TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

करवीर माहात्म्य - खंड ५

करवीरे माहात्म्य पोथीचे पठन केल्याने साक्षात महालक्ष्मीची कृपा होते.

खंड ५
पराशर मुनींस श्रीनें दिलेलें पुत्रवरदान, व व्यास जन्मकथन.

अगस्ती ह्मणाले,  लोपामुद्रे ! पराशर मुनींच्या तपास पुष्कळ विघ्नें येऊं लागलीं, परंतु त्यास न जुमानितां निश्चयानें श्रीहरीचें ध्यान करुन ब्रह्मचर्य धारण करुन, थंडीवारा व सूर्यताप सहन करुन पायाच्या एका अंगठयावर अचल उभे राहून त्या मुनींनीं पुनः तप आरंभिलें; व विष्णु प्राप्तीकरितां त्यांनीं सूर्याकडे सारखी टक लाविली. त्यांचे शरीर कृश होऊन अंगावर शिरा दिसत होत्या. मत्स्यांनीं अंगावरील मांस खाल्लें होतें. शंभर वर्षें उदक प्राशन न केल्यामुळें शरीर शुष्क होऊन अस्तिगत प्राण राहिला होता. हें त्यांचें उग्र तप पाहून श्रीमहालक्ष्मीस दया आली व गरुडावर बसून आपल्या योगिनीसह पराशरापुढें उभी राहिली व बोलली कीं, "मुने ! तुझें उग्र तपामुळें मी प्रसन्न झालें आहे तुला पाहिजे असेल तो वर माग."

हें भाषण ऐकून मुनीनें सूर्याकडील दृष्टि काढून नेत्र पुसून श्रीकडे पाहिलें. तिच्या चारी हातात अनुक्रमें खेट, पानपात्र, गदा व मातुलिंग हीं होतीं. तिनें मस्तकावर योनि व नागलिंग धारण केलें होतें. उत्तम वस्त्रें व भूषणें परिधान केलीं होती, व कृपादृष्टीनें ती पहात होती. हें पाहून पराशर मुनी मनांत ह्मणाले; "मी पुत्र प्राप्तीकरितां श्रीविष्णूचें ध्यान करित असतां ही लक्ष्मी न प्रार्थना करिता मध्येंच कां आली. "माझी इच्छा पुरी करण्यास हिला काय शक्ति आहे ? फक्त श्रीहरीच माझी इच्छा त्रुप्त करील ! असा विचार करुन पराशरमुनी देवीस बोलले कीं, "मी श्रीविष्णूचा धांवा करीत असतां तुला मध्येंच येण्याचें व माझ्या तपास विघ्न आणण्याचें कारण नाहीं. माझी इच्छा तुझ्या हातून तृप्त होणार नाहीं. तूं विष्णुस्वरुपिणी आहेस असे सांगून मला मोहांत पाडूं नकोस;" असें बोलून त्यानीं पुनः सूर्याकडे डोळे लाविले.

देवी मनांत समजली कीं, मी विष्णुस्वरुपिणी आहें, हे या मुनीस अद्यापि कळलें नाहीं व याची भेदबुद्धि गेली नाहीं, यामुळें याच्या तपास विघ्नें येतात. याचें तप पुरें झालें आहे, याजवर कृपा केली पाहिजे; असा विचार करुन देवी हास्ययुक्त वदनानें बोलली कीं, "तुला वर देण्यास मी विष्णू आलों आहे, करितां इच्छा असेल तो वर माग. " असें बोलून शंख, चक्र, गदाधारी चतुर्भुज घनःशामवर्ण व नानादिव्य वस्त्राभरणानीं युक्त असें विष्णुस्वरुप लीलेनें धारण करुन तें परशरास दाखविलें. हें पाहून मुनी संतुष्ट होऊन पत्‍नीसह साष्टांग नमस्कार करुन बोलले कीं, "देवा ! तुझें चरणकमल पाहून माझें जन्म सफळ झालें. तूं सर्व विश्वाचा कर्ता असून सर्वापासून अलिप्त आहेस. मी मूढ असल्यामुळें तूं स्त्री किंवा पुरुष हें मला कळलें नाहीं. गुरुनें जें रुप सांगितलें तें मीं ध्यानांत दृढ धरिलें." असा अनेक प्रकारानें श्रीविष्णूचा स्तव केला. तेव्हां विष्णू बोलले कीं, माझ्यामध्यें व महालक्ष्मीमध्यें भेद मुळींच मानूं नको. पूर्वी शुभनिशुंभांनीं मोठें तप केलें, त्यामुळें प्रसन्न होऊन वर मागण्यास मी त्यांस आज्ञा केली. त्यांनीं वर मागितला कीं, पुरुषापासून आपल्यास मरण येऊं नये. तो वर मी त्यास दिला. त्यांनीं त्रैलोक्य जिंकून देवांस त्रास दिला यामुळें मीं लक्ष्मीरुप धरुन त्यांचा नाश केला व त्याच रुपानें जनांस भुक्ति व मुक्ति देण्याकरितां मीं करवीरांत वास केला. रामादिक अवतार जसे मजहून भिन्न नाहींत, तसाच महालक्ष्मीचा अवतार मी घेतला आहे. माझ्यामध्यें व लक्ष्मीमध्यें जो भेद मानील त्यास करवीरवासाचें फळ मिळणार नाहीं.

अगस्ती ह्मणाले, लोपामुद्रे ! हें विष्णूचें भाषण ऐकून पराशर मुनी संतुष्ट झाले व त्यांनी वर मागितला कीं, "तुमय्चाप्रमाणें मला पुत्र द्यावा." तो वर त्यास देऊन श्रीविष्णू ह्मणाले कीं, माझ्याप्रमाणें मुलगा तुला होऊन तो जगाचा उद्धार करील; असे बोलून त्यांनीं लक्ष्मीचें रुप धरिलें, नंतर पराशरांनीं खालीं लिहिलेल्या आठ श्लोकांनीं महालक्ष्मीची स्तुति केली :-

देवीस्तोत्र.

अनाद्यनंतरुपां त्वां जननीं सर्वदेहिनम्‌  ।
श्रीविष्णुरुपिणीं वंदेमहालक्ष्मीं परेश्वरीम्‌ ॥१॥
नामजात्यादिरुपेण स्थितां त्वां परमेश्वरीम्‌ ।
श्रीविष्णुरुपिणींवंदे० ॥२॥
व्यक्ताव्यक्त स्वरुपेण कृतस्त्रं व्याप्य व्यवस्थितां ।
श्रीविष्णु० ॥३॥
भक्तानंदप्रदां पूर्णां पूर्णकामकरीं परां ।
श्रीविष्णु० ॥४॥
अंतर्याम्यात्मना विश्वमापूर्य हृदिसंस्थितां ।
श्रीविष्णु० ॥५॥
सर्वदैत्यविनाशार्थं लक्ष्मीरुपां व्यवस्थितां।
श्रीविष्णु० ॥६॥
भुक्तिं मुक्तिं च दातुं वै संस्थितां करवीरके ।
श्रीविष्णु० ॥७॥
सर्वाभय प्रदां देवीं सर्व संशयनाशिनीं ।
श्रीविष्णु० ॥८॥
(क.मा. १५-६४-७१)


अगस्ती लोपामुद्रेस बोलले कीं, पुढें सत्वतीच्या उदरीं श्रीविष्णू व्यास रुपानें जन्मास आले. हें भाषण ऐकून लोपामुद्रा बोलली कीं, प्राणनाथ ! माझ्या ऐकिवांत असें आहे कीं, मत्स्योदरीच्या उदरीं जार पराशरापासून व्यास जन्म झाला, व तुह्मी सांगतां कीं, सत्यवतीचे उदरीं ते जन्मास आले; तर खरी हकीकत मला सांगा. हें ऐकून अगस्ती मुनी संतुष्ट होऊन लोपामुद्रेस त्यांनीं जें पुण्यपावन आख्यान सांगितलें, नारद ह्मणाले, मार्कंडेया तें तूं ऐक.

अगस्ती ह्मणाले :- पराशर मुनी आपल्या आश्रमांत राहात असतां एके दिवशीं पर्वकाळीं पत्‍नीसह भद्रा नदीस स्नानास गेले. तेथें स्नानसंध्यादि कर्मे आटोपून पूजा करण्यास आश्रमास गेले; सत्यवती त्या नदींस स्नान करीत असतां तिनें मत्स्य मत्सियणीची क्रीडा चालली होती ती पाहिली, व पती सेवनाचें भान तिला न राहतां कांहीं वेळ ती तेथें तें कौतुक पहात उभी राहिली नंतर पतीकडे गेली. त्या मुनींनें ज्ञान चक्षूनें तिला येण्यास उशीर लागल्याचें कारण जाणून शाप दिला कीं, "माझी सेवा सोडून मत्स्य क्रीडा पाहून तूं कामयुक्त झालीस करितां मत्स्योदरीं तूं जन्म पावशील." हा शाप ऐकून ती पतिव्रता थरथरा कांपूं लागली व पतीच्या चरणीं मस्तक ठेऊन तिनें प्रार्थना केली कीं, "आपण सर्व जातच आहां. माझे मानसिक पाप आपल्यास कळून आलें आहे. मनाची ओढ फार अनिवार आहे. आपण स्मृतीचे कर्ते आहां. माझ्या थोडया दोषास हा दंड फार मोठा आहे. मी अनन्य भक्तीनें तुह्मांस शरण आलें आहे तर कृपा करुन मला उश्शाप मिळावा." ही प्रार्थना ऐकून मुनीचें अंतःकरण द्रवलें व ते ह्मणाले कीं, माझा शाप खोटा होणार नाही, तथापि अरी तूं मत्स्याचे पोटीं जन्मलीस तरी नारी होशील. तें ऐकून सत्यवती बोलली कीं, श्रीविष्णु तुमच्या पुत्ररुपानें अवतरणार आहे त्यांचा जन्म माझे उदरीं व्हावा एवढी कृपा करा. पराशर मुनीनें "तुझी इच्छा पूर्ण होईल" असे सांगितलें व भद्रा नदीच्या काठीं पापविमोचन उत्तरेश्वर लिंग व तीर्थ आहे तेथें मुनी राहिले.

नंतर सत्यवतीनें आपल्या योगसामर्थ्यानें देहत्याग करुन भारद्वाज मुनीच्या वीर्यानें मत्स्यगर्भांत ती नारी रुपानें राहिली. ती मत्स्यी गंगेंत राहत असतां एका कोळ्यानें तिला पाहिलें. त्यानें ती घरीं नेऊन तिचें पोट चिरिलें त्यांत एक सुंदर कन्या निघाली. तिचें अंग स्वच्छ धुऊन त्या कोळ्यानें तिचें पालन केलें व माशाची दुर्गंधी तिच्या अंगास येत असल्यामुळें "मत्स्यगंधा" असें तिचें नांव त्यानें ठेविलें, व "मत्स्योदरी" असेही लोक तिला ह्मणूं लागले.

ती दिवसेंदिवस वाढली व उपवर झाली, परंतु तिच्या अंगीं दुर्गंधी असल्यामुळें तिला कोणी वर मिळेना. यास्तव त्या कोळ्यानें तिला नांवेवर वल्हीं मारण्यास ठेविली. हें पाहून ती फार दुःख करुं लागली. पराशर मुनींस तिची दया येऊन ते एके दिवशीं तिच्या जवळ गेले व मला परतीरास घेऊन चल असें त्यांनीं तिला सांगितलें. नांवेंत बसून पराशर मुनी जात असतां नदीच्या मध्यावर नांव आली, तेव्हां मत्स्योदरीस पाहून ते काममोहित झाले व पुर्वींचे वचन सत्य करण्याकरितां त्यांनीं तिला रतिभोग मागितला. ती लज्जायमान झालेली पाहूण आपला संग कोणी पाहूं नये ह्मणून धुकें उत्पन्न करुन दिशाधुंद करुन त्या मुनीनीं तिला रतिसौख्य दिलें व पुढें अमोघवीर्यानें मत्स्यगंधेच्या उदरीं व्यासरुप हरी प्रगटले. कृष्णानदींत * जेथें व्यास प्रगटले तेथे "खलखलेश्वर" निर्माण झाला. पुढें पराशर मुनीं जाण्यास निघाले त्यावेळीं मत्स्यगंधा बोलली कीं, "मी दुर्गंधा असून माझे कुमारीपणही नष्ट झालें, मला आतां कोणी वरणार नाहीं, करितां मला सुगंधा व कुमारी करा. नाहींपेक्षा तुह्मी माझें पतीच्या नात्यानें पालन करा."

हें ऐकून त्यांनीं तिला पूर्वीचें वर्तमान सांगितलें व बोलले कीं, "तूम अमगील जन्मीं अन्यनर सुखाची इच्छा धरलीस ती पूर्ण होण्याकरितां तूं सुगंधा कुमारी व राजस्त्री होशील" असा आशीर्वाद देऊन पराशर मुनी तपास गेले. नंतर व्यासही तपास निघाले, हें पाहून मत्स्योदरी खिन्न होऊन बोलली कीं, "मला टाकून तूं कोठें जातोस ?" हें वचन ऐकून व्यास ह्मणाले, माते ! तुला संकट येईल त्या वेळेस माझें स्मरण कर ह्मणजे मी तुला भेटून तुझें संकट निरसन करीन. असें बोलून मातेस नमस्कार करुन व्यासमुनी करवीरास आले व क्षेत्राच्या वायव्येस पंचगंगेच्या परतीरास च्यवन आश्रमानजीक जेथें भोगावती नदी गुप्त आहे त्या ठिकाणीं तप करुं लागले. श्रुतींचा अर्थ करुन पुराणें व इतिहा ते शिष्यांस पढवीत असत. अगस्ती ह्मणाले, लोपामुद्रे ! पराशराच्या आशीर्वादानें ती मत्स्यगंधा "कुमारी व सुगंधा" झाली व तिला मोहित होऊन शंतनुराजानें चंद्रवंशवृद्धि होण्याकरितां तिचें पाणिग्रहण केलें.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:57.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

allicine

  • न. ऍलिसिन 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.