उत्तरार्ध - अध्याय ३७ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


त्या वज्रपूरीं वसतां नरनाथा ! प्राप्त होय घनकाळ, ।
जो दयितासंगिजनप्रियकर केवळ वियोगिजनकाळ. ॥१॥
त्या काळाचे वर्णी सुज्ञ प्रद्युम्न सर्व गुणदोष;।
तेणें प्रभावतीच्या हृदयातें दे सदैव परितोष. ॥२॥
वर्णी बहु सोमातें, तद्वंशजराजसाधुरीतीतें, ।
भुलवी यदुवसुदेवश्रीकेशवकीर्तिमाधुरी तीतें. ॥३॥
कश्यपसत्र समाप्तिस पावे, स्वस्वस्थळास सुरजन, गा ! ।
असुरहि गुरुसि, जयाचें तेज म्हणे, “वाजवूनि मुरज न गा.” ॥४॥
त्रैलोक्यविजयकामुक असुरेश्वर वज्रनाभ आला जो, ।
कश्यप म्हणे तया, “वस वज्रपुरीं, स्वर्गवास या लाजो. ॥५॥
ज्येष्ठ भ्राता शतमख, ही ज्या आला करीत अधिकारा, ।
त्याचि करो, बा ! तृष्णा जेविं निरुद्धा, तसी न वधि कारा. ॥६॥
ब्रम्हाण्य, धर्मपाळक हा, याच्या जय न जोडिला अहितें. ।
जा, स्वपुरीं वस, वत्सा ! मरसीलचि लंघितां तया अहितें.” ॥७॥
ऐसें वदतां, कश्यपमुनिला तो करुनि जाय नमनातें, ।
त्याच्या गुरुबोध तसा, बधिराच्या जेविं गायन मनातें, ॥८॥
येवुनि वज्रपुरातें, म्हणवाया सुरवरा हरिस हाय, ।
त्रिभुवनविजयारंभीं सिद्ध करी जिष्णुचे अरि सहाय. ॥९॥
तों त्या प्रद्युम्नातें हंस कथिति जिष्णुविष्णुसंदेश, ।
कीं “हा समज असे; त्वां मारावा वज्रनाभ मंदेश.” ॥१०॥
शक्राच्युतांसि कळविति गर्भवती असुरपतिसुता रमणी, ।
आधिस उपाय मागति हंस चर, अहिस जसा उतार मणी. ॥११॥
प्रद्युम्नप्रोक्त जसें संकट कथिलें प्रभूंसि हंसांनीं, ।
आधि हराया त्यांतें वर दिधला निहतवृत्रकंसांनीं, ॥१२॥
“सुत उपजतांचि होतिल अतुलबलज्ञानरूपगुण तरुण; ।
अरुण तमीं जेविं, तसे जे परमथनीं सदैव निष्करुण.” ॥१३॥
हंस असा वर कथिती, तों ती पुत्र प्रभावती प्रसवे, ।
तो हंसकेतु नामें, सुकवींस जया न वर्णितां नसवे, ॥१४॥
एकें मासें झाला चंद्रवतीलाहि पुत्र, हा नांवें ।
चंद्रप्रभ गदनंदन, सत्कविंनीं बहु जयासि वानावें. ॥१५॥
जो गुणवतीस झाला, तो गुणवान् सांबपुत्र वरतेजा, ।
मातामह, मातुळ जे, गमति सुनाभादि असुर पर ते ज्या. ॥१६॥
जन्मींच तरुण जो तो सुत, सर्वहि सांग वेद पाठ वदे, ।
अभ्यास सुद्दढ पहिला, जाणों समयीं तयांसि आठव दे. ॥१७॥
पितरांच्या आशींची दशदा दिवसांत जे सुतति घेते, ।
हर्म्याग्रीं असुरांहीं वृष्णीचे देखिले सुत तिघे ते. ॥१८॥
त्या प्रभुच्या देखियले ते इच्छेनेंचि बा ! परजनांहीं, ।
ज्याच्या करि चरणाचें ब्रम्हावधाद्यखिलपाप रज नाहीं. ॥१९॥
बहु बिवुनि हर्म्यरक्षक, कथिती त्या स्वर्गविजयसिद्धातें; ।
गृहधर्षणें तयां जें दु:ख, न विषदिग्धबाणविद्धा तें, ॥२०॥
असुरपति म्हणे, “दिसतां खिळिले कां ? देव मानव धरा, हो ! ।
जा त्या पोरींस म्हणा, ‘गिळिले कांदे वमा, न वध राहो.”’॥२१॥
कन्याहर्म्य व्यापुनि, असुर असे गर्जले, “धरा, बांधा,” ।
कां “धामधर्षकांतें” प्रभु न म्हणे राक्षसांसि “खा, रांधा,” ? ॥२२॥
वदली प्रभावती ‘हा !’ चंद्रवती, गुणवतीहि, बा ! भ्याल्या; ।
कीं सोसेल कसा हो ! केळीच्या तप्त शूल गाभ्याला ? ॥२३॥
हांसे प्रद्युम्न, म्हणे, “रडतां कां ? वेड लागलें काय ? ।
‘हाय’ म्हणावें न तुम्हीं, वृष्णीचा राक्षिता सुखी राय. ॥२४॥
आम्ही तुमचे नाथ, स्वस्थ अजित अजितसंश्रयें आहों, ।
पाहों शके न इकडे काळहि, ताडूनि भुज, पुढें राहों. ॥२५॥
तात, पितृव्य, तसेचि ज्ञाति, भ्राते, तुझे गदापाणी, ।
प्राणासह सर्वस्वा सोडितिल, सुखें न हे मदा पाणी. ॥२६॥
आम्हांतें मारावें, या अहितांच्या मनांत हा हेत, ।
तुझिया संबंधें तों, सर्वहि हे मान्य, पूज्य आहेत. ॥२७॥
भगिनींस पूस, मतिमति ! पिकवध कर्तव्य वायसां गमला, ।
या संकटीं करावें आतां म्यां कार्य काय ? सांग मला.” ॥२८॥
सुमति प्रभावती दे प्रद्युम्नकरीं कराल करवाल, ।
ती त्यासि म्हणे, “वांचा, वांचोनि यशें कराल, करवाल. ॥२९॥
जीणें साधु निवावे, ती ठावी या न दानवां चाल, ।
अहितजनीं करुनि कृपा, शस्त्र न धरितां, कदा न वांचाल. ॥३०॥
कल्याण असाल जरि, स्त्रीपुत्रांतें तुम्ही तरि पहाल,  ।
आधि आर्येसि म्हणो, कदलीस म्हणे जसा करिप ‘हाल.’ ॥३१॥
मज मुनि वदला, ‘होसिल जीवत्पतिका सदैव जीवसुता,’ ।
हा भरंवसा असे, कीं गुरु ती रक्षी, न दैव जी वसुता.” ॥३२॥
चंद्रवतीहि असेंचि प्रार्थुनि दे असि गदसि उपसून, ।
सांबासि गुणवतीही, माराया पर, उरांत खुपसून. ॥३३॥
प्रद्युम्र सुतासि कथी, “सांबसहित तूं महायशा लाहें.” ।
“खळबळ मर्दाचि,” म्हणे, “न वदोत निजा, न ‘हाय!’ शाला हें !" ॥३४॥
ते हंसकेतु, चंद्रप्रभ, गुणवान्, सांब निकट तो स्थापी; ।
मायारचितरथावरि बसुनि, शरांहीं अरिब्रजा व्यापी. ॥३५॥
भगवान् सहस्रमस्तक सारथि झाला रणांत कामाचा, ।
कीं त्या पुत्रीं प्रेमा त्या कृष्णाहूनि फार रामाचा, ॥३६॥
भासें बा ! सेनांत त्रिद्शारींच्या वनांत या दव हा, ।
म्हणवी जिकडे तिकडे, क्षय करितां, परजनांत यादव ‘हा !’ ॥३७॥
गदसांबांसीं करिती, जे शक्रावध्य असुर, संगर ते; ।
जो संमुख ये पर, तो परतोनि न, धरुनि देहसंग, रते ॥३८॥
दैत्यांच्या दमनातें सामरगण शक्र ये पहायास, ।
चित्तीं म्हणे, “पुरारे ! प्रद्युम्नाला नसो महायास.” ॥३९॥
मातलिपुत्र सुवर्चा सारथि, निज रथ, गदासि दे शक्र, ।
सांबाला प्रवरसहित गज, असुरांचें मथावया चक्र. ॥४०॥
तैसाचि जयंत दिला प्रद्युम्नाला सहाय समरांत, ।
जों जों ते खळ गळती, तों तों बहु हर्ष होय अमरांत. ॥४१॥
सजयंत प्रद्युम्नप्रभु आटोपी क्षणांत तें हर्म्य, ।
देवुनि रथ, गज, सांगे त्या सांबगदांसि कर्म हें धर्म्य. ॥४२॥
“आजि द्वारवतींत श्रीरुद्राची असे महापूजा, ।
येइल सकाळ, पावे वृष्णीची पाहतां महा पू ज्या. ॥४३॥
मग कृष्णाज्ञप्त म्हणों लोकांसि, ‘न या पहाल पविनाभा,’ ।
करितों विधान, जेणें शक्राची पाप हा लपविना भा. ॥४४॥
स्त्रीधर्षणें बुडे यश; मानी वपुस न, जपो कलत्रास, ।
मृतिचा पोकळ, भार्यापरिभव जो हा न पोकळ त्रास.” ॥४५॥
ऐसें गदसांबांतें सांगुनि, माया करी प्रकट मोटी, ।
निर्मी तो प्रद्युम्न पद्युम्नांच्या रणीं बहुत कोटी. ॥४६॥
जें पररचित, उरों दे त्या भैमदिनेश तेंवि न तमातें. ।
हा मायावींद्र म्हणे, “परमायालक्ष तें विनत मातें.” ॥४७॥
बहु देवेश्वर हर्षे  पावुनि रिपुमर्दना हरिसुतातें, ।
कीं ‘पुत्रयश’ म्हणावें, ‘स्वयशिधिक जग सदा परिस,’ तातें. ॥४८॥
देखति सकळें भूतें सकळा शत्रूंत कृष्णतनयातें, ।
जो क्षेत्रक्ष, अशेषां देहांत जसेचि सुज्ञ जन यातें. ॥४९॥
रण करिताम रात्रि सरे, त्या असुरांचा त्रिभाग तो खपवी, ।
श्रीरुक्मिणीसुताच्या तेजें पावे अपार तोख पवी. ॥५०॥
काम करी रण, संध्या तो विष्णुपदीजळीं जयंत करी; ।
जों युद्ध जयंत वरी, काम प्रातर्विधि स्वयेंहि वरी. ॥५१॥
त्रिमुहूर्तदिवस आला, प्रभुही गरुडी गरुडीं चढोनि अरिनगरा: ।
जो म्हणतो, “गर अमृता, अमृतचि लीलेंकरूनि करिन गरा.” ॥५२॥
प्रभु, अग्रजासि वंदुनि, आकाशीं तत्समीप मग राहे. ।
पाहे असुरांसि, म्हणे, “मिरवूं देतील गर्व न गरा हे.” ॥५३॥
अहितासि भयद ज्याचा नाद, जसा गरुडनाद सर्पास, ।
तो पांचजन्य वाजवि, गाजवि नभ, नुरवि दैत्यदर्पास, ॥५४॥
ऐकुनि दरवररव, जव करुनि, प्रद्युम्न ये, चरण नमुनी, ।
निकटचि राहे, लाहे सुख, ज्याचें विसरति स्मरण न मुनी. ॥५५॥
प्रभु निज पुत्रासि म्हणे, ‘प्रद्युम्ना ! पातलों पहायाला, ।
हूं, मार वज्रनाभा, अनुचित वध संगरीं न हा याला. ॥५६॥
हा वज्रनाभ वध्यचि, या हर तूं, खगवरीं चढ, गरा हो. ।
शत्रु तुजपुढें जरि, तरि वायुपुढें अंबरींच ढग राहो. ॥५७॥
हरियानीं बसुनि प्रभु, बसवी प्रद्युम्नतोक विवरीं, हो ! ।
वसवाया रवि तमसें शत्रुकुळ, करीत शोक, विवरीं हो. ॥५८॥
प्रभुसि नमुनि, पविनाभा गांठी तो चित्तपवनवेगानें, ।
ज्यांतें देति सुर, असुर, सुयशाच्या हर्ष नवनवे गानें. ॥५९॥
तार्क्ष्यगतें प्रद्युम्नें, नाशाया परचमूमदाघातें, ।
पविनाभ पाडिला, उर ताडुनि, मूर्च्छित रणीं गदाघातें. ॥६०॥
बहु रक्त असुर वमला, भ्रमला, गमला गतासुसम, राया ! ।
हरिपुत्र करी कौतुक, हरिस श्रम लागता सुसमरा या. ॥६१॥
प्रद्युम्न म्हणे, “म्हणतें, योग्य न मूर्च्छित असा वधा, नातें; ।
हो सावध, पविनाभा ! यादव न वधिति असावधानातें.” ॥६२॥
उठुनि मुहूर्तें, तो पविनाभ म्हणे, “परम शत्रु, पण साधू, ।
मग कां देव न म्हणतिल ? ‘सद्यश, होवूनि सत्य पण, साधू. ॥६३॥
तूं लोकीं श्लाव्य मला शत्रु; भला ! यादवा ! भला ! साहें ।
आतां प्रतिप्रहार, स्थिर अभिमुख संगरीं उभा राहें.” ॥६४॥
ऐसें म्हणुनि, ललाटीं स्वगदेनें प्रभुसुतासि तो ताडी, ।
पाडी मुहूर्त मुर्च्छित, भान सुरांचें दिगंतरीं धाडी. ॥६५॥
शोणित वमतां, भ्रमतां, सुत, फुंकी कृष्ण पांचजन्यातें, ।
ज्याच्या नादें व्हावा स्वजनातें मोद, मोह अन्यातें. ॥६६॥
त्या पांचजन्यनादें उठला प्रद्युम्न मोह सोडून, ।
जाय करीं चक्र, तया द्याया यश नव्य भव्य जोडून. ॥६७॥
श्रीकृष्णच्छंदें जें आलें स्वकरांत चक्र, तें सोडी, ।
तोडी पविनाभाचें  शिर, चिर कविगेय विजय तो जोडी. ॥६८॥
हर्म्यगत गदावरि, तों पविनाभानुज सुनाभ करि लगट, ।
वाट तत्तनयांतें, निजपतिसह आपणासि करिल गट. ॥६९॥
त्यातें मारुनि समरीं, केले व्याकुळ महासुर गदानें, ।
देती आशींचीं या प्रेक्षक सुर, नर सुधी, उरग, दानें. ॥७०॥
वरकड असुर निवटिले सांबानें संगरांत झाडून. ।
प्रभुनें प्रमुदित केले स्वर्गीं ते दिव्यदेह धाडून. ॥७१॥
दैत्य निकुंभ पळाला, गेला तो षट्‌पुरास मायावी, ।
असुरमनीं शांति कसी, रुचतां दुर्मति सुरासमा, यावी ? ॥७२॥
इंद्रोपेंद्र उतरले वज्रपुरीं, वज्रनाभवधभीता ।
अभय़ें प्रजा सुखविली, कीर्ति जयांची महत्‌सभागीता. ॥७३॥
राज्य चतुर्धा केलें, प्रद्युम्नजयंतसांबगद यांचे ।
अभिषेचिले  यथाविधि सुत अनुभविती प्रसाद सदयांचे. ॥७४॥
सुत विजय जयंताचा, कामाचा हंसकेतु सन्महित, ।
चंद्रप्रभगुणवान् गदसांबज, ज्याचें जनांत जन्म हित. ॥७५॥
जे ग्राम चारकोटी, शाखानगरें सहस्र, तें प्राज्य ।
सर्व चतुर्धा केलें, वांटुनि चवघा जणां दिलें राज्य. ॥७६॥
शक्र जयंतासि म्हणे, “त्वां हे राजे सदैव रक्षावे; ।
रक्षा वेळोवेळां, प्रेमें स्वप्राणसेचि लक्षावे; ॥७७॥
उच्चै:श्रवा हयोत्तम, तत्सुत, जे दिग्गजात्मज प्रथित, ।
यां मागतील तितुके दे, यांचे व्हावया अरि व्यथित. ॥७८॥
आकाशग ऐरावतसुत शत्रुंजयरिपुंजय प्रेमें ।
गदसांबांतें द्यावे, समलंकृत करुनि मणिगणें होमें. ॥७९॥
आकाशपथें येतिल यांवरि बैसोनि सुत पहायाला ।
पुर, चिर नांदो, माझें न म्हणों देईल सुतप ‘हा !’ याला. ॥८०॥
स्वच्छंदानें यावे स्वर्गासि, द्वारकेसि, हे चवघे; ।
चव घेवूत यशाची यांच्या, जे रसिक, साधु ते अवघे.” ॥८१॥
ऐसें सांगुनि शक्र स्वर्गासि, पुसोनि केशवा, गेला; ।
प्रभुहि द्वारवतीला, बहु उत्सव पौर वृष्णिंहीं केला. ॥८२॥
गद, काम, सांब, होते वज्रपुरीं, पुसुनि हरिस, सा महिने; ।
प्रभुवर हा कीं नाकी स्पष्ट, करुनि दंड, अरि ससामहि ने. ॥८३॥
‘मौसल’ रण झाल्यावरि गेले गदसांबकामसुत राज्या; ।
गावें हें, वैतरणी व्हावी, अति दुस्तराहि, सुतरा ज्या. ॥८४॥
हीं राज्यें मेरूच्या उत्तर पार्श्वीं प्रसिद्ध आहेत, ।
व्यास म्हणे, “या चरितश्रवणें होतोचि पूर्ण बा ! हेत.” ॥८५॥


Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP