आत्माराम - समास ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
जी जी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथंचिया माहेरा । सार्थक झालें जी दातारा । कृपाकटाक्षें ॥१॥
या मनाचे संगतीं । जन्म घेतले पुनरावृत्ति । माया मायिक असोनि भ्रांति । वरपडा झालों होतों ॥२॥
मी मानवी किंकर । एकाएकीं झालों विश्वंभर । संदेह तुटला थोर । यातायाती ॥३॥
मी संसाराहून सुटलों । मीच सकळ देहीं विस्तारिलों । जन्मदु:खापासूनी मुकलों । सर्वांभूतीं ॥४॥
मी करून अकर्ता । मी भोगूनि अभोक्ता । मजमध्यें वार्ता । मीपणाची नाहीं ॥५॥
ऐसें जें कां निजबीज । गाळींव मीपणाचा फुंज । तो मुरलिया सहज । सिद्धचि आहे ॥६॥
ऐसा शिष्याचा संकल्पू । म्हणोनि बोले भवरिपू । संसारसर्प । केला जेणें ॥७॥
जें स्वामीच्या हदयीं होतें । तें शिष्यास बाणलें अवचितें । जैसें सामर्थ्य परिसाचें तें । लोहाअंगीं ॥८॥
स्वामिपरिसाचा स्पर्श होतां । शिश्य परीस झाला तत्त्वतां । गुरुशिष्याची ऐक्यता । झाली स्वानुभवें ॥९॥
गुज स्वामीच्या हदयींचें । शिष्यासी वर्म तयाचें । प्राप्त झालें योग्याचें । निजबीज जें ॥१०॥
बहुताम जन्मांच्या शेवटीं । झाली स्वरूपाची भेटी । एका भावार्थासाठीं । परब्रह्म जोडलें ॥११॥
जो वेदशास्त्रांचा भावगर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ । तयाचा एकसरां लाभ । झाला सद्भावें ॥१२॥
जें ब्रह्मादिकांचें मोहर । अनंत सुखाचें भांडार । जेणें हा दुर्गम संसार । सुखरूप होय ॥१३॥
ऐसें ज्यासी ज्ञान झालें । तयाचें बंधन तुटलें । येर नसोनि पाउलें । दृढ अविवेकें ॥१४॥
संदेह हेंचि बंधन । नि:शेष तुटलें तेंचि ज्ञान । नि:संदेहीं समाधान । आपैसें होय ॥१५॥
प्राणियासी माया सुटेना । अभिमानें त्रिपुटी तुटेना । वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥१६॥
मायाजाळीं जे पडले । ते ईश्वरासि चुकले । ते प्राणी सांपडले । वासनाबंधनीं ॥१७॥
ज्याचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त झालें । तयाचें बंधन तुटलें । नि:संगपणें ॥१८॥
सर्वसाक्षी तुर्यावस्था । तयेचाहि तूं जाणता । म्हणोनि तुज नि:संगता । सहजचि आली ॥१९॥
आपणासी तूं जाणसी । परी तूं तें नव्हेसी । तूंपणाची कायसी । मात स्वरूपीं ॥२०॥
जाणता आणि वस्तू । निमाली या उर्वरित तूं । तूंपणाचीहि मातू । सहजचि वाव ॥२१॥
असो हा शब्दपाल्हाल । तुझें तुटलें जन्ममूळ । कां जें नाशिवंत सकळ । मदर्पण केलें ॥२२॥
जें जें जाणोनि टाकिलें । तें तें नाशिवंत राहिलें । तुझें तुज प्राप्त झालें । अक्षय पद ॥२३॥
ऐसें बोले मोक्षपाणि । ऐकोनि शिश्य लोटांगणीं । नि:संग-स्वरूपमिळणीं । दोघे एकचि झाले ॥२४॥
ऐसा कृपाळू स्वामिराव । आदिपुरुष देवाधिदेव । शिष्याची निजपदीं ठाव । ऐक्यरूपें दिल्हा ॥२५॥
जो स्वामीस शरण गेला । तेणें जन्म सार्थक केला । संदेहवेगळा झाला । जो देवा दुर्लभ ॥२६॥
ग्रंथ संपतां स्तुति उरे । बोलिजेती अपारें । अर्थासी कारण येरें । चाड नाहीं ॥२७॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम । साधकें पाहतां भ्रम । बाधिजेना ॥२८॥
इति श्री आत्माराम संपूर्ण ॥ ओंवीसंख्या ॥१८३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP