उपमेयोपमा अलंकार - लक्षण ६

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या एका कवीच्या श्लोकांत असलेल्या परस्परोपमेंत, तुमच्या वरील लक्षणाची अतिव्याप्ति होणारच. “ तर मग, ही सुद्धां उपमेयोपमाच आहे, ( असें समजा ) ” असेमही तुम्हांला म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, सुखाच्या वेळीं दु:ख देणारी वस्तु सुद्धां सुखकारक वाटते, व दु:खाच्या वेळीं
सुख देणारी वस्तु सुद्धां दु:खदायक होते, एवढाच अर्थ या श्लोकांत, सांगायचा असल्यामुळें, ‘ या दोघांसारखा तिसरा पदार्थच नाहीं ’ अशी प्रतीति या श्लोकांत दिसत नाही. ( आणि म्हणूनच या श्लोकांत, उपमे-योपमा मानतां येत नाहीं. )
अशाच रीतीनें,
“ रथाने वर उडलेल्या धुळीमुळें व मेघासारख्या ( काळ्याकभिन्न ) हत्तींच्या योगानें, आकाश पृथ्वीसारखें करून टाकणारा व पृथ्वी आकाशा-सारखी करून टाकणारा ( तो युद्धाचा प्रसंग होता. ) ”
या श्लोकांतील परस्परोपमेंत तुमच्या वरील लक्षणाची अतिव्याप्ति होणारच; ती टाळण्याकरतां , ‘ यांच्या सारखी, या दोघांच्या सारखी, तिसरी वस्तु न सांपडणें हें या उपमेयोपमा अलंकाराचें फळ आहे. ’ असें एकादे विशेषण द्या. ( म्हणजे उपमेयोपमेचें लक्षण परस्परोपमेंत अतिव्याप्त होणार नाहीं. ) ’ असें जर तुम्ही म्हणत असाल तर, शेवटीं तुम्ही आमच्याच म्हणण्यावर आला.
आतां, विमर्शिनीकारांनी म्हटले आहे कीं, “ उपमेयोपमेंत दोन वाक्यें असतात; पण तीं कधीं कधीं खरोखरीचीम दोन असतात; तर कधीं कधीं अप्रत्यक्षपणें तीं दोन असतात. प्रत्यक्ष दोन वाक्यें असल्याचें उदाहरण ‘ रजोभि: ’ इत्यादि श्लोक. या उपमेयोपमेंचे दुसर्‍या उपमानाचा तिरस्कार करणें हें फळ; म्हणूनच उपमेयानें ( स्वत:च ) उपमान होणें हें या अलंकाराचें नांव अन्वर्थक ( म्हणजे ) योग्य आहे. ” हें त्यांचें म्हणणें
कुचकामाचें आहे; कारण कीं,‘ रजोभि: ० ’ इत्यादि श्लोकांत दुसर्‍या उपमानांचा तिरस्कार ( निषेध ) प्रतीत होत नाहीं. कारण कीं, त्या श्लोकांत असलेल्या ज्या दोन उपमा त्यांच्यामध्यें एक समान धर्म नाहीं. वरील श्लोकांतील पहिल्या उपमेंत, अनुगामी धर्म ( रजस्‍ हा ) उपमेला कारण झाला आहे; तर दुसर्‍या उपमेंत, बिंबप्रतिबिंबभावानें होणारा एक धर्म ( घन व गज यांच्या बिंबप्रतिबिंबभावामुळें झालेल्या अभिन्नत्वानें उत्पन्न झालेला एक साधारण धर्म ) उपमेला कारण झाला आहे.
आतां परस्परांचें परस्परांनीं ( आळीपाळीनें ) उपमान आणि उपमेय होणें म्हणजेच उपमेयोपमा असें लक्षणच करून त्याचे उदाहरण म्हणून “ सविता विधवति ” इत्यादि पूर्वीं आलेला श्लोक रत्नाकरानें दिला आहे. हें त्याचें लिहिणे त्यांच्या स्वत:च्याच ‘ उपमेयोपमेंतील उपमानोपमेयभाव दुसर्‍या उपमानाच्या निषेधाकरिताच असतो ’ या ग्रंथाशीं विरुद्ध आहे. कारण कीं ‘ सविता विधवति ’ या श्लोकांत दुसर्‍या उपमानाचा निषेध प्रतीत होत नाहीं, असे पूर्वींच आम्ही सांगितलें आहे. तो प्रतीत होतोच असे म्हणत असाल तर या बाबतींत, स्वत:च्या मनालाच विचारा ना. बस, एवढा वाद पुरे.
ही उपमेयोपमा वाक्यांतील कोणत्याही प्रधान अर्थाचा उत्कर्ष करणारी असेल, तरच ती अलंकार होते; नाहींतर स्वत:चें वैचित्र्य दाखवूनच केवळ तिचा शेवट होतो. ही गोष्ट इतर अलंकारांच्या बाबतींतही खरी समजावी.
आतां, या उपमेयोपमेच्या ध्वनीचें उदाहरण हें:-
“ अत्यंत गांभीर्याच्या बाबतींत व परममाहात्म्याच्या बाबतींत राम-चन्द्राच्या तोडीचा समुद्रच व समुद्राच्या तोडीचा रामचन्द्रच. ”
या श्लोकांतील द्वितीय शब्दाचा  अर्थ सादृश्ययुक्त असा वाच्यार्थानें होत नसल्यामुळें, यांतील सादृश्य व्यंजनेनेंच सूचित झालें आहे ( असें म्हणणें भाग आहे. ) पण या श्लोकांतील सादृश्य हा अर्थ लक्षणाव्यापारानें हातीं आला आहे, असें म्हणत असाल तर, ( शुद्ध ) उपमेयोपमा ध्वनीचें हें ध्या उदाहरण :-
“ हे प्रुथ्वीवरील चंद्रा ( हे राजा ), तुझी रम्य वाणी, अमृताच्या सागराला, व अमृताचा सागर तुझ्या वाणीला माधुर्य शिकविण्याच्या बाबतींत, अत्यंत गर्व धारण करतात. ”
या श्लोकांत वाणी व सागर यांनीं परस्परांना माधुर्य शिकविणें, ही गोष्ट बाधित होत असल्यानें, एकमेकांत माधुर्य विशेषत्वानें संक्तांत करणें, असा लक्षणेनें त्याचा अर्थ ध्यावा लागतो; आणि मग या लक्षणेचें प्रयोजन म्हणून परस्परांचें उपमान व उपमेय होणें हा अर्थ सूचित होतो. ( आणि म्हणूनच ) या ठिकांणीं उपमेयोपमाध्वनि समजावा. आतां, या अलंकारांतील दोष सांगतो:-
आम्ही पूर्वीं उपमेचे जेवढे म्हणून म्हणून दोष सांगितले, व विस्ताराच्या भयानें जे ( आणखी दोष ) सांगितले नाहींत, ते सर्व ( दोष ) हा अलंकार उपमेच्या पोटांत येत असल्यानें, या अलंकारांतही असू शकतात, असें समजावे. पण हाही आणखी एक दोष समजावा:-
यांतील एक उपमा, म्ह० सादृश्य, दुसर्‍या उपमेहून निराळ्या तर्‍हेची असेल तर, या उपमेयोपमेंत दोष आहे, असें समजावें. उदा० “ कमला-प्रमाणें याचें तोंड आहे; व कमळ याच्या तोंडासारखें आहे. ” या श्लोकांतील पहिली उपमा श्रौती आहे; व दुसरी आर्थी आहे. त्यामुळें येथील दोन्ही उपमा एकमेकाहून निराळ्या असणें, हा या अलंकारांतील दोष समजावा. त्याचप्रमाणें , ‘ तिचें मुख कमळाप्रमाणें आचरण करतें, व कमळ या जगांत तिच्या मुखासारखें वागतें; ’ या श्लोकांतील पहिली उपमा क्किप् मुळें व दुसरी उपमा क्य‍ड्‍मुळें झाली असल्यानें, त्या दोहोंत निराळेपणा आहे. ( आणि म्हणूनच येथें दोष आहे. ) अशाच रीतीनें वरील श्लोकार्धांतच.
‘ पद्मं वदनायते ’ एकदा, व ‘ वक्त्रायते ’ असे दुसर्‍यांदा, उपमान व उपमेय यांचें ( अनुक्तमें ) वाचक दोन निराळें शब्द वापरल्यास, त्यातही दोष समजावा. अशा अनेक प्रकारांनीं, यांतील दोन उपमांमध्यें दिसणारा निराळेपणा, सह्लदयांना उद्वेजक वाटत असले तर, दोषच समजावा.
येथे रसगंगाधरांतील उपमेयोपमेचे प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP