उपमेयोपमा अलंकार - लक्षण ५

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


आतां, अलंकारसर्वस्वकरांनीं या बाबतींत असें म्हटलें आहे-“ उपमेय व उपमान या दोहोपैकीं प्रत्येकानें आळीपाळानें ( पर्यायेण ) सादृश्याचा प्रतियोगी होणें, याला उपमेयोपमा म्हणावी. या वाक्यांत ‘ तत्‍ ’ शब्द जो वापरला आहे, त्यानें उपमान व उपमेय हा अर्थ निर्दिष्ट केला आहे, असें समजावें. शिवाय, या वाक्यांतील पर्याय याचा अर्थ, दोन्ही एकाच वेळीं न होणें ( म्हणजे आळीपाळीनें होणें ) हा आहे; आणि म्हणूनच या उपमेयोपमेंत दोन वाक्यें ( आवश्यक ) असतात ’ हें अलंकारसर्वस्व-काराचें म्हणणें बरोबर नाहीं. वरील लक्षणांतील द्वयो: हें पद व्यर्थ आहे;कारण एकच पदार्थ आपणच उपमान व आपणच उपमेय झाल्यास, उदा० ‘ आकाश आकाशासारखें ’ या अनन्वय अलंकाराच्या एका वाक्यांत, पर्यायाचा अभाव असल्यामुळें वाक्यभेदाचा ( म्ह० दोन वाक्यांचा ) प्रसंगच उत्पन्न होत नाहीं. आतां, तुम्ही म्हणाल कीं, ‘ या ठिकाणीं द्वयो: हा शब्द लक्षणांत घातला आहे तो, लक्षणाचा अर्थ स्पष्ट करण्याकरितां; अथवा उपमान आणि उपमेय या दोघांनी परस्परांना योग्य व्हावें एवढ्याकरितां; त्या दोहोंत लिंग आणि वचन यांच्यात भेद नसावा, हें सांगण्या-करितां; अथवा कवींच्या संकेताची प्रसिद्धि स्पष्ट करण्याकरितां. ’ पण, असें मानले तरी पूर्वी आम्ही दिलेल्या  “ अहं लताया: सदृशी ” इत्यादि पद्यांत सांगितलेल्या परस्परोपमेंची उपमेयोपमेच्या लक्षणांत अतिव्याप्ति होणारच. आणि शिवाय, “ तर मग आतां, ज्यांतील सुकुमार बाहुली हलत आहे
असा तुझा डोळा, व ज्याच्या आंतल्या भागांत भुंगा फिरत आहे, असें कमळ, या दोहोंची परस्परांशीं तुलना, दोहोंच्या एकाचवेळीं सुंदर रीतीनें होणार्‍या उन्मीलनानें, एकदम, होवो. ” ( रघु० ५। ६८ )
या कालिदासाच्या श्लोकांत असलेल्या उपमेयोपमेंत, एकाच वेळीं उपमेय व उपमान या दोहोंचा संबंध सांगितला असल्यानें, येथें ( या उपमे-योपमेंत ) दोन वाक्यें नाहींत; व त्यामुळें तुम्ही केलेलें उपमेयोपमेचें लक्षण, या श्लोकांतील उपमेयोपमेला लागू पडणार नाहीं. ( म्हणजे, तुमच्या लक्षणांत अव्याप्ति दोष आहे. ) तुम्ही म्हणाल कीं, ‘ वरवर , या ठिकाणीं ( अन्योन्य-प्रतियोगिता दाखविणारा ) एकच शब्द दिसला तरी, त्याचा शेवट, वरील श्लोकांत दोन वाक्यें होण्यांत होतोच. ’ पण असें म्हणू नका. कारण कीं, तुमचें लक्षण वरील कांलिदासाच्या श्लोकांतील उपमेयोपमेला लागू पडतें, असें ( घटकाभर ) मानलें तरी-
“ सुख व दु:ख यांनीं मनाचा ताबा घेतला असतां, अनुक्तमानें, सूर्य चंद्रासारखा भासतो, व चंद्र सूर्यासारखा भासतो; रात्री दिवसासारख्या वाटतात, व दिवस रात्रीसारखे वाटतात. ” ( का. प्र. १० मध्यें उद्धृत )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP