मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक तर्क व उपसंहार|
अर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती

अर्वाचीन मनूपासून आनुवंशिकतेची उत्पती

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


स्मृतिग्रंथांची गणना धर्मशास्त्रग्रंथांत होते हे योग्यच आहे. तथापि श्रुतिग्रंथांनंतरच्या काळी हे स्मृतिग्रंथ धर्मशास्त्रावरील आद्य ग्रंथ होत असे मानणे मात्र चुकीचे होईल. कारण या प्रकारचे ग्रंथ होते. या ग्रंथांत वर्णपद्धती व्यक्तिनिष्ठ अगर आनुवंशिक, याबद्दलचा कोठे उल्लेख झाल्याचे दिसत नाही. सांप्रतकाळी आपण जीस ‘ मनुस्मृती ’ हे नाव देतो, त्या स्मृतीत म्हणजे ‘ भृगुप्रोक्त मनुसंहिते ’ त हा उल्लेख पहिल्याने झाला, व पुढील स्मृतिकारांनी त्याचीच कल्पना कायम ठेवून आपले ग्रंथ रचले. ‘ मनुर्वै यत्किंचिदवदत्तद्भेषजं ’ म्हणजे ‘ मनु जे काही बोलला ते औषध होय ’ असे एक वेदांत आले आहे, व मनुस्मृतीत आनुवंशिकता स्वीकारिली आहे, यावरून वेदकालीदेखील आनुवंशिकपद्धतीची वर्णव्यवस्था होती अशी कल्पना आहे, परंतु ती सर्वथा निराधार होय.
मनूचा धर्मसूत्रांवरील कल्पग्रंथ निराळा असून तो गद्यात्मक आहे; व ‘ भेषज ’ म्हणजे ‘ औषध ’ असे मानिले जाण्याची योग्यता कोणत्या तरी ग्रंथाची असू शकेल तर ती या जुन्या कल्पग्रंथाची आहे, हा काय तो वरील वेदवचनाचा खरा अर्थ आहे. या ग्रंथात आनुवंशिकतेचा उच्चार कोठेही नाही, व तो असण्याचे कारण पण नाही. भृगूने जो स्मृतिग्रंथ लिहिला आहे, त्यात अमुक अमुक प्रकारे ‘ मनुरब्रवीत् ’ म्हणजे ‘ मनूने सांगितले आहे ’ अशा तर्‍हेची वाक्ये ठिकठिकाणी आली आहेत, यावरून विचार करू जाता असले विशेष उच्चार असलेल्या ठिकाणचा आर्थिक भाग फ़ार तर जुन्या मनूच्या मताचा, व बाकीचा स्वत: भृगूचा, अगर भृगूच्या वेळी प्रचारात असलेल्या लोकपद्धतीचा, याहून अधिक कल्पना करण्याचे कारण नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP