आत्माराम - समास ३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥   
संग तितुका नाशिवंत । सोडून राहावें निवांत । एकपणाचा अंत । झालिया समाधान ॥१॥
एकपणाचा उमस । काढिताम त्रिपुटी सावकाश । होत आहे म्हणोनि ध्यास । एकपणचा नसे ॥२॥
तो मी आत्मा ऐसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं । उन्मनी अवस्थेचा प्रांतू । तें स्वरूप तुझें ॥३॥
ऐसा जो अनुभव झाला । तोहि नाशि- वंतामध्यें आला । अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥४॥
हेंहि न घडे बोलणें । आतां पाल्हेरा किती देणें । वेद शास्त्रें पुराणें । नासोनि जाती ॥५॥
ग्रंथमात्र जितका । आत्मा त्यावेगळा राहिला । हे मायेचा स्पर्श जाला । नाहींच त्यासी ॥६॥
स्वरूप निर्मळ निघोट । स्वरूप शेवटा शेवट । जिकडे तिकडे नीट । सन्मुख आहे ॥७॥
जें बहु दूरीच्या दूरी । निकट जवळी अंतरीं । दुरी आणि अभ्यंतरीं । घटणी नाहीं ॥८॥
जें सकळांपरीस मोठें । जेथें हें सकळ आटे । अकस्मात एकसरां तुटे । मूळमायेचें ॥९॥
जें सकळांहून मृदु कोंवळें । सकळांहून अत्यंत जवळें । जे सकळांमध्ये परि निराळें । अलिप्तपणें ॥१०॥
जें हाले ना चाले । जें बोले ना डोले । अवघें आपण संचलें । एकटेंचि तें ॥११॥
आकाश बाहेर भरलें । आकाश जेथें मुरालें । आकाश मुरूनि उरलें । एकजिनसी ॥१२॥
जें चळे ना ढळे । अग्रीमध्यें न जळे । जें जळीं परि निराळें । उदकीं बुडेना ॥१३॥
ज्यास कोणी नेईना । चोरूं जातां चोरवेना । कल्पांतहि वेचेना । अणुमात्र जें ॥१४॥
चक्षूनें लक्षिलें नवजाय । जेथें आकाश भस्मोनि जाय । सांगितलें तें साकार होय । सांगणें न घडे ॥१५॥
ऐसें जरी न बोलावें । तरी म्यां काय करावें । न बोलतां कळावें । तुज कैसें ॥१६॥
बोलणें तितुकें व्यर्थ जातें । बोलतां अनुभवा येतें । अनुभव सांडितां तें । आपण होइजे ॥१७॥
मायारूप मूळ तयाचें । शोधूं जातां कैचें । मग लाभ झालिया दु:खाचें । मूल तुटे ॥१८॥
अहं ब्रह्मास्मि ही गाथा । आली देहबुद्धीच्या माथां । देहबुद्धीनें परमार्था । कानकोंडें होईजे ॥१९॥
देहबुद्धि हे टाकावी । हेहि मायेची उठाठेवी । म्हणोनी काय अंगिकारावी । अंगि-कारू न घडे ॥२०॥
मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां ब्रह्मसाधन । मायाचि गोंवी बंधन । तोडी तेहि माया ॥२१॥
माया आपणासी गोंवी । आपआपणा वेड लावी । प्राणी दु:खी होत जीवीं । अभिमानेंकरूनी ॥२२॥
जैसा सारीपाट खेळती । सारी एकाच्या मागोन आणिती । खेळों बैसतां वांटोन घेती । आपुलाल्या ॥२३॥
नसतां अभिमान माथां । सारी मरतां परम व्यथा । डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥२४॥
फांशासी देदे म्हणती । एक ते रडी खाती । क्रोधें पेटल्या घेती । जीव एकमेकांचे ॥२५॥
तैशा कन्या पुत्र नारी । वांटून घेतल्या सारी । अभिमान वाहती शिरीं । पांग प्रपंचाचा ॥२६॥
इतुकीं वेडें लविलीं । ते माया खेळे एकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥२७॥
माया मोडितां अधिक जडे । म्हणोनि धरिती ते वेडे । धरितां सोडितां नातुडे । वर्म कळल्या-वांचूनी ॥२८॥
जैसें चक्रगृहाचें उगवणें । बाहेर येऊन आंत जाणें । कां अंतरीं जाऊन येणें । अकस्मात बाहेरी ॥२९॥
त्या कवाडीच्या कडया । गुंतगुंतों उगवाव्या । तैसी जाण ही माया । गुंतोनि उगवावी ॥३०॥
मायी कैशी झाडावी । तोडोनि कैशी टाकावी । येथें विचारें पहावी । नाथिलीचे हे ॥३१॥
बहुनाटक हे माया । मीपणें न जाय विलया । विचार पहातां इया । ठावचि नाहीं ॥३२॥
वर्म हेंचि माया मायिक । इचा करावा विवेक । विवेक केलिया अनेक । एकीं मुरे ॥३३॥
एकीं अनेक मुरालें । एकपण अनेकांस वेगळें । उपरी जें नि:संग उरलें । तें स्वरूप तुझें ॥३४॥
तुझें स्वरूप नाकळे । तें जया साधनें आकळे । तें साधन एक सोहळे । भोगिसी स्वानंदें ॥३५॥
इति श्रीआत्माराम । सांगिजेल पुढें साधन वर्म । जेणें भिन्नत्वाचा भ्रम । तुटोनि जाय ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP