बहीणभाऊ - रसपरिचय ३

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.


तिचे आईबाप नसतात. आईबाप गेले म्हणजे कोठलें माहेर असें लोक म्हणतात. तें का खरें होणार ? मरतांना मायबाप बोलले तें का दादा विसरेल ?

शेवटील शब्द आई तुला जे बोलली
काय विस्मृति पडली त्यांची दादा ॥
ताईला प्रेम देई तिला रे तूंच आतां
माय बोले मरतां मरतां दादा तुला ॥

या ओंव्या वाचतां वाचतां कोणाचे डोळे भरून येणार नाहींत ? स्त्रीयांच्या अंतरंगांतील हे थोर दर्शन आहे.

बहिणीला ओंवाळणी घालावी लागेल म्हणून तर भावाला चिंता नसेल ना पडली ? अरे, बहीण का पैशासाठीं भुकेलेली असते ?

लागेल घालावी फार मोठी ओंवाळणी
चिंता काय अशी मनीं भाईराया ॥
नको धन नको मुद्रा नको मोतियाचे हार
देई प्रेमाश्रूंची धार भाईराया ॥
पानफूल पुरे पुरे अक्षता सुपारी
नको मोतियाचे हार भाईराया ॥
नको शेला जरतारी भाईराया ॥

भावाला केव्हां पाहीन असें तिला होतें. तिच्या डोळ्यांतून पाणी येतें तिला चैन पडत नाहीं.

येरे येरे भाऊ किती झालें दडपण
कधीं हृदय उघडीन तुझ्यापुढें ॥
येरे येते भाऊ किती पहावी रे वाट
पाण्याचा चाले पाट  डोळ्यांतून ॥
जिवाच्या जीवना अमृताच्या सिंधु
येई गा तूं बंधू उठाउठी ॥
जिवाच्या जिवलगा प्रेमाच्या सागरा
सुखाच्या माहेरा  येई गा तूं

ती भावाला निरोप तरी कोणाबरोबर पाठवणार, पत्र कोणाबरोबर देणार ? स्त्रियांना कोठें आहे तें स्वातंत्र्य ? परंतु एक साधन आहे. वार्‍याबरोबर, पांखरांबरोबर पाठवावा निरोप. त्यांना बातमी घेऊन येण्याविषयीं सांगावें :

अरे वार्‍या वार्‍या घांवशी लांबलांब
बहिणीचा निरोप सांग भाईरायाला ॥
कावळ्या कावळ्या लांब जाई रे उडून
येई निरोप सांगून भाईरायाला ॥

परंतु चिमण्याकावळ्यांनीं कां जावें, कां ऐकावें ? कां म्हणजे ? मीं त्यांना अंगणांतून हांकललें नाहीं. त्यांना दाणे घातलें, त्यांना का कृतज्ञता वाटत नसेल ?

दाणे मी घालल्यें तुम्हांला अंगणांत
भावाची आणा मात  चिमण्यांनो ॥
नाहीं हांकलीलें कधीं अंगणामधून
यावें निरोप सांगून भाईरायाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP