सौन्दर्याची परीक्षा व स्वभावपरीक्षा

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


कसेही असो; शरीराच्या लक्षणांवरून शुभाशुभ फ़ळे ओळखण्याचा विषय क्षणभर एका बाजूस ठेविला तरी या लक्षणांचा विचार निराळ्या दृष्टीने करिता येण्याजोगा आहे; व वास्तविक लोकव्यवहारात त्याचे महत्त्वही विशेष आहे. पृथ्वीवरील कोणत्याही काळचे व कोणत्याही जागचे लोक घेतले, तरी त्या सर्वांस सौन्दर्य म्हणून काहीएक विशेष गुण आवडत असतो. या सौन्दर्याशी विरोधी गुण म्हणजे कुरूपता होय. या दोन्ही गुणांची आवडनिवड प्रत्येक मनुष्य कमीजास्त प्रमाणाने करीत असतोच; तथापि शरीराची भव्यता अगर किरकोळपणा; अंगाचा कोमलपणा, राठपणा अगर कसलेलेपणा; मुद्रेची उग्रता व भयंकरपणा; शान्तता व समाधानवृत्ती; रंगेलपणा, आनंदीवृत्ती हिरमुसलेपणा, खुनशीपणा, व उदासीनता; ऐटबाजपणा, नेभळेपणा; मानीपणा, तोंडपुजेपणा, इत्यादी गोष्टींच्या संबंधाने प्राय: सर्वत्र मतैक्यच दृष्टीस पडते. या सर्व गोष्टींत अंत:स्वभावदर्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, व व्यवहारात त्याचाच उपयोग पदोपदी होतो. सुभाषित-ग्रंथात--
आकारैरिंगितैर्गत्या चेष्ट्या भाषणेन च ॥
नेत्रवक्तविकाराभ्यां ज्ञायतेन्तर्गतं मन: ॥
हा श्लोक येतो. त्यात आकृती, इंगिते, चालणे, अंगचेष्टा, भाषण व नेत्र आणि मुद्रा यांवर प्रकटणारे विकार यांच्या योगाने मनाचे अंतर्वृत्ती समजते असे सांगितले आहे. अंतर्वृत्ती जाणण्याच्या या साधनांपैकी आकृती मात्र कायमची असते, व इतरांची स्वरूपे प्रसंगभेदानुसार भिन्न भिन्न रीतीने प्रकटणारी असतात. सौन्दर्य काय किंवा स्वभाव काय, यांची परीक्षा करिताना सामुद्रिक शास्त्रात आकृतीचे महत्त्व मानण्याचे कारण हेच होय. बृहत्संहितेत स्त्रियांची लक्षणे सांगून झाल्यावर शेवटी “ प्रायो विरूपासुभवंति दोषा यात्राकृतिस्तत्र गुणा वसंति । ” म्हणजे, स्त्रिया कुरूप असल्यास त्यांच्या अंगी बहुधा दोष राहतात, व जेथे सौन्दर्य असेल तेथे गुणांचे वास्तव्य असते असे सांगितले आहे. दशकुमार चरितातून घेतलेल्या उतार्‍याच्या पुढे दंडी कवीने “ सेयमाकृतिर्न व्यभिचरति शीलम् ” हे वाक्य घातले आहे. त्याचा अर्थ ‘ अशा सुंदर आकृतीवरून कन्येचा स्वभाव वाईट नसणारच ’ असा आहे. मृच्छकटिक नाटक अंक ९ येथे चारुदत्तावर वसंतसेनेस मारिल्याची फ़िर्याद शकाराने आणिली असता प्रथमदर्शनीच हा आरोप चारुदत्ताच्या मुखचर्येवरून पाहता खोटा असला पाहिजे अशा अर्थाची न्यायाधिशाच्या तोंडी कवीने पुढील उक्ती घातली आहे :
घोणोन्नतं मुखमपाङ्गविवृत्तनेत्रम्
नैतद्धि भाजनमकारणदूषणानाम् ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP