चतुर्थ पटल - महावेधकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


श्रीशंकर म्हणतात की, हे त्रिभुवनेश्वरी ! अपान व प्राण यांना एक करून महाबंधामध्ये स्थिर असलेल्या योग्याने आपल्या पोटात वायू भरून आपल्या दोन्ही पार्श्वभागावर ताडन करावे. मी ( शंकराने ) या प्रकाराला वेध म्हटले आहे.

बुद्धिमान् योगिश्रेष्ठाने या महावेश्वाचा अभ्यास करून वायुद्वारा अर्थात् जागृत कुंडलिनी शक्तीचे सुषुम्नामार्गात चालन करून त्या मार्गातील ( रुद्रग्रंथी व विष्णुग्रंथी ) या दोन्ही ग्रंथींसह ब्रह्मग्रंथीचा भेद करावा.

जो साधक या सर्वोत्तम किंवा सर्वश्रेष्ठ महावेधाची प्रक्रिया गुप्त ठेवून सतत अभ्यास करतो त्याला वायुसिद्धी प्राप्त होते म्हणजे त्याचा वायू सिद्ध होतो अर्थात् वायूची वक्र किंवा बहिर्मुख गती संपून तो सुषुम्नागामी होतो. याचा अर्थ असा की, महावेधाचा अभ्यास करणार्‍या साधकाची आत्मशक्ती कुंडलिनी जागृत होऊन ती शनै शनै सुषुम्नेत प्रवेश करून सहस्रारातील शिवाशी मीलन होण्यासाठी सतत उद्युक्त राहते. ज्यावेळी शक्ती जागृत होते तेव्हा महामीलन सिद्ध होते. यामुळे साधकाचे जरा व मरण नाहीसे होतात.

शरीरातील चक्रांमध्ये ज्या देवता आहेत त्या ( उपरोक्त प्रकारे ) केलेल्या वायूच्या ताडनामुळे कम्पायमान होतात आणि यामुळेच महामाया कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ती सुषुम्नाद्वारा कैलासात म्हणजे ब्रह्मस्थानात किंवा सहस्रारात लीन होते. याचा अर्थ असा की, महावेधान्तर्गत ताडनक्रिया  ही महामायास्वरूप कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी म्हणूनच केली जाते. ही शक्ती जागृत व्हावी म्हणूनच सर्व साधने व साधनान्तर्गत प्रक्रिया सिद्ध झाल्या आहेत. ज्यावेळी कैलासातील शिवाशी एकरूप होण्याकरिता ही जागृत शक्ती अतरंग साधन करू लागते अर्थात् सुषुम्नाद्वारा ऊर्ध्वमुख होते त्यावेळी खर्‍या कर्माची, भक्तीची व ज्ञानाची सिद्धी होते. त्याचप्रमाणे चक्रस्थित देवता म्हणजे गणेश, ब्रह्मा, विष्णू, महादेव, मायाधीश व ज्योतिस्वरूप ईश्वर क्रमाने आधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध व आज्ञाचक्रांमध्ये स्थित आहेत. ज्यावेळी कुंडलिनी शक्ती सुषुम्नामार्गाने वर वर जाऊ लागते त्यावेळी वायुरूप शक्तीच्या वेगाने या देवता क्रमश: जागृत होऊन त्या या शक्तीत विलीन होतात. यालाच षट्चक्रवेध व ग्रंथित्रयभेद असे म्हणतात.

महावेधाची क्रिया केली नाही; तर महामुद्रा व महाबंध निश्फ़ल होतात अर्थात् महावेधाशिवाय मुद्रेचे व बधाचे काहीही फ़ल मिळत नाही. या करिता योगीसाधकाने प्रयत्नपूर्वक क्रमाने मुद्रा, बंध व महावेध या तिन्हीही साधनांचा अभ्यास करावा.

जो साधक मुद्रा, बन्ध आणि वेध या तिन्हींचा दररोज दिवसा व रात्री चार चार वेळा प्रयत्नपूर्वक अभ्यास करील तो सहा महिन्यांत मृत्यूवर विजय प्राप्त करील यात काहीही संशय नाही.

सिद्धपुरुष या तिन्हींचे माहात्म्य उत्तम प्रकारे जाणतात. इतर लोक अर्थात् सामान्य सांसारिक लोक हे माहात्म्य जाणत नाहीत. हे माहात्म्य जाणणार्‍या व त्याप्रमाणे साधनाभ्यास करणार्‍या साधकाला सर्व प्रकारच्या सिद्धींचा लाभ होतो.

सिद्धीची इच्छा करणार्‍या साधकाचे हे कर्तव्य आहे की, त्याने आपला साधनाभ्यास प्रयत्नपूर्वक गुप्त ठेवावा. मुद्रा इत्यादि गोष्टी साधारण किंवा सामान्य लोकांसमोर प्रकट केल्याने सिद्धीची म्हणजे शिवशक्तिसामरस्याची अंतिम स्थिती कधीच प्राप्त होत नाही हे नितांत सत्य आहे. ॥५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP