सुदामचरित्र - भाग ११ ते १५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


११.
वाचे नाम गात चालिला तो द्विज । एकाचें तें चोज शुद्ध भावें ॥१॥
जीवशिव एकाकार झाली वृत्ति । नाहीं कांहीं चित्तीं शमदम ॥२॥
हात पाय नळ्या वळती फेंगडया । भावार्थाच्या गुडया उभारीत ॥३॥
नामा म्हणे वाट चालतां समाधि । सोहं स्वरूपीं बुद्धि ठसावली ॥४॥
१२.
शुभसूचचिन्हें होताती शकुन । तेणें तों ब्राह्मण आनंदला ॥१॥
म्हणे थोर लाभ आजिचा दिसतो । आनंद वाटतो मनामाजी ॥२॥
उडती उजवे काग ते जोडयानें । भरल्या कुंभानें नारी देखें ॥३॥
तास भारद्वाज वामभागीं जाती । मयूर नाचती उत्साहानें ॥४॥
नामा म्हणे सर्व प्रश्नांचाही प्रश्न । वाचे नारायण नाम गातो ॥५॥
१३.
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥
काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं  कळवळे ॥२॥
येवढा ज्याचा राज्यभार । मी तो केवळ फकीर ॥३॥
कोठें तयाला आठव । बाळपणींचें माझें नांव ॥४॥
तैं तो होता गौळ्याघरीं । आतां त्रैलो. क्याधिकारी ॥५॥
नामा म्हणे ऐसें । करितचि निजध्यास ॥६॥
१४.
दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले ॥१॥
येथें देवराणा नांदतो तो ठाव । काय म्यां वर्णावें मंदमति ॥२॥
हिरे चिरे रत्न झगमग दिसती । घोंस ते लोंबती मोतियांचे ॥३॥
वैकुंठींचें सर्व वैभव आणिलें । शोभेसी शोभले आपोआप ॥४॥
गुडीया गोपुरें झळकती पताका । वाजतहि डंका चौवेदांचा ॥५॥
साहाजण भाट उभे महाद्वारीं । अठरा वारकरी मोकाशांचे ॥६॥
नामा म्हणे रिद्धिसिद्धीचें भांडार । देखिलें नगर ब्राम्हणानें ॥७॥
१५.
झांकावले डोळे शंका करी मनीं । दिवस कीं यामिनी हें न कळें ॥१॥
महा तेज:पुंज फांकती सकळ । सिंधूचा झळाळ भोंवताला ॥२॥
गोमती ते नदी निर्मळ वाहात । बहु घुमघुमीत सुमनें भार ॥३॥
जाईजुई आणि कमळ कल्हारी । भ्रमर झुंकारी गुंजारव ॥४॥
नामा म्हणे मुनि पातला पूर्वद्वारा । पुढिल्या विचारा चित्त द्यावें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP