करवीर माहात्म्य - खंड २

करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते.

अगस्ती ऋषीनीं काशी सोडण्याचें कारण.

सूत ह्मणाले, "ऋषी हो ! नारदांनीं पूर्वोक्त कथिलेलें करवीरमाहात्म्य श्रवण करुन मार्कंडेयांनीं त्यास तें सविस्तर कथन करण्यास विनंति केली व अगस्ती मुनीनें पुण्यपावन क्षेत्र काशी सोडण्यास काय कारण झालें विचारिलें तेव्हां नारद ह्मणालें."

भुक्तिमुक्तिदायक दक्षिणकाशी जे करवीर त्या क्षेत्राचें साद्यंत माहात्म्य वर्णन करण्यास सहस्त्रवदनासही शक्ति नाहीं. तथापि माझा पिता ब्रह्मदेव यांनीं कथन केलेली माहिती मी तुह्मांस निवेदन करितों, ती श्रवण करा

एके कालीं अगस्ती मुनी आपल्या शिष्यांस बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशानें भूतलावर फिरत होते. ते नाना फलपुष्प वृक्षांनीं व शुकसारिकादि पक्षीसमुदायांनीं युक्त अशा कुल नांवाच्या पर्वतावर गेले. तेथें पवित्र उदकानें भरलेलें व प्रफुल्लित कमळ पुष्पांनीं आच्छादिलेलें एक सरोवर त्यांनीं पाहिलें. त्याचे तीरास शांत, दांत सुद्युम्न पद्मासन घालून नेत्र झांकून अभेद्य भक्तीनें हरिध्यान करीत बसला होता. तो ध्यानस्थ असल्यामुळें, अगस्तीमुनी येथें आल्याचें त्यास कळलें नाहीं. यामुळें कोपायमान होऊन अगस्ती मुनी गर्वानें ह्मणाले, माझा प्रताप या दुराचारी सुद्युम्नास माहित नाहीं. मी इल्वल व वातापी वधिलें, समुद्राचें प्राशन केलें, असा मी प्रतापी असून यानें हरिध्यानाचे मिषानें माझा अपमान केला, करितां असा तामसी व दुराचारी मनुष्य हरिध्यानास अपात्र आहे व यास शिक्षा करणें योग्य आहे, असें ह्मणून "हा गज होऊन फिरेल" असा दारुण शाप त्यास दिला व अगस्ती तेथून निघून गेले.

नारद ह्मणाले, मार्कंडेया, अगस्तीस शाप देण्यास सुद्युम्न असमर्थ नव्हता, परंतु तो हरिध्यानीं निमग्न झाल्यामुळें त्यानें तसे केलें नाहीं. त्यानें श्रीविष्णूचा धांवा केला व करुणा भाकून ह्मणाला "भक्तरक्षका दयाळा ! मी पूर्वी कोणतें पातक केलें होते कीं ज्यामुळें हा मजला शाप मिळाला. शापाबद्दल मजला दुःख वाटत नाहीं, परंतु ती अज्ञान गजयोनी असल्यामुळें माझ्याकडून हरिध्यान घडणार नाहीं, याविषयीं मला फार वाईट वाटतें. याकरितां दीनदयाळा प्रभो ! तुमचें स्मरण मला गजयोनींतही राहील असें करा."

ही सुद्युम्नाची दीनोक्ति ऐकून दयाघन प्रभु गहिंवरले व ज्याचे हातांत शंख, चक्र, गदा हीं आयुधें असून कंठांत वनमाळा व कासेस पीतांबर शोभत आहे अशी घनःशाम मूर्ति त्याचे पुढें उभी राहिली. श्रीविष्णूनीं अभय देऊन सांगितलें कीं, "कर्मशेषामुळें गजयोनी भोगून अंतीं माझे पदास तूं येशील. ज्यानें तुजला विनाकारण शापिलें व दुःख दिलें, त्या अगस्तीवर महान संकटें येतील व तो मोठया अनर्थाते पावेल" असें ह्मणून श्रीविष्णु अंतर्धान पावले.

नारद ह्मणाले, पुढें एकदां मी फिरत फिरत वैकुंठास गेलों, व श्रीविष्णूस वंदन करुन बसलों असतां विष्णु ह्मणाले "नारदा ! अगस्तीचे अविचाराचे वर्तन तूं ऐक. माझा प्रियभक्त सुद्युम्न देहाभिमान सोडून निश्चल मनानें माझें ध्यान करीत असतां त्यास अगस्तीनें विनाकारण शापून त्याचे ध्यानास विघ्न आणिलें, करितां हा दुष्ट आहे हें जाणून यास योग्य दंड झाला पाहिजे. नारदा ! तू माझा प्रियभक्त आहेस. करितां कांहीं युक्ति काढून अगस्ती पुण्यपावन काशी क्षेत्रांतून बाहेर जाईल असें कर. प्राण्याच्या उद्धाराकरितां मी दक्षिण काशी (करवीर) व उत्तर काशी हीं दोन क्षेत्रें निर्माण केलीं आहेत. उत्तर काशींत शिवरुपानें, व करवीरांत शक्तिरुपानें मी वास करीत आहे. काशींत शिवरुपानें जनास तारक मंत्र उपदेशून मी मुक्ति देतों व मुक्ति देणें हा अधिकार स्त्रियांचा अस्लयामुळें शक्तिरुपानें करवीरांत राहून मी जनास भुक्ति व मुक्ति देतों. करितां करवीर हें काशीपेक्षा यवाधिक श्रेष्ठ आहे.

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ॥
पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षमात्रदाः ॥
करवीरं विरुपाक्षं श्रीशैल पांडुरंगकं ॥
श्रीरंग सेतुबंधं च भुक्तिमुक्ति प्रदायिनी षट् ॥
(क.मा. ३-४९)

अयोध्या, मथुरा, माया, (हरिद्वार) काशी , काम्ची, अवंतिका व द्वारका हीं सात क्षेत्रें फक्त मुक्ति देणारीं आहेत, आणि करवीर विरुपाक्ष, (हंपी) करवीर,  श्रीरंग पंढरपूर आणि सेतुबंध रामेश्वर हीं सहा क्षेत्रें भुक्ति व मुक्ति दोन्ही देणारीं आहेत. पहिल्या सात क्षेत्रांत काशी श्रेष्ठ आहे, दुसर्‍या सहा क्षेत्रांत करवीर श्रेष्ठ आहे. याकरितां, हे नारदा ! अगस्तीस काशी बाहेर काढण्याची योजना तूं कर."

नारद ह्मणाले,  मार्केडेया ! ही श्रीविष्णूची आज्ञा मी शिरसा वंद्य मानून "कार्य करितों" असें बोलून वैकुंठाहून निघालों. मनांत अशी चिंता उप्तन्न झाली कीं, आतां काय करावें ? जर कारणाशिवाय अगस्तीस काशींतून "बाहेर जा" ह्मणावें तर तो मुनी कोपानें मला क्षणाम्त भस्म करील. असा विचार करीत मी भवताप शमन करणारी नर्मदा वहात असलेल्या विंध्य पर्वतावर गेलों. मला पाहून विंध्यगिरी मजकडे धांवत येऊन आपले जड व उंच शिर नम्र करुन मजला त्यानें साष्टांग नमस्कार केला. त्याचें चलन करणार जड शरीर पाहून मला संतोष झाला. मी त्यास आपल्या हातानें उठविलें. विंध्यानें माझी षोडशोपचारें पुजा केली व पादसेवन करुन उभा राहून बोलूं लागला कीं,"हे नारदमुने, तुमच्या दर्शनाने व पादस्पर्शानें माझा देह पवित्र झाला आहे व माझी सात कुळें उद्धार पावलीं आहेत" हें ऐकून मी किंचित दीर्घ स्वास सोडला. हें पाहून दीर्घ स्वास सोडण्याचें कारण त्यानें मला विचारिलें , व ह्मणू लागला. " मेरु , त्रिकुट, शैल, सह्याद्रि इत्यादि पर्वत जरी श्रेष्ठ आहें, व ही पृथ्वी मीच धारण केली आहे." हें त्याचें भाषण ऐकून त्याची शक्ति किती आहे हें पहावें ह्मणून मी बोललों कीं हें विंध्या ! तू आपलें सामर्थ्य सांगितलेंस तें खरें आहे, परंतु सर्व पर्वतांत फक्त मेरुपर्वत तुझी निंदा करीत असतो हें कांहीं बरें नव्हे. मजला तुह्मी दोघेही सारखेच आहांत व एकाची चाहाडी दुसर्‍यास सांगण्याचें मला प्रयोजन नाहीं; तथापि ऐकिलेली गोष्ट तुला कळविली. "तुझें कल्याण होवो" असें बोलून मी आकाश मार्गानें निघून गेलों.

नारद ह्मणाले मार्कंडेया ! विंध्य पर्वतानें पुढें काय केलें तें ऐक. त्यानें मनांत विचार केला कीं, सूर्य, नक्षत्रें, गण, मेरुपर्वतास सव्य प्रदक्षिणा करितात, यामुळें त्यास गर्व होऊन तो माझे पाठीमागें माझी निंदा करुन माझा अपमान करितो. यामुळें माझी मान छेदिल्याप्रमाणें मला दुःख होत आहे. मला असें वाटतें कीं, एकदम मेरुवर उडून पडावें किंवा त्यास ठार मारावें. तो माझा अपमान करितो ही गोष्ट खरी आहे. नाहीं पेक्षां सत्यलोकवासी नारदास मला खोटें सांगण्याचें कांहीं कारण नाहीअसा विचार करुन विंध्यपर्वतानें आपला देह वाढविला व गगनांत तो उंच वाढल्यामुळें सुर्याच्या मार्गास अडथळा झाला. सूर्यं दक्षिण दिशेला चालला असतां त्याच्या रथाचा घोडा पुढें चालेना, हे पाहून त्यास अरुण बोलला " हे सूर्यनारायणा ! तुह्मी दररोज मेरुपर्वतास प्रदक्षिणा घालतां हें विंध्यपर्वतास सहन न होऊन त्यानें आपले मार्गांत विघ्न आणिलें आहे."

सूर्याचा मार्ग बंद झाल्यामुळें पूर्वेकडील व उत्तरेकडील लोकांस सूर्यकिरणाचा अति ताप झाला व दक्षिणेकडील व पश्चिमेकडील लोकांस अंधारामुळें निद्रेनें व्याकुळ केलें. सूर्योदय न झाल्यामुळें स्नानसंध्या यज्ञादि सर्व कर्में बंद पडलीं; यामुळें सकल मुनी व देवगण ब्रह्मदेवास शरण गेले व त्याची स्तुति करुन आपलें संकट निवारण करण्यास त्यांनीं त्यास विनंति केली. तेव्हां ब्रह्मदेवानें संतुष्ट होऊन मुनिगणास सांगितलें कीं, काशीक्षेत्रांत अगस्ती मुनी रहात आहेत त्या ठिकाणीं जाऊन तुह्मी त्यांची प्रार्थना करा. ते महान् प्रतापी आहेत. त्यांनीं वातापी व इल्वल हे दोन राक्षस मारुन समुद्राचें शोषण केलें व ते तुमचें संकट दूर करतील.

हें ब्रह्मदेवाचें भाषण ऐकून सर्व मुनी व इंद्रादि देवगण अगस्तीस शरण गेले. त्यांनीं काशीस जाऊन मणिकर्णिकेंत स्नान करुन विश्वेश्वर, भवानी, व ढुंढिराज यांचीं दर्शनें घेतलीं व ते अगस्तीच्या आश्रमास गेले. तेथें अगस्ती मुनी कर्णांत रुद्राक्ष माळा धारण करुन समाधि लावून बसले होते. त्यास नमन करुन देवादिकांनीं त्यांचा जयजयकार केला. अगस्तीनें देवांस योग्य आसन देऊन आगमनाचें कारण विचारिलें. तेव्हां देवांनीं गुरु बृहस्पतीच्या वदनाकडे पाहतांच गुरु ह्मणाले--- "अगस्ते, तूं पुण्यवान्‌ असून धन्य आहेस ! तुझी अर्धांगी पतिव्रता पुण्यखाणी लोपामुद्रा गंगेप्रमाणें पुण्यपावन आहे. तूं ओंकार व तुझीं स्त्री श्रुति आहे. तुजला कोणतीही गोष्ट असाध्य नाहीं. याप्रमाणें गुरुंनीं अगस्तीची स्तुति केली व बोलले कीं, सर्व देवांचा भर्ता प्रतापी व शूर असा हा इंद्र तुजकडे कांहीं कार्याकरितां आला आहे. तसेंच वरुण, ईशान, कुबेर, वैश्वानर इत्यादि देवही आले आहेत. त्यांचा येण्याचा हेतु असा आहे कीं, मेरुच्या स्पर्धेंने विंध्य पर्वत फार वाढला आहे व त्यामुळें सूर्याचा मार्ग बंद पडला आहे. अर्धा लोक तापला आहे व अर्ध्यांत अंधःकार आहे; यामुळें लोकांस फार पीडा होऊन स्नानसंध्यादि कर्मे राहिली आहेत. करितां विंध्यवृद्धि नाहींसी कर. हें गुरुचें वचन ऐकून क्षणमात्र ध्यान करुन "कार्य करितों" असें गुरुस सांगून देवास त्यांनीं निरोप दिला.

नंतर विश्वेश्वराचें ध्यान करुन मनांत खिन्न होऊन अगस्ती आपल्या भार्येस ह्मणाले, लोपामुद्रे ! ज्याच्या अंगणांत कल्पवृक्ष आहे, ज्याच्या हातीं वज्र आहे असा इंद्र पर्वतांचे पक्ष सहज तोडण्यास समर्थ असतां त्यास विंध्य दमन कां होत नाहीं ? तसेंच अग्नि, यम, अष्टवसु, अकरा रुद्र, बारा आदित्य, अश्विनीकुमार, इत्यादि प्रबळ देवांना विंध्यदमन कां कठीण झालें ? हें मला समजत नाहीं. मी साधारण मुनी असून गिरिदमनाचें कार्य मजवर येऊन पडलें आहे व ज्या अर्थीं अमर हें कार्य करण्यास थकलों ह्मणतात त्या अर्थी ईशसंकेत कांहीं वेगळा दिसतो. असो. काशीबासाविषयीं एकदां मुनी बोलले तें मला आतां आठवलें तें तुला सांगतों तें ऐक. मुक्ति मिळण्याकरितां जे नर काशीत राहण्याची इच्छा करितात त्यांस बहुत विघ्नें येतात, असें जें वृद्धांचें मत आहे तें बरोबर आहे व त्याप्रमाणे हें विघ्न आपल्यास प्राप्त झालें आहे. यावरुन विश्वेश्वर आपल्यास विमुख झाला असें मला वाटतें. असें बोलून मनांत खिन्न होऊन दंडपाणीस अगस्ती ह्मणाले, हे सर्व यक्षाच्या राजा ! काशींतून मला बाहेर घालविण्यासारखें मीं कोणतें पाप केलें आहे, तें मला कळत नाहीं. मीं सर्वदां पुण्याचरण केलें असें असून काशीत्यागाचें दुःख मला कां प्राप्त झालें ? असा शोक करीत काशीप्रदक्षिणा करुन डोळ्यांतील अश्रु पुसून सर्व बाल, वृद्ध, मुनी, वृक्षलता, पाषाण यांचा निरोप घेऊन, पुनः पुनः काशीकडे पाहून ह्मणाले, लोपामुद्रे ! पहा, देव किती दुष्ट आहेत ! कोणीही पुण्य आचरण करुं लागले कीं त्याच्या पुण्याचा क्षय करण्यास ते नेहमीं तयार असतात. असो, देवाकडे तरी काय दोष ! आपुलें प्रारब्ध खोटें ! असें ह्मणून शिव ! शिव ! नांवाचा उच्चार करीत पत्‍नीसह अगस्ती मुनी काशीच्या बाहेर मोठया कष्टानें निघाले.

वाटेंत उपोषणें करीत चालल्यामुळें श्रमानें घाम येऊन मूर्छित होत असत. अशा रीतीनें ते विंध्य पर्वताजवळ आले. त्यांचें उग्र रुप व तपाचें सामर्थ्य पाहून पर्वत कापूं लागला व त्यानें लागलींच आपलें लहान रुप धरिलें व हात जोडून अगस्तीची प्रार्थना केली कीं, मी आपुला दास आहें, काय आज्ञा असेल ती करावी. हें ऐकून अगस्ती बोलले कीं, "विंध्या, तूं ज्ञाता आहेस, माझा प्रताप तुला माहीत आहे ? मी दक्षिण दिशेस जातों आहे. मी परत येईपर्यंत तूं आपलें लहानरुपच धरुन रहा." तें वचन विंध्यपर्वतानें मान्य करुन आपल्यास अगस्तीनें शापिलें नाहीं यामुळें आपल्या पुनर्जन्म झाला असें तो मनांत समजला व त्या मुनीची परत येण्याची वाट पहात तो लहान रुपानेंच राहिला. यामुळें सूर्याच्या वाटेवरील अडथळा नाहींसा होऊन रथ पुढें चालूं लागला, व सर्व कर्में पूर्वीप्रमाणें व्यवस्थित चालूं लागलीं.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP