मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|
सतीगमन

सतीगमन

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


गांधर्वविवाहात व्यक्त होणार्‍या प्रेमाची उत्पत्ती होते, त्या वेळी प्राय: प्रथमदर्शनीच उभयता स्त्रीपुरुषांच्या मनात एक प्रकारचा झटका बसतो, व त्या झटक्याच्या वेळी इतर विषयांबद्दलची विवेकबुद्धी दोघांच्याही मनातून नाहीशी होऊन ती तात्कालिक सुखास लुब्ध होतात हे प्रसिद्धच आहे. या झटक्याचा जोर काही वेळ चालतो, व पुढे तो आपोआप शिथिल होत गेला म्हणजे स्त्रीपुरुषांची दृष्टी व्यावहारिक गोष्टींकडे वळते. संसार आपणा उभयतांचा, व दोघेही सुखदु:खाची सारखीच वाटेकरी, ही कल्पना दोघांच्याही मनात राहात असली, तथापि त्या कल्पनेची किंमत उभयता जिवंत आहेत तोपावेतोच काय ते. मरणस्थितीच्या पलीकडे तिची धाव असणे बहुधा शक्य नाही.
स्त्री मृत झाली असता पुरुषाकडून सहगमनाच्या मार्गाचा अनादर होतो; यासाठी तुल्यतेच्या न्यायाने पुरुषाच्या मरणप्रसंगी स्त्रीकडूनही तो व्हावा हेच साहजिक आहे. स्त्रीने सहगमन केले तर ती वेडाच्या भरात होती म्हणून, अथवा तिला ते करणे कोणी भाग पाडिले असेल म्हणून, किंवा असेच दुसरे काही कारण तिच्या मनाला दु:सह वाटले म्हणून. या तीन गोष्टींपैकी कोणता तरी एखादा प्रकार असला पाहिजे यात संशय नाही. गेल्या शतकात या भारतभूमीत उच्च वर्णाच्या लोकांत ही अमानुष चाल होती, व ती इंग्रज सरकारने बंद केली हे योग्यच झाले; कारण या चालीत स्त्रीजातीची स्वत:ची प्रेमप्रेरणा बाजूस राहून सामाजिक बलजबरी हीच आपला अधिकार चालवीत असे.
या चालीची उत्पत्ती केव्हा व कशी झाली असावी हे नीटसे ठरविता येत नाही. तथापि प्राचीन काळच्या दृष्टीने विचार करू जाता तिचा अंमल फ़ार थोड्या प्रसंगी होत असावा असे वाटते. प्रसिद्ध बाणभट्टांच्या कादंबरी ग्रंथात चंद्रापीड राजपुत्राने महाश्वेतानामक स्त्रीशी यासंबंधाने केलेले भाषण महत्त्वाचे आहे, व यासाठी ते परिशिष्ट ( फ़ ) येथे भाषान्तरसुद्धा उतरून घेतले आहे. या भाषणात अनेक उदाहरणे प्राचीन ग्रंथांतून दिली आहेत, व ती सर्व पांडवकाळच्या राजकुलातील आहेत. यावरून भारतीय कथाकाळी स्त्रीजनांच्या मनात प्रेम वास करीत असले तरी ते स्त्रियांस वेड लावणारे नसे, इतके अनुमान करण्यास हरकत नाही; व या गोष्टीवरून पर्यायाने तत्कालीन जनसमुदायाच्या मनातील प्रेमाच्या व्यावहारिक स्वरूपाचे दिग्दर्शनही आपोआप होईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP