अंजनीचा बाळ

लोककथा तत्कालीन सामाजात चालीरीती कशा असतात याचे वर्णन करतात. तसेच समाजाचे नीती नियम यांचा उहापोह करतात.


आपल्या बाळपणापासून सोन्याचा लंगोट घालणार्‍या आणि बाळुत्यात असल्यापासूनच द्रोणागिरीला आपल्या तळहातात झेलणार्‍या मारुतीबद्दल लहानपणापासूनच माझ्या मनात भारी कुतूहल असायचे. जन्मत:च सूर्यदेवाला गिळंकृत करायला निघालेला हा अंजनीचा बाळ किती आणि कशा प्रकारची अचाट उलाढाल करील याचा नेम नव्हता. त्यामुळं लंकेच्या रावणानं सीतामाईचे हरण केल्याची वार्ता कानावर आली तशी हा रामरायाचा निष्ठावंत सेवक खात्रीनं सीतेचा शोध लावील हा जनमनानं कौल दिलेला. म्हणताना मारुतीच्या देवळात गेलं रे गेलं की मला त्याच्याशी बोलायचा मोह बळपणापासून व्हायाचा. त्या कारणानं मी कितीदा तरी रामाच्या मुद्रिकेला माझा हा निरोप मारुतीला सांग म्हटलेलं. पण ती विसरली असावी न् ते ध्यानात न आल्यामुळं मीही मारुतीशी बोलायला धजले नसावी असाच प्रकार घडत गेला.
अखेर शेवटी मग जिवाचा धडा केला आणि लक्ष्मणाच्या शक्तीसाठी द्रोणागिरी घेऊन येणार्‍या मारुतीला मी एक दिवस विचारावं म्हटलं. चैत्र पौर्णिमेला जन्मलेल्या ह्या मारुतीला दशरथाच्या राण्यांनी आपल्या ओटीत झेलले असल्याच्या गोष्टी आठवीत मी सगळच विचारलं, “ लंकेला गेल्यावर सीतामाई भेटस्तोवर कसं कसं झालं देवा ? ”
तशी मग गाभार्‍यातून आवाज आल्याचा भास झाला, “ सगळी वानरं माघारी आली. मग मी गेलो. एका उड्डाणात लंका गाठली. दरिया पार केला. तोडून टाकलेले. उपयोग झाला. बरोबर रामाची मुद्रिका. आडलंकेचा पडलंकेला झालो. मंडादेरीच्या बोलण्यावरनं पत्ता लागला. अख्ख्या लंकेला वेढा दिला. वानरांची फ़ौज घनदाट बसली. सीतामाई गवसली. घेऊन आलो खूण. सांगितली रामाला. लढाई झाली. दिली लंका पेटवून. आमची तोंड काळी झाली. पण सीतामाई रामरायांनी घरी आणली. शीणभाग उतरला. काम झालं. मनाला शांती आली. ” त्यासरशी एकीनं बोलणं केलं कीं, शेंदराच्या पायघड्या घालीन देवा मारुतीराया पण घरात पाळणा हलू दे.
आणि मग मला बोलता बोलता कळलं की, ह्या मारुतीच्या आंघोळीला सव्वा तोळा कस्तुरी लागते ! एवढेच नाही तर सव्वा खंडीचा नैवेद्य तो गटकनी गिळून मोकळा होतो !! म्हणताना सेतूबंधनाला गेलेल्या ह्या देवाला मी हात जोडले अन् म्हटलं की, करशील तेवढं थोडं आहे बाबा. आम्ही आपलं पहात रहावं न् ऐकत बसावं तुझ्या एकी. असं का न् तसं कसं हे विचारणारे आम्ही कोण ? खरं का खोटं ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP