बहीणभाऊ - रसपरिचय ६

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.


वैनी उभ्या उभ्या कुंकूं नीट बसून प्रेमाने सौभाग्यतिलक लावीत नाहीं. कपालींच्या कुंकवाची सुद्धां वैनी अशी हयगय करते हें पाहून बहिणीचें ह्रदय चरकतें. ती म्हणते :

वैनीबाई भावजये उभ्यानें कुंकूं लावूं
नवसाचा माझा भाऊ किती सांगूं ॥

घरीं दोन दिवस बहिणी आलेल्या. भावाला वाटतें कौतुक करावें. परंतु त्याच्या पत्नीला राग येतो. बहिणी कशाला लुटायला आल्या असें ती म्हणते :

भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटाला
भावजया ग म्हणती आल्या नणंदा लुटाला ॥
भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट
भावजया ग म्हणती  धरा नणंदा आपुली वाट ॥

बहिणी मनीं म्हणतात, “आपण वैनीपासून अपेक्षा तरी कां करावी ? किती झालें तरी परक्या घरून ती आलेली :”

माउलीची माया काय करील भावजयी
पाण्यावीण जाईजुई सुकतील ॥
आईबापांच्या राज्यांत खाल्या दुधावरल्या साई
भावजयांच्या राज्यांत ताक घेण्या सत्ता नाहीं ॥

परंतु सर्वच भावजया वाईट नसतात. कधीं भावजयाच मनाच्या थोर असतात व भाऊ उलट असतात. भावयीचें कौतुक करायला नणंद तयार असते :

भावा ग परीस भावजय फार भली
कोणा अशीलाची केली वयनीबाई ॥
भावा ग परीस भावजय ग रतन
सोन्याच्या कारणें चिंधी करावी जतना ॥

कोणा कुलशीलवंताच्या घरची ही ? किती चांगली वागते. सोन्यासारखी आहे. माझा भाऊ म्हणजे फाटकी चिंधी. परंतु त्या सोन्यासाठीं हया चिंधीला जपलें पाहिजे. लहानशी चिंधी सोन्याला सांभाळते. किती सुंदर आहे द्दष्टान्त ! भाऊ व भावजय यांचें परस्परप्रेम पाहून बहिणीला धन्यता वाटते :

अतिप्रीत बहु प्रीतीचीं दोघेंजण
विदा रंगे कातावीण भाईरायाचा ॥

इतर जगांतल्या भावजया पाहिल्या म्हणजे स्वत:च्या भावजयीची किंमत कळते :

भावजयांमध्यें वहिनीबाई शांत
भाऊ माझे सूर्यकांत उगवले ॥

भाऊ तेजस्वी, जरा प्रखर. परंतु वैनी अगदीं शांत व सौम्य पाहून बहिणीला समाधान होतें :

भावाचें वर्णन करताना बहिणीच्या वाणींत सारी सरस्वती जणुं येऊन बसते. माझे भाऊ म्हणजे देवळांतील निर्मळ आरसे, देवळांतले अभंग खांब, देवळाजवळचीं शीतळ झाडें :

माझे दोघे भाऊ देवळाचे खांब
अभंग प्रेमरंग मला ठावें ॥
माझे दोघे भाऊ बिल्लोरी आरसे
देवळीं सरिसे लावीयेले ॥
माझे दोघे भाऊ मला ते वाणीचे
देवाच्या दारींचे कहुलिंब ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP