रत्नागिरीचा राजा

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


नागपंचमीच्या गीतांच्या कारणानं रत्नागिरी गाव आमच्या ओळखीचं झालेलं. आणि तिथल्या उंच टाकीवर शेला झुलत असल्याचं पण आम्ही तोंडपाठ केलेलं. पण हे गाव आजोळाखेरीज आणखी कुठलं नातं जोडील याचा पत्ता आम्हांला परवापरवापर्यंत नव्हता. म्हणूनच ह्या गावाला एक राजा पण आहे अस कळलं तेव्हा जीव भुलूनच गेला. आणि चैत्राच्या महिन्यात ज्या वेळी ह्या राजाच्या डोंगरावर चारी वाटा फ़ुलून माणसं आली त्या वेळी तर नजरच ठरेना. शिवाय चांगभलंच्या गर्जनेनं तो डोंगर जेव्हा दणाणून गेला तेव्हा तर काही सुचेनाच. म्हटलं हा राजा असा आहे तरी कोण तेव्हा हे एवढे सोपस्कार !
पण तिथं सव्वा तोळा धूप जळत असल्याचं आणि दारी शिंग वाजत असल्याचं आम्ही पाहिलं मात्र न् आमच्या आवाक्यात हे प्रकरण आलं. आपल्या मनीचं कोडं सोडवायला म्हणून ह्या देवाजवळ आलेली माणसं नवस बोलत होती, चांगभला म्हणत होती आणि त्याच्याकडून धीराची अपेक्षा करीत होती. हे पाहिलं तेव्हा हा देव कुलस्वामी असावा असा अंदाज आम्ही बांधला. पण त्याबद्दल आम्ही जेव्हां तिथं चारचौघांत यासंबंधी बातमी काढली तेव्हा कळलं की, मराठ्यांचं हे फ़ार मानाचं कुलदैवत आहे. म्हणून गुलाल खोबरं उधळीत न् दंडवत घालीत माणसं ह्या देवाच्या दर्शनाला येतात. एवढंच नाही तर या देवाच्या नावानं होणार्‍या चांगभलंच्या गर्जनेनं पन्हाळगड देखील हादरून जातो !
घोड्यावर बसलेल्या ह्या देवानं नजर टाकली की सगळ्या वाटांनी गुलालाच्या पायघढ्या येतात आणि तांब्याचा नगारा झडू लागतो. हे पाहिल्यावर आम्हांला मोठा अचंबा वाटला. त्याकारणानं आम्ही देखील जनलोकांच्या जत्रेत सामील झालो न् ह्या देवाचं दर्शन घेतलं. एवढचं नाही तर ह्या देवाच्या डोंगराची नऊ लाख पायरी राजीखुशीनं पायाखाली तुडवित तिथल्या गाईमुखाचं पोटभर पाणी देखील प्यालो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP