सुदामचरित्र - भाग १ ते ५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥
तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥
सत्वाचा सागर धैर्याच मांदार । भक्तीचा निर्धार तयापाशीं ॥३॥
हालेना चालेना चळेना ढळेना । आणिक कल्पीना इच्छा कांहीं ॥४॥
सदा सर्वकाळ समाधी लागला । प्रपंच सांडिला छेदूनियां ॥५॥
नामा म्हणे तोचि योगियांचा राजा । ज्ञान्याचीया पूजा पुजतसे ॥६॥
२.
प्रारब्धाच्या बळे देहाचें वर्तनें । काळचक्र भोवने जैसें कांहीं ॥१॥
तैसाची तो साधु जाणावा प्रसिद्धु । देहाचा संबंधु नेणे कांहीं ॥२॥
वारे वाजूनियां जातां वृक्ष डोले । मर्यादेवेगळें होत जाय ॥३॥
नामा म्हणे होणें जाणें नाहीं तयां । संचिता साराया लागोनियां ॥४॥
३.
ऐसा तो ब्राह्मण दरिद्रें पीडिला । सदा स्वरूपीं झाला अखंडीत ॥१॥
न करीच खंती कांहीं तो अंतरीं । वाचे तो उच्चारी रामकृष्ण ॥२॥
नाहीं धड घर केवळ जर्जर । चंद्र प्रभाकर उगवती ॥३॥
बाळें पांच सात बाहाती झोंबती । भुकें तळमळिती सर्वकाळ ॥४॥
उष्णें पोळे वारा येतसे भरारा । मेघाचिया धारा घरामाजी ॥५॥
नामा म्हणे त्यानें प्रपंच सांडिला । परमार्थ मांडिला अखंडीत ॥६॥
४.
तयाची सुंदरा शांतीची बाहुली । आणिक जीभली बोलों नेणे ॥१॥
सेवेसी सादर होऊनियां राहे । भुकची ते खाये भुकेलिया ॥२॥
नित्य नैमित्तिक कांहीं न म्हणे । अंतरींची खूण जाणोनियां ॥३॥
नामा म्हणे न्य़ून पूर्ण सर्व हरि । आणिका विचारीं गुंतेचिना ॥४॥
५.
एके दिनीं भार्या भावें तें मानवी । भ्रतारा विनवी नम्रतेनें ॥१॥
तुमचा सोइरा आहे नारायण । अखंडित ध्यान करितां त्याचें ॥२॥
तयाचिये भेटी जावें लवकरी । तो आहे कैबारी दीनालागीं ॥३॥
भेटतांचि नासे अज्ञान दरिद्र । सुखाच समुद्र पांडुरंग ॥४॥
नामा म्हणे देव भक्ता साहाकारी । सर्व सिद्धि घरीं वोळगती ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP