हरहर महादेव

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


भरपूर वेलविस्तार असलेल्या वडाच्या पारंब्या जागोजाग दिसाव्यात आणि ते झाड डेरेदार असावं तसा प्रकार माणसांच्या मित्रापणाच्या बाबतीत घडलेला कधी कधी दिसून येतो. अशा वेळी ही माणसं दिवस न् रात्र कुणाच्या नाही कुणाच्या तरी उपसा भरीत असल्याची वार्ता नेहमीच कानांवर येते. निदान कैलासावरच्या शंकर-पार्वतीच्या बाबतीत तरी मी हे नेहमीच ऐकलंय. मानवलोकीच्या माणसाची नड शोधून काढायची न् त्यांची ती नड भागवीत घरदार सोडून फ़िरत रहायचं हा शंकर-पार्वतीचा नेहमीचाच स्वभाव. त्या कारणानं जेव्हा बघावं तेव्हा ही दोघं आपली एकमेकांच्या सावलीप्रमाणं एकत्रच. कधी काळी झालीच फ़ारकत तर शंकराला ते खपायचं नाहई आणि पार्वतीनं मग तिकडे कानाडोळा करीत रोख न् चोख उत्तर दिलं नाही असं व्हायचंच नाही. अशा वेळी मग त्यांच्या बोलण्याची गंमतच बघून घ्यावी बाई.
आमच्या बाळपणापासून शंकरपार्वतीच्या गोष्टी आमच्या कानांवर. त्या गोष्टीत पार्वतीनं माहेरी जायला निघावं आणि शंकरानं तिला नको तरी म्हणावं नाही तर तिच्या माहेरच्या माणसांना हिणवावं तरी हे अगदी ठरलेलं असायचं. त्या कारणानं माझं माहेर दुबळं असलं तरी मी साखळ्या न् पाटल्या तरी आणीनच असं उत्तर पार्वतीनं दिलं कीं आमच्या घरी वर्षातून एकदा ती यायची. त्यामुळे ती हमखास यावी ही आमची भावना. तिची गाटभेट पडावी आणि मनाला येईल तासं तिच्याबरोबर खेळायला मिळावं हाही आमचा हेतू. तिच्या एकी लहानपणापासून मनाला भारी ओढ. अगदी हुरहूरच लागून रहायची. त्यासाठी अंगावरचा एखादा दागिना तिला द्यावा लागला तरी फ़िकीर वाटायची नाही. उलट पार्वतीला यायला उशीर झाला म्हणजे तिनं आंबराईत गुंतलए होते, हळदकुंकू वाटीत होते, घरात काम निघालं होतं असल्या थापा दिल्या तरी ते कधी खरं वाटायचं नाही. आणि मग आपला शंकर साधा भोळा राजा आहेतर तो रुसला, नगरीचं निशाण लागलं नाही, हिर्‍यामाणकांच्या पाळण्यात मला जोजवीत बसला न् सोन्याची दोरी त्यानं हाती घेऊन आडाचं पाणी काढलं ही खरी गोष्ट बाहेर आलई की आमची हसून हसून पुरेवाट व्हायची. अशा वेळी “ मग तू काय बोललीस ग गिरजा ? ” असं आम्ही पार्वतीला विचारलं म्हणजे ती पोटभर बोलत सुटायची. एवढंच नाही तर “ अग, तू कुणाच्या गळ्याभोवती हात टाकलास, कुणाला कडेवर घेतलंस ? कुणाच्या मुखाकडं बघत होतीस ? ” अशा संशयानं शंकर बोलायला लागला म्हणजे मग “ मी कळशीच्या गळ्यात हात टाकला वता, घागर कमरेवा घेतली वती, दिव्याच्या मुखाकडे बघत होते. ” असली उत्तरं करीत त्याला गप्प बसवलं असं तिनं सांगितलं की, आम्हांला खूप आनंद वाटायचा. आमची गिरजा शहाणी आहे हीच आमची भावना. हाच आमचा अभिमान. म्हणून आम्ही तिच्या भलेपणाची तारीफ़ करीत तिच्या शब्दाला उतार द्यावा म्हणून शंकराला चिडावायला मागंपुढं पहायचे नाही !
पण हा शंकर-शंभूमहादेव-आमचं ऐकत बसायला आलाय होय ? तो आपला कधी तरी शिखर शिंगणापुरी जाऊन मग गावोगाव भटकत रहायचा तर त्याच्या मागनं आम्ही कुठंवर धावावं ? म्हणून आम्ही त्याला काही टाकून बोलावं म्हटलं तरी ते पार्वतीला खपायचं नाही. चार दिवस सुखाचं माहेरपण भोगीत न् वासाच्या तांदळाचा भात जेवीत ती शंकराच्या भलेपणाच्या गोष्टी आम्हांला ऐकवायची. आणि सांगायचं म्हणजे त्या ऐकताना आम्ही त्यात एवढे दंग होऊन जायचे के, त्याच्यावर रागवायचं विसरूनच जावं !
तर एकदा काय झालं की, एक बाई म्हणे आपल्या भावजयीनं राग राग केला तर मोकळ्या हातांनी सासरी निघून आली. जेवली खावली नाही. लेणं लेवून आली नाही. तर तिनं काय केलं की, बाजारात जुंधळे घालून भोपळ्याची फ़ोड घेतली.  गोडधोड करावं म्हणाली. तशी पार्वतीनं शंकराला ते दाखवलं. तिचं भलं करा म्हणाली. आणि मग शंकरानं पण युक्ती काढली. भर बाजारात जाऊन त्या बाईला दर्शन दिलं. तो भोपळ्याचा तुकडा अमक्या अमक्या भगुल्यात शिजव म्हणाला. आणि आशीर्वाद देऊन माघारी आला. त्या बाईनं शंकराच्या म्हणण्याप्रमाणं केलं तर काय चमत्कार बाई ! त्या भगुल्यात सोन्याच ढीग ! तिनं देवाला हात जोडले. मनोभावे त्याची प्रार्थना केली. सारं घर वगतं केलं. पैकाअडका, जमीनजुमला, गाडीबैल, घरदार असं काय काय उभं केलं न् भावाला ये म्हणाली. तर काय गंमत की, भावजयीनं ह्या नणंदेवर चोरीचा आळ घातला ! भाऊ मैनीच्या डोक्यात दगड घालायला आला !! आणि खरी गोष्ट कळल्यावर त्यानं शंभू महादेवाचे पाय धरले. पूजा बांधली. हरहर महादेव बोलला न् मग सगळ्यांना सुखाचे दिवस आले.
पार्वतीनं असल्या गोष्टी सांगाव्यात न् त्या मोठ्या आवडीनं आम्ही ऐकाव्यात. इतक्यात नेहमीच हे शंभू महादेव यायचे न् तिला घेऊन जायचे ! इतकी घाई, इतकई घाई की, बोलायची सोय नाही. पावणे घरी आले म्हणून पुरणपोळी तर राहो देच पण साधी भाजीभाकरीपण होस्तोवर दम निघायचा नाही न् मग बाकीचं कुठलं काय ? तशात आमचा तो गणपती, त्याला आपल्या घरी जायची आशी घाई की विचारूच नये !
पण ते काही का असेना, गणपतीची विद्येची देवता म्हणून पूजा बांधायची न् पार्वतीला मनसोक्त माहेर करायचं एवढंच आम्हांला माहीत. बाकीचं काही बोलायला तरी फ़ुरसत नको का ? काहई करणंसवरणं तर मग लांबच !! नाही तर काय ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP