धरित्रीची लेक

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


जिवाला चटका लावून सोडणार्‍या अशा गोष्टी मी आतापावेतो खंडीभर तरी ऐकल्या असतील, पण म्हणून रामाच्या सीतेचं ऐकल्यापासून मनाला लागलेली हुरहूर नव्हती बाई कधी यापूर्वी रेंगाळलेअए. विसरायचं म्हणून कितीही ठरवलं तरी ते जमतच नाही त्याला काय करणार ? आणि मी म्हणते ही गोष्ट तशी विसरावी अशी नाहीच मुळी.
नांगराच्या तासाला सीता जनकराजला गवसते काय, धनुष्याच्या परीक्षेस्त उतरलेल्या रामरायासी तिचं लगीन लागतं काय आणि रावणानं कपट करस्थान करून तिला पळवून नेली म्हणून राम तिला वनवासात धाडतो काय, साराच कसा चमत्कार आहे ! आणि त्याहीपेक्षा वनवासात तिनं बिनबोभाट भोगलेले कष्ट, गिळून टाकलेली दु:खं, लवाच्या दर्शनानं उडालेला गोंधळ आणि अखेर शेवटी रामपेक्षा सरस ठरलेल्या धनुर्विद्याविशारद मुलांना व रामाला सोडून धरित्रीच्या कुशीत जाणारी सीता ह्या गोष्टी ऐकल्या म्हणजे अंगावर काटा उभा राहातो. वाटतं की, हिला हे जमलंच कसं ? राजाची लेक न् राजाची राणी म्हणजे वैभवात वाढलेली सीतामाई. पण भिकार्‍याच्या पलीकडेही तिनं हालपेष्टा सोसायच्या न् वर रामाचं सुख चिंतायचं म्हणजे साधी का गोष्ट आहे ?
सीतामाई, खरंच, धन्य ग s s बाई तुझी. दुसर्‍या कुणाला नसतं हं जमलं हे तुझं धाडस. छे छे ! कुणाची हिंमतच व्हायची नाही तर ! तू मोठी धीराची म्हणूनच तुला हे निभलं मी म्हणते. नाहीतर एखादी नुसत्या वनवासाच्या कल्पनेनंच खचून जाती. अग ! पाहिल्या नाहीस तू बायका किती भावनाप्रधान असतात त्या ? पण तू विवेक सोडला नाहीस गडे. शाबास !
हिर्‍यामाणकांचा लखलखाट करणारा मंडप उभारून तुझं स्वयंवर झालं सीतामाई ! आणि न वाकवता धनुष्यबाण मोडण्याचा पण मांडून तून जमलेल्या राजांच्या भरसभेत आपल्या पतीचा शोध घेतलास. धनुर्विद्येत पारंगत असलेल्या सुकुमार रामानं तुझा पण जिंकला न् तू त्याची राणी झालीस. केवढा थाट ग तुझ्या लगीन साजाचा ! आणि तुझं कोडकौतुक तरी किती ग व्हावं !
पण मेल्या त्या कैकईला तुझं सुख खुपलं. पहावलं नाही. आपल्या भरताला गादीवर बसवावा म्हणून तिनं दशरथापाशी हट्ट घेतला. दशरथ राजा तसा मोठा माणूस. पण ऐन वेळेला रथाचा कणा मोडला तर हिनं आपला हात तिथं घालीत वेळ भागवायची तयारी दाखविलेली ना ! तर त्या वेळी तिनं बिचार्‍याला मूर्च्छा आली ग राम वनवासात धाडावा म्हटल्याबरोबर !
आणि स्वत: रामराया ! गादीवर बसायला म्हणून निघताना आईवडिलांच्या आशीर्वादासाठी गेला तर वनवासाची वार्ता कानावर ! काय ग वाटलं असेल सीतामाई त्याला ? पण त्यानं धीर धरला. अंगावरची महावस्त्रं काढली न् वल्कलं चढवलई. रेशमी गोंड्याचे धनुष्यबाण तेवढे बरोबर घेतले न् निघाला. तूही त्याची पाठीराखीण झालीस. आनंदानं निघालीस. आणि तुझे लक्ष्मण भाऊजी, त्यांनी तर स्वत:च्या कुटुंबाचा त्याग करून तुम्हांला सोबत दिली ! केवढा मोठा माणूस म्हणावा हा तुझा दीर ! तुमच्या वाटेतील काटे वेचून त्यानं रस्ता करावा का ग ? छे, असा भाऊ पृथ्वीच्या पाठीवर नाहीच म्हणीनास. अंहं !
पण मृगजळानं घोटाळा केला. सोन्याचं हरिण तू पाहिलंस न् तसली चोळी हवी म्हणालीस. राम लक्ष्मण त्यासाठी धावले तर कपटी रावण बैरागी होऊन आला. सत्त्वाला तू भ्यालीस. लक्ष्मणरेषा ओलांडून तू त्याला भिक्षा वाढलीस. त्या संधीचा फ़ायदा घेऊन त्यानं तुझं हरण केलं. तो तुला घेऊन लंकेला निघाला.
आणि सितामाई, त्या क्षणाला रामाचा धावा करीत तू अंगावरचे अलंकार खुणेला फ़ेकलेस. जटायू पक्षानं तुला पाहिलं. रामाला तो बोलला. तू झोपडीत नाहीस म्हटल्यावर रानभैरी झालेल्या रामलक्ष्मणांनी सारं जंगल पालथं घातलं न् मग ह्या खुणा गवसल्या. मारुतीनं, तुमच्या दासानं, विश्वासू राखणदारानं, त्या खुणेबरहुकूम तुझा तपास लावला. लंकेवर उड्डाण केलं. पहातोय तर तू झाडाखाली रामनाम घेत बसलेली. मंदोदरीनं रावणाचं राज्य करू या म्हटलं तरी तिला तुझ्यासारख्या आपल्या घरी दासी असल्याचं सांगितेली ! त्या घटकेला मारुतीनं रामाची मुद्रिका तुझ्या पुढ्यात फ़ेकली न् तू सुखावलीस. राम लंकेवर चालून येईल म्हणालीस न् तसंच झालं. अभिमानानं तंबत बसलेल्या रावणाचा पराभव झाला. तू परत रामाबरोबर आयोध्येला आलीस.
परंतु कुणा मेल्याचं ऐकून रामानं आपले कान हालके केले न् तुला वनवासात पुन्हा धाडलं.
सीतामाई, नव्हे तुझा ह्या रामावर एवढा जीव मग हा असा ग कसा वेडा म्हणावा तरी ? काय म्हणून तुला त्यानं धाडावी वनवासाला ? होय होय, काय म्हणून ? अग्निदिव्यातून पार पडलेली ना ग तू ?  मग ?
मऊ रेशमी पायघड्यांच्यावरून चालणारी तू गेलीस काट्याकुट्यातून वनात. पण त्यापेक्षा तुला दु:ख झालं ते राम सभेचा उठून तुला पोचवायला आला नाही या गोष्टीचं ! खरं ना ? तरीदेखील तू आपल्या नगरीचा निरोप घेतलास. घालवायला आलेल्या बायकांना तू मागे फ़िरा म्हणालीस ! पण कशासाठी ? राम भुकेचा आळका आहे म्हणून ! सीतामाई, केवढ्या मोठ्या काळजाची ग तू ? आणि रामाचं अमूक पहा, तमूक पहा हे तरी किती सांगशील ? ओटींच्या खारका देखील वाटल्यास सगळ्यांना न् निरोप घेत पुढं चाललीस. पण कुठं ? लक्ष्मणानं निराळ्या वाटेनं नेलं न् ती माहेराची वाट नाही हे कळलं तशी तू हाडबडलीस ! त्याला मनीचं कपट सांग म्हणालीस न् तुला सव्वा महिना झालेला म्हणून तुझा जीव उडून गेला.
पण सीतामाई, भल्या माणसाचं सत्त्व कुणी नाही ग हिरावून घेत. होय नाही हिरावून घेत. तुझी ती दशा बघून बोरीबाभळी बायका झाल्या. मानवी रूप घेऊन त्यांनी तुला उराशी कवटाळली. तुला कर्दळीच्या पानांचा द्रोण करून पाणी पाजलं. तशी मला आठवण आली. नाशिकच्या रामकुंडावरची हिरव्या पालखीतून तिथं तू स्नानाला जायचीस आठवतं का ? इथं कुठली पालखी न् काय ! तू मनाचा धीर धरलास. तणांच्या शेजेवर दगडाची उशी घेऊन निजलीस. आभाळ पांघरलंस आभाळ !
आणि बाळंतपणाच्या वेळेला कातबोळ देखील मिळाला नाही तुला. झाडपाल्याच्या रसावर वेळ काढलास तू. तातोबा ऋषी तुझे आई झाले. त्यांनी तुला न् तुझ्या बाळाला न्हाऊमाखू घातलं. तुला सांभाळली. अग पण, तू धरित्रीची लेक म्हणूनच ना तुला हे निभलं ? एरव्ही कसं शक्य आहे ? सांग ना तूच ! आम्ही तुझं हे दु:ख वाचून देखील हातपाय गळून बसणारे तर निभावं कुठलं ग हे ? छे ! आमचा घासच नाही.
सीतामाई, रत्नजडित रांगोळ्या घालण्यार्‍या तुझ्या नाजूक हातांनी नदीला जाऊन तुझ्या अंकुशाची बाळुती धुवावीत ना ग ? असा जीव तुटतो म्हणून सांग या वार्तेनं ! सहनच होत नाही बघ. राजाची राणी अशी कशी मी म्हणते ? काय हा प्रसंग ग तरी सीतामाई ? असूं दे. पण गडे, ज्या वेळी त्या नदीच्या काठावरील झाडावर एक वानरीण आपल्या बाळाला अंगावर पाजतांना तू पाहिलीस त्या वेळी तुला पान्हा फ़ुटला. अंकुशाची आठवण आली. तातोबा देव झोका देत बसले होते तरी वात्सल्य दाटून आल्यामुळं तूं एकदम धावलीस आश्रमाकडे ! होय ना ?
तर दरम्यानच्या काळात कोण गोंधळ. तू गेलीस न् अंकुशाला घेऊन आलीस पुन्हा बाळुती धुवायला. त्या वानरिणीसमोर आपल्या बाळाला पाजलंस. दोघीही सुखावलात. पण इकडे तोवर तातोबांचं धाबं दणाणलं ! अंकुशबाळ झोळीत नाही म्हणजे ? गेला कुठं ? दाही दिशा त्यांनी पालथ्या घातल्या न् अखेरशेवटी एक लव्हाळ्याची काडी आणून ती दुपट्यात गुंडाळीत झोळीत निजवली. अग, सांगून तरी यायचंस की !
आणि गंमत बघ हं, तू आपलं काम आटोपून माघारी आलीस तर कडेवर अंकुश न् हुबेहूब त्याच्याच तोंडावळ्याचा लव त्या तिथल्या झोळीत रडतेला ! तशी तू दुचित पडलीस. हे बाळ कोणाचं म्हणालीस न् त्यालाही पदराखाली घेतलंस ! तुझी कूस धन्य झाली. पण तुला प्रश्न पडला की, अंकुश रामाचा खरा पण हा लव कुणाचा सांगायचा ? आणि तू गेलीस गडबडून, पण तिथल्या जंगलात फ़ुललेल्या वृक्षवेलींनी तुझी समजूत घातली. आणि मग ही दोन्ही बाळं उद्या तुझा पांग फ़ेडतील या आशेवर त्यांची तू. चांगली जोपा केलीस.
होता होता मग लव आणि अंकुश लहानाचे मोठे झाले. धनुर्विद्येत पारंगत ठरले. राजबिंडे दिसू लागले. ऋषीमंडळीत त्यांचा बोलबाला झाला. तशी मग काय गंमत झाली की, इकडे तोवर रामानं यज्ञ मांडला. शेजेवर सीता नाही म्हणून नित्य नियमानं डोळ्यातंतील गंगायमुनांचे पूर तरून जाणार्‍या रामानं सुपारी घेऊन पूजा केली आणि दुनियेच्या प्रवासाला आपला घोडा सोडला. स्वत:ची ताकद कमवायचा बेत हं ! पण सीतामाई तुझ्या लेकांनी तो घोडा अडवला न् खुद्द रामाच्या पुढं बाणांचा सडा घातला सडा ! तुझी मुलं अजिंक्य झाली. त्यांचं कौशल्य बघून तुझीच काय राजाचीही तहानभूक हरपली. नेत्रांचं पारणं फ़िटलं.
रामरायाच्या दर्शनानं तू धन्य झालीस. आणि आपल्या पुत्रांच्या व तुझ्या दर्शनानं राम समाधान पावला. आनंदला. पितापुत्रांची ओळखदेख पटली न् तुम्ही आयोध्येला यावं म्हणून शृंगारलेला रथ तुम्हांला सामोरा आला.
पण सीतामाई, आनंदाच्या ह्या कडेलोटाचे प्रसंगी तू आपल्या मनानं धरित्रीच्या कुशीत गेलीस ! आता यापुढं जिवाला कष्ट नकोत म्हणालीस. तुझं सोनं झालं. पण मुलांच ग ? त्यांना कोण ? रामावर भरवसा ठेवलास होय ग अशा वेळी ? असूं दे. तुझी मर्जी. आम्ही काय बोलावं ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP