उत्तरार्ध - अध्याय ५२ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


जनमेजय भूप म्हणे, “बा ! वैशंपायना ! कथा आतां ।
वद हंसडिंभकांची, निववी हरियशचि ऐकतां, गातां.'' ॥१॥
वैशंपायन सांगे, शाल्वांत ब्रम्हादत्त  या नावें ।
होता राजा, ज्याचें यश शक्राचें तसेंचि वानावें. ॥२॥
त्याच्या दोघी भार्या, त्या अनपत्या, नृपा ! सदा खिन्ना, ।
दिसल्या देहें मात्र, ज्ञानें, शीळें, न त्या सती भिन्ना. ॥३॥
मित्रसहाख्य ब्राम्हाण योगीश्वर नृपतिचा सखा होता, ।
तोही अनपत्य नृपा ! बहुमान्य सुहित, जसा मखा होता. ॥४॥
भार्यासह आराधी पुत्रार्थ ब्रम्हादत्त भर्गातें, ।
यमनियम स्वीकारुनि, जिंकुनि सत्वं ह्रषीकवर्गातें. ॥५॥
मित्रसह महामुनिही वैष्णवसत्रें हरीस आराधी, ।
पारा धीरजना जो नेता, देऊनि शांतिसारा धी. ॥६॥
स्वप्नीं दर्शन देऊनि, पुत्र नृपा देवदेव दे दोघे; ।
प्रार्थूनि पांच वर्षे, प्रभुपासुनि एक विप्रही तो घे. ॥७॥
तो ब्रम्हादत्त भूप श्रीरुद्रवरेंकरूनि सुत पाहे, ।
हंसाख्य ज्येष्ठ, दुजा डिंभकनामा, वरूनि सुतपा, हे. ॥८॥
मित्रसह मुनिहि पावे, न चळों देतां, सुरूप सुत, पातें, ।
हरिसा अरि सा दमिता, अमितामळगुण, करूनि सुतपातें; ॥९॥
मुनिचा पुत्र जनादन साधु जनार्दनवरें, सुत तिघे ते ।
झाले सखें, कळांची विद्यांची गुरुमुखें सुतति घेते. ॥१०॥
सद्नुण जनार्दनचि, बा ! वक्षींच न लक्ष्मवत्स, ‘मानव’ या ।
म्हणुनि म्हणति जन; नृपसुत जे हा तन्मित्र तत्समानवया. ॥११॥
ते नृपनंदन दोघे संवत्सर पंच हिमनमीं तपले, ।
खपले न निराहारहि, पंचाक्षर मंत्र सर्वदा जपले. ॥१२॥
झाला प्रसन्न ईश्वर, भेटोनि, म्हणे तयांसि “वर मागा; ।
लज्जित करि देवांच्या ज्याचा पदपद्मरेणु परमागा. ॥१३॥
नमुनि प्रांजलि, वद्ले, “आम्हीं व्हावें अवध्य दनुजांस, ।
दितिजांस, अदितिजांसहि, राक्षसगंधर्वसर्पमनुजांस. ॥१४॥
जीं पाशुपत प्रमुखें अस्त्रें द्यावीं महेश्वरा ! सर्वें, ।
स्वपरशुहि, सहाय रणीं भूतहि दोघे बळी, तुवां शर्वें. ॥१५॥
द्यावें अभेद्य कवचहि, अच्छिद्य तसाचि चाप दे हातीं; ।
इतरांची शस्त्रास्त्रें जीं, देऊतया न ताप देहा तीं.” ॥१६॥
प्रभु ‘एवमस्तु’ ऐसें बोलुनि, दे एक भृंगिरिटिनामा, ।
कुंडोदराख्य दुसरा, त्यांच्या पुरवावया रणीं कामा. ॥१७॥
वर देउनि वरदेश्वर अंतर्हित होय; सिद्ध ते झाले, ।
त्याले प्रसादभूषा, ते डिंभकहंस, निजपुरीं आले. ॥१८॥
बंदुनि, निजवृत्त कथिति ते तात ब्रम्हादत्त राजाला, ।
तन्मित्रा मित्रसहा, झाला विष्णुप्रसाद बा ! ज्याला. ॥१९॥
सप्रेम भेटले ते श्रीहरिभक्ता जनार्दन मित्रा, ।
त्या हरिहरभक्तासीं झाल्या जनमेजया ! कथा चित्रा. ॥२०॥
बहु शांत, दांत, झाला सिद्ध जनार्दनहि विष्णुच्या भजनें; ।
बहु मित्रसह निवाला सदपत्यें, तप्त जन जसा व्यजनें. ॥२१॥
कृतदार तिघे देती सुख तातांतें, तसेंचि मातांतें, ।
जें हंसडिंभकांसीं कृष्णासीं वैर, परिस आतां तें. ॥२२॥
मृगयेसि हंसडिंभक सजनार्दन एकदा वनीं गेले; ।
क्रीडा करूनि पुष्करतीर्थनिकट कटकयुक्त ते ठेले. ॥२३॥
तेथें कश्यपमुनिकृतवैष्णवसत्रोत्थवेदनादातें ।
परिसुनि, जाउनि, नमिती सजनार्दन ते मुनींद्रपादातें. ॥२४॥
त्या विप्रांहीं त्यांचें केलें, आतिथ्य जें उचित, राया ! ।
कीं, साधु भूतमात्रीं हरि देखति, व्हावया शुचि, तराया. ॥२५॥
हंस म्हणे, “जन्मप्रद आम्हां जो ब्रम्हादत्त, सन्मुनिहो ! ।
“तो राजसूययाजी,” म्हणतों, “सुरराज तेंवि जन्मुनि हो.” ॥२६॥
आम्ही, जिणुनि नृपांचीं, भव्य करविणार राजसूय, शतें; ।
अस्मत्प्रसू मिरविती जें, कोणीही न राजसू यश तें. ॥२७॥
आम्ही समर्थ, शक्रहि शक्त न आम्हांपुढें रहायास, ।
झालों अजय्य विश्वीं शंभुवरें न करितां महायास. ॥२८॥
घेऊनि अग्निहोत्रें यावें अस्मत्पुरा, अहो ! मुनि ! हो ! ।
व्हावें सुखें सदस्यचि, जो अक्षम, तो श्रमी, न होमुनि, हो.” ॥२९॥
मुनिवर म्हणति, “बहु बरें, न म्हणे यज्ञास सर्वही ‘नाहीं,’ ।
ऋत्विक् सदस्य व्हावें विद्यासामर्थ्यगर्वहीनांहीं. ॥३०॥
येऊं, दीक्षा देऊं”, ऐसें बहु गोड बोलिले विप्र, ।
पुसुनि तयांसि, निघाले तेथुनि ते हंसडिंभक क्षिप्र. ॥३१॥
ते पुरुष्करोत्तरतटीं जातां तेथुनि धरावरा ! गेले, ।
सुयतीवरि मूढ, जसे कनकघटावरि शराव, रागेले. ॥३२॥
दुर्वास रुद्रात्मा, त्रिभुवन द्दकपात नाशिते ज्याचे, ।
हंस, परमहंस, बहु च्छात्र, ब्रम्हाज्ञ, राशि तेजाचे. ॥३३॥
ते हंसडिंभक तया म्हणती, “हा कोण भूतसा पापी ? ।
या तीर्थ, तरि म्हणावें कां न ‘क्षीर’ प्रभूत सापा ‘पी’? ॥३४॥
करिति, गृहाश्रम सोडुनि, अन्याश्रमकल्पना कशाला हे ? ।
नृपयम, यांपासुनि, जो दांभिक, तो अल्प ना कशा लाहे. ॥३५॥
या लोकीं, परलोकीं, शर्म न या कुपथकल्पका कांहीं, ।
यांहीं गृहाश्रम, जसा मानावा हंस अल्प काकांहीं”. ॥३६॥
यतिपति दुर्वासा जो, त्यातें वदले, “बुडोनि, अन्यास ।
बुडवाया केला हा मंदा ! त्वां प्रकट काय संन्यास ? ॥३७॥
चुकलास, स्वसुखाला, मुकलास, स्पष्ट मूर्ख गमलास, ।
भ्रमलास, श्रमलास, व्यर्थ कसा दुष्पथांत रमलास ? ॥३८॥
श्रेष्ठ गृहाश्रमचि धरा, दंडिन, न करील अस्मदाज्ञा, त्या, ।
समजे, विलंघिता हे, दवकीलासीच भस्मदा ज्ञात्या.” ॥३९॥
मुनि लंघितां तयांहीं मार्गीं, सन्निधि जसा अनयनांहीं, ।
चित्तीं म्हणे जनार्दन, “बहुत असति, परि असा अनय नाहीं.” ॥४०॥
भ्याला सविनय, झाला कंपित, कीं तो तपोनदीन मुनी ।
व्हाया प्रसन्न, पोटीं घालाया आग तें, पदीं नमुनी, ॥४१॥
त्यांतें दटावुनि म्हणे, “नृप ! हो ! करितां क्षयार्थ अन्याया, ।
मुख्याश्रम हा, कीं हो ! भजती ज्ञाते, त्यजूनि अन्या, या. ॥४२॥
बहुधा म्हणणार, तुम्हीं ऐसे अतिमंद मातगे ‘हा’ ची, ।
ज्ञानाश्रमापुढें रे ! वदतां हे काय मात गेहाची ? ॥४३॥
ज्ञान परम धर्माचें साधक आहे जगांत, इतरांचें ।
तुमचें अघसाधक हें शोकार्त करील हृदय पितरांचें. ॥४४॥
हा ! हा ! खळसख्यास्तव पडलेहि, पडेनही, महाविषमीं; ।
अन्याय कराल असा जरि, तरि सेवीन दहन, कीं विष, मी.” ॥४५॥
ऐसें वदे जनार्दन, कविहि रडे, बा ! बुधा ! रसाहि रडे, ।
कीं लंघिति भगवंता त्यासि, जसे जड सुधारसा हिरडे. ॥४६॥
उग्रें एकें नेत्रें दुर्वासा त्या खळाकडे पाहे, ।
सौम्यें अपरें नेत्रें देखतचि जनार्दनानना राहे. ॥४७॥
तो यतिपति अतिकोपन, लोप न व्हाया स्वशुद्धधर्माचा, ।
शिष्यांसि म्हणे, “येथुनि शीघ्र निघा, देश हा न शर्माचा.” ॥४८॥
वदला जनार्दनातें, “सत्वर येथूनि तूंहि बा ! निघ रे, ।
शांता कुसंग तापद, घनहि घृत ज्वलनसंगमें विघरे.” ॥४९॥
त्या दोघां मत्तांतें श्रीदुर्वासा म्हणे, “अरे ! खळ ! हो ! ।
पळ होमा तुमच्या मज न लगे, न क्रोधवन्हिचें बळ हो. ॥५०॥
ऐसें कोण मजपुढें बोलेल ? क्षुद्र हो ! उठा, राजे ।
ऐसेचि खळ, वचकले न मनीं रामाचिया कुठारा जे. ॥५१॥
ब्रम्हाण्य कृष्ण भगवान् तुमच्या सत्वर हरील दर्पातें, ।
लीलेनेंचि हरितसे; जैसा विनतातनूज सर्पातें.” ॥५२॥
ऐसें वदे निघे मुनि, घे तत्कौपीन हंस हिसकून, ।
साहे यतिपति भगवान्, त्या भस्म करावयासहि सकून. ॥५३॥
हा ! हा ! म्हणत पळाले यति अतिभयविकळकाय तेथून, ।
ऐसे प्रमत्त जे खळ, घेतिल बा ! म्हणुनि काय ते ‘थू’ न ? ॥५४॥
वारुनि म्हणे जनार्दन, “हें साहस कर्म काय रे ! हंसा ! ।
क्षोभुनि म्हणेल कीं रे ! वरद हर तुम्हांसि, ‘दुष्टहो ! ध्वंसा’.” ॥५५॥
साहे अत्यपराधा, सत्यपरा धाक देखत्या झाला; ।
मुनि मंद मंद ऐसें, क्रोधगरळ गिळुनि, बोलिला त्याला, ॥५६॥
“स्वपदाश्रितजनपीडक जे, त्यांतें नेतसे हरि लयाला, ।
हा गर्व सर्वनाशक, शर्वप्रियदेव तो हरिल याला, ॥५७॥
नच करिल असें तुमचा बंधु जरासंध, साधु तो व्यक्त, ।
भक्त ब्रम्हाकुळाचा, सज्जनंसरक्षणार्चनीं सक्त, ॥५८॥
त्यजिल यतिद्रोहें तो तुमचें बधुत्व; जरि न सोडील, ।
धर्म बुडेल तयाचा; मगधेंद्र जगीं अकीर्ति जोडील, ॥५९॥
जा रे ! द्दष्टिपुढुनि जा, हंसा कंसारि गर्व नाशील, ।
ज्या शील त्यजितें, त्या कां न त्रैलोक्यनाथ शासील.” ॥६०॥
प्रणता जनार्दनातें, मग दुर्वासा म्हणे, ‘अगा ! साधो, ।
स्वस्ति असो, तुज बाधो न भव, सदा भक्ति विष्णुची साधो. ॥६१॥
तुज भगवत्संग घडो, विप्रेंद्रा ! दुष्टसंगदोष झडो, ।
त्रासें अरिवर्ग दडो, साधुत्व तुझ्या गळां सदैव पडो. ॥६२॥
जा स्वगृहातें, वत्सा ! शुद्ध यशें शात्रवाननें मळिव, ।
अस्मत्स्मरण असों दे, स्वपित्याला सर्व वृत्त हें कळिव.” ॥६३॥
दंड, कमंडलु, भंगुनि, मांसें त्याच्या स्थळांत भाजवुनी, ।
अतिमत्त हंसडिंभक गेले, असुरादिकांसि लाजवुनी. ॥६४॥
साधुसभा पाहुनि खळ, चोर विलोकूनि पुनिव, रागेला. ।
त्या मागूनि जनार्दन, वंदुनि आत्रेयमुनिवरा, गेला, ॥६५॥
पंचसहस्त्र मुनिसह, श्रीदुर्वासाहि हरिपुरा गेला, ।
तापुनि म्हणे, “प्रभुवरिहि, केवळ मजवरिच न, रिपु रागेला.” ॥६६॥
घेववि भग्न कमंडलुदंडादि पदार्थ हरिस दावाया; ।
कीं दु;सह साधूसीं केला स्वीयाहि परिस दावा या. ॥६७॥
एकेचि अहोरात्रें तेथूनि द्वारकेसि तो पावे, ।
ज्याच्या तेजें शक्रप्रमुखांचेहि प्रताप लोपावे. ॥६८॥
स्नान करुनि वापींत, प्रभुच्या द्वारीं मुनींद्र तो पावे, ।
द्वा:स्थें त्यास कळविलें, जेणें पुरुषार्थ सर्व ओपावे. ॥६९॥
यतिवृंदसहित नेला, तो  दुर्वासा सभेंत, पद नमुनी; ।
भ्याले यादव,  म्हणती, “कां दिस्तो अप्रसन्नवदन मुनी ?” ॥७०॥
स्वकरें आसन मांडुनि, दुर्वासा बसविला रमारंगें; ।
तोही सुखासनावरि, जो यतिजन पातला तयासंगें. ॥७१॥
पूजुनि, म्हणे पभु, “वदा; न कळे मज, कोण हेतु आगमनीं ?” ।
या  प्रश्नें बहु आला मुनिच्या पहिला असा न राग मनीं. ॥७२॥
दुर्वासा प्रभुसि म्हणे, “वदसी न कळे असें कसें व्यक्त ? ।
सर्वज्ञ, सर्वसाक्षी, तूं, आम्ही तत्व जाणतों भक्त, ॥७३॥
तूं साक्षात् ब्रम्हा, मला वंचिसि, कृष्णा ! न हें तुला युक्त, ।
जड अज्ञानापासुनि झाले त्वच्चरणचिंतनें मुक्त. ॥७४॥
प्राकृत, अभक्त, नेणति; परि आम्ही जाणतों तुला पुरतें, ।
स्फुरतें त्वद्रूपीं जग, गंधर्वांचें जसें नभीं पुर तें. ॥७५॥
पकट करुनि, नाशाया जाडया, दु:खा, अघा, बरा काय, ।
‘न कळे’ या त्वच्छब्दें होइल दुसरा न घाबरा काय ? ॥७६॥
आम्हींच अभाग्य जगीं, करुण, ज्ञाताहि, न स्मरसि कांहीं; ।
हें काय बरें, व्हावें विघ्नज्वलनांत भस्म रसिकांहीं ? ॥७७॥
अति साहस हें, म्हणसी ‘न कळे’ सकलेश तूं कसें स्पष्ट ? ।
जरि नेणसि, सर्वज्ञा ! कृष्णा, तरि, परिस, कळवितों कष्ट. ॥७८॥
आहेत हंसडिंभक अतिखळ बळमत्त, मत्तपा अरि ते ।
करिते झाले विघ्न, श्रीशा ! मदसिंधु जे कधीं न रिते ! ॥७९॥
म्हणती गृहाश्रमासचि ‘हितकर’ ते, या ‘न’ मत्त पोर ‘हित’; ।
आम्हां ‘धर्मविनाशक, दांभिक, जड, दंडय, सत्तपोरहित.’ ॥८०॥
हे भंगिले कमंडलु, केलों मी नग्न, भग्नदंड, पहा; ।
मोडावा काय तिहीं मोक्षाश्रमशांतिवल्लिमंडप ह ? ॥८१॥
हें शालग्रामाचें संपुट, केले कसे पहा तुकडे ! ।
बुडत्याकडे, न कथितां, अघ, अयश, दिल्या न हाक, सेतुकडे. ॥८२॥
केले अजय्य वरदें रुद्रें, पाजूनि अमृत साप तसे, ।
पाप तसे तेचि जगीं, तत्तेजें साधु सर्व तापतसे. ॥८३॥
बा ! त्यांपुढें टिकाया शक्रहि न समर्थ, काय मग अमर ? ।
न करिल अधीनमृत्युहि भीष्ममहाराज, बाल्हिकहि समर. ॥८४॥
सर्वक्षत्रभयंकर मागधही फार यास भीताहे, ।
रावणसम तो गमतो सानुज, तव पुण्यकीर्ति सीता हे. ॥८५॥
त्यातें वदलों, ‘नाशिल कृष्ण तुझा सर्व गर्व हंसा ! रे !’ ।
संसारेच्छाशमना ! तें सत्य करीं मद्नुक्त कंसारे ! ॥८६॥
जरि हंसडिंभकांचे करिसिल चक्रानळीं न हुत काय, ।
तरि ‘रक्षिसि’ हा शब्द व्यर्थचि होतो, वदों बहुत काय !” ॥८७॥
नमुनि श्रीकृष्ण म्हणे, “स्वामी ! माझाचि होय हा दोष, ।
रोष स्वांतीं न धरीं, देइन, दुष्टांसि दमुनि, मी तोष. ॥८८॥
शक्र, यम, वरुण, धनपति, विधि, किंवा त्यासि हर असो वरद, ।
पर दक्ष असे वधिनचि; मम शर खर, तक्षकाहिचे न रदे. ॥८९॥
होइल सर्वक्षत्रियकाळ मगधपाळही जरि सहाय, ।
तरिहि म्हणाया लाविन बा ! विनयानास्पदा अरिस ‘हाय.’ ॥९०॥
जा, स्वस्थ समाधि धरा, तुमचें याउपरि चित्त साधि न हो, ।
सद्रक्षण भद्र क्षण न विलंबुनि, कीर्तिवित्त साधिन हो !” ॥९१॥
दुर्वासा प्रभुसि म्हणे, “स्वस्ति सदा तुज असो, अगा ! धात्या ! ।
तूंचि अगाध, न सागर, लाजविसि दयार्णवा ! अगाधा त्या. ॥९२॥
तूं मी, मी तूं, तरिहि प्रार्थितसें बा ! तुला अगाधाला, ।
वदलों कटु, क्षमावें,  तुजचि भजुनि जन, न त्या अगा, धाला.” ॥९३॥
कृष्ण म्हणे, “भगवंता ! त्वांचि करावी क्षमा, न कोपावें, ।
ओपावें अभय, अशन व्हावेंचि, ‘पुरे’ म्हणों नको,अ पावें.” ॥९४॥
मुनिवर म्हणे, “बहु बरें,” प्रभु करवि चतुर्विधान्न, बहु तर्पी, ।
सर्वांसि, मृदु दुकूलें फादुनि, कापीन, शाटिका अर्पी. ॥९५॥
प्रभुसि पुसुनि, वरकड यति गेले, संन्यासिराज तो राहे, ।
नारद मुनिसह शुद्धब्रम्हात्मविचार सार बा ! पाहे. ॥९६॥
त्या काळीं तातातें हंस म्हणे, “राजसूय तूं यत्नें ।
प्रारंभीं, नृप जिंकुनि, आम्ही बहु साणितों धनें, रत्नें.” ॥९७॥
त्यातें म्हणे जनार्दन, “हंसा ! साहस करावया स्वमतें ।
झालासि सिद्ध, तातहि म्हणतो ‘हूं’, परि मला कठिन गमतें. ॥९८॥
असतां भीष्म महाबळ भूवरि, बाल्हिक नरेंद्रही असतां, ।
असतां यादव, बा ! दव शत्रुतृणाचा मुकुंदही वसतां, ॥९९॥
‘इष्ट’ परि ‘जिंकिला ज्या वीरवरें, भीष्म काय सवघड तो ? ॥१००॥
वीर्य जरासंधाचें जें समरीं, जाणतोसि हंसा ! तें; ।
बा ! बाळ कृष्ण वधिता झाला, केशीं धरूनि, कंसातें. ॥१०१॥
तूं ‘क्रुतु करीन’ म्हणसी, पण सीरायुध रणीं न आटेल, ।
फाटेल स्पष्ट हृदय, तो साक्षात् क्रुद्ध काळ वाटेल, ॥१०२॥
केला विरोध ज्यासीं, तो यतिपति केशवाकडे गेला, ।
मज वृत्तांत श्रुत हा सद्द्विप्रें भोजनागतें केला. ॥१०३॥
क्रतु साधीं, पण आधीं मंत्र करायासि बा ! बहा सचिव, ।
पाया हा या यज्ञप्रातादाचा सख्या ! बरा रचिव.” ॥१०४॥
तो हंस म्हणे, “सखया ! काय भिववितोसि ? भीष्म तो दशमी; ।
लीलेनेंचि तयाचें हरिन क्षणही न लागतां यश मी. ॥१०५॥
कृष्णहि काय मजपुढें ? काय हलायुध ? जया सुरा सुरसा, ।
प्राप्त बरा मज सात्यकि मायाविवरा मयासुरा सुरसा. ॥१०६॥
मागध तो धर्मात्मा हो बंधुचि, कार्य आमुचा मख या, ।
न खयानस्था दुस्तर सिंधु, सव शिवाश्रिता मला, सखया ! ॥१०७॥
जा द्वारकेसि, आज्ञा कृष्णास स्पष्ट सांग, कीं ‘लवण ।
आणूनि, राजसूया ये,’ धाडूं आत्मसम दुजा कवण ? ॥१०८॥
माझा शपथ तुज असे, म्हण, सखया ! न करितां नकारा, ‘हूं.’ ।
बळकृष्णासि म्हण, ‘लवणकर घेउनियां चला, नका राहूं.” ॥१०९॥
झाली जनार्दनाला मान्या आज्ञा तसीच हंसाची. ।
भगवद्भक्तश्रेष्ठा त्या अक्रूरा जसीच कंसाची. ॥११०॥
जाणे, ‘आज्ञालंघन सोसिल न क्रूर पाप हां; याला ।
पुसुनि, प्रेमें प्रभुतें गेला अक्रूरसा पहायाला. ॥१११॥
बसुनि सदश्वीं, जातां द्वारवतीच्या धरूनि वाटेतें, ।
निज धन्यत्व तया जें, याहि, प्रभुतें स्मरूनि, वाटे तें. ॥११२॥
खळसंसर्गें होतो पुरुषार्थयशांत फार जरि तोटा, ।
खोटा, तरि तो मानी हंसासीं मित्रभांव हित मोटा. ॥११३॥
मिळतां सुदुर्लभ अमृत, तृषित न जाईल कां तडक ? राया ! ।
बा ! वत्स सोडितांही, लागे, सुटलाहि, तांतड कराया. ॥११४॥
हांसे द्वारवतींत द्विज बहुबहु, पाहता हरि समोर; ।
नीरद गर्जे, वर्षे, हर्षे, परि बहु तयापरिस मोर. ॥११५॥
युयुधान पुढें, पार्श्वीं नारद, बळभद्र ज्याजवळ आहे, ।
यतिपतिसीं कृतकथ, यदुराजपुरस्कृत, अशा प्रभुसि पाहे. ॥११६॥
स्वमनीं म्हणे जनार्दन, “लाजविलें भास्करासि वर देहें, ।
कैसा मी प्रभुसि म्हणों, ‘हंसाला लवणरूप कर दे’ हें ? ॥११७॥
ब्रम्हाण्य, सर्वसाक्षी, सदय, मला नच म्हणेल ‘अपराधी,’ ।
नमुनि, विशंक वदावें, उचिता प्रभुच्यापुढें न अपरा धी. ॥११८॥
करुनि विचार द्दढ असा, प्रभुसि सुधर्मेंत तो करी नमन, ।
घालुनि, उडी, म्हणे जो करुणार्णव, “हृष्ट हो करीनमन.” ॥११९॥
मग रामातें वंदी, होय प्रोद्भूतपुलक, राया ! तें ।
प्रेम प्रभुनेंचि दिलें, त्याचें अतिधन्य कुल करायातें. ॥१२०॥
“मी हंसडिंबकांचा दूत ब्राम्हाण जनार्दनाख्य असें;” ।
कळवी खळवीर्यतिमिरसूरा शूरान्वयोत्तमासि असें, ॥१२१॥
देव म्हणे, “दूतपणें जरि तूं आलासि शिष्ट, रामातें ।
सांग निरोप, तसाचि प्रकट, अधिष्ठूनि विष्टरा, मातें.” ॥१२२॥
बसला जनार्दन, तया कुशल पुसे विश्वगुरु, करी धन्य, ।
मित्रसहाचेंहि; असा न पिताहि असेल, कोण हो ! अन्य ? ॥१२३॥
जो ब्रम्हादत्तराजा, जे तत्सुत हंसडिंभक क्षुद्र, ।
त्यांचेंही कुशळ पुसे, वर देता जाहला जयां रूद्र. ॥१२४॥
प्रभु मग संदेश पुसे, करि बहु संकोच विप्र सांगाया, ।
देव म्हणे, “अभय असे, वद, तूं संकोचलासि कां गा ! या ?” ॥१२५॥
प्रार्थुनि, जनार्दन द्विज सांगे संदेश अभयवरदास, ।
“रुद्राचे ते मागति तुजपाशीं लवणरूप कर दास. ॥१२६॥
तो ब्रम्हादत्तराजा करिताहे राजसूय, जाणावें, ।
तुज हंसडिंभकांची आज्ञा, कीं ‘विपुल लवण आणावें’.” ॥१२७॥
हास्य करि प्रभु; नारद, दुर्वासा, उग्रसेन, बळभद्र, ।
अक्रूरोद्धव, सात्यकि, म्हणती, “पावेल कोण खळ भद्र ?” ॥१२८॥
भगवान् म्हणे, “न झाले मज करिते कवि जगीं कवण करद ? ।
बहु निपुण हंसडिंभक, कां हो न करितिल हे लवणकरद ?” ॥१२९॥
जगदीशातें जे जड म्हणती, कीं “लवण आण वाहोन,” ।
बहु हास्य काय ? त्याच्या कदना कवि कवण आण वाहो न ? ॥१३०॥
लाजे जनार्दन, कथुनि तैसा बहु हास्यहेतु संदेश, ।
होय अधोवदन, म्हणे, “तेही, तन्मित्र मीहि, मंदेश.” ॥१३१॥
श्रीकृष्ण म्हणे, “विप्रा ! त्या हंसा, डिंभका, असें सांग, ।
‘शार्ड्गप्रेषित खरतर शर देतिल लवणकर तुम्हां चांग. ॥१३२॥
अथवा इच्छितसां जें, येतों द्याया सनंदक, लहा तें. ।
चक्र च्छेदिल शिर, जरि जाल तुम्ही जाडयकंद कलहातें. ॥१३३॥
योजा प्रयाग, मथुरा, कीं समरस्थान तीर्थ पुष्कर, हा ।
मी झालों सिद्ध, तुम्ही व्हा, किंवा मुख करूनि शुष्क, रहा; ॥१३४॥
वरद महेश्वरहि तुम्हां समरीं होइल सहाय जरि काय, ।
त्यासहि जिंकुनि, तुमचे शतखंड रणीं करीन तरि काय.’ ॥१३५॥
त्यापाशीं मित्रत्वें तुजला नच बोलवेल हें, भक्ता ! ।
तुजसह या सात्यकिला पाठवितों, हा असे महावक्ता. ॥१३६॥
मत्स्नेह असे तुजवरि, तूंही आहेशि भक्त वरशील, ।
हो मत्कथापर सदा, विजयी होशिल भवांत, तरशील.” ॥१३७॥
सात्यकिस म्हणे प्रभुवर, “घटजमुनि जसा सरस्वदोघांतें, ।
शोषु प्रताप माजा द्रुत: न म्हणो त्या ‘सर स्व दोघांतें. ॥१३८॥
जा करुनि समरनिश्वय, ये सत्वर सत्वरक्षणा, वीरा ! ।
ती राजश्री लाजो, रविस शशिश्री, तसी तुला धीरा !" ॥१३९॥
प्रभुतें नमुनि, जनार्दनसह सात्यकि वीर शाल्वपुर पावे, ।
जेणें परभट शस्त्रें, जेंवि तृणांकुर, समूळ खुरपावे. ॥१४०॥
एकीं तुरगीं बैसुनि आत्यकि असहाय परपुरीं गेला, ।
हंसा जनार्दनें तो भेटविला, स्थान जो यशें केला. ॥१४१॥
‘हा सात्यकि दक्ष भुज प्रभुचा’, हें विप्र तो तया कळवी; ।
असती जसी पतीस प्रेरुनि, कुनियति जया गुरु च्छळवी. ॥१४२॥
मग तो त्या सद्विप्रें डिंभासीं वृष्णिवीर भेटविला, ।
क्रोधाग्नि प्रभुलंघनवातें ज्याच्या मनांत पेटविला. ॥१४३॥
हंस पुसे कृष्णाचें कुशळ, बळाचें, तसेंचि अन्याचें, ।
सांगे सस्मित सात्यकि म्हणुनि तया “सर्वधन्य धन्याचें.” ॥१४४॥
त्यावरि वरदर्पित तो हंस पुसे त्या जनार्दना आर्या, ।
“त्वां कृष्ण देखिला कीं ? सिद्ध करुनि पातलास कीं कार्या ?” ॥१४५॥
विप्र म्हणे, “हंसा ! मी झालों कृतकृत्य कृष्ण पाहून, ।
प्रभुदर्शनसुखबहु, बा ! न गमे बहु मोक्षसुखहि याहून. ॥१४६॥
दर्शनसुख मी जाणें, हृदयीं, नयनांत,  रेखिला हरि तो; ।
क्ष्मापा ! बापा ! तापा पापा मापाल देखिला हरितो. ॥१४७॥
नारदमुनि, दुर्वासा, कृष्णप्रभु चंद्रमा, चकोरा या; ।
त्रिभुवनपति अतितेजा, त्याला ‘कर दे’ म्हणूं नको, राया ! ॥१४८॥
होसिल दंडय, हटातें, संपादायासि लवणकर, करुनी; ।
काळें बद्ध न केला पाशांहीं तदरि कवण करकरुनी ? ॥१४९॥
हरिसीं शशसा, क्षम तूं त्या प्रभुसीं न कलहा, निरोपानें ।
बहु हांसला अजित हरि, करिल तुझी सकलहानि रोपानें. ॥१५०॥
दाटुनि दुराग्रहातें न मनीं आणून कोचकी नाशीं; ।
प्रभुचा प्रसाद हंसा ! थोडा जाणूं नकोच कीनाशीं.” ॥१५१॥
हंस म्हणे, “रे ! ब्राम्हाणदायादा ! वदसि काय ? वाचाळा ! ।
तुज लाविला खरा त्या बहुमायें केशवेंचि हा चाळा. ॥१५२॥
त्रैलोक्यजया सानुज मी सिद्ध, शिवप्रसादपात्रास ।
मज हंसा दाखविसी, गोपास स्तवुनि, काय हा वास ? ॥१५३॥
मज अन्नदा न मानिसि, न गणिसि माझ्या महातपा, पोरा ! ।
मित्र, द्विज, म्हणुनि, तुझ्या चूर्ण करी हा न हात पापोरा. ॥१५४॥
न करीं स्पर्श कृतघ्ना ! मज शिवपदनखरशिचकोरा; हूं, ।
जा जीवदान दिधलें ऊठ कसा, मत्पुरीं नको राहूं.” ॥१५५॥
यापरि सख्यासि विटऊनि, सात्यकिस म्हणे, “कशास आलास ? ।
वद, कां रे ! त्य गोपें कर न दिला ? काय मूक झालास ?” ॥१५६॥
ययुधान म्हणे, “हंसा ! जेणें केलीं पराननें असितें, ।
देणार कृष्ण तुजला कर, कवळुनियां करें तया असितें. ॥१५७॥
धृष्टा ! कृष्णापासुनि वांच्छिसि, न गणूनि काय हानि, कर ? ।
व्यसनार्णवीं बुडाया, दाटुनि करितोसि काय हा निकर ? ॥१५८॥
जगदीश कृष्ण भास्कर, तूं पामर काजवा, खरकरा या ।
कर मागसि ! काय क्षम खङगाधिक काज वाखर कराय. ॥१५९॥
जी वदली ‘कर दे,’ दे तव जिव्हा सर्वथैव कापावी, ।
पापा ! वीतविवेका ! साधुसभा दुर्वचें न तापावी. ॥१६०॥
बलभद्र, बभ्रु, सात्यकि मी, सारण, निशट, विपृथु, सारंग, ।
उत्कल,कृतवर्मा, कवि उद्धव, हरि; सर्व शत्रु सारंग. ॥१६१॥
हे दश सहाय आम्ही युद्धांत प्रभुपुढें रहायाचे. ।
अस्मत्प्रहार दु:सह, अन्याचे ते सुखें सहायाचे. ॥१६२॥
पुष्कळ आम्हीच असों, श्रम नलगे मारितां तुला लेश, ।
करिसि कराज्ञा प्रभुला ! ब्रम्हाधिक काय रे ! कुलालेश ॥१६३॥
घालूं गांठि तुम्हांसीं आम्ही, दंभोलि जेंवि शैलासीं, ।
बैलासी व्याघ्र जसे; तुमचा राहेल वरद कैलासीं. ॥१६४॥
पुष्कर, कीं गोवर्द्धन, कीं मथुरा, कीं प्रयाग हें, सदरे ! ।
करणार युद्ध कोठें प्रभुसीं ? तूं स्थान शीघ्र तें वद रे ! ॥१६५॥
तो अधमाधम खालीं पाहवितो यदुपहास वितयातें, ।
काय तुम्ही ? रे ! तेजें लाजवितो यदुप हा सवितयातें.” ॥१६६॥
ऐसें सात्यकि वदला, रगडूनि समक्ष दप साराया; ।
सानुज हंस खवळला, वळला क्षतपुच्छ सर्पसा, राया ! ॥१६७॥
हंस म्हणे, “रे ! यादवदायादा ! वदसि, भीड सोडून, ।
तोडून दूतमस्तक, मद्भुज न मळेल, अयश जोडून. ॥१६८॥
कोठें रे ! स्त्रीहंता ? कोठें पीता सुरा ! रिपो ! कळतो ।
कर्मेंचि गोप जाणें, मायाभीतासुरारि पोकळ तो. ॥१६९॥
पाशुपत दिलें रुद्रें, आम्ही केलों अवध्य, गोपा ! रे ! ।
आम्हां ती द्वारवती काय ? कडे मेरुचेहि सोपारे. ॥१७०॥
यादव धरितों, करितों दासी तुमच्या स्त्रिया, तया गोपा ।
कोपानळांत हवितों, त्रिजगहि न पुरेल आमुच्या कोपा. ॥१७१॥
कातर हा, तरचि  पळुनि, करुनि नगर सागरीं, हरि लपाला. ।
आम्हांपुढें किति तुम्ही ? खर वायु न काय रे ! हरिल पाला ? ॥१७२॥
जें अयशस्कर, न करी ज्ञाता, चरितें मळासि धूता, तें. ।
जा, अभयदान दिधलें, प्रभुनें मारूं, नयेचि दूतातें. ॥१७३॥
या सर्व दीर्घ निद्रा पुष्करदेशीं करावया, जड हो ! ।
गोमायुगृध्रवायसभोजन तुमचें रणांगणीं धड हो.” ॥१७४॥
सात्यकि म्हणे, “सुजड ! हो ! जातों अजित प्रभूसि आणाया, ।
खाणायास तुम्हांतें, पुरलें आयुष्य सर्व जाणाया. ॥१७५॥
निश्चय उद्यांचि तुमच्या अथवा केला वधासि परवांचा. ।
आतांचि मारितों, परि मी दूत; तुम्हीहि वध्य, पर वांचा.” ॥१७६॥
सात्यकि यापरि तेजें त्या हंसा, डिंभका, अरिस दापी. ।
जाउनि वृत्त कथी त्या, ज्याचें खळजीवना अरि सदा पी. ॥१७७॥
प्रभुवरी निघे बळसहित भस्म कराया रणांत अरिसेना, ।
कीं ‘कर घेइनचि’ म्हणे हंस, सुहृत्सूक्ति किमपि परिसेना. ॥१७८॥
पावे सरामसात्यकि सहवृष्णिसमूह पुष्करा क्षम हा, ।
तत्रस्थ ब्राम्हाण जे, त्यांतें दे देव पुष्कराक्ष महा. ॥१७९॥
ते हंसडिंभकहि मग गेले, त्यांच्या महाचमू वशगा, ।
परमोत्साहवती त्या गणिल्या अक्षौहिणी नृपा ! दश, गा ! ॥१८०॥
रुद्राक्ष भस्म देहीं ज्यांच्या, शिवनाम आननीं पूत, ।
भूत प्रभुदत्त पुढें, भ्यावे बहु मृत्युचेहि ज्या दूत. ॥१८१॥
दानव विचक्रनामा, त्याचेंही असुरवीर बहुलक्ष, ।
जो पूर्वीं शक्रातें जिंकी, करि युद्ध विष्णुसह दक्ष, ॥१८२॥
द्वारवतीप्रति पावुनि, जो पीडी यादवांसि समरांत, ।
देवासुरसंग्रामी जो प्रकटी उग्र तेज अमरांत. ॥१८३॥
तो हंसडिंभकांच्या साहित्याला सखा स्वयें आला, ।
ज्याला देवसमूह, व्याघ्रा मृगसा, विलोकितां भ्याला, ॥१८४॥
ज्याचें उग्रत्व सदा बहुमानुनि, तक्षकेंहि वानावें, ।
तैसाचि विक्रमाचा अत्यंतसखाहि डिंभ या नांवें. ॥१८५॥
ज्या राक्षसनाथाचे, हरिते अरितेज, बहु समर करितें, ।
अष्टाशीतिसहस्त्र क्षणदाचर, असि, शिला, परिघ धरिते. ॥१८६॥
गेले ते नृप, जेथें श्रीपुष्कर, पुष्कराक्ष, बा ! राया ! ।
या दोघांसम कोणी नाहींच समर्थ जीव ताराया. ॥१८७॥
पुष्कर, पुष्करनेत्र, स्मरणें तारिति अगा ! नरवरा ! हे, ।
साधुसभेंत यशाचा यांच्या क्षणही न गानरव राहे. ॥१८८॥
बा ! जनमेजयराया ! श्रीपुष्कर पुष्कराक्ष लोकांत ।
तारक सारकविस्तुत बंदी देती पडों न शोकांत. ॥१८९॥
त्या हंसडिंभकाच्या बळकृष्णाच्या चमू तदा ज्ञात्या ।
अत्युत्साहें मरती, मारिति, होतां रणा तदाज्ञा, त्या. ॥१९०॥
सप्ताशीतिसहस्र द्विष हत झाले, रथी रणीं लक्ष, ।
मध्यान्ह होय जों, तों सादीही तीसकोटि, जे दक्ष, ॥१९१॥
मोठा झाला संगर, भंग रथी पावले, बहु गळाले, ।
किति पुष्करांत सिरले, किति हंसाचे भयें भट पळाले. ॥१९२॥
श्रीकृष्ण विचक्रासी, करि हंसासीं बळी हळी युद्धा, ।
युयुधान डिंभकासी, यश लोकीं मेळवावया शुद्ध. ॥१९३॥
राक्षस हिंडब यासीं करिती वसुदेव, उग्रसेन, रण, ।
तेव्हां नारदमुनिला होय श्रीरामलक्ष्मणस्मरण. ॥१९४॥
ताडी हरि त्रिसप्तति खर शर निकरें विचक्रवक्षातें; ।
साहे संधान परम शीघ्र तसें त्यांत युद्धदक्षा तें. ॥१९५॥
एकेंचि शरें ताडुनि वक्ष:स्थल, सर्वलोकवीरा या ।
दानव विचक्रनामा बहु भडभड रक्त ओकवी, राया ! ॥१९६॥
क्षोभे प्रभु, तोडी ध्वज, पाडी हय, सूतमस्तक च्छेदी, ।
घे दीनत्व न दानव, विरथहि झाला रणीं न तो खेदी. ॥१९७॥
असुर रथावरुनि उडी घाली, घेउनि गदा, तिणें तूर्ण ।
अत्यंत क्रोधानें त्या रणरंगीं करावया चूर्ण, ॥१९८॥
ताडी प्रभुसि किरीटीं प्रथम, मग क्षिप्र अरि ललाटांत, ।
भट समितींत, जलधिच्या न तसि मकर केलि करिल लाटांत. ॥१९९॥
मग सिंहध्वनि करुनि, क्षिप्रतर विचक्र तो सुरद्वेषी ।
भ्रमवुनि शतगुण, लक्षुनि भगवदुर:स्थळ, महोपळ प्रेषी. ॥२००॥
झेलुनि महाशिळेतें, जगदीश तिणेंचि दानवा ताडी, ।
पाडी मूर्च्छित भूवरि, तद्देहस्मृति दिगंतरीं धाडी. ॥२०१॥
संज्ञा पावुनि, दैत्य क्रोधें घे शीघ्र उग्र परिघातें, ।
लोकत्रयांत अद्भुत संपादायासि कीर्ति हरिघातें. ॥२०२॥
“या परिघें गोविंदा ! गर्व तुझा सर्व आजि मी हरितों, ।
करितों गतासु तुजला, विजयश्रीतें रणांगणीं वरितों. ॥२०३॥
देवासुरसमरीं जो कृतवर्मा वीर, तोचि मी आहें, ।
पाहें प्रताप, भुज हे ओळख, परिघप्रहार हा साहें.” ॥२०४॥
ऐसें वदुनि, विचक्र क्षेपी क्रोधें शके न परि घाया, ।
केशव खङ्गें खंडी, अहिस शिखंडी तसेंचि, परिघा या. ॥२०५॥
मग शतशाख महाशिख तरु टाकी तो विचक्र अरि, त्यांतें ।
खङ्गेंचि प्रभु तोडी प्रेक्षकशक्रादिधैय हरित्यातें. ॥२०६॥
सुचिर क्रीडा करुनि, प्रभु तो त्या दानवासि माराया ।
दहनास्त्रमंत्रिताशुग सोडी संगरसवांत, बा ! राया ! ॥२०७॥
तो शर असुरशरीरा धावुनि वेगें सखातसा पेटे; ।
दहनें तृणराशि जसा, तेंवि विचक्र क्षमावरा ! पेटे. ॥२०८॥
पाहुनि विचक्रगतितें सिरले हतशेष असुर जलधींत, ।
ते अद्यापि न फिरती, कैसें राहेल धैर्य मळधींत ? ॥२०९॥
बळभद्र दशशरांहीं ताडी हंसासि, पांच तो सोडी, ।
त्यातें दश बाणांहीं हांसुनि बळदेव अंतरीं तोडी. ॥२१०॥
राम ललाटीं हंसा नाराचें बा ! मनुष्यपा ! वेधी, ।
त्याची क्षण मोहातें, न धरूं द्याया धनुष्य, पावे धी. ॥२११॥
मग लब्धसंज्ञ हंसहि शर हाणी, रक्त तो हळी वमला, ।
ज्या सर्व मुमुक्षु म्हणे, “भगवंता ! तत्व तूं कळीव मला.” ॥२१२॥
सोडी सप्तसहस्र क्रूराशुग बळ, करी रथा पिहित. ।
जरि दुरभिमान घातक, वाटे मत्ता जना तथापि हित. ॥२१३॥
ध्वज तोडुनि, हय मारुनि, हरिसा गर्जोनि, खळविरामातें, ।
सूतातें वधुनि, रणीं हंस स्वोकर्ष कळवि रामातें. ॥२१४॥
राम रथावरुनि उडी टाकी, घेउनि महागदा हातें, ।
जीच्या अंगीं तेज न शत्रुमदाच्या महागदाहातें. ॥२१५॥
हंसहि महागदेतें कवळुनि, घाली उडी रथावरुनी,।
करिति गदायुद्ध परम दारुण दोघेहि, न व्यथा वरुनी. ॥२१६॥
मुनिसुर नारदशक्रप्रमुख गदायुद्ध अतुळ पाहून, ।
वदले, ‘झालें न असें, मग होइल काय अधिक याहून ?’ ॥२१७॥
सात्यकि, डिंभक, दोघे करिति महावीर युद्ध हे तुमुल, ।
कीं शूरा यश, तैसें वृद्धाहिन परमहर्षहेतु मुल.  ॥२१८॥
सात्यकि दश शर, डिंभक तो पंचसहस्र, संगरीं सोडी; ।
तोडी माधव, याच्या लागे देवासि बहु रणीं गोडी. ॥२१९॥
डिंभक सप्त शरांहीं वेधुनि, वेधी पुन्हाहि लक्षानें, ।
धनु तोडिलें तयाचें सात्यकिनें परमयुद्धदक्षानें. ॥२२०॥
अन्य धनुष्यें डिंभक हाणी उग्र क्षुरप्र, तों गमला ।
काळभुजंगचि डसला, युयुधान क्षतज भडभडा वमला. ॥२२१॥
तेंही कार्मुक सात्यकि तोडी, डिंभक पुन्हाहि घे चाप, ।
खर शर मर्मीं हाणी, युयुधानातें असहय दे ताप. ॥२२२॥
युयुधान तेंहि कार्मुक खंडी, तों घे पुन्हाहि तो धनुतें, ।
हाणी खर शर, केले खंडित त्या यादवें सुयोधनुतें. ॥२२३॥
सात्यकि अशीं दशोत्तर शत कोदंडें रणांगणीं खंडी, ।
गमली माधवकार्मुकवल्लिमहाशक्ति ती जशी चंडी. ॥२२४॥
त्यजुनि धनुष्यें, डिंभक सात्यकि करवाल संगरीं धरिती, ।
ते बत्तिस प्रकार भ्रांतोद्भांतादि तेधवां करिती. ॥२२५॥
“अर्जुन, सात्यकि, केशव, डिंभक, गुरु, शर्व, वीरवर सा हे ।
प्रख्यात, न प्रतापा यांच्या समरांगणांत पर साहे.” ॥२२६॥
ऐसें वदले ज्ञाते, सुर, मुनि, गंधर्व, सिद्ध पाहून, ।
राहून नभीं, त्यांवरि सुस्तवपुष्पें प्रभूत वाहून. ॥२२७॥
करिति स्वधर्म यास्तव रण वसुदेवोग्रसेन हे दशमी, ।
त्यांसि हिडिंब म्हणे, “रे ! तुमचें हरितों समग्रही यश मी.” ॥२२८॥
घटकर्ण तसा भौषणकाय खचर खाय वृष्णिसैन्यातें, ।
देता झाला समरीं वीरांतें तो हिडिंब दैन्यातें. ॥२२९॥
हिसकुनि घेऊनि, मोडी तो वसुदेवोग्रसेनचापांतें, ।
वीरांतें कंपप्रद झाला, पक्षींद्र जेंवि सापातें. ॥२३०॥
वृद्ध भिऊनि पळाले, राया ! देऊनि पाठ, रक्षा या, ।
पसरुनि वद्रन भयंकर, लागे मागें तयांसि भक्षाया. ॥२३१॥
“मज खाऊं द्या, खावें तुमचें, गेहांत न वपुरोगानें. ।
युद्धीं मेल्या, स्वर्गीं व्हाल सुखी नित्यनवपुरोगानें.” ॥२३२॥
ऐसें राक्षस गर्जे, उत्तर देती न वृद्ध खळपा हे. ।
व्याघ्राघ्रात हरिणसे दोघे दूरूनि देवबळ पाहे. ॥२३३॥
ज्यांसी करीत होता संगर, तो हंस कंसकाळाला ।
देउनि, धावुनि, गांठी राम हिडिंबा पलाशपालाळा. ॥२३४॥
“रे ! वृद्ध राजसत्तम सोडुनि, मजसी निशाचरा ! भीड.” ।
राम म्हणे कीर्तिमहाहंसीचा अतिमनोज्ञ जो नीड. ॥२३५॥
ऐसें ऐकुनि, गांठी त्या रामा वृष्णिसत्तमा, राया ! ।
द्दढ मुष्टिनें उरावरि ताडी तो वीर्यमत्त माराया. ॥२३६॥
रामहि निशाचरातें, सोडुनि कोदंड, मुष्टिनें ताडी, ।
चिर रण करुनि, तळांहीं वदनीं ताडूनि, भूतळीं पाडी. ॥२३७॥
बाहु धरुनि, उचलुनियां, गरगर फिरवूनि, राम शूरवर ।
युग्मक्रोश झुगारी, पडुवि, उठुनि, पळूनि, जाय दूरवर, ॥२३८॥
हतशेष खचरजन तो जाय, दिगंतासि, अर्कही अस्ता. ।
त्रस्तात्मसैन्य घेउनि हंसहि गोवर्धना महाशस्ता. ॥२३९॥
तीर्थीं रात्रि क्रमुनि प्रात:काळीं निघोनियां सबळ ।
गौवर्धनासि गेला हरि, अरिकरिचा करावया कवळ. ॥२४०॥
गिरिच्या उत्तरपार्श्वीं, यमुनातीरीं, स्थळीं महाशुद्धीं, ।
त्या हंसडिंभकांतें सर्वहि यदुवीर गांठिती युद्धीं. ॥२४१॥
शर उग्रसेन हाणी त्या हंसातें त्रिसप्तति क्रोधें, ।
वसुदेव सप्त, सप्तचि सात्यकि, सर्वेंहि मान्य जो योधें. ॥२४२॥
दश कंक, पंचविंशति अनुजयुता त्या सुबाण सारण गा ! ।
उद्धव दश, तीस निशठ, त्या विपृथु अशीति तामसा रणगा. ॥२४३॥
प्रद्युम्न शर त्रिंशत, सप्त विशिख सांब, शत्रुवरि वृष्टी ।
असि करिति, एकषष्टि क्षेपी अत्युग्र शर अनाधृष्टी. ॥२४४॥
ते वीर हंसडिंभक, एकैकातें दहादहा बाण ।
हानुनि, ओकविति रुधिर, विकळ करिति सर्वयादवप्राण. ॥२४५॥
झाले सिद्ध पळाया यादव, वारुनि तयांसि, बळ हातें, ।
होय पुढें, हंसासीं, धनु धरुनि, करावयासि कळहातें. ॥२४६॥
त्या रामावरि डिंभक धांवे, करि हंस विष्णुसीं समर; ।
गगनीं बसुनि विमानीं, देखति शक्रादि सर्वही अमर. ॥२४७॥
प्रभु, राम, हंस, डिंभक, राया ! जगदेकवीर हे चवघे, ।
देव म्हणति, “सबाधिक शस्त्रीं, अस्त्रीं, बळीं, रणीं, अवघे.” ॥२४८॥
हे भक्त हंसडिंभक, वरदें देवें मनांत आठविले, ।
त्यांते कैलासाहुनि भूतप दोघे सहाय पाठविले. ॥२४९॥
त्या अद्भुत संग्रामीं सर्वांहीं स्वस्वशंख वाजविले, ।
ते सकळ रव प्रभुनें निजदरनादेंकरूनि लाजविले. ॥२५०॥
तों दोघे भूतेश्वर धानुनि, कृष्णासि ताडिती शूळें, ।
प्रभु काय ? काय ते ? बा ! भंगावा अमृतरस कसा गूळें ? ॥२५१॥
हंसुनि, रथावरुनि उडी टाकी, हरिसा करूनि वेग, हरी; ।
त्या दोघां भूतांतें क्षिप्र महद्भूत देवदेव धरी. ॥२५२॥
शतगुण गरगर फिरवुनि, उडवि तयां प्राप्त होय कैलास, ।
हें काय ? कोटियोजन उडविल भगवान् सुमेरुशैलास. ॥२५३॥
कैलासाचळशिखरीं स्वप्नांत जसे, तसेचि ते पडले, ।
रडले, प्रेमें, विस्मित होऊनि, भगवत्पदांबुजीं जडले. ॥२५४॥
भूत उडविले पाहुनि, हंस क्षोभे, म्हणे, “अरे ! गोपा ! ।
कां विघ्न राजसूया करुनि, करिसि दीप्त माझिया कोपा ? ॥२५५॥
रे ! सावधान हो; दे, प्राणासि, नसाबयास हानि, कर; ।
अथवा दुर्मद जाया, सुविवेक वसावया, सहा निकर. ॥२५६॥
ईश्वर मी राजाचा, जेंवि सुरांचा महायशा शर्व, ।
गर्व त्वच्चित्तींचा गोपा ! आतांचि नाशितो सर्य.” ॥२५७॥
ऐसें बोलुनि, ओढुनि तालोपम चाप, हंस नाराचा ।
सोडूनि; तया ललाटीं वेधी देत्या भवाब्धिपाराच्या. ॥२५८॥
जगदीश दारुकातें त्या तुमुल रणांत पृष्ठवाह करी ।
सात्यकितें निज सारथि, तो हस्तांहीं गुणप्रतोद धरी. ॥२५९॥
रथरत्न चालवी, तो मंडळ समरांगणांत नव दावी; ।
मातलिपटुता अधिका याच्या पटुतेपरीस न वदावी. ॥२६०॥
प्रभु अग्न्यस्त्र स्वशरीं योजी, हंसा परासि माराया; ।
गर्जोनि म्हणे, “वारीं, जरि शक्ति तुला असल वाराया. ॥२६१॥
हंसा ! मजपासुनि तूं कर वांच्छिसि, करिसि जरि मदें आजी, ।
तरि निज पराक्रमातें दाखीव प्रकट करुनि तूं आजी. ॥२६२॥
तूं वांचशील कैसा ! साधुद्वेष्टा मनुष्यपा ! मरतो, ।
विजयार्थ धर्म लंघुनि, गर्वें धरिता धनुष्य पामर तो. ॥२६३॥
त्वां निंदिला, यतीश्वर, बहु गांजुनि, मुख्य धर्म संन्यास, ।
धन्या सत्सेवेचा, सत्पीडेचाचि काम अन्यास. ॥२६४॥
खळशास्ता मी अंसतां, तूं कोण ब्राम्हाणासि गांजाया ? ।
मत्ता ! सत्तापकरा ! तुज काळमुखीं विलंब कां जाया ?” ॥२६५॥
ऐसें गर्जुनि सोडी, त्यांतें तो हंस वारुणें वारी, ।
उंडवी प्रभुवर सहसा वातास्त्रें परमदारुणं वारी. ॥२६६॥
वातास्त्रातें शमवी माहेंद्रें करुनि हंस बा ! राया ! ।
माहेश्वरास्त्र योजी प्रभु, हंस तयासि रौद्र वाराया. ॥२६७॥
गांधर्व एक, दुसरें राक्षस, पैशाच अस्त्र हें तिसरें, ।
योजी ब्रम्हास्त्रहि हरि, जें अरिस म्हणे, ‘स्वभानही विसरें.’ ॥२६८॥
कौबेर, आसुर, तिजें याम्य, ब्रम्हास्त्र, चार चवघांस ।
योजूनि हंस वारी, भासे तो अस्त्रजात दव घांस, ॥२६९॥
माता जैसी बाळा रक्षी ज्याची सुकीर्ति संसरणीं, ।
योजी ब्रम्हाशिरोस्त्र प्रभु तो, त्यावरिहि तेंचि हंस रणीं. ॥२७०॥
श्रीयमुनेच्या उदकें आचमन करुनि, देवदेव हरी ।
श्रीवैष्णवास्त्र योजुनि, शार्ङ्गगुणीं दीप्त दिव्य बाण धरी. ॥२७१॥
भ्याला तत्काळचि तो हंस, महारौद्र अस्त्र पाहून, ।
टाकी उडी, पळे, त्या स्वरथावरि करिल काय राहून ? ॥२७२॥
होय प्राप्त मति कुडी, कीं आवडली सुकीर्तिहूति कुडी; ।
टाकुनि तो हंस उडी, दे कालियपन्नगर्‍हदांत बुडी. ॥२७३॥
प्रभुवरहि शीघ्र धावुनि, डोहीं घाली उडी स्वयें हंसीं, ।
मंचावरूनि लोटुनि, पूर्वींहि रणांगणीं जसी कंसीं, ॥२७४॥
गोवर्धनाद्रिच्याहि, न यमुनेच्या ढांसळी उडी दरडी; ।
त्या ध्वनिपुढें घनध्वनि खाय, तुरिपुढें जसी उडीद, रडी. ॥२७५॥
जगदाधार प्रभुनें करितां पादप्रहार साहेल ? ।
राहेल क्षुद्र कसा ? वज्राहत अद्रि भद्र पाहेल ? ॥२७६॥
कोणी म्हणति, “न मेला, गेला तो हंस पळुनि पाताळा,” ।
किति “भक्षिला फणींनीं,” आला तात्पर्य नाश या ताळा, ॥२७७॥
यमुना र्‍हदांतुनि निघे प्रभुसत्तम निजरथीं पुन्हा बैसे, ।
नाहींच सदरि केले लीलेनें अमित केशवें ऐसे. ॥२७८॥
यमुनार्‍हदांत वधिला हंस श्रीकेशवें, असी वार्ता ।
क्षिप्र क्षितिवरि फांके, कां केशव निवविना जगा आर्ता ? ॥२७९॥
मग राजसूय धर्में श्रीकृष्णें प्रथम यज्ञ हा केला; ।
हंसाच्या कीर्तिस भी हरि, हरिच्या जेंवि हरिण हाकेला. ॥२८०॥
या प्रभुविजयें झाला त्रैलोक्यांत प्रमोद बा ! राया ! ।
प्रभुचरित गायिलें हें बहु सत्कविंनीं तरोनि, ताराया. ॥२८१॥
भ्रात्याचा वध परिसुनि, अरि सुनिपुणही मनांत गडबडला, ।
करितां रण रामासींजो गर्वेंकरुनि फार बडबडला. ॥२८२॥
डिंभकही रथ सोडुनि, जोडुनि अपयश, निघे, तयामागें ।
प्रभु रामकृष्ण धांवति, सिंह वधाया गजा जसे रागें. ॥२८३॥
घालुनि उडी, बुडी दे, शोधी तो फार पाप नर डोहा, ।
‘हाय !’ म्हणे; कां साधुद्वेष्टा, पावोनि ताप, न रडो हा ? ॥२८४॥
क्षण उपल होय, सोडी उसळुनि जैसा अलाबु, डोहातें; ।
सुर म्हणती, “जें केलें, सेवू, भ्रमला भला, बुडो, हा तें.” ॥२८५॥
यमुनातटीं रथस्थ प्रभुतें पाहुनि, म्हणे, “अरे ! गोपा ! ।
कोठें रे ! मद्भाता ? ज्याच्या शक्रादि कांपले कोपा.” ॥२८६॥
स्मित करुनि, श्रीश म्हणे, “पुससी रे ! काय डिंभका ! मजला ? ।
यमुनेतें पूस, इला शरणागत कालियाहिसा भजला.” ॥२८७॥
डिंभक पुनरपि शोधी, तो धीर हित स्वयें विलापातें ।
करुनि, करी जें कांहीं, आइक जनमेजया ! इलापा ! ते. ॥२८८॥
“हा ! हंसा ! हा ! हंसा !” ऐसें बोलोनियां, र्‍हदीं रडला ।
स्वकरें समूळ जिव्हा उपडुनि, डिंभक मरोनि तो पडला. ॥२८९॥
झाली ऐसी तद्नति सद्नतिदात्यासमक्ष, हा तातें ।
‘हाय ! म्हणायासि, करी, नरका जायासि, आत्मघातातें, ॥२९०॥
ऐसे दोघे भ्राते, सपादुनि वरमदें अघा, मेले, ।
जे उद्वृत्त च्छळितां यतिपतितें, लेशही न घामेले. ॥२९१॥
सत्कंटक उन्मूळितां होऊनि अति सुप्रसन्न, बळसहित ।
गोवर्धनीं वसे, जो करि साधूंचें, नसोनि अळस, हित. ॥२९२॥
पूर्वीं जेथें केली केलि, प्रेमें तया नगीं राहे, ।
पाहे निर्झरकंदरवृक्षादि, प्रभुकृपा असी आहे. ॥२९३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP