उपमेयोपमा अलंकार - लक्षण १

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां ह्या उपमेचाच एक प्रकार असलेल्या उपमेयोपमा नांवाच्या अलंकाराचें विवेचन करतों-
“ ह्या दोन पदार्थांसारखा तिसरा पदार्थ नाहीं, अशी व्यवच्छेदबुद्धि ( म्ह० निराळें पाडण्याची बुद्धि ) उत्पन्न होणें हें ज्यांचें फळ अशा वर्णनाला विषय होणारें, परस्परांशीं उपमान व उपमेय ह्यासंबंधानें संबद्ध झालेल्या दोन पदार्थांमधील जें सुंदर सादृश्य, त्या सादृश्याला उपमेयोपमा म्हणावें. ”
“ तडिदिवतन्वी भवती भवतीवेयं तडिल्लता गौरी ” ( तूम विजेसारखी कृशांगी आहेस; व विद्युल्लता तुझ्यासारखी गौरवर्ण आहे ) ह्या परस्परोपमेच्या उदाहरणांत, उपमेयोपमेची अतिव्याप्ति होऊं नये, एवढ्याकरितां वरील व्याख्येंतील, ‘ विषयीभूंत’ पर्यंतचें सबंध पद घातलें आहे. ह्या श्लोकांत, दोन उपमा आहेत. त्यांपैकी पहिली उपमा कृशांगत्व या अनुगामी धर्मामुळें निर्माण झाली आहे; व दुसरी उपमा, गौरत्व या ( अनुगामी ) धर्मामुळें झाली आहे. परंतु, दोन्ही उपमेंतील सादृश्य तिसर्‍या सादृश्याचें निवारण करीत नाहीं. म्हणून या श्लोकार्धांत उपमेयोपमा नाहीं. ज्या ठिकाणीं, एका धर्मानें, उपमान ज्याचा प्रतियोगी, व उपमेय ज्याच अनुयोगी, असें सादृश्य सांगि-तलें जातें, त्या ठिकाणीं, तें उपमेय ज्याचा प्रतियोगी, आणि उपमान ज्याचा अनुयोगी आहे असें, त्याच धर्मामुळें झालेलें सादृश्य, अर्थदृष्टया सिद्ध झालेलेंच असतें; म्हणून, त्याच सादृश्याची पुनरुक्ति शब्दानें केल्यास तो शब्द स्वत:च्या प्रयोगाच्या निरर्थकपणाचा परिहार करण्याकरितां, तिसर्‍या सदृशपदार्थाच्या निवारणाचा आक्षेप करतो. ( म्हणजे अशा ठिकाणीम सादृश्यवाचक शब्द दुसर्‍यांदा वापरल्यानें, तो विनाकारण वापरला असें वाटूं नये म्हणून, ह्या दोहोंच्यासारखा तिसरा पदार्थ नाहीं असें अनुमान करण्याला तो भाग पाडतो. ) पण, प्रस्तुत तडिदिव या वाक्यांत, कृशांगत्व ह्या एका धर्माच्या योगानें, वीज ज्याची प्रतियोगी व स्त्री ज्याची अनुयोगी असें सादृश्य उत्पन्न झाल्याचें सांगितलें आहे; त्यावरून त्याच धर्मानें ( कृशांगत्व धर्मानें ) स्त्री ज्यांत प्रतियोगी आहे, व वीज ज्यांत अनुयोगी आहे असें सादृश्य पण निर्माण झाले आहे असें, (प्रत्यक्ष शब्दानें जरी नाही तरी ) अर्थदृष्टया सिद्ध होतें. तरीपण त्या सादृश्याची सिद्धि, गौरत्व या धर्मानें सिद्ध झालेली नसते; म्हणून त्या गौरत्व धर्मानें त्या सादृश्याची सिद्धि करण्याकरितां, दुसर्‍यांदा सादृश्यवाचक शब्द घातला आहे. म्हणून त्या दुसर्‍या सादृश्यवाचक शब्दाचें, तिसर्‍या सदृश पदार्थाचा निरास हें फळ नाहीं.
“ हे सुंदरी, ब्रह्मदेवानें तुझ्यासारखी कुणीही निर्माण केली नाहीं, हें सर्वांना मान्य आहे; तरी पण या बाबतींत, सूक्ष्मदृष्टीनें पाहूं लागल्यास, कौमुदी ( चंद्राची प्रभा, तुझ्यासारखी म्हणून ) थोडीशी मनांत येते. ”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP