TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

करवीर माहात्म्य - खंड १

करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते.

खंड १
सूतांनीं ऋषीस सांगितलेलें क्षेत्रमाहात्म्य.

"नारदमार्कंडेयसंवाद."

एकदां नैमिषारण्यांत ज्ञानवान् व ध्यानस्थ असणारे कश्यप, गालब, गौतम, गार्ग्य, अंगिरा, भृगु, वसिष्ठ, याज्ञवल्क्य, भरद्वाज, अत्रि, जमदग्नि, पराशर, विश्वामित्र इत्यादि एकाहून एक महान् श्रेष्ठ अठयाऐंशी हजार मुनि शुष्कपणें व वायु भक्षण करणारे, मोठे आत्मसंयमी असे, सूताप्रत प्रश्न करिते झालें कीं, "हे सूता, सर्व शास्त्रांतर्गत मधुर कथन अर्थ करुन तूं सांगतोस यास्तव तूं चिरायु हो. त्रिभुवनांतील प्रख्यात तीर्थांचें माहात्म्य ऐकून आमचे मनीं संशय उत्पन्न होत आहे; करितां ज्या स्थळीं पुष्करादि तीर्थें, गंगा, कृष्णा, वेणी, गौतमी आदि नद्या, प्रयाग, गया, काशी, सेतुबंध, द्वारका, गोकुळ इत्यादि तीर्थें जेथें असतील असें एकच क्षेत्र आह्मास निवेदन कर ह्मणजे आमची संशयनिवृत्ति होईल." सूत ह्मणाले, "सर्वज्ञ मुनी हो, माझें दैव मोठें यास्तव, तुह्मी हा प्रश्न केला, त्याचें उत्तर श्रीव्यासांना नमस्कार करुन मी सांगतों तें श्रवण करा.

वाराणस्याधिकं क्षेत्रं करवीरं पुरं महत्  ( क० मा० १. २९. )

ज्या क्षेत्रांत त्रिलोक्यांतील सर्व तीर्थें आहेत, ब्रह्मेंद्र, मुनी ज्या ठिकाणीं वास करितात, जेथें प्रत्यक्ष श्रीविष्णूच देवीचें रुप धरुन राहिले आहेत, ज्या देवीचे हातांत ज्ञानामृत पूर्ण पानपात्र असून उजवे हातांत मातुलिंग आहे, खेटक व गदाही दोन आयुधें जिनें हस्तांत धारण केलीं आहेत, अशी लक्ष्मी ज्या ठिकाणीं वास करिते, व ज्या क्षेत्राला महामातृक असें नांव आहे, व ज्या क्षेत्रीं कश्यपादि ५ मुनींनीं भागीरथीसमान पापाचें क्षालन करणारी पंचगंगा नामाभिधान असलेली नदी आणिली आहे, जे अष्ठोत्तरशतकल्पांचें प्राचीन क्षेत्र आहे व ज्यात अनंत लिंगें असून जें आदिशक्तीचें पीठ आहे तें करवीर (ज्यास कोल्हापूर नांव आहे ) त्या क्षेत्राचा हे मुनी हो, तुह्मी आश्रय करा.

सूतांनीं आणखी असें सांगितलें कीं, या करवीरक्षेत्राचें आठ दिशेस क्षेत्राचें रक्षण करण्यास अष्ट लिंगें आहेत तीं क्षेत्रवासी जनास मृत्यूनंतर मुक्ति देतात; तसेंच चार द्वारांचें रक्षण करण्याकरितां श्रीविष्णु हातांत चक्र घेऊन जलामध्यें शयन करीत आहेत. चार दिशेस चार कल्लेश्वर असून रुद्र, इंद्र, चंद्रादि देव भक्तीनें या ठिकाणीं वास करीत आहेत. ब्रह्मदेवांनीं पूज्य मानिलेली जीवंती नदी जिला मिळालेली आहे अशी जयंती नदीही तेथें आहे. रामेश्वरही तेथें असून पर्वतावर श्रीमल्लिकार्जुनही वास करीत आहेत. क्षेत्राच्या वायव्य दिशेस प्रयाग आहे व रुद्रपदही तेथें आहे. विशाळ तीर्थांत हटकेश्वराचें वास्तव्य असून विष्णु गयाही तेथें आहे. तसेंच श्रीविश्वेशादिकांचीं दिव्य लिंगें तेथें असून क्षेत्रापासून पश्चिमेस तीन योजनें दूर बदरिकावन आहे. सर्व इच्छा पुरविणारे विरजतीर्थ मुद्गलमुनीसह तेथें आहे. क्षेत्राच्या उत्तरेस गोदावरी नदी असून श्रीत्र्यंबकेश तेथें आहेत. क्षेत्राचे पश्चिमेस गोपगोपींनीं युक्त गोकुळ आएह व बत्तीस युगें श्रीपांडुरंगाचा वास असलेलें नंदवाळक्षेत्रही नैऋत्येस निकटच आहे. श्रीमहालक्ष्मीनें दुष्टांचा संहार करुन साधूंचें रक्षण करण्याकरितां ज्याची योजना केली तो रंकभैरव करवीरांत आहे. क्षेत्राच्या पूर्वद्वारीं उज्वलांबा देवी, दक्षिणेस कात्यायनी, पश्चिमेस सिद्ध आणि बटुकेश, उत्तरेस रत्‍नेश्वर वास करीत आहे व वीरमहार्गल व रंकभैरव हातीं दंड देऊन दानवांचा नाश करण्याकरितां श्रीनें नजीक ठेविले आहेत. अशा पुण्यपावन क्षेत्रांत दीड महिना वास केल्यानें अनेक कल्पांत केलेलीं पातकें नाश पावून वास्तव्य करणाराचीं सात कुळें पवित्र होऊन त्यास उत्तम गति मिळते यांत संशय नाहीं.

याप्रमाणें करवीर क्षेत्राचें माहात्म्य वर्णन करुन सूतांनीं ऋषींस असें सांगितलें कीं, ज्या क्षेत्राचें माहात्म्य श्रीविष्णूंनीं ब्रह्मदेवास कथन केलें, ब्रह्मदेवांनीं नारदास सांगितलें व नारदांनीं आपला प्राणमित्र मार्कंडेय यांस कथन केलें तें तुह्मांस सांगतों तें श्रवण करा. एके दिवशीं मार्कंडेयमुनी मनांत विचार करिते झाले कीं,"वेद, धर्मशास्त्र पुराणें, वेदांगें धनुर्वेद, न्याय, शास्त्र, आयुर्वेद, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, अर्थशास्त्र, मंत्रशास्त्र नानादेशभाषा व लिपी या सर्व मी जाणतों; धर्मानें द्रव्य मिळवून मीं उत्तम भोगही भोगिले. आतां माझें तारुण्य जाऊन मला जरा प्राप्त झाली आहे. विद्या पढण्यांत व द्रव्य मिळविण्यांत माझें आयुष्य निघून गेले, मी सर्वव्यापी परमेश्वराचि आराधना कधींही केली नाहीं, चौर्‍यांशी लक्ष योनी फिरुन मोक्षचें द्वार जो मनुष्य जन्म तो मी व्यर्थ घालविला, यास्तव मला फार दुःख वाटत आहे. मला आतां असें कोणतें पवित्र ठिकाण मिळेल कीं, जेथें राहून थोडेंही तप केलें तथापि तें अत्यंत फलदायक होऊन आयुष्यही जेथें वृद्धिंगत होईल व सर्व पातकांपासून मी मुक्त होऊन परम पदास जाईन."

याप्रमाणें मार्कंडेय मुनी मनांत विचार करीत असतां अकस्मात् नारदमुनी त्या ठिकाणीं प्राप्त झाले. त्यांचे दर्शन होतांच मार्कंडेय मुनीनें मोठया आनंदाने त्यांना नमस्कार करुन विनंति केली कीं, हे नारद मुने, माझें मनांत एक दारुण चिंता उत्पन्न झाली आहे तिचें निवारण आपले वांचून दुसरें कोणी करण्यास समर्थ नाहीं; करितां मी ती आपणांस निवेदन करीत आहे, तिचें निरसन कृपा करुन करावें व ज्या क्षेत्रांत सर्व दैवते आहेत व प्रयागादि सर्व तीर्थें आहेत, ज्या ठिकाणीं थोडाही होम केला अथवा जप केला असतां त्याचें अनंतपट फलप्राप्त होतें, व ज्या ठिकाणीं इच्छा पूर्ण होतें असें कोणतें क्षेत्र आहे तें मला सांगा.

हा प्रश्न ऐकून नारदास संतोष वाटला. ते ह्मणाले, "अति पवित्र करवीर नामक क्षेत्र आहे त्या ठिकाणीं महालक्ष्मीचें आद्यपीठ असून तेथें नानातीर्थें मुनिगण, गंधर्व, सिद्ध, यक्ष, चारण व किन्नर हे वास करीत आहेत. तेथें जलरुपानें महादेव, पाषाण रुपाने विष्णु, बालुकारुपानें मुनिवृंद रहात असून, वृक्षरुपानें सर्व देवता वास करीत आहेत. हें क्षेत्र सर्व क्षेत्रांत श्रेष्ठ असून त्रिभुवनांत जीं साडेतीन कोटी तीर्थें आहेत तीं निवृत्ति संगमीं सूर्यग्रहणाचे वेळीं एके ठिकाणीं होतात, त्या ठिकाणीं एक हजार सूर्यग्रहणांमध्यें स्नान केल्याचे जें फळ तें प्रत्येक दिवशीं करवीरक्षेत्रांत वास केल्यानें मिळतें. उखर, स्मशान, क्षेत्र, पुर व पीठ असें पांच महा गुण या क्षेत्रांत असून हे भुक्तीमुक्तिदायक असून काशीहून याचें माहात्म्य यवभर अधिक आहे. संसार तापापासून मुक्त करण्याकरितां श्रीविष्णूंनीं उत्तरेस काशी व दक्षिणेस करवीर हीं दोन क्षेत्रें निर्माण करुन शिव व शक्तीरुपानें आपणच दोन्ही ठिकाणीं वास करीत आहेत.

एके वेळीं महालक्ष्मी व महादेव यांचा आपसांत वाद चालला होता. देवी ह्मणाली "माझें क्षेत्र श्रेष्ठ" व शंभू ह्मणाले "माझें क्षेत्र श्रेष्ठ." या वादाचा शेवट करण्याकरितां श्रीविष्णु तेथें आले व त्यांनीं हातांत तराजू घेऊन उत्तरेकडील पारडयांत काशीक्षेत्र व दक्षिणेकडील पारडयांत करवीरक्षेत्र घालून तराजू उचलला त्यामध्यें उत्तरेकडील पारडें वर जाऊन दक्षिणेकडील खालीं बसलें, हें पाहून श्रीविष्णु शंकरास ह्मणाले "नाना तीर्थे व देवांच्या पंक्ति महालक्ष्मीचे क्षेत्रांत अधिक असल्यामुळें तें पारडें जड होऊन खालीं बसलें. काशीक्षेत्रांत तसे नसल्यामुळें तें पारडे हलकें होऊन वर गेलें, यामुळें काशीपेक्षां करवीरक्षेत्र अधिक श्रेष्ठ आहे." हे पाहून शंकर खिन्न झाले व आपल्या गणांसह मनिकर्णिका व काशी या तीर्थाच्या रुपानें करवीरीं येऊन राहिले.  करवीर क्षेत्राचे पांच कोसांतील सर्व तीर्थांत गंगाच राहती झाली. विश्वनाथ आपल्या तीर्थासह करवीरास गेल्याचें ऐकून प्रयाग व बिंदुमाधव तेथें गेलें, हें ऐकून त्रैलोक्यांतील सर्व तीर्थेंही तेथें गेलीं. महाकालीरुपानें शिव, सरस्वतीरुपानें ब्रह्मदेव व लक्ष्मीरुपानें माधव तेथें वास करीत आहेत. तेहतीसकोटी देवही तेथें जाऊन वास करुं लागले. जयंती व गोमती यांचे संगमांत द्वारका निर्माण झाली, त्या संगमांतील माती जे नर कपाळीं लावितात ते भवसमुद्रापासून मुक्त होतात. या करवीरांत तिळा तिळाचे अंतरावर शंकर लिंगरुपानें आहेत. या ठिकाणीं स्वल्प दान व अल्प जप केले तरी मेरुप्रमाणें अनंत गुण होते. एक ग्रास जरी अन्न दान केलें तरी तें रत्‍नयुक्त भूमिदानाचें फळ देतें. तेथें भिक्षा दान केलें असतां कोटिगोदानाचें, हजार अश्वमेधाचें व शंभर वाजपेय यज्ञाचें फळ मिळतें. नारद ह्मणाले "मार्कंडेया, करवीरांत स्वल्प दानाचें जें मोठें पुण्य मिळतें त्याचे कारण असें आहे कीं, करवीरांतील नर आपल्यास भिक्षा घालतील तर त्यास अतीशय पुण्य प्राप्ति होईल असें जाणून श्रीदत्त या ठिकाणीं नित्य भिक्षेस फिरत असतात व दैवयोगानें त्यांस जो नर भिक्षा घालितो त्याचें पुण्य अगणित होतें. या ठिकाणीं कोणत्याही जातीस भिक्षा दान केलें असतां दान करणारा मनुष्य सद्गतीस जातो. वेदवेदार्थाचें दान जो नर येथें करिल त्याचें पुण्य वर्णन करण्यास शेषही समर्थ नाहीं. या ठिकाणीं जे नर द्विमुख धेनुदान देतात त्यास वैकुंठ प्राप्त होतें. हें महात्म्य ऐकून कपिल महामुनि या ठिकाणीं कायमचा वास करुं लागले."

नारद आणखी ह्मणाले "या क्षेत्राच्या पूर्वेस जयंतीगोमतीच्या संगमीं द्वारका आहे. त्या ठिकाणीं माझा वास आहे. दक्षिणेस दुर्वास ऋषी आहेत. अगस्ती मुनीने या क्षेत्राचें माहात्म्य जाणून व काशीत्यागाचें दुःख विसरुन करवीरक्षेत्राच्या दक्षिणेस आपली वस्ती केली. तसेंच क्षेत्राच्या वायव्य दिशेस पर्वतावर सोमेश्वरानजीक सोमतीर्थ आहे. त्या ठिकाणीं पराशर मुनीनें वास केला. विशाळ तीर्थानजीक श्रीवेदव्यास राहिले. वसिष्ठ च्यवनादि अठयाऐंशी हजार ऋषी आपापले परिवारासह ज्या क्षेत्राच्या भोंवती राहत आहेत, त्यांचें वर्णन करण्यास मी असमर्थ आहें. जीं जीं तीर्थें त्रैलोक्यांत आहेत तीं तीं सर्व या क्षेत्रांत आहेत. जे नर करवीरास जाण्याकरितां आपले घरांतून निघतात ते वाटेंत जितकीं पावलें टाकितात तितक्या त्यांच्या पितरांकरितां स्वर्गास जाण्यास पायर्‍या होतात व पावलोपावलीं त्यास अश्वमेधाचें फळ या तीर्थांच्या ठिकाणीं गयाशिरावर जो स्वपितराचे श्राद्ध करितो तो स्वतः मुक्त होऊन आपली शतकुळें उद्धरितो. दक्षिण काशी जें करवीर तें ज्यानें पाहिलें नाहीं त्याचा जन्म व्यर्थ होय. याकरितां हे मार्कंडेया, ज्या ठिकाणीं सर्व देवगण, शिव व महालक्ष्मी वास करीत आहेत तें पवित्र क्षेत्र कोल्हापूर कितीही प्राणांतिक संकट आले तरी तें सोडूं नको. त्या ठिकाणीं निश्चल तप कर ह्मणजे सर्व कामना पूर्ण होतील."

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:56.7970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खुरखुराट

  • m  Great fretting & pining:anxious and impatient desire. 
  • पु. ( खुरखुरचा अतिशय ) अतिशय चुटपुट तळमळ ; हुरहुर ; हांव ; उतावीळ . 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.