पंढरीमाहात्म्य - अभंग २५ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२५.
सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ ॥१॥
तेथें अवघाची सुखरूप होसी । जन्मोंजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥
चंद्रभागेसी करितां स्नान । तुझे दोष पळती रानोरान ॥३॥
लोटांगण घालेनि महाद्वारीं । कान धरोनि नाच गरुडपारीं ॥४॥
नामा ह्मणे उपमा काय द्यावी । माझ्या विठ-बाची इडा पीडा घ्यावी ॥५॥

२६.
संपदा सोहोळा नावडे मनाला । छंद हा लागला पंढरीचा ॥१॥
जावें पंढरीची आवडे मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
आषाढी कार्तिकी कधीं ये ह्मणोनि । जातिया लागोनि पुसतसे ॥३॥
नामा ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥४॥

२७.
यारे नाचों प्रेमानंदें । विठ्ठल नामाचिया छंद्रें ॥१॥
जाऊं ह्मणती पंढरिची वाट । कळिकाळा भय वाटे ॥२॥
चंद्रभागे घडलें स्नान । यमलोकीं पडली हान ॥३॥
झाली पुंडलिका भेटी । पूर्वज आनंदले वैकुंठीं ॥४॥
आतां राउळासी जातां । झाली जी-वाचि मुक्तता ॥५॥
विष्णुदास नामा म्हणे । आतां नाहीं येणें जाणें ॥६॥


२८. पैल ते पंढरी पैल ते पंढरी । पांढरीवरी काळी वस-विली ॥१॥
सोंवळें हें ब्रह्म सुनिळ हें ब्रह्म । विद्युल्लता ब्रह्म पाहूं चला ॥२॥
नामा ह्मणे माझा विठ्ठल हा डोळा । अर्धमात्रे जवळां पाहूं चला ॥३॥

२९.
झळकती पताका । कळस दिसतो नेटका ॥१॥
बरवें बरवें पंढरपुर । विठोबा रायाचें नगर ॥२॥
अरे हें माहेर संतांचे । नामया स्वामि केशवाचें ॥३॥

३०.
काय पुण्य केलें इहीं जीवा जनीं । पंढरी नयनीं देखि-येली ॥१॥
अनंता जन्मांचे होंचि प्रायश्चित । वाचे जपे नित्य राम नाम ॥२॥
कोटी कुळें केलीं क्षणेंचि पावन । केल्या एक स्नान चंद्रभागे ॥३॥
शोक मोह ताप विध्वंसिल हेळां । अवलोकितां डोळां पांडुरंग ॥४॥
महा पापराशी तिहीं केल्या होळी । वाजवि-ल्या टाळी विठ्ठलनाम ॥५॥
नामा म्हणे धन्य धन्य ते संसारीं । चालविती वारी पंढरीची ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP