पशुपरीक्षेची उदाहरणे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


पशुपरीक्षेची उदाहरणे, व सामुद्रिक विद्येची प्राचीनता : वरील कलमाच्या अखेरीस जो श्लोकार्ध आहे, त्याच्यापुढील उत्तरार्ध --
नागेषु गोषु तुरगेषु तथा नरेषु
न ह्याकृति: मुसदृशं विजहाति वृत्तम् ॥
असे आहे. त्यावरून पाहू गेल्यास आकृतीवरून अगर मुखचर्येवरून नुसती माणसांचीच परीक्षा होते असा प्रकार नसून मुक्या जनावरांपैकी गाई, बैल, घोडे, हत्ती यांचीही परीक्षा होऊ शकते, अशी प्राय: सर्वत्र रूढ समजूत असल्याचे दृष्टीस पडते. पाच पांडवांपैकी दोघे कनिष्ठ बंधू नकुल व सहदेव हे एक वर्ष रूपे पालटून विराटराजाच्या घरी अज्ञातवासात रहात असता, तेथे नकुल अश्वशिक्षा व अश्वचिकित्सा करीत असे; व सहदेवाने गाईबैलांचा कारखाना संभाळिला होता, हे महाभारत ग्रंथावरून सर्वत्र प्रसिद्ध आहेच. घोड्यासंबंधाचे शास्त्र आजमितीसही ‘ शालिहोत्र ’ या नावाने प्रसिद्ध असून या शास्त्रावरील ग्रंथांत नकुलास गुरुत्व दिले जाते ही गोष्ट प्रत्येक साळेत्र्यास माहीत असते. विराटाच्या सभेत नकुल हा ग्रंथिक या नावानए प्राप्त झाला असता त्याने आपल्या गुणांचे वर्णन असे केले आहे :
अश्वानां प्रकृतिं वेद्मि विनयं चापि सर्वश: ॥
दुष्टानां प्रतिपत्तिंच कृत्स्नं चैव चिकित्सितम् ॥
न कातरं स्यान्मम जातु वाहनं
न मेस्ति दुष्टा वडवा कुतो हया: ॥
( महाभारत विर. प. अ. १२ श्लो. ७-८ ).
तात्पर्यार्थ : ‘ मी अश्वाचा स्वभाव जाणतो. कसाही घोडा असो, तो ताब्यात कसा आणावा हे मला माहीत आहे. हरएक प्रकारच्या रोगांवर औषधपाणी देण्याची विद्या मला पूर्णपणे अवगत आहे. मी ज्या जनावरावर बसेन ते जनावर कधीही भ्यावयाचे नाही. घोडीचा अवखळपणा माझ्यापुढे चालावयाचा नाही, मग घोड्याचे तर नावच घ्यावयास नको. ’ प्रसिद्ध पुण्यश्लोक नलराजा असाच अश्वलक्षवेत्ता होता, व तो आपत्प्रसंगी ऋतुपर्ण राजाजवळ चाबुकस्वाराच्या वेशाने रहात असे, ही कथामहाभारतान्तर्गत वनपर्वात वर्णिलेली सर्वत्र प्रसिद्ध आहेच. गाईबैलांच्या संबंधाने सहदेवाची पुढील उक्ती महत्त्वाची आहे :
लक्षणं चरितं चापि गवां यच्चापि मंगलम् ॥
तत्सर्वं मे सुविदितमन्यच्चापि महीतपे ॥११॥
वृषभानपि जानामि राजन्पूजितलक्षणान् ॥
येषां मूत्रमुपाघ्राय अपि वंध्या प्रसूयते ॥१२।:
( महामा. वि. प. अ. ३. )
या श्लोकांत गाईंची लक्षणे, त्यांची वागण्याची तर्‍हा म्हणजे सवयी, त्यांची शुभ लक्षणे, त्याचप्रमाणे उत्तम लक्षणाचे बैल - की ज्यांच्या मूत्राचा वास घेतला असता भाकड गाईदेखील प्रसव पावतील, ही सर्व लक्षणे आपण जाणतो, असे सहदेवाने म्हटले आहे. सूर्यग्रहण ( खग्रास ), पर्जन्य पडू लागण्याची संधी, इत्यादी प्रसंगी गुरांच्या सवयी विशेष रीतीने व्यक्त होतात, व अशा सवयीवरून पावसाची भाकिते सहदेवमतानुसार ग्रंथात वर्णिली आहेत. तात्पर्य इतकेच के, जनावरे व मनुष्ये यांच्या आकृतीवरून त्यांची लक्षणे व गुण ओळखण्याची विद्या या देशात फ़ार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, व स्त्रीगुणपरीक्षणाच्या बाबतीत आजमितीसही त्या तत्त्वाचे अनुसरण होत असल्यामुळे त्याकडे लक्ष पुरविणे प्रत्येक प्रसंगी जरुरीचे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP