बहीणभाऊ - रसपरिचय ४

चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.


भाऊ येणार असें तिला वाटूं लागतें. हातांतला घांस गळतो. डोळा लवतो. कोणी तरी दूर डोंगर उतरून उन्हांतून येतांना दिसतें. भर दुपारच्या उन्हांतून कोण येतें तें ? पावसानंतरचें पहिलेंच ऊन, फार त्रास देतें तें. भाऊच असणार तो :

दुपारचें ऊन घाटीडोंगर कोण घेतो
बहिणीसाठीं भाऊ येतो भाऊबीजे ॥
दुपारचें ऊन लागतें सणसण
शेला घेतो पांघरूण भाईराया ॥
तांबडें पागोटें उन्हानें भडक्या मारी
सुरूच्या झाडाखालीं भाईराया ॥

कोंकणांतील हें वर्णन दिसतें. घाटी चढून येणारा, सुरूच्या झाडाखालीं बसणारा हा कोंकणचा भाऊ दिसतो. भाऊ येतो व मुळें मामा मामा करूं लागतात. वहिणीच्या आनंदाला आकाश ठेंगणें होतें. ती भावाजवळ प्रेमानें विचारपूस करते. कौतुकानें पुसते :

“तुला आळवीत बैसल्यें होत्यें दादा
काय वयनीच्या नादा गुंतलासी ॥”

“वयनीनें मोहिनी घातली म्हणून बहिणीला विसरलास ना ? बरें पण खुशाल आहेस ना, सारी मंडळी बरी आहे ना ? थकलास हो दादा. तूं का आजारी होतास ? डोळे कां असे खोल ?” किती प्रश्न ती करते. परंतु प्रेमळ भाऊ म्हणतो :

प्रवासाचा शीण, ताई नाहीं मी आजारी
हळुवार चित्त भारी  ताई तुझें ॥
ताईला पाहून हरेल सारा शीण
भावाला बहीण अमृताची ॥
ताईला पाहून सारीं दु:खें हरपती
हृदयीं भरती प्रेमपूर ॥

किती दिसानीं भाऊबीजेसाठीं आलेला. बहिण मग थाट करते. परंतु ती गरीब असते. तिच्या घरांत गहूं नसतात. ती शेजी बाईकडे जाते :

“शेजारणी बाई उसने द्यावे गहूं
पाहुणे आले भाऊ फारां दिशीं ॥”

शेजारीण नाहीं म्हणत नाहीं. सुंदर सोन्यासारखे गहूं शेजी देते. बहीण दळते :

सोनसळे गहूं रवा येतो दाणेदार
फेण्यांचें जेवणार भाईराज ॥
सोनसळे गहूं त्यांत तुपाचें मोहन
भाऊबीजेचें जेवण भाईरायाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP