उत्तरार्ध - अध्याय ४८ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


श्रीप्रद वामननाम प्रादुर्भाव त्रितापहर, पाया ।
पुरुषार्थांचा, गावा, ऐकावा स्वत्रिताप हरपाया. ॥१॥
असुरांच्या राज्यपदीं सद्नुणसंपन्न म्हणुनियां विधिनें ।
विधिनें अभिषेक करुनि, बळि बैसविला स्वयें दयानिधिनें. ॥२॥
सचिव म्हणति असुरेंद्रा, “हित कथितों, जाणतोसि, पण तूटें; ।
सुरहृत कनककशिपुचें राज्य, हरीं तूं प्रवीर पणतू तें.” ॥३॥
‘देवांनीं प्रतितामह वधुनि, त्रैलोक्य आपुलें हरिलें,’ ।
बळिनें ऐसें समजुनि, तत्प्रत्याहरण तें मनीं धरिलें. ॥४॥
त्रैलोक्यजयाकरितां आज्ञा करुनि स्वधीरचक्रातें, ।
केलें प्रयाण राज्यभ्रष्ट कराया स्वशत्रुशक्रातें. ॥५॥
बळिसुत सहस्रभुज जो बाण, तयाचे रथातिरथ कोटी, ।
मोटी चमू निघे, ती वाटे तेजें खरी, दुजी खोटी. ॥६॥
बाणें अधिष्ठिला, परमद नेता जो रथ त्रिनल्व लया, ।
आयुधरत्नाकर हा होय रणीं, शत्रुयान पल्वल या. ॥७॥
रथ शतसहस्त्र ज्याचें. बळनामा असुर हा निघे राया ! ।
ऋक्षसहस्रयुतरथें, द्याया अहितासि हानि, घेराया. ॥८॥
खरयुक्त, सर्वभीषण, रथ षष्टिसहस्त्र घे नमुचि ऐसें, ।
व्याघ्रसहस्रयुतरथीं, साधाया विजय, वीर तो बैसे. ॥९॥
अयुत शतसहस्र रथ प्रबळ करुनि सिद्ध, अष्टनल्वमितीं ।
ऋक्षसहस्रयुतीं मय बैसे, जो निरत असुरराजहितीं. ॥१०॥
षष्टिसहस्र स्यंदन घेउनि, खङ्गंककेतु जो, धीर, ।
उष्ट्‍सहस्रयुतरथीं बसुनि, पुलोमा निघे महावीर. ॥११॥
वीर हयग्रीव गिरिप्रतिमस्यंदनवरी बसोनि, नृपा ! ।
रथलक्षसह निघाला, स्वपरांची ज्या नसे रणांत कृपा. ॥१२॥
प्रबळबळ प्रर्‍हाद स्यंदनरत्नें निघे महातेजा, ।
‘अमरपरिवृत पितामह’ ऐसें कवि मानिती पहाते ज्या. ॥१३॥
शंबर अंबरमणिसा तेजस्वी, सर्ववीरजनमहित, ।
दशशतहययुतरथगत, तो त्रिंशच्छतसहस्ररथसहित. ॥१४॥
पुत्र अनुर्‍हादाख्य प्रर्‍हादाचा, मृगेंद्रमुख वाजी ।
ज्याच्या त्रिनल्व सुरथा, भट म्हणति जया, “जयें स्व सुखवा, जी ! ॥१५॥
याचे सुभटाधिष्ठित सद्रथ शतशत सहस्त्र गा ! राजा ! ।
शात्रव चमू विराव्या पावुनि, तपनासि जेविं गारा, ज्या. ॥१६॥
बळिचा तात विरोचन, सत्तुरग सह्स्र तद्रथा, राजा ! ।
प्रेमें करीत आलें पुण्य, यश श्रेष्ठ, भद्र, थारा ज्या. ॥१७॥
अगणितरथसहित निघे हा जोडाया यशा शशिवलक्षा, ।
ज्याचा प्रर्‍हाद पिता, जेविं रवि तमा, तसा अशिवलक्षा. ॥१८॥
विश्रुत विरोचनानुज, असुरोत्तम, जो कुजभ या नांवें, ।
वानावें वीरांहीं ज्या, अमरांहीं स्वकाळ मानावें. ॥१९॥
रणरुचि शुचि भट घेउनि, उत्साह मनीं धरूनि, हा समरा ।
निघता होय, म्हण तो स्वरिपुसुरांतें, करूनि हास, ‘मरा.’ ॥२०॥
असिलोमा, जो स्वप्नीं देवांसि म्हणे, “सशक्र समरा या.” ।
तो उग्र निघे, ज्याचे डोळे ते शकटचक्रसम, राया ! ॥२१॥
पर्वतपादपयोधी असुरसहस्त्रौघ घे पर दमाया, ।
गर्जत निघे, महोग्रा ज्या दे धाता महावरद माया. ॥२२॥
दिव्यरथें वृत्र निघे, घेउनियां सुरथ बहुसहस्र, जिता ।
मानी स्व:श्री, मायाशत रण करितां सुरासह स्रजिता. ॥२३॥
तैसाचि एकचक्रहि युद्धोत्साहें महारथीं वळघे ।
प्रबळ अशीतिसहस्र त्रिदशपतिपराभवार्थ तो बळ घे. ॥२४॥
जो शतशीर्ष, शतोदर, विकट, द्दढ रथीं चढोनि राहु निघे, ।
“साधु !” असें म्हणुनि, स्थिर कोणीहि जयापुढें न राहुनि घे. ॥२५॥
तो बहुसैन्यसह निघे, परबळ पाहुनि रणांत परते ज्या, ।
जो सर्व सहस्त्र कर्ता, कश्यपसुत विप्रचित्ति वरतेजा. ॥२६॥
रथ अष्टनल्व दशशतहययुत कैलासशिखरसम, राया ! ।
ज्यांहीं स्वीकारावा रण दाटुनि, जेंवि विखरस मराया. ॥२७॥
केशी, शताक्ष, शतभुज, जोडूनि रथीं महामहिख, वळला, ।
घनसाचि; निघे दु:सह जो अहिताला, जसा अहि खवळला. ॥२८॥
यद्भट, उग्र, महाबळ, बावन्नसहस्र, काळसम राया ! ।
ज्यास नसे, माराया किंवा कळहांत आळस मराया, ॥२९॥
वृषपर्वा, सुरसूदन, मेरुशिखरसम रथीं बसोनि, करीं ।
उग्र धनू धरुनि, निघे; ‘जय न सुरांच्या’ म्हणे, ‘वसो निकरीं.’ ॥३०॥
षोडशनल्व, मयरचित, बळिरथ अत्यद्भुत प्रभा बाहे; ।
वाहति दितिसुत, गजमुख, विकृताकृति, या महाप्रभावा हे. ॥३१॥
कनकमयचित्रपुष्पा, रुचिरा, विजयप्रदा महामाळा ।
बांधुनि, असुरेंद्र निघे, पूजुनि सद्विप्र, बा ! धरापाळा ! ॥३२॥
वर्णावा तेव्हांचा त्यांचा उत्साह कायसा ? राया ! ।
अत्युत्कंठित समरीं विजयार्थ द्रव्यकाय साराया. ॥३३॥
करिति जयसमारंभा, जेंवि विवाहक्रियासमारंभा; ।
जेणें सुभटासि भजे श्री, सत्कीर्ति, प्रियासमा रंभा. ॥३४॥
मग जगदीशें शक्रें, त्या असुरांसीं करावया समर, ।
आज्ञापिले वसुमरुद्विश्वादित्याश्विरुद्रमुख अमर, ॥३५॥
दशशतहरिहययुक्त स्यंदनरत्नीं वसोनियां, शक्र ।
निघता झाला क्रोधें, तें दैत्यांचें मथावया चक्र. ॥३६॥
दिव्यकिरीटकवचधर धरि जननीदत्त कुंडलें कानीं, ।
चित्तांत म्हणे, “वरिलें दितिच्या वैराग्निकुंड लेंकांनीं.” ॥३७॥
कंठांत वैजयंती घाली आपादलंबिनी माळा, ।
जांबूनदरचिता, त्या फार रुचे दानवांचिया काळा. ॥३८॥
सप्तर्षि स्तुति करिती, बहु आशीराशि ओपिती हरितें; ।
करितें आशीर्वचनचि साधूंचें भव्य, संकटें हरितें. ॥३९॥
राजर्षि, ब्रम्हार्षि, त्रिदश सकळ, चालती तयामागें; ।
वज्र धरुनि, शक्र निघे, मर्दाया असुर सर्वही रागें. ॥४०॥
श्रीहरसखा विलोकुनि समरीं पावे द्विषज्जन दरा ज्या, ।
तो हरिसहस्त्रयुक्तीं सुरथीं बैसुनि निघे धनद, राजा ! ॥४१॥
गर्जति पुढें महायुधधर राक्षसयक्ष राजराजाच्या, ।
शिवली प्रभुप्रसादें कीर्तिस न तनुसहि, बा ! जरा ज्याच्या. ॥४२॥
ये शतहरियुक्तरथीं चढुनि करायासि दैत्यहानि यम, ।
ज्याच्या दंडें न उरे पर, दहनें जेंवि शैल्य, हा नियम. ॥४३॥
क्षोभोनि उरों देती जे नव द्दढही कदान वपु रोग, ।
ते काळाचे झाले, राहों द्याया न दानव, पुरोग. ॥४४॥
आला, त्रिशीर्षपन्नगयुक्त रथीं चढुनि, पाशधर वरुण, ।
जो जळपति खळ पतितां अकरुण, सद्धर्मनयरतां करुण, ॥४५॥
याचे पुत्र महाबळ मूर्त पयोनिधि, महाविष व्याळ, ।
आले, प्रबळखळक्षयकामें रक्षावया पय़:पाळ. ॥४६॥
रव्यंश अर्यमा जो, त्वष्टा, पर्जन्य, मित्र, भग, धाता, ।
चंद्र, मनु, रुद्र, आले दिव्यरथारूढ परमचमूघाता. ॥४७॥
वसु, अश्विनीकुमार, प्रख्यात महानुभाव जे सिद्ध, ।
जे साध्य, सर्व आले गंधर्वेश्वर, शिखी जसे इद्ध. ॥४८॥
श्रीहरिहर गुप्त नभीं त्यांची अवलोकिती थडक, राया ! ।
स्मरणहि समर्थ ज्यांचें सुलभा भवसिंधुची थड कराया. ॥४९॥
बसुनि विमानी, समुनि ब्रम्हा पाहे महासमरयज्ञ, ।
सुर, असुर, प्रकट करिति शस्त्रास्त्राद्भुत महा समरयज्ञ. ॥५०॥
वाजति गोमुख, काहळ, आनक, डिंडिम, मृदंग, दर, भेरी; ।
झाली सुरासुरचमू, श्रवण करुनि नाद उग्रतर, भेरी. ॥५१॥
सेनासिंधु मिसळले क्रोधावेशें करूनि जव, दोनी, ।
घालिति गांठि सुरांसीं असुर रणीं, नाम ते निज वदोनी. ॥५२॥
परिस, प्रवर्तलीं जीं द्वंद्वें अत्यद्भुतें नृपा ! युद्धें, ।
सावित्रें बाणासीं गांठि रणीं घातली अतिक्रुद्धे. ॥५३॥
ध्रुववसुंसीं युद्ध करी बळनामा असुर, नमुचिहि धरासीं. ।
तैसाचि विश्वकर्मा देव मयासीं महायुधधरासीं. ॥५४॥
वायुसह करि पुलोमा रण, इच्छुनि करिर्तिरूप वरभूषा; ।
त्याहि हयग्रीवासीं, वांच्छुनि निजभुजबळें विजय, पूषा. ॥५५॥
जे दैत्य चंद्र, भास्कर, शरभ, शलभ, करिति समर सोमासीं; ।
शंबरहि भगासीं, कीं युक्त सदा शूर याचि होमासीं. ॥५६॥
संगर करी विरोचन, जो विष्वक्सेन साध्य, यासहित; ।
असुर कुजंभ तयासीं, जो नामें अंशवसु जगन्महित. ॥५७॥
करि समर मारुतासीं असिलोमा; देववैद्य जे त्यांसीं. ।
वृत्र भिडे, राजेंद्रा ! प्रणताच्या सर्वरोगजेत्यांसीं, ॥५८॥
जो साध्य देव, यांसीं युद्ध करी एकचक्र, गा ! राया ! ।
वृत्राचा भ्राता बळ, त्यासिं मृगव्याध रुद्र माराया. ॥५९॥
भगवान् अजैकपाद त्रिदशोत्तम देव जो महाबाहू, ।
त्या शतशीर्ष, शतोदर, तो विकृताकार ‘ये’ म्हणे राहू. ॥६०॥
समरांगणीं महाबळ केशी दानव धनेश्वरा  पाहे, ।
वृषपर्वाही विश्वेदेवा निष्कंभुला रणा बाहे. ॥६१॥
असुरवर महावीर्य प्रर्‍हाद झटे परेतपाळासीं, ।
झगडे कुबेरहि अनुर्‍हादासीं देवसैन्यकाळासीं. ॥६२॥
रण विप्रचित्तिहि करी वरुणासीं द्विषदजातकरुणासीं, ।
असुरेंद्र बळि करि त्या इंद्रासीं युद्ध नित्यतरुणासीं. ॥६३॥
जे देव, दैत्यदानव, या नवयागा रंणाभिधा झटते.।
नटते झाले अद्भुत रणरंगीं, फार शोभले भट ते. ॥६४॥
देवपराभवसूचक झाले उत्पात तेधवां घोर, ।
थोर प्रभु ते स्मरती, करिती रणयज्ञ, न करिती घोर. ॥६५॥
त्या समरमहायज्ञीं नेता प्रर्‍हाद दैत्यकुळ्पाळ, ।
अध्वर्यु तो विरोचननामा, जो बळिपिता अमरकाळ. ॥६६॥
प्रस्तोता वृत्रासुर, नरनाथा ! नमुचि दैत्य तो होता, ।
यष्टा बाण महाबळ त्या रणयज्ञांत जाहला होता. ॥६७॥
जीं ब्रम्हास्त्रप्रमुखें अस्त्रें, ते मंत्र मयहि उद्राता, ।
बळि तो ब्रम्हा, इंधन वैर, समर अग्नि, जाण गा ! ताता ! ॥६८॥
रथपंक्ति यूप, भूपश्रेष्ठा ! जें रक्त तेंचि बा ! आज्य, ।
दीक्षित बळि, तत्पत्नी सेना, जें रुधिर, सोम तो प्राज्य. ॥६९॥
शामित्रकर्मकर्ता शंबर ऐसें नृपोत्तमा ! जाण, ।
जो काळनेमिनामा, ती विपुला दक्षिणा मनीं आण. ॥७०॥
अस्थि, कपालें, मस्तक, तेचि पुरोडाश या सवा सवते, ।
पंडित दितिदनुज, करिति न असे सुर कुशळ बा ! सवासव ते. ॥७१॥
तेथें सदस्य राया ! जंभकुजंभादि वर्णिले असती, ।
वर्णावा रणमख किति ? त्यांत नृपा ! सर्व सुगुण ते वसती. ॥७२॥
बळि करिल सुरपराभव, यज्ञांतीं तेंचि अवभृथस्नान; ।
गान व्यास असें करि, ज्याचें विश्वांत निरुपम ज्ञान. ॥७३॥
मर्दुनि सुरसेनेतें, सावित्राचे हरावया प्राण, ।
बाण प्रखरतर रणीं वर्षे ग्रीष्मार्ककिरणसे बाण. ॥७४॥
सावित्र शक्ति टाकी बळिपुत्रीं, हरि नगीं जसी अशनी, ।
ती खंडिता गमे तो उग्र तया, तेंवि मांनवा न शनी. ॥७५॥
मग विश्वकर्मनिर्मित असि घे सावित्र, पररथाजवळ ।
शीघ्र भिडे, गरुड जसा उग्र फणीचा करावया कवळ. ॥७६॥
बळिसुत खरतर वर शर सरसर परमर्म भेदिते सोडी, ।
झोडी तरुसि पवनसा, सावित्र पळे, पराभवा जोडी. ॥७७॥
सावित्रातें जिंकुनि, बळिनंदन बाण तो महातेजा ।
शक्ररथाप्रति गेला, सुर भीति, वरायुधें वहाते ज्या. ॥७८॥
बळ दैत्य ध्रुववसु हे करिति महायुद्ध दिव्य शस्त्रांहीं, ।
झांकिति अन्योन्यातें, समयज्ञ सखे जसेचि वस्त्रांहीं, ॥७९॥
बहु आप, अनळ, हे वसु केले व्याकुळ महारणीं बळकें, ।
सुरबळ तसें अपयशें दिसलें, कानन जसें दिसे जळकें. ॥८०॥
शस्त्रें सारीं सरलीं, मग केलें बाहुयुद्ध बा ! बहुत; ।
ध्रुव होऊनि भग्न पळे, ‘ज्वलनीं व्हावें,’ म्हणे, बळें न हुत. ॥८१॥
धरवसु नमुचिवरि शर क्रोधें वर्षे, गमे पयोधर तो, ।
जोडाया कीर्ति, रणीं शुचि शस्त्रास्त्रज्ञ कां न योध रतो ? ॥८२॥
हास्य करुनि, नमुचि तया नव बाणांहीं महातपा वेधी, ।
बसुची, अतितापाते, अहितोत्कर्षा पहात, पावे धी. ॥८३॥
खरतरशरप्रहारें फार क्षोभे धराख्य वसु, राया ! ।
अभिमुख निजरथ हांकवि हा कवि, मारावयासि असुरा या. ॥८४॥
स्वरथाश्व वसुरथाश्वांमध्यें तो कश्यपात्मभू मिसळी, ।
चक्रें धररथ जाळी, कीं ज्ञाति प्रबळ हरुनि, भूमि सळी. ॥८५॥
दवदीप्तद्रुमसम रथ गमला, धरवसुहि तेधवां पक्षी, ।
लक्षी अधिक यशाहुनि वपुचि, तयातें पळोनि तो रक्षी. ॥८६॥
प्रख्यात विश्वकर्मे दोघे देवासुरांत धीरा ! जे, ।
स्पर्धेनें रण करिती चतुरांचे बळपयोनिधी राजे. ॥८७॥
त्वष्टा तीक्ष्णशरांहीं ताडी, न करूनि आळस, मयातें; ।
पंडित न चुकेचि, चुको दैवें पावोनि बाळ समयातें. ॥८८॥
त्वष्टा तीस शर, मयहि तीस, तया, व्हावया स्वयश, हाणी; ।
ज्याच्या बुद्धिसमाना बा ! कोणाचीहि बुद्धि न शहाणी. ॥८९॥
सोडी शक्ति अशनिसी, कृत्यासी, स्वाहितावरि त्वष्टा; ।
तोडी सप्त शरांनीं, मय गरुडचि सर्पिणीच ती रपष्टा. ॥९०॥
मय गमवी व्यमर, तसा, त्वष्टा निजनायका व्यसुर समय; ।
सादर युद्ध पहाती रसिक, जसें काय काव्य सुरसमय. ॥९१॥
गरगर फिरवुनि कोपें मय, मोहायासि सुर, गदा हातें, ।
सोडी, जेंवि विषानळहेति करायासि उरग दाहातें. ॥९२॥
मय हय वधुनि गदेनें, शरयुग्में केतुसारथी ताडी, ।
पाडी मोहीं तत्परिभूति सुरबळा, मुला जसी ताडी. ॥९३॥
झाला विरथ त्वष्टा, जरि समरीं पावला दशा कष्टा. ।
तरि शर वर्षे, नष्टा न व्यसनीं होय सद्धृति स्पष्टा. ॥९४॥
ताडी मय विरथातें बहु बाणांहीं, तयासही सुर तो ।
सव्यभुजीं शर हाणी, धीर व्यसनीं सखा तसा उरतो. ॥९५॥
हाणी मर्मीं, धर्मीं द्दष्टि न ठेवूनि, सपरिहास मय, ।
त्वष्टा निघे, म्हणे, “हें अयशस्कर, जयद न परि हा समय.’ ॥९६॥
दैत्य पुलोमा, त्यासीं घाली गांठी प्रभु स्वयें वायु, ।
बा ! युद्ध अतिभयप्रद तें, कीं हा होय सर्वजीवायु. ॥९७॥
जें कोणींहि न केलें, करि रणपांडित्य नव पुलोमा तें, ।
धरि वायुदें शरातें, शल्याचें तेविं न वपु लोमातें. ॥९८॥
छेदी परबाणातें प्रकट करुनि अतितरा पवनवेगा, ।
प्रथम नव, पुन्हा विंशति, हाणी शर शत्रुतें नवनवे गा ! ॥९९॥
तेव्हां मरुद्रणोत्तम दश म्हणती, “साधु ! साधु !” पवनातें; ।
स्तवनातें आप्त करिति, करितां व्यसनीं झटोनि अवनातें. ॥१००॥
तें स्तवन पुलोम्यातें, तद्वीरांतें, न सोसलें कांहीं; ।
कीं वीरसू म्हणति, “हा नित्य वहावाचि सोस लेकांहीं.” ॥१०१॥
त्या पवनासि पुलोमा, प्रेरुनि बहु दैत्ययोध, वेढी गा ! ।
मर्दी त्यातें तो प्रभु, न तृणाच्या दहन रोधवे ढीगा. ॥१०२॥
वधिले सप्त महारथ दानव पवनें करप्रहारेंच, ।
बहु शत्रूंचा उतरी त्या समरामाजि वीर हा रेंच. ॥१०३॥
असुरकटकरक्ताची वाहविली खळखळां नदी पवनें, ।
बाढुनि लोभ, उरों दे मोठींहि कुळें, जसीं नदीप वनें. ॥१०४॥
देवांच्या कटकांचा बहु नाश करी रणीं पुलोमा तो, ।
जाणों म्हणे पळाशन, बळ पळरुधिराशनें भुलो, मातो. ॥१०५॥
त्या रणरंगीं वेष्टिति दैत्य महारथ सहस्र पवनातें, ।
पर भंगाया न शकति, जैसे भगवत्प्रसादकवनातें. ॥१०६॥
मारुनि अष्टशत, निघे, पवन वनांतुनि, शिखी जसा इद्ध, ।
त्या प्रवनकृतपथातें अद्यापि विलोकिती नभीं सिद्ध. ॥१०७॥
शरवृष्टि हयग्रीच प्रथम करी,  मग तसाचि तो पूषा; ।
समयीं विक्रम करणें, याहुनि पुरुषा नसे परा भूषा. ॥१०८॥
असुर हयग्रीवातें, सुर वदले “साधु ! साधु !” पूषातें; ।
परि होऊनि विरध निघे, म्हणुनि सुरांचें न तेज दूषा तें. ॥१०९॥
शंबर म्हणे, “खरशरव्रजदहनें भस्म मी करीन भगा, ।
अक्षसमाशुगनिकरें तो बा ! जनमेजया ! भरी नभ गा ! ॥११०॥
जें रुंद सप्तकिष्कु, स्पष्ट द्वादशअरत्नि लांब, करीं ।
कार्मुक धरी, मग न कां तो हरि ? तीं सुरबळें न कां बकरीं ? ॥१११॥
होत्या सहस्र ठाव्या राया ! त्या शंबरासुरा माया, ।
तद्यश न ढळों देती, जपती त्या अंबरा सुरामा या. ॥११२॥
भगहि, महाचापातें सज्ज करुनि, सुरसमूह हर्षाया, ।
त्या शंबरदैत्यावरि लागे प्रलयाब्दसाचि वर्षाया. ॥११३॥
असुरबळा भग, शंबर अमरबळा, भंग दे, वदे ‘हा !’ तें, ।
जेंवि दितिजदेहातें, ते किंशुकरंग देवदेहातें. ॥११४॥
बाणांहीं भगवपुचें करि शंबर असुर तो विदारण गा ! ।
भगहि विदरी राया ! त्या मायायोगकोविदा रणगा. ॥११५॥
तो होय खंड शंभर शंबर भुजवीर्यमत्त मायावी, ।
कीं स्पष्ट पराभूति भ्रमयोगें देवसत्तमा यावी. ॥११६॥
क्षणभरि अरि, पसरुनि मुख, भुज, चरण, रणीं विचेष्ट तो पडला, ।
घडला सत्य वध गमे, कीं त्याचा आप्तवर्गही रडला. ॥११७॥
क्षणभरि अद्दश्य होय, प्रकटे, क्षण युद्ध करि महातेजा, ।
शत रूपें धरि, मानिति सुर सर्व सपक्ष गिरि पहाते ज्या. ॥११८॥
होय प्रादेशमित क्षणभरि, कोणी नसेल खर्व तसा. ।
तत्क्षण विशाळ देह प्रकट करी विंध्यमेरूपर्वतसा. ॥११९॥
बैसुनि दिगिभीं भांडे, होय पयोधर, करी महावृष्टी, ।
सृष्टिग्रास कराया प्रळयानळ होय, तापवी द्दष्टी. ॥१२०॥
शस्त्रें सगळींच गिळी, भीती सुर, असुरही महाकाया, ।
त्यातें कोणी शकति, व्याघ्रासि जसे, ससे न हाकाया. ॥१२१॥
तो प्रळयकाळगनसा लागे सर्वत्र शत्रु वाढाया, ।
सुर म्हणति, ‘फुटाण्यापरि याच्या नग रगडतील दाढा या.’ ॥१२२॥
रूपें उग्रें प्रकटी बहुसंख्य सहस्रमाय शंबर हा; ।
“शंबर हानिकर,” म्हणति निर्जर, अवलंबुनीहि अंबर, “हा !” ॥१२३॥
सुर पळति, सुमुनि म्हणती, “असुराच्या काय भीति भगला हे ? ।
शक्रासि शरण जाय, त्यजुनि समर, फार भीति भग लाहे. ॥१२४॥
भंगुनि भगदेवातें, तो शंबर अग्नितें म्हणे, “दहना ! ।
करितों भस्म तुला मी, जैसा करितोसि काय तूं गहना.” ॥१२५॥
यापरि दटावुनि, असुर अंतर्हित होय, आधि अनळातें ।
व्याकुळ फार करी, बा ! कलि उग्र, परंतु तेंवि न नळातें. ॥१२६॥
सोम करी असुरांच्या चंद्रार्कांसी महोग्र कलहातें, ।
देवांचें दैत्यांचें, सर्व म्हणे सुक्षतार्त बळ ‘हा !’ तें. ॥१२७॥
दिजराजें शिशिरास्त्रें त्या असुराचा बळौघ करपविला, ।
हरपविला मद, जैसा शक्रें सोडूनि विनाशकर पविला. ॥१२८॥
दैत्यांचे चंद्रार्क क्रोधभरें वधिति देव सैन्यातें, ।
रक्तनदी वाहविली, झाले हतशेष पात्र दैन्यातें. ॥१२९॥
शिशिरास्त्र सोम सोडी, जिकडे तिकडे सुरारि “हा !” करिती, ।
जळती, पळती, गळती, त्यांची पडली रणांत हाक रिती. ॥१३०॥
साहों न शकति कोणी शिशिरकरें सोडिल्या स्वशैत्यांतें, ।
म्हणती, “येना कां पवि !” कांपवि सहसा तशांहि दैत्यांतें. ॥१३१॥
हिनकरहि बरें म्हणवी त्या ग्रीष्माच्याहि अहिमकरसमया, ।
शिशिरास्त्र प्रकटी जें, मानिति ते दैत्य अहिमकरसम या. ॥१३२॥
“जित,” “अजितहि,” मुनि न म्हणे, जो ब्राम्हाणराज अत्रिनयनज, या ।
त्रिनयनजय करि वृक, मग कां न करिल काळ अत्रिनयनजया ? ॥१३३॥
वीर विरोचन साध्या विष्यक्‌सेनासि शरशतें झोडी, ।
विष्वक्सेनहि कोपें रोपें तदुर प्रगाढही फोडी. ॥१३४॥
कोपें सप्तशरांहीं मूर्च्छित करि देव काळ साध्या या, ।
ध्वज धरि, निश्चळ वाढे बसला, सोडूनि आळसा, ध्याया. ॥१३५॥
तों साध्य होय साधक, ठाके असुरांत, धरुनि चापातें; ।
सुरमथन करि विरोचन, सांगों नि:सीम काय बापा ! तें ? ॥१३६॥
बोळविले स्वर्गातें बहु बळिजनकें, मनांत पोळविले, ।
जे साध्यपादरक्षक देव चतुर्दशसहस्र लोळविले. ॥१३७॥
विष्वक‌सेनसहित सुर काळतसे अरिस धांवले खाया, ।
बहु झटति, आपुलें जें, तें कविंनीं प्रथम नांव लेखाया. ॥१३८॥
स्वस्थ त्यजुनि तयातें मारी घेऊन कराल करवाल, ।
हर्षोनि, वीर ‘लोकीं;’ त्यांसि म्हणे, “स्तव कराल, करवाल.” ॥१३९॥
असुर कुजंभहि करि, बहु होऊनियां क्रुद्ध, युद्ध अंशासीं; ।
लोभें होय अदितिच्या, दितिच्या, दारुण विरोध वंशासीं. ॥१४०॥
सुर न गणिले कुजंभें, मत्तें वारणवरें जसे दंड, ।
दिव्य दशसहस्र गज प्रेषी, वारावया तया, अंश, ॥१४१॥
वीर कुजंभ, गदेतें घेऊनि, टाकी उडी रथावरुनी, ।
मारित सुटे; भिडाया शकती सुरगजघटा न थावरुनी. ॥१४२॥
उग्र कुजंभामात्यहि गजयोधिशिरें शरब्रजें हरिती, ।
त्रस्त गज फिरनि पळतां, सुरसेनामथन बहु रणीं करिती. ॥१४३॥
एकेंचि गदाघातें मारी गजवर कुजंभ बलशाली, ।
भंगी मत्तगजघटा, दंडकर जसा सलील कलशाली. ॥१४४॥
शतमख तया बधाया, प्रेरी कोपोन सर्व जें सैन्य, ।
वैन्य क्षितिधरनिकरा, तेंवि परबळासि दे महादैन्य. ॥१४५॥
असिलोमा हरिमारुत यांसीं राण होय, म्हणति कवि, भारी; ।
हरि भारि सगरीं त्या झाला तो; जेंवि राहु रविभारी. ॥१४६॥
मारिति सुर असुरांतें, असुर सुरांतें अगा ! धसाधस ते; ।
गमले कातर, मिळता जरि इतर जलधि अगाधसा, धसते. ॥१४७॥
त्या देवांदैत्यांवरि दैवें पडिला असा नवा घाला, ।
त्यांतहि तरे न सुर असिलोम्यास, जसा ससा न वाघाला. ॥१४८॥
असिलोम्याच्या धनुची हरिनें भल्लेंचि खंडिली कोटी, ।
शर रोविले शरीरीं, शक्ति असी दाविली रणीं मोटी. ॥१४९॥
कोपे कोटिच्छेदें, सज्य करी अन्य चाप देवारी, ।
झांकी हरिस शरांहीं, बहु सुरसेनेसि ताप दे, वारी, ॥१५०॥
पाडी मूर्च्छित हरितें, हाणुनि वक्ष: स्थळांत शर भारी; ।
देव म्हणति, “हा ! हा ! हा ! झालों दैवेंचि सिंह शरभारी,’ ॥१५१॥
पाडुनि हरितें, मर्दी एकत्रिंशत्सहस्रपरिवार; ।
असिलोमा शक्ररथाप्रति गेला, कांपवूनि अरिवार. ॥१५२॥
रण अश्विनीकुमार क्रोधें वृत्रासुरासवें करिती, ।
यांचे, वृत्राचे भट, अन्योन्यप्राण संगरीं हरिती. ॥१५३॥
केली सुरवीरांहीं शस्त्रांची वृष्टि वृत्र तो उडवी, ।
बुडवी मोहीं परबळ, नळवन गजसा, महायशा तुडवी. ॥१५४॥
बहु खरशरवृष्टि करी, लाजवि मेघासि वृत्र हा होतें. ।
साहे ताप न, पावे दैन्य, म्हणे देवसैन्य, “हा ! हा !” तें. ॥१५५॥
तों अश्विनीकुमारें एके पार्श्वींच वत्सदंतांहीं ।
अरि ताडिला, प्रहार स्तविला बहु नारदादि संतांहीं. ॥१५६॥
कोपे वृत्र, गदा घे; गर्जे नासत्य, शूळ सोडून; ।
धिक्कारी असुर तया, शूळ गदाग्रें पळांत तोडून. ॥१५७॥
गगनीं उडोनि, हाणी वृत्र गदेनें उरांत नासत्या; ।
जिंकी समरीं, स्वयुगीं बळि कळि जैसा पुरातना सत्या. ॥१५८॥
शक्राकडे, पराभव पावुनियां, जाय देव नासत्य, ।
निजकीर्तिकारणें तो, असमय जाणोनि, दे वना सत्य. ॥१५९॥
साध्यविशेष रणाजि क्रोधें करि युद्ध एकचक्रासीं, ।
पावेल विजय कैसा ? झगटुनि सरळस्वभाव वक्रासीं ? ॥१६०॥
आधीं पाहुनि निजभटशवलक्षव्याप्त तें रणाजिर हा, ।
मग खिजुनि;एकचक्रा असुरासि म्हणे, “उभा” रणाजि “रहा.” ॥१६१॥
मथनास्त्र प्रकट करी, त्यापासुनि शूल लक्षशां निघती; ।
अर्थी वदान्यगेहीं, सुररिपुदेहीं विशंक ते रिघती. ॥१६२॥
तों एकचक्र वारी, प्रत्यस्त्र प्रकट करुनि, मथनातें; ।
गजहय वधी, गदेनें कवण सविस्तर करील कथनातें ? ॥१६३॥
कनककशिपुसा सुररिपु तो त्रिंशच्छतसहस्र अरि खपवी, ।
हा जेंवि बळिस, तैसा हरिस रणीं दे कधीं न हरिख पवी. ॥१६४॥
जिंकुनि रणाजितें, तो गेला शक्राकडेचि जितकाशी; ।
रणभू वीरासि रुचे, कीं हे करिती, जसेंचि हित काशी. ॥१६५॥
रुद्र मृगव्याध करी रण न परस्वापहारतृप्तासीं, ।
अतिबळ बळासुरासीं, विद्यासद्वंशजन्मद्दप्तासीं. ॥१६६॥
भंगुनि पार्षदबळ, बळ पळवि, कळवि कळहकर्म मुद्रहित; ।
असुर वधुनि शुचिसस्त्रें, करि शत्रूंचेंहि देव रुद्र हित. ॥१६७॥
रुद्रबळाच्या हाणी शिखरिशिखरसम शिरीं विशिख सप्त, ।
गर्जे, नभीं शिरे तो, होय क्रोधेंकरूनि बहु तप्त. ॥१६८॥
व्योमीं कपटखगांचा तो आश्रय अरि तरु द्रवे, गा ! तें ।
वंचन समजे, धांवे त्यामागें करित रुद्र वेगातें. ॥१६९॥
वर्षे अरिवरि खरशर रुद्र्प्रभु, घन नगीं जसा तोया; ।
पडुनि रथीं चूर्ण करी, नभ सोडुनि, सेववी रस तो या ? ॥१७०॥
साहति न विरथ खांतुनि तो रुद्र रणांगणीं उतरला, तें ।
पारिषद; नभीं वेढुनि, ताडिति शस्त्रव्रजें सुतरलातें ? ॥१७१॥
न गणुनि रुद्रगणातें, भूवरि उतरे, विशाल शालनगा ।
उपडुनि, पारिषदांतें मारी, रुद्रा न होय पालन, गा ! ॥१७२॥
मग नगशृंग महाबळ बळ समृगव्याळवृक्ष उपडुनि घे, ।
तेणें चूर्ण करुनि गण, तो शेषबळक्षयाहि सुपटु निघे. ॥१७३॥
अश्वें अश्व, रथें रथ, नागें नाग, क्षयासि ने बळ तो; ।
कातर म्हणती, “याचा न टळे, काळप्रहारही टळतो.” ॥१७४॥
झाले सुरासुरक्षयकारक बळरुद्र रण असा रचिते,।
वीरांसि गमति रणमखगुरु, इतर श्रेष्ठ, पण असारचि ते. ॥१७५॥
तैसाचि राहुसीं करि संगर दुसरा अजैकपात् रुद्र, ।
ज्याच्या वीररसाहुनि रसिकासि गमे रसांतर क्षुद्र. ॥१७६॥
शमविति महद्रणकथा, जो न शमे, तोहि ताप गारा या; ।
श्रीरुद्रराहुसमरीं चिर वाहे लोहितापगा राया ! ॥१७७॥
क्रोधें युद्ध कराया या रुद्रासीं शतास्य राहु निघे, ।
केले प्रहार रुद्रें, पारिषदेंहीं, समोर राहुनि घे. ॥१७८॥
रुद्रें वर रथ चुरितां, क्षोभे कल्पांत काळसा राहू, ।
भंगी तळप्रहारें रुद्रस्यंदन रणीं महाबाहू. ।
पारिषदांतें मर्दी, रुद्रशराहत रणीं न राहु टळे, ।
गण म्हणति, “गुरुहि तृणसे केलों परबाणवृष्टिवाहुटळें.” ॥१८०॥
रुद्रक्षतदैत्यांच्या लाजविले फुल्ल पळस सेनांहीं, ।
झाले जेंवि हरिपुढें राहुनि, वाहूनि पळ, ससे नाहीं. ॥१८१॥
उठले कबंध बहुशत, पुष्कळ समरांगणांत पळ सांचे. ।
रक्तस्नात सुरासुर गमले वृक्ष प्रफुल्ल पळसांचे. ॥१८२॥
धूम्राक्ष रुद्र भेदी केशीतें शक्तिनें नृपा ! मर्मीं, ।
गणही वर्षति शस्त्रें, जे बहु सादर रणाभिधीं धर्मीं ॥१८३॥
केशिमुखांतुनि कोपें धडक निघाल्या सुदारुणा ज्वाळा, ।
शस्त्रपदस्पर्श बळें केला जाणो तया महाव्याळा. ॥१८४॥
पीडी सकळ सुरकटक, सोडुनि खर बाणकोटि, केशी तें; ।
तत्तेजें धीर तसा, वृद्धांत जसा न तो टिके शीतें. ॥१८५॥
जेव्हां देहा केशीदे हाकेशी प्रकंपदे अरिच्या, ।
याच्या सुर जेविं, तसे नादा भ्याले न मृगकरी हरिच्या. ॥१८६॥
गेले सर्व सुरांचे केशीच्या गर्जितेंचि आवांके, ।
बहुभारें बाळवृषभ, तेंवि अरि भयें, करूनि आ, वांके. ॥१८७॥
जाणों ज्वालावन्मुखभव रव, यास्तवचि सर्व तापविते ।
झाले; बा ! लेखांच्या अत्यद्भुतधैर्यपर्वता पवि ते. ॥१८८॥
भ्रमले रजोंधकारें, कशीध्वानेंहि, देवदानव ते; ।
स्वजनातेंचि निवविती, कवि झाले बहु तयांसि मानवते. ॥१८९॥
वज्रास्त्रें करुनि महा पारिषदमनोरथद्रु अवकेशी; ।
विजयश्रीचा झाला त्या धूम्राक्षासमक्ष धव केशी. ॥१९०॥
वृषपर्व, सूतातें आज्ञापुनि, करि रणीं महावेगा, ।
वर्षे बहु शर घनसा, न सुरांसि तयांकडे पहावे, गा ! ॥१९१॥
निष्कंभु विश्वदेव क्रोधें त्याउपरि शालतरु भारी ।
हाणी, त्यातेंचि असुर घेऊनि तेणेंचि देवबळ मारी. ॥१९२॥
निष्कंभु तया मर्मीं हाणी कोपोनि बाण तीस महा, ।
असुरहि खर शर वर्षें, काळासी देव जाणती सम हा. ॥१९३॥
निष्कंभूचे अवयव वृषपर्वा क्षत रणांत करि सगळे, ।
तद्देहांतुनि शोणित वर्षीं गैरिकनगांबुपरिस गळे. ॥१९४॥
निष्कंभुचे भट पळति पृष्ठवदन, करुनि आयुधन्यास, ।
रक्षी त्या वृषपर्वप्रलयज्वलनांत आयु धन्यास. ॥१९५॥
युद्ध प्रर्‍हादासीं काळासीं होय तुमुल, गा ! राया ! ।
होम स्वस्त्ययन करी प्रारंभीं शुक्र, शिष्य ताराया. ॥१९६॥
विजयप्राप्त्यर्थ करिति शुक्राचे अयुत शिष्य जे जप, ते ।
तपते ब्राम्हाण योगी, तत्तेजें विघ्न जाहले लपते. ॥१९७॥
कंठीं, हस्तीं, माथां प्रर्‍हादाच्या सदोषधीमाळा ।
गुरु अभिमंत्रुनि बांधी, सुतिलक लावी तयाचिया भाळा. ॥१९८॥
मंत्रित मणिकनककवचमुकुट श्रीशुक्र लेववी, राया ! ।
मंत्रितरथरत्नस्था पाहों शकती न देव वीरा या. ॥१९९॥
सप्ततिसहस्र गज, रथ, घेऊनि पादात, लक्षसा सादी, ।
काळातें प्रर्‍हाद प्रभु तो युद्धांगणांत आसादी. ॥२००॥
असुर प्रर्‍हादाचे अमित, यमाचे रविप्रभ व्याधी, ।
जो सोडिती न रणभू भंभींहि, जसे न विप्र भव्या धी. ॥२०१॥
द्यंगुलहि असों दिधलें क्षतवर्जित दैत्यकाय न गदांहीं, ।
तापे प्रहाद, उरे तिळहि नगीं शैत्य काय नगदाहीं ? ॥२०२॥
सर्वांसही सुदु:सह कालाचे प्रबळ जरि, तरि, पुरोग ।
असुरांहीं लोळविले, जे होते कदन  करित रिपु रोग. ॥२०३॥
हतशेषा दिसति पुढें परिघ, मुसल, शूळ, सायक, गदासी; ।
सकळांहि असुर झाले काळासम भीतिदायक गदांसी. ॥२०४॥
प्रर्‍हादाच्या व्यूहीं अतितेजा काळनेमि, गा ! राया ! ।
काळाच्या सैन्यांत क्षय परम क्षम अरीस माराया. ॥२०५॥
होतां असुरांचा जय, गद म्हणति, “क्वासि नाथ ! हा ! काल !” ।
कीं झाला शत्रूच्या शस्त्राला रोगनिकर हा काल. ॥२०६॥
स्वबळविनाशक्रोधें करिति प्रर्‍हादकाळ कलहा ते, ।
झाले स्वपरजनमुखें स्तुति असुरव्याधिपाळक लहाते. ॥२०७॥
काळप्रर्‍हादांचे युद्ध मनुष्येश्वरा ! जसें काय ।
झालें, तसें न मागें, होइल न पुढेंहि, म्हणवि तें “हाय !” ॥२०८॥
दे पाठ प्रर्‍हादा, सोडुनि अभिमान, अन्यसम यम हा; ।
सुर म्हणति, “अधन्य समय,” शेष असुर म्हणति, “धन्य समय महा.” ॥२०९॥
प्रर्‍हाद विजय पावे, काळहि समरीं पराभवा लाहे, ।
झाले विजयी भजुनि श्रीशुक्रा गुरुवरा भवाला हे. ॥२१०॥
प्रर्‍हादानुज दैत्यश्रेष्ठ अनुर्‍हाद धनद हे धन्य ।
वन्यद्विपसे, हरिसे, करिति क्रोधांधशरभसे जन्य, ॥२११॥
धनु धरुनि, अनुर्‍हादें शर वर्षुनि, जे रणीं महादक्ष, ।
यक्षक्षणदाचरवर गुहयकवर वीर मारिले लक्ष. ॥२१२॥
यक्षबळा नच तरवे तो, जैसा नग नरा जरा ज्याला; ।
बहु असुर वधी, साहे निजवीरक्षय न राजराजाला. ॥२१३॥
प्रखर अनुर्‍हादानें धनदातें हाणिले असे बाण, ।
त्यातें भेदुनि, तदनुग जे, त्यांचेही विनाशिती प्राण. ॥२१४॥
शरवृष्टि यक्षराक्षससहितें ईश्वरसखें असी केली, ।
मेली बहु, रक्तनदीमध्यें वाहूनि परचमू गेली. ॥२१५॥
शारदवर्ष वृष जसें डोळे झांकूनि नरवरा ! साहे, ।
तेंवि अनुर्‍हाद धनदसरवर्ष, मनीं न भीतितें वाहे. ॥२१६॥
अतिकुपित अनुर्‍हाद क्षितिरुह उपडी विशाळसा तूर्ण, ।
धनदरथाचे वाहक वाह करी त्या द्रुमेंचि तो चूर्ण, ॥२१७॥
मर्दिति असुर सुरांतें, सुर असुरांतें, रणांत खवळून, ।
कुलिशकठिण कुपित कलहकुशळ करिति कदन, केश कवळून; ।
त्र्यंबकसख शर सोडी, प्रळयजलदवृष्टिही गमे थोडी. ।
असुरांतें बहु झोडी, भुजमस्तक लक्ष तडतडां तोडी. ॥२१९॥
धनदरथावरि टाकी तो असुर करावयासि घात शिळा, ।
ज्याच्या पर प्रतापा, जेंवि द्रविडद्रिजासि भात शिळा. ॥२२०॥
सगद रथावरुनि उडी टाकुनि, वित्तेश  जाहला दूर, ।
तों वरि पडुनि शिळेनें केला सहसा शतांग तो चूर. ॥२२१॥
सोडुनि सायक, सारी सुरसेना मथुनि, दूर पळवून, ।
पर्वतशृंग असुर घे, परवीरांचे मुखेंदु मळवून. ॥२२२॥
गर्जे असुर क्रोधें, धांवे; परि धनद भय मनीं नाणी, ।
गरगर फिरवूनि गदा, त्याच्या वक्ष:स्थळीं बळें हाणी. ॥२२३॥
रुद्रसखगदाघाता साहे, तद्धृदय सत्वराशि खरें ! ।
प्रर्‍हादानुज ताडी धनदा अत्यंत सत्वरा शिखरें. ॥२२४॥
वज्र जेंवि नग, तसा नगशृंगें यक्षपाळ तो खचला; ।
यक्ष म्हणति, ‘ईश्वरसख रक्षूं, झाला परांसि तोख, चला,’ ॥२२५॥
तैसेचि परतले ते राक्षसगुहयक पतीस रक्षाया; ।
रक्षिति, न क्षिति सोडिति युद्धाची, जपति शत्रु भक्षाया. ॥२२६॥
होता मुहूर्त मूर्च्छित,  सावध होऊनि गर्जला धनद, ।
घन दर्प त्यजुनि, पळति असुर, जसे वातवेगहत वनद. ॥२२७॥
त्या धनदभयें वरिती जे सुमहाकाळपूर्वनेमि पळ ।
त्यासि अनुर्‍हाद म्हणे, “कां पळतां ? रे ! राहा धरूनि बळ. ॥२२८॥
आहे पोकळ कळला, भिववितसे आरडोनि वित्तप हा; ।
आतां यासि पळवितों, कलहकुतुक, कठिण करुनि चित्त, पहा. ॥२२९॥
म्हणती असुरांसि असुर कोपारुणखरतराक्ष ‘समरा या.’ ।
यक्ष वदे, “दुर्लभ यश होतें, रे ! परत राक्षस मराया.” ॥२३०॥
सुरशत्रु, यक्षराक्ष, वीर करिति युद्ध हें तुमुल, गाया, ।
कनककशिपुचा झाला, होऊनियां क्रुद्ध, हेतु मुलगा या. ॥२३१॥
निजपक्षयक्षराक्षससंक्षय लक्षूनि, यक्षप क्षोभे, ।
अरिस क्रूरशरांहीं वेधूनि सहस्रकरतासा शोभें. ॥२३२॥
विद्ध अनुर्‍हाद वमे क्रोधें अंगारमिश्रिता ज्वाळा, ।
मारी सहस्त्र सायक ‘हाय !’ करविते उदग्दिशा पाळा. ॥२३३॥
शर शिरकतां शरीरीं, मोहें रकें भरे, धरेसि वरी; ।
पुनरपि साबध होऊनि, नुरवाया परमदा, गदाचि धरी. ॥२३४॥
क्षिप्र अनुर्‍हादावरि हरसख तो त्या अरिच्या उरांत शिरकावी. ॥२३५॥
शीघ्र महाकृत्येनें कृत्येनें जेंवि जाणता फिरवी, ।
स्वगदेनें धनदगदा फिरवुनि, तो असुर जय जगीं मिरवी. ॥२३६॥
धांवे त्याचि गदेनें ताडाया धनद पुनरपि तयातें, ।
समजोनि गुरुहि, कोपें हाणाया जेंवि कुनर पितयातें, ॥२३७॥
सुगुरु गिरिशिखर उपटुनि, सुपटु निकामप्रताप तो अहित ।
प्रर्‍हादानुज धांवे, योजुनि धनदक्षय क्षमारहित. ॥२३८॥
परते शिवसख पुनरपि, येतां अरि कौर्तितें विटाळाया, ।
कवि काळा प्रतिकूळा, देतो अलकेश तेंवि टाळा या. ॥२३९॥
झाला निरुपम राजा ! वरुणासीं विप्रचित्तिसीं झगडा. ।
ते स्वभटांसि म्हणति, “हूं, दगड घन, तेंवि परबळा रगडा.” ॥२४०॥
शर विप्रचित्तिचे खर शकला वारावयासि न जलेश, ।
सिंहापुढें प्रबळही न समर्थ जसा राणासि गज लेश. ॥२४१॥
मुख विप्रचित्तिचें रविमंडळसें, त्याकडे पहावेना, ।
सर्वेश्वरतेज तसें वरुणा तत्तेज तें सहावेना. ॥२४२॥
वरुणाचा धीर, करीं धरितां तेणें महापरिघ, सरला; ।
उत्साहनगीं चढला होता जयकाम, हा परि घसरला. ॥२४३॥
शस्त्रास्त्रज्ञ, जरि सरथ सकवच, जरि बहु कृती, परि सहाय ।
झाले निश्चेष्ट भयें त्रिदश, म्हणति, देखतां अरिस, “हाय !" ॥२४४॥
भ्याला न एक शक्रचि, धरिति भयाचीच सरणि वरकड, बा ! ।
केले त्या अरिपरिपें पडुनि अयुत वीर धरणिवर कडबा, ॥२४५॥
तोंचि पुन्हा त्या असुरें वरुणावरि टाकिला परिघ, राया ! ।
होय विशीर्ण, शरीरीं न करि तिलसमहि तसा परि घराया. ॥२४६॥
जे परिघकण उसळले, दिसले विस्पष्ट काजवेचि तसे, ।
गमला,विटोनि, तेज, न करितां निज मुख्य़ काज, वेचितसे. ॥२४७॥
एकवटुनि कतक, म्हणे वरुण, “करा वीर ! हो ! जसें कथितों, ।
मारा असुरांसि तुम्हीं, हा मी या विप्रचित्तितें मथितों.” ॥२४८॥
जें पतिवच अनुग, श्रुतिवच धरितिल का न विप्र चित्तीं तें ? ।
सोडुनि भय, गांठिति ते त्या असुरांतें सविप्रचित्तीतें. ॥२४९॥
डसले सागरवासी आशीविष कडकडोनि सदरींतें, ।
सुस्वामिभक्त समयीं वेंचिति, जें धन असेल पदरीं, तें. ॥२५०॥
जे उग्र असुर होते, दंश करुनि मारिती अहि तयांतें, ।
वाराया, माराया, बा ! राया ! न शकले अहित यांतें. ॥२५१॥
शस्त्रें धरूनि करिती युद्धहि, डसतीहि, तेमहासर्प; ।
तों विप्रचित्ति त्यांचा गरुडास्त्रें संहरी रणीं दर्प. ॥२५२॥
सर्पादक्षय होतां, असुर वधी बहु सकोप सलिलेश. ।
बळ विप्रचित्ति याचें, धर्माचें जेंवि नुरवि कलि लेश. ॥२५३॥
बहु विप्रचित्तितें भी वरुण, न भीताचि वरकडा खात्या, ।
न वसों दे असुरांचा युद्धाध्वरभूमिवर कडाखा त्वा. ॥२५४॥
अरितेज, जलेश्वरता अंगीं सत्या असोन, सोसेना; ।
एकाकीच हरिकडे जाय, म्हणे, ‘तो असो, नसो सेना.’ ॥२५५॥
भगवान् वन्हि क्षोभे, त्याचा मारुत सखा तया भेटे, ।
सहसा सुरशत्रूंच्या सैन्यामध्यें चहूंकडे पेटे. ॥२५६॥
व्यापुन कटक चहुंकडे, अत्युग्र ज्वाळ धडकले वरते. ।
कोणाही असुरांचें राहों देती न घड कलेवर ते. ॥२५७॥
ते असुर पराभविले प्रर्‍हादप्रमुख सर्वही दहनें, ।
सर्वत्र पेटलींतीं कटकें, दावानळें जसीं गहनें. ॥२५८॥
पेटे ध्वज, रथ, कार्मुक, कोश, शरधि, चर्म, वर्म, पल्याण, ।
पर म्हणति, ‘हाय ! आतां या कल्पांतांत काय कल्याण ?’ ॥२५९॥
तत्काळ भग्न केले, जे तेजस्वी, अशेषही पर ते; ।
बहु लागले पळाया मोठे मोठे, न एकही परते. ॥२६०॥
प्रकट करिति, मय, शंबर, दोघे पर्जन्य वारुणी माया; ।
बा ! या महाप्रयोगें झाला मंदार्चि अग्नि तो, राया ! ॥२६१॥
होतां मंदज्वाळ, स्तवुनि बृहस्पति म्हणे, ‘अगा ! धात्या ! ।
सुर रक्षीं, प्रकट करीं, आहे निजतेज जें, अगाधा त्या.’ ॥२६२॥
जाणोन स्तवन, तया बळद खळदमार्थ सर्पितें दे हा. ।
होय पुन्हा  दीप्त शिखी, स्तोत्र अमृतसेंचि तर्पितें देहा. ॥२६३॥
पहिल्याहूनि अधिक तो असुरांतें देवरंजना भाजी, ।
सदरिक्षयार्थ दहना शक्ति भजे तीच, कंजनाभा जी. ॥२६४॥
भ्याले दग्धांग असुर, मग गेले शरण सर्वही बळितें; ।
प्रर्‍हाद म्हणे, “रक्षीं, शिखितेज त्वज्जना बहु च्छळितें. ॥२६५॥
तूं अग्नि, वायु, भास्कर, सलिल, शशी, ब्योम, भूमि, नक्षत्रें, ।
झालासि, दिशा, विदिशा, हें मेळविलें कधींच न क्षत्रें. ॥२६६॥
झालासि सिद्धिसुतपें तूं भूत, भविष्य, वर्तमान; तुला ।
विधिदत्त वर असे, कीं ‘त्रिजगीं या त्वन्महोदया न तुला.’ ॥२६७॥
ईशित्व, वशित्व, अमित शुभ बळ, सर्वेश्वरत्व, तुज आलें, ।
इंद्रत्वहि, अमरत्वहि, समरीं अपराजितत्वही झालें. ॥२६८॥
शूरत्व रणांत, महायोगीश्वरता, प्रभुत्व जें काय, ।
अमितत्व, लघुत्व तुझें, सत्त्वगुणाचा निवास तूं राय. ॥२६९॥
शक्रातें, देवांते, भंगुनि, तूं विश्वपाळ होचि कसा; ।
अहितांच्या नयनीं तव भाग्योदय सर्वकाळ हो चिकसा. ॥२७०॥
विधिनें वरदान दिलें जें तुज, तें सर्व सत्य जाणावें. ।
सुरपतिहृत निजपूर्वजराज्य पुन्हा त्वां जिणोनि आणावें.” ॥२७१॥
प्रर्‍हादाच्या वचनें बळि होऊनि परम हृष्ट, विजयाला ।
पूजुनि विप्रांसि, निघे; वर्धविती सर्व धीर निज याला. ॥२७२॥
शुक्रप्रमुख मुनीश्वर बहु आशीर्वृष्टि मंगळें करिती, ।
असुरेश्वरप्रयाणीं रणतूर्यध्वनि दिशा दहा भरिती, ॥२७३॥
गुरुवर दे त्या बळिला, रत्नमया जेंवि अर्क तेज नगा, ।
रूप विलोकुनि, करिती, ‘जय होतो,’ हाचि तर्क ते जन गा  ! ॥२७४॥
पाहे निज बळ दहनें विसकटिलें फार, राहिलें दभ्र; ।
जैसें वातें बा ! तें गगनांत ध्वस्त होतसे अभ्र. ॥२७५॥
सांबरले क्षीण पुन्हां त्रिदश सबळ पावकाश्रयें सर्व; ।
सिंधूचे ओघ जसे बहु उसळति भेटतां महापर्व. ॥२७६॥
बळि सुरकटकीं वर्षे बहु नाना शस्त्र, करित दाहातें ।
सुटला कल्पांतींचा दहन जसा, तेंवि करि तदा ‘हा’ तें. ॥२७७॥
शक्राहुनि इतर सबळ सुर बळिनें भंगिले रणीं सर्व, ।
ते त्या अतिशक्तिपुढें, प्रांशुपुढें, बा ! जसे नृपा ! खर्व. ॥२७८॥
वदले  सुर शक्रातें, ‘देवेंद्रा ! दव जसा अरण्यातें, ।
बळि तेंवि तव बळातें, रक्ष तुज प्रार्थितों शरण्यातें.” ॥२७९॥
देउनि अभय, अशॆषस्वबळसहित अहिततिमिरभानु निघे. ।
शतरविसमप्रभ प्रभु बलिवध हृदयांत शक्य मानुनि घे. ॥२८०॥
सप्तर्षिसुरर्षिस्तुत हरि धरि अरिवरवधार्थ उत्साहा, ।
कीं मानधना स्वजनानवनें बहु म्हणवितीच कुत्सा ‘हा !’ ॥२८१॥
दशशतलोचन, शतमख, शतपर्वप्रहरण, त्रिदशपाळ, ।
शतबाहु, शतशिरोधर, योगी प्रभु होय तो असुरकाळ. ॥२८२॥
अदितिप्रियसुत परबळ उडवी, बुडवी भयांत समरीं तें; ।
गांठी बळितें, द्याया निजविजयें परम हर्ष अमरींतें. ॥२८३॥
अरिकरिहरि हरि कोपें गांठी बळितें रणांत मग, राया ! ।
तोहि महामगर तया तुमुलरणसरोवरांत मगरा या. ॥२८४॥
स्तवनें प्रबोधिला तो, पवनें दावाग्नि, तेंवि आजानें, ।
आरंभिलें तयासीं समर समरयेंचि देवराजानें. ॥२८५॥
राजांसीं रण होतां, ते देवासुरहि करिति कलहातें; ।
मुखपद्में त्रेलोक्यश्रीनें धरिलें जयांत तलहातें. ॥२८६॥
खरशस्त्रवृष्टि बळिवरि तो देवेश्वर महातपा सोडी, ।
झांकाया द्दष्टि जसी मत्तगजशिरीं महात पासोडी. ॥२८७॥
बळिवर बळिवर शस्त्रें खंडी तत्काळ वज्रभृन्मुक्तें, ।
युकें वाक्ये वादी प्रतिवादिमुखोद्नतें जसीं उक्तें. ॥२८८॥
अग्न्यस्त्र शक्र सोडी त्यातें असुरेंद्र बारुणें वारी, ।
अरिहस्तें देवविलें प्राणाज्या परमदारुणें वारी, ॥२८९॥
तें बळिचें अत्यद्भुत बळ झलें देवसैन्य कापवितें, ।
मग नगभेत्ता न धरिल वाराया स्वजनदैन्य कां पवितें ? ॥२९०॥
परजी परजीवनहरवज्रातें शक्र बळिस माराया, ।
बाराया यातें तों झाली वाणी नभांत, बा ! राया ! ॥२९१॥
“शक्रा ! परत वरतपा ! हा न कराया विनाश शकशील, ।
आद्य हरिच जिंकिल, बळि हरिस इतर याविना शशकशील. ॥२९२॥
अत्यद्भुत तप याचें, अन्यत्र, त्यजुनि सत्य, हा न रते.” ।
वर तेज अधिक ऐकुनि, बळितें सोडूनि, देवरा‍ट् परते. ॥२९३॥
बळिजयतूर्यरव असुरलोकातें द्यावया सुख निघाला, ।
सुर म्हणति, ‘साहिल कसी स्वस्वर्गस्थिति सुमुत्सुखनि घाला, ॥२९४॥
बहुसाधुवादजयजयकारस्तुतिलाभ जाहला बळिला, ।
त्रिजगद्राज्यपद मिळे नव मानसनीररुह जसें अळिला. ॥२९५॥
इंद्रपदीं प्रर्‍हादप्रमुखाप्तजनासमेत तो कविनें ।
अभिषेचुनि शोभविला, कर देउनि पद्म बा ! जसा रविनें. ॥२९६॥
सद्धर्मन्यायपथें होऊनि देवेंद्र, बळि करी राज्य, ।
आज्य ज्वरितपरांतें पाववि,तो स्वप्रजां सुख प्राज्य. ॥२९७॥
पद्मकरा श्रीदेवी आली भेटावया स्वयें बळिला, ।
अत्यद्भुत हे, यावी नलिनी भेटावया जसी अळिला. ॥२९८॥
‘कनककशिपुपरिस अधिक अससि,’ असें ती म्हणे तया लुबरी; ।
तरिच ‘चपला’ असें या श्रीस म्हणति, हे नव्हे दयालु बरी. ॥२९९॥
स्तवन बहु करुनि, शिरली श्रीदेवी प्रेमयुक्त बळिदेहीं; ।
गुरुचा प्रसाद ज्यावरि, त्याच्या ये असिच मुक्तिही गेहीं. ॥३००॥
मातेतें शक्र म्हणे, ‘मृत्युसमचि भंग अदिति ! हा समज, ।
असकृत् सुहृदुक्तिहि न, स्वास्थ्यप्रद होय सदितिहास मज.’ ॥३०१॥
ती जाय शरण ससुता, जाया नि:शेष ताप हा, पतितें, ।
कीं सत्पुरुषा नमितां न म्हणावें, स्मरूनि पाप, ‘हा !’ पतितें. ॥३०२॥
स्त्रीपुत्रासह कश्यप कळवी, जाऊनि शरण, आजाला; ।
विधि त्यासि म्हणे, “विनवा पावुनि यदनुग्रहसि हा जाला, ॥३०३॥
सुतपें क्षीरधितीरीं मधुकैटभसूदनासि आराध, ।
हरिल हरि लक्ष दु:खें, त्याच्या सेवुनि यशाचि सारा, धा. ॥३०४॥
आराध्या सारा ध्या, त्या वरदवरा नमूनि, परमा गा; ।
प्रभुसि, अदितिकश्यप ! ‘हो ! अस्मत्सुत हो,’ असाचि वर मागा.” ॥३०५॥
नमुनि ब्रम्हापदातें, क्षीरधिच्या उत्तरीं तटीं गेला, ।
ठेला अमृतस्थानीं मुनि, विधिनें बोध या जसा केला, ॥३०६॥
कश्यपमुनि, अदिति, तिचे सुत दिव्य सहस्र अब्द ते तपले; ।
जपले नामसुमनुतें, यमनियमातें सदैवही जपले. ॥३०७॥
कश्यप करि स्तव, वदे नामें जीं भव्य, तींच दोन शतें; ।
कविशत बहुवत्सर जें सुग्रंथांच्या शके वदों न शतें. ॥ ३०८॥
न दिसे विश्वगुरु, प्रभु सप्रेम म्हणे तयासि पर ‘मागा; ।
कश्यप, अदिति विधिकथित वर मागति त्या स्वकल्पपरमागा. ॥३०९॥
‘हो पुत्र, वरद वरदा ! भेट कसा, तापले असों देहें; ।
रूपीं तुझियाचि सदा मनु, मागति ‘आपलें असोंदे हें.”’ ॥३१०॥
अदितिसह कश्यपातें विष्णु म्हणे, ‘शीघ्र पुत्र बा ! होतों, ।
तुमचें नेत्रयुग सुखें, जोंवरि इच्छा, यथेष्ट पाहो तों. ॥३११॥
जों सुर हो, स्वस्थ रहा, तुमचा मी सर्वथा अनुज होतों.’ ।
ऐसें वदे दयामृतसागर, ‘जों प्राण, गा ! मनुज हो ! तों. ॥३१२॥
तुमचे शत्रु मजपुढें, घन वाता काय ? न उरतिल कांहीं; ।
करिजेल परवधूंचें विरहें कां दीर्ण न उर तिलकांहीं ? ॥३१३॥
लाविन पुन्हां तुम्हांला यज्ञाचे मध्ये भाग भक्षाया, ।
लक्षायास हरि चरित माझें, व्हा सावधान लक्षाया. ॥३१४॥
जाणा या साध्वीच्या आलों हा देवदेव मी पोटा; ।
तो टाका खेद तुम्ही, बंधु अजित काय हो ! जया तोटा ? ॥३१५॥
सर्व सुधी स्वस्थ असा, ही आर्या, हाहि आर्य, साधि नहो. ।
परदुष्कर, परि तुमचें मी लीलेनेंचि कार्य साधिन हो !" ॥३१६॥
प्रभुतें वंदुनि कश्यप सुतदारसहित निजाश्रमा आला, ।
प्रभुहि अदितिच्या उदरा, हर्षोदय सर्वसुरमनीं झाला. ॥३१७॥
दिव्यसहस्त्राब्द धरी अदिति जगद्भव्यहेतु गर्भातें, ।
प्रकटे मग नुरवाया प्रभुपावक दैत्यगर्वदर्भातें. ॥३१८॥
म्हणती, ‘मूर्त प्राशूं अमृत, असो परम चिर तृषित, यातें.’ ।
वंदिति, सादर पाहति बहु भाग्यें सर्व सुरऋषि तयातें. ॥३१९॥
हाहा, हूहू, नारद, तुंबरु, गंधर्ववर तदा गाती, ।
नाचति वराप्सरा, सुखवेलौषधि हरि मनोगदागा ती. ॥३२०॥
झाले परमप्रमुदित रुद्रादित्यादि सर्वही सुर ते, ।
मेघश्यामीं नसते रत, तरि त्या संकटीं कसे उरते ? ॥३२१॥
त्यापासुनि कवि बहुधा बहु धाती ‘दीनबंधु’ या नांवें. ।
मानावें हें सत्य, प्रभुचें यश सर्वकाळ वानावें. ॥३२२॥
प्रभुतें वंदुनि, पाहुनि, झाला आनंद फार बा ! धात्या, ।
देवांसि म्हणे, ‘साक्षात् सत्पति हा विष्णु हरिल बाधा त्या.’ ॥३२३॥
श्रीवामन वाम नयन लक्ष्मीचें पुण्यकीर्ति जो स्फुरवी,।
सुरवीरांसी म्हणे तो, ‘वर मागा, मम कथा व्यथा नुरवी.’ ॥३२४॥
इंदप्रमुख अखिल सुर जोडुनि कर, म्हणति, ‘वामना ! भ्रात्या ! ।
वळिव प्रसादवातें, गेल्या सोडूनि कामनाभ्रा त्या. ॥३२५॥
अधिकार दिला होता त्वां जो आम्हां सुरांसि हव्याचा, ।
कव्याचा पितरांला, ज्यांत सदा प्राज्य लाभ भव्याचा, ॥३२६॥
तो अधिकार विधिवरें विधिनें हरिला करूनि सुतपाला, ।
बळिविक्रम वात, तया साहेना सर्व अदितिसुत पाला, ॥३२७॥
हरिलें त्रिभुवनराज्य प्राज्य बळें जाण बाणजनकानें, ।
तें सोडवूनि द्यावें, ऐको हे तव सुकीर्ति जन कानें. ॥३२८॥
सांप्रत करितो, अरि तो आपण होऊनि इंद्र, हरिमेधा; ।
कविमेधेतें पाहूनि, गुरुची बहु लाज आज धरि मेधा. ॥३२९॥
बळिपासुनि सुरराज्य प्रभुवर्या ! व्हावया सुखें मुक्त, ।
चिंतावें त्वां बरदें सर्वज्ञें सिद्धिकारि जें युक्त.” ॥३३०॥
विष्णु म्हणे, “तरि सुर ! व्हावा आचार्य गुरु, न लाजावा; ।
बळिच्या हयमेधातें, घेऊनि शिष्यास हा मला, जावा.” ॥३३१॥
होय त्रिजगद्नुरुच्या आज्ञेनें गुरु तदीय गुरुसा जो, ।
तद्यश विश्वीं होऊनि, सर्व गुरु यशांत कां न उरु साजो ? ॥३३२॥
धरुनि कमंडलु, मौंजी, छत्र, ध्वज, दड, अजिन, बटुता, तें ।
ब्रम्हा, निघे द्रुहिण म्हणे, “रचिला सदुपाय कार्यपटु तातें.” ॥३३३॥
भटगुप्त यज्ञवाटद्वारें मोहुनि सलील शिरला, हो ! ।
व्रम्हादि म्हणति, “ज्याचें पदपंकजरज सकृत् स्वशिर लाहो.” ॥३३४॥
जाउनि सभेंत वर्णी बळि, मुनिजन, यज्ञवाट, वामन या; ।
कपट करि तद्विता, जे देती अनयज्ञ वाट वाम नया. ॥३३५॥
यज्ञप्रयोगविषय प्रभु बळिच्या यज्ञमंडपीं काढी, ।
कविसहि निरुत्तर करी, अमृतचि सभ्यां जनांसि तें वाढी. ॥३३६॥
श्रौतीं, शास्त्री, जिंकी, वादांत, प्रकट करुनि पटुतेतें, ।
खंडितहि पंडित हितचि मानिति, न म्हणति बटूक्त कटु ते तें, ॥३३७॥
चालों दे तो कांहीं सर्वसभासदकविप्रसर बटु न, ।
घे पांडित्यकरानें बळिचा महिमा सविप्र सरबटुन. ॥३३८॥
वर्णुनि पांडित्य, म्हणे बळि, “केला त्वां बरा जय ज्ञानें, ।
यश या सकें मिळविलें, हें कोणाही न राजयज्ञानें, ॥३३९॥
देवर्षिकुमार असति बहु, परि तुजसम नसेचि बा ! इतर, ।
जित रविविधुवन्हि तुझ्या या तेजें, धन्यतम तुझे पितर. ॥३४०॥
न कळे, तूं कोण, असे माझें तुजकारणें बटो ! नमन, ।
वद, काय करूं ? भुललें भवदागमनोत्सवें नटोन मन.” ॥३४१॥
वामन म्हणे, “नको मज राज्य, स्त्री, रत्न, यान, हें कंहीं; ।
विषयार्थ इंद्रियें तिळमात्र करिति राजया ! न हेका हीं. ॥३४२॥
अससिल तुष्ट जरि, तुझी मति धर्मीं सादरा असेल जरी; ।
गुर्वर्ध अग्निशरणाकरितां दे त्रिपदमात्र भूमि तरी.” ॥३४३॥
हास्य करूनि, बळि म्हणे, “ विप्रेंद्रा ! काय तुज पदें तीन ? ।
घे शतलक्ष पदें भू; अल्पार्था उक्ति जी, वदें ती न.” ॥३४४॥
शुंक्र म्हणे, “वंचाया तुज आला कनककशिपुचा काळ, ।
देऊं नकोचि, राया ! मायावी विष्णु हा, नव्हे बाळ. ॥३४५॥
सर्वस्व तुझें हरुनि, प्रिय हा करणार जाण शक्राचें, ।
झाला कपटें बटु, हें हरिल सकळ भाग्य दैत्यचक्राचें.” ॥३४६॥
चिर चिंतुनि, बळि बोले, “बहुभाग्यें त्रिभुवनीं मला मात्र ।
झालें प्राप्त सुदुर्लभ अत्यद्भुतपुण्यकीर्ति हें पात्र. ॥३४७॥
विमुख न व्हावें; पात्र च्छात्र, असो कीर्तिधन, न वारावा; ।
गुरुजी ! ‘कुरु, जीव,’ म्हणा; मोर अनुसरोचि घननवारावा.” ॥३४८॥
बळि मानीना झाला, तो बहु, मारूनि हाक, विप्र कटू; ।
विष्णु म्हणे, “शिष्याचें अत्यद्भुत सत्व हा कवि प्रकटू.” ॥३४९॥
पूजुनि, जळ सोडाया घे असुरोत्तंस हेमभृंगार; ।
श्रीवामन कर पसरी, श्रीचा ज्याच्या अधीन शृंगार. ॥३५०॥
असुरकुळक्षयकर कर करि करिवरवरद तीपुढें बळिच्या, ।
प्रर्‍हादोक्ती त्याच्या, जसि गंधफळी नये मना अळिच्या. ॥३५१॥
बळि मनिं म्हणें, “यश उरो, जीवितसह भाग्य सर्व हा निपटू.” ।
त्रिपदक्षितिदानोदक दे, घे सुरशत्रुगर्वहानिपटू. ॥३५२॥
त्रिपदक्षितिदानाचें पडतां बळिनें दिलें करीं तोय. ।
वामन तोचि अवामन ततक्षण जनमेजया ! नृपा ! होय. ॥३५३॥
अमृतें तरुसा, वामन दानजळें क्षिप्र वाढला गावा; ।
या महिम्या दोष, जसा वज्रा शिखरी, न वाढ लागावा; ॥३५४॥
प्रभुनें निजरूप अखिलदेवमय प्रकट करुनि दाखविलें, ।
तें अमृतचि सुजनाला, कुजनाला स्पष्ट विषचि चाखविलें. ॥३५५॥
भू पाद, मस्तक द्यौ, नेत्रें रवि चंद्र, वदन वन्हि, असें ।
रूप प्रभुनें धरिलें, जें गात्यांतें म्हणे, ‘उगाचि असे.’ ॥३५६॥
प्रभु चरणकरतलांहीं असुरांचें तेधवां करी मथन, ।
तन्नामाकारांचें किति विस्तरभीरु मी करूं कथन ? ॥३५७॥
दिसले वाढत असतां चंद्रादित्य स्तनांतरीं हरिच्या, ।
मग ऊरूजानुदेशीं, सुकवीच्या वर्णनोक्ति या परिच्या. ॥३५८॥
यापरि बा ! परिस नृपा ! मथुनि सहोद्दम दैत्यचक्रातें, ।
लीलेनें लोकत्रय जिंकुनि दे देवदेव शक्रातें. ॥२५९॥
बळिला म्हणे, त्रिविक्रम, “साप्त अधिष्ठुनि सुखें रहा सुतळा, ।
सुखमयचि नित्य तूं हो, कनकरसें ओतिला जसा पुतळा. ॥३६०॥
न करीं शक्रद्वेष, प्राप्त तुला सर्व भोग होतील, ।
बा ! एकनिष्ठ चातक वदनीं घन कां न अमृत ओतील ? ॥३६१॥
बहु हर्षे, खेद मनीं न धरी प्रर्‍हादतनयसुत लेश; ।
केला प्रभुनें, शिकवुनि निजवदनें सन्मतनय, सुतलेश. ॥३६२॥
प्रभु, पाशबद्ध बळितें स्थापुनि सुतळीं, निजालया गेला; ।
मग नारदें अनुग्रह, त्या पाशांतुनि सुटावया केला. ॥३६३॥
‘सर्वस्वदान दिधलें, बळि न म्हणायासि योग्य यास्तव हा.’ ।
नारद असें विचारुनि, कथि हरिचा, प्रार्थितांचि, या स्तव हा. ॥३६४॥
तो मोक्षविशंक स्तव, आरंभ ‘नमोऽस्त्वनंतपतये’ हा, ।
ज्याच्या पाठें न मुखा, होतां भगवत्पदासि नत, ये ‘हा’ ! ॥३६५॥
स्तवपाठ बळि करी, तों सेवकचातककिशोरतोयद या ।
मुक्त कराया धाडी गरुडातें, बहु मनांत होय दया. ॥३६६॥
सुतळीं जाय खगोत्तम, कापावें ज्यासि अहितसेनांहीं, ।
दोष जसे विष्णुगुणें, गरुडें झालेचि अहि तसे नाहीं. ॥३६७॥
फणिपाशमुक्त बळितें गरुड म्हणे, “असुरनायका ! अजितें ।
आज्ञापिलें असे तें परिस, प्रणतासि जें शिवें सजितें. ॥३६८॥
‘होऊनि मुक्त वसावें सुतळीं त्वां स्वजनसह, न लाजावें. ।
येथूनि दोनकोशहि नच, न गुणनि सर्वथा मला, जावें. ॥३६९॥
तूं लंघिसिल समय जरि, तरि दंडाया नको मला उशिर, ।
शतधा करिन, कठिणपण पण मच्चक्रा तुझें न लाउ शिर.”’ ॥३७०॥
त्यासि बळि म्हणे, “प्रभुच्या मान्य असे दास हा निरोपातें, ।
कल्पावा भाग मला, होऊं द्यावी न हानि रोपातें,” ॥३७१॥
गरुड म्हणे, “जे करितिल यज्ञ विधिरहित, न देव घेतील; ।
कीर्तित दानादिसुकृतभागहि, ते तुजकडेचि येतील. ॥३७२॥
यज्ञादि भाग यापरि तुज जगदीशेंचि योजिला आहे, ।
स्वस्थ रहा, तूं प्रभुची आज्ञा विसरूं नको बरें बा ! हे. ॥३७३॥
होइल लोकीं त्वत्कृत अत्युत्तम कल्पनगसम स्तव हा, ।
देहीं सत्वगुण, सुखी व्हाया, फणितल्पनग समस्त वहा.” ॥३७४॥
सांगुनि ऐसें बळिला, गेला, त्यातें पुसोनि पक्षिवर; ।
न शकति जयापुढें पर कोणीहि करावयासि अक्षि वर. ॥३७५॥
लिहिला वामननामा हा प्रादुर्भाव,  यांत रसिकांहीं ।
द्यावें मन, रुचि आहे, व्हावा परम प्रमोद, असि कांहीं, ॥३७६॥


Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP