सुदामचरित्र - भाग १६ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६.
चहूंकडे स्वर गाताती गायनें । आणिक पुराणें ठाईठाईं ॥१॥
गीतनृत्य नाना करिती तनाना । होतसे झणाणा टाळघोळ ॥२॥
श्रवणाचें सुख घेतसे ब्राम्हण । नामाही गर्जना करीतसे ॥३॥
१७.
नारायण नाम तारक सर्वांसी । तें मुनीं मानसीं धरिलें असें ॥१॥
कापुराची राशी अग्नीचाहो कण । तैसें नाम जाण पातकासी  ॥२॥
अंतरीं ते क्षुधा लागली द्विजासी । पाहीन नगरीसी सावचीत ॥३॥
नामा म्हणे द्विज उभा महाद्वारीं । केवळ भिकारी राजयोगी ॥४॥
१८.
नाहीं देवाचिये द्वारीं आडकाठी । हे तो आहे गोष्टी सिद्धांताची ॥१॥
भावाविरहित मार्गची न फुटे । फुटल्या न सुटे मागुता तो ॥२॥
नामा म्हणे ऐसा लौकिक वेव्हार । तेथें तों निर्धार कांहीं नाहीं ॥३॥
१९.
चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥
पाहातां लोचनीं राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळीं ॥२॥
सभा ते साजिरी रत्न सिंहासनीं । देव चुडामणी शोभतसे ॥३॥
राईरखुमाई चामरें ढाळिती । राधा उभी हातीं घेउनी छत्र ॥४॥
समारंभें पुढें गरुड तो उभा । शोभतसे शोभा दिव्य कांहीं ॥५॥
यादवांची सभा दाटलीसे भारी । नाना उपचारी रिद्धी सिद्धी ॥६॥
उद्धव अक्रूर उभे पायांपासीं । देवादिदेवासी विडे देत ॥७॥
नामदेव तेथें उभा होता निका । घेऊनि पादुका दोन्ही हातीं ॥८॥
२०.
पुढें तो भिकारी जाता झाला वेगें । आपुलिया रंगें रंगूनियां ॥१॥
येकाकार करी चित्त आणि वृत्ति । पाहे लक्ष्मीपति दुरोनियां ॥२॥
तटस्थ जाहाला चालला त्वरित । मुखीं नाम गात गोविंदाचें ॥३॥
नामा म्हणें नीर पाझरे लोचनीं । समाधी लागुनी मुनी ठेला ॥४॥


Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP