शकुनशास्त्राचा पगडा व देवादिकांचे कौल

aअप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


आता शकुनांविषयी विचार करावयाचा. मनुष्याचे मन देवभोळे असले म्हणजे जगात सर्वकाळ केवळ नैसर्गिक नियमांनी होत असलेल्या गोष्टींचे कार्यकारणभाव समजून घेण्याकडे त्याची प्रवृत्ती प्राय: कमी असते; व अशा स्थितीत मनुष्याच्या अवलोकनात साहजिक येणार्‍या हरएक गोष्टीचा संबंध तो आपल्या स्वत:च्या स्थितीशी जोडून घेण्याचा यत्न करीत असतो. हा संबंध जर अनुकूल वाटला तर तो शुभ, व प्रतिकूळ वाटला तर तो अशुभ, ही व्याख्या तो मनाश्सी घट्ट धरून ठेवितो; व पदोपदी अनुकूळ अगर प्रतिकूळ वाटलेल्या गोष्टी ध्यानात ठेवून त्यांच्या धोरणाने पुढे होणार्‍या गोष्टींची स्वरूपे अगोदर जाणण्याची त्याची खटपट सुरू होते.
होराशास्त्राची उत्पत्ती या खटपटीपासूनच झाली. हळूहळू या खटपटीचा मक्ता ज्योतिषी लोकांनीच आपणांकडे घेतला, व सामान्यजनांस कोणतीही नवीन अथवा महत्त्वाची गोष्ट कर्तव्य झाल्यास तीत आपणास यश अगर अपयश कसे काय येणार हे अगाऊ समजून घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे धाव घेऊ लागले. प्रकृत विषयापुरताच विचार करू गेल्यास मागे कृ. ३३ मध्ये वर्णिलेल्या कन्येच्या गुणावगुणांपुरतीच ही धाव असती, तर तीत विशेष आश्चर्य वाटण्याजोगे काही नव्हते; कारण त्या ठिकाणी या पृथ्वीगोलापासून अत्यंत दूर असे ग्रह, राशी, नक्षत्रे इत्यादींचे संबंध असल्यामुळे त्यासंबंधाचे कार्यकारणभाव सामान्य बुद्धीच्या मनुष्यास दुर्विज्ञेय वाटून केवळ श्रद्धा ठेवूनच जोशीबोवांच्या सांगन्यावर भरवसा ठेवण्याची सामान्य लोकांस पाळी येणे अगतिकच होते असे म्हणण्यास जागा तरी होती. परंतु हा प्रकार येथेच न थांबता या पृथ्वीवर अगदी संकुचित स्थली केवळ व्यवहारानुसार होणार्‍या किरकोळ गोष्टींसही कमाक्रमाने नवे नवे अर्थ मिळू लागले, व या अर्थांपासूनच हळूहळू शकुनशास्त्राची उत्पत्ती झाली. मनुष्यशरीराचा काही भाग अमळ कोठे नित्यापेक्षा निराळ्या तर्‍हेने हालला, किंवा सहजवृत्त्या कोणी नवीन मनुष्य जवळ आले, किंवा कोठे खसबस झाली, किंवा निरनिराळ्या प्रकारचे आवाज ऐकू आले, तरी त्या प्रत्येक गोष्टीस निरनिराळे विवक्षित अर्थ मिळण्याची पाळी आली. या अर्थावर जनसमूहाची श्रद्धा पूर्णपणे असल्यामुळे कोणतीही अनुकूल अथवा प्रतिकूल परिणामाची गोष्ट घडली, तरी ज्योतिषी मंडळाकडून त्याची संगती कशीबशी तरी जुळवून देण्याचे प्राय: कमी होत नाही.
एक वेळ बसलेली श्रद्धा अशा रीतीने कायम होत गेल्यामुळे शकुनशास्त्रात विरुद्ध किंवा अनुकूल म्हणून सांगितलेला प्रकार घडला असता मनुष्याची वृत्ती ताबडतोब घाबरण्याची अथवा हर्ष मानण्याची होते. चांगली गोष्ट सर्वांसच अपेक्षित असते, यासाठी ती घडल्याबद्दलचे यश कोणासही अगर कशासही दिले तरी एक वेळ चालण्यासारखे असते. परंतु वाईट गोष्टींचा उल्लेख होताना त्यांचा कार्यकारणभाव चुकला असता त्यापासून मात्र एक प्रकारे कायमचे नुकसान होण्याचा संभव असतो. अस्तु: शकुनशास्त्रास अनुसरून शुभाशुभ सांगण्यच्या प्रकारांचे स्वरूप पुढील वचनांवरून दिसून येईल :

१. शौनकोक्त शिशुं कन्या पृच्छकमाश्रित्य तिष्ठति प्राक्चेत् ॥
स्त्रीहस्ता स्त्रीजननी पुंहस्ता पुत्रजननी च ॥
सर्पंति यदि कुमारा: समीपगा: पृच्छकस्य विगतभया: ॥
सा कन्या पुत्रवती कथनीया मंगलवती च ॥
 
२. वादित्रतूर्यघोषो वीणावेणुप्रगीतशब्दाश्च ॥
शंखध्वनि: प्रशस्त: पृच्छाकाले कुमारीणाम् ॥
वृषभो रथो गजो वा शंख: पद्मं ध्वजोथ वा छत्रं ॥
सर्पति पृच्छकदेशे सोत्तमतां व्रजति सर्वलोकस्य ॥

बृहस्पत्युक्त अशुभद्योतक वचने
३. शृगालमहिषोष्ट्राश्च शिवमेषाजकुक्कुटा: ॥
खरकौशिकमार्जारा न प्रशस्ता: समीपगा: ॥

शौनकोक्त अशुभद्योतक वचने
४. श्वशृगालोलूकरवो महिषोष्ट्रगजाविकप्रलापो वा ॥

५. भिद्यति यद्युदकुंभ: शय्यासनपादुकादिभंगो वा ॥
प्रश्नसमयेपि यस्यास्तस्या वैधव्यमादेश्यम् ॥
तात्पर्यार्थ : ( १ ) कन्येच्या लग्नाच्यासंबंधाने प्रश्नकर्ता जोशीबोवांस प्रश्न करू गेला असता येथे एखादी मुलगी पुरुष अगर स्त्रीजातीचे मूल घेऊन प्रश्नकर्त्याच्या पुढे येऊन उभी राहील, तर ज्या जातीचे ते मूल असेल, त्या जातीचे मूल त्या विवाह्य कन्येस प्रथम होणार असे समजावे; म्हणजे त्या मुलीने मुलगा घेतला असेल तर विवाह होणार्‍या कन्येसही मुलगाच होणार, व मुलगी घेतली असेल तर कन्येस मुलगी होणार असे जाणावे, तसे प्रश्न करण्याच्या वेळी कोणीही मूल मनात भय न बाळगता प्रश्नकर्त्याजवळ आले, तर विवाह्य कन्येस मुलगी होणार व ती कल्याण पावणार असे समजावे.
( २ ) प्रश्नाच्या वेळी नगारे, वाजंत्री, वीणा, पावा अथवा गायन यांचा ध्वनी शुभकारक होय. शंख वाजला तर तो फ़ारच प्रशस्त होय. अशा वेळी बैल, रथ, हत्ती, शंख, कमळ, पताका, छत्री यांपैकी काही प्रश्नकर्त्याजवळ आल्यास कन्या उत्तम समजावे.
( ३ - ४ ) कोल्हा, कोल्हे, म्हैस, उंट, मेंढा, बकरा, कोंबडा, गाढव, घुबड, मांजर ही जवळ नसावी. कुत्रा, कोल्हा, घुबड, म्हैस, उंट, हत्ती, मेंढा यांचे आवाज ऐकू नयेत.
( ५ ) प्रश्न करण्याच्या वेळी पाण्याने भरलेला घडा फ़ुटला; किंवा अंथरूण, बिछाईत अगर पादुका ही मोडली; तर कन्येस वैधव्य येणार असे सांगावे..

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP