मृदुवचनीं । ‘ वस्ता पाठवा मजलागुन ।
बाळ्या बुगड्या आणि नथनी । घडोनिया पाठवा ॥१०८॥
ऐसें सांगुनी सर्वांनीं । माझ्या वरुतें सोडिलें पाणी ।
ह्मणती आला जरी वांचुनी । तरी आपुला ह्मणावा ॥१०९॥
ऐसें ह्मणती वरचेवरी । परि कोणी न ह्मणें ‘ राहें घरीं ।
कासया जातोसि दुरीं । श्रम होतील तुज लागीं ’ ॥११०॥
असो कोणी न ह्मणतां भलें । सर्वांनीं मज बाहेर घातलें ।
मार्गीं चालतां रुदन आलें । सर्व राहिले ह्मणवूनी ॥१११॥
द्रव्याकरितां आप्त सोईरे । द्रव्याकरितां मुलें लेंकुरें ।
दर्व्य नसतां घालिति बाहेर । कोणी माया न करिती ॥११२॥
कोठेंही नाहीं विश्रांती । संसारसागरीं आदि अंतीं ।
सद्गुरुपाय धरितां चित्तीं । सर्व सुख आतुडे ॥११३॥
इतिश्री आत्मप्रचीति ग्रंथ । संमत दत्तात्रय अवधूत ।
निरंजनीं आत्मप्रचीत । गुरुकृपें जाहली ॥११४॥
॥ श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP