मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|
पत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य

पत्याज्ञापालन हेच स्त्रियांचे कर्तव्य

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


या निषेधाने स्त्रीस स्वत:च्या इच्छेने पर पुरुषगमनाची बंदी झाली, तथापि साक्षात पतीनेच जर स्त्रीस तशी आज्ञा केली, तर ती पाळने हे तिचे कर्तव्य होय, इतकी सवड त्या निषेधकारानेही ठेविली होती ! ‘ या सवडीचा उपयोग मी करीत नाही, व मला दुर्वास ऋषीने मंत्र दिला आहे त्याच्या पठनाने मी देवतांपासून इष्ट हेतू सिद्ध करीन ’ असे कुंती बोलली, व नंतर तिने धर्म, वायू आणि इंद्र या तीन देवतांस पाचारण करून त्यांपासून युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र प्राप्त करून घेतले, असे महाभारतात वर्णिले आहे.
पुत्रप्राप्ती झाली नसती तर पांडुराजास नरकावासच पत्करावा लागला असता. सबब तो टळण्याच्या हेतूने त्याला आपल्या स्त्रीस ही आज्ञा करण्याचा प्रसंग आला; व यावरून सामान्य लोकसमुदायातही तसाच आपत्प्रसंग असल्याशिवाय अशा प्रकारची आज्ञा पतीकडून करण्यात येत नसावी असे मानिता येईल. परंतु ‘ आपत्प्रसंग ’ हा शब्द फ़ार मोघम आहे; व तो नरकवास टाळणे या रूपाचाच नेहमी असला पाहिजे असा नियम नसल्याने त्याचा प्रसंगी पाहिजे त्या तर्‍हेने व्यत्यासही करिता येईल.
एक वेळ नारदमुनींची स्वारी कृष्णास भेटावयास आली असता, कृष्णाच्या अष्टनायिका व इतर उपनायिका यांपैकी एखादी स्त्री आपणास मिळावी अशी इच्छा त्याने प्रकट केली, व कृश्नाने आपण ज्या स्त्रीच्या मंदिरात नसू त्या स्त्रीस खुशाल घेऊन जाण्याची परवानगी त्यास दिली, - इत्यादी कथा सर्वत्र प्रसिद्धच आहे; व तिजवरून पाहुणचाराच्या प्रसंगी पतीकडून केव्हा केव्हा तरी अशी आज्ञा प्राचीन काळी होत असावी असे मानण्यास जागा आहे. शिष्टाचाराच्या संरक्षणार्थ ही गोष्ट करणे गैर नव्हे अशी समजूत प्राचीन काळी इतर अनेक सुधारलेल्या राष्ट्रांमध्येही होती असे इतिहासावरून दिसते.
ग्रीस देश व रोम शहर ही एक वेळ सुधारणेच्या कळसास पोचली होती हे प्रसिद्धच आहे. त्या ठिकाणी स्नेही अगर पाहुणा यांच्या आदरसत्काराच्या परिपूर्तीसाठी घरच्या यजमानाने आपल्या पत्नीस अशा प्रकारची आज्ञा करण्याची व तिने ती पाळण्याची चाल होती. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता व पंडित सॉक्रेटिस याने आपला स्नेही आल्सिबायडीस याचा सत्कार याच रीतीने केला होता. रोमच्या इतिहासातील प्रसिद्ध केटो (मोठा ) याने आपल्या हार्टेन्शियस नावाच्या मित्राकडे आपली स्त्री अशीच बरेच दिवसपर्यंत राहू दिली होती. ( पाहा : The Evolution of Marriage पृ. ५३ ).

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP