पंढरीमाहात्म्य - अभंग ४१ ते ४५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४१.
सर्व सुखरासी भिंवरेचे तीरीं । आमुची पंढरी काम-धेनू ॥१॥
प्रेमासृतें दुभे सदा संतजनां । वोसंडतो पान्हा नित्य नवा ॥२॥
धर्म अर्थ काम मोक्ष चार्‍ही थानें । दोहोणार धन्य पुंडलीक ॥३॥
जयाचें दुभतें नित्य नावें वाढतें । बहु पंढरीतें पुर्वपूण्य ॥४॥
भक्तिचेनि बळें भावाचेंनि मेळें । देखोनियां बोले बहु फार ॥५॥
भाग्यवंत नामा तें क्षीर लाधला । प्रेमें वोसंडला गर्जे नाम ॥६॥

४२.
पंढरीच्या सुखा अंत पार नाहीं लेखा । शेषा सह्स्र-मुखा न वर्णवेचि ॥१॥
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी । जन्मोंजन्मी वारी घडली तया ॥२॥
पंढरीस जातां प्रेम उचं-बळत । आनंदें गर्जत नामघोष ॥३॥
विश्वमूर्ति विठो विश्वंभर देखे । विसरला दु:खें देहभाव ॥४॥
नामा ह्मणे त्याचा होईन चरणरज । नुपेक्षील मज पांडुरंग ॥५॥

४३.
पंढरीची वारी जयाचिये कुळीं । त्याची पायधुळी लागो मज ॥१॥
तेणें त्रिभुवनीं होईन सरता । नलगे पुरुषार्था मुक्तिचारी ॥२॥
नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा । क्षण जिवावेगळा नकरीं त्यासी ॥३॥
नामा म्हणे माझा सोयरा -जिव - लग । सदा पांडुरंग तयाजवळी ॥४॥

४४.
पंढरीचें प्रेम आहे त्यांचे जीवीं । त्यांची नित्य नवी करीन आशा ॥१॥
ते माझे सोइरे सुखारे सद्नुरु । भवसिंधुचा पारु उतरतो ॥२॥
माझ्या विठोबाच्या नामीं ज्यां विश्वास । होइन त्यांचा दास आवडीचा ॥३॥
माझ्या विठोबाच्या चरणीं ज्यांचा भाव । दारवंटा पाय धरीन त्यांचे ॥४॥
माझ्या विठोबाचें ध्यान ज्यांचें मनीं । सांडोबा अंगणीं होईन त्यांचे ॥५॥
ऐसे सर्वभावें माझ्या विठोबा शरण । त्यांचे वंदीन चरण नामा म्हणे ॥६॥

४५.
अभिमानें लोक जाती वाराणसी । आमुची मिरासी पंढरीये ॥१॥
तीर्थ व्रत नेम मज केशिराजा । पंढरीचा राजा बोळ - वया ॥२॥
पाउला पाउलीं चालती मारग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥३॥
नामा म्हणे मज पंढरीं विसांवा । दर्शन केशवा पुरे मज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP