श्रीदत्त विजय - अध्याय पहिला

स्वामी दत्तावधूतांनी लिहिलेली ही पोथी म्हणजे श्रीदत्त प्रभूंजवळ जाण्याचा अतिसुलभ मार्ग होय.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः । ॐ गणेशदत्त गुरुभ्यो नमः ।

ध्यानम्‍
सुरमुनि गणवेष्टितम्‍ हरि हर ब्रह्मादि आराधनम्‍ ।
विद्या ज्ञान कला गुणनिधिम्‍ सिद्धेश्वरानाम्‍ गुरौ ॥

करुणा प्रेम शांति क्षमादि भूषणं दाताच विश्वे जनाम्‍ ।
वंदे श्रीदत्त परात्पर गुरौ अज्ञान संहारिणाम्‍ ॥

दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंददायकः । मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरः ॥

दिगंबर मुने बाला । समर्था विश्वस्वामीने । परमहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥

ॐ हंस हंसाय विदमहे । परमहंसाय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात ॥

ॐ शून्य शून्याय विदमहे । परमशून्याय धिमही । तन्नो परब्रह्म प्रचोदयात्‍ ॥

ॐ दत्तात्रेयाय विदमहे । योगीश्वराय धिमही । तन्नो दत्त प्रचोदयात । ॐ नमोजी गजवदना । ऋद्धि सिद्धि दाता दयाघना । बैसे ग्रंथी येवोनिया । नमन माझे तुजलागी ॥१॥

वंदू सरस्वती वाग्विलासिनी । असंख्य विद्यांची स्वामिनी । ग्रंथामध्ये राहोनी । सिद्ध करी या ग्रंथाते ॥२॥

नमन समस्त सुरवरा । सिद्ध ऋषी योगीश्वरा । यक्ष गंधर्व विद्याधरा । विनम्र भावे प्रार्थितसे ॥३॥

हा श्रीदत्त विजय ग्रंथ । होवो सर्वां संमत । आणि सर्वांचे सामर्थ्य । राहावे ग्रंथामाजी या ॥४॥

हा ग्रंथ व्हावा सदगुरु । साधका नेवो पैलपारु । भक्त काम कल्पतरु । ऐसा व्हावा ग्रंथ हा ॥५॥

पठणे पुरवावे मनोरथ । ऐहिक आणि आध्यात्मिक । सर्वांसी मोक्ष प्राप्त । व्हावा ग्रंथ पठणाने ॥६॥

ऐसी करिता प्रार्थना । लागले ध्यान माझ्या मना । चिदाकाशात दैवते नाना । दिसो पाहा ती लागली ॥७॥

गणेश शिव कार्तिकेय । सरस्वती पार्वती विष्णुदेव । गायत्री गुरु दत्तात्रेय । दिसो पाहा ते लागले ॥८॥

श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती । श्रीस्वामी समर्थ दुर्गा भगवती । रुद्र भैरव मारुति । वरदान देती ग्रंथाते ॥९॥

षोडषी त्रिपुरसुंदरी । बाला राजराजेश्वरी । महालक्ष्मी अंबा परमेश्वरी । वरदान देती ग्रंथाते ॥१०॥

व्हावया जनकल्याण । होतसे ग्रंथ निर्माण । सर्व इच्छा पूर्ण । होतील ग्रंथ पठणाने ॥११॥

योगाचे होई ज्ञान । देवता देती दर्शन । सदभक्ता लागे ध्यान । केवळ ग्रंथ पठणाने ॥१२॥

सर्व कष्टांचे निवारण । श्रीदत्त करतील जाण । ऐसे देवोनी वरदान । गुप्त झाले देव ते ॥१३॥

नारायण प्रसन्न चित्त । आभार देवांचे मानीत । म्हणे ईश्वरा कृतकृत्य । केले आजि मजला तू ॥१४॥

अवतार झाले बहु होती । तैसी नोहे दत्तमूर्ती । सदा राहे पृथ्वीवरती । लोकोद्धार करावया ॥१५॥

विविध रुपाने श्रीदत्त । पृथ्वीवरी राह्ती फिरत । ती रुपे आजपर्यंत । चिरंजीव असती जाहली ॥१६॥

श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती । तिलोपा स्वामी समर्थ यति । अल्लमप्रभू ब्रह्मेंद्रस्वामी जती । स्वरुपे जाणा दत्ताची ॥१७॥

श्रीचिदंबर दीक्षित । महावतार बाबा प्रख्यात । साई गजानन सिद्ध । स्वरुपे जाणा दत्ताची ॥१८॥

अनंगदेव आणि नवनाथ । विविध धर्मांतील सिद्ध । दादा कलंदर आणि बुद्ध । स्वरुपे जाणा दत्ताची ॥१९॥

रुपे धरोनी अनंत । लोकोद्धार करिती दत्त । जना सन्मार्गा लावीत ऐसे कार्य तयांचे हो ॥२०॥

ऐसेचि रुप प्रकटत । नाम श्रीदत्तावधूत । पूर्ण रुपेण भगवंत । जगदोद्धारा प्रकटतसे ॥२१॥

रत्नागिरी ग्रामात । होता एक भक्त राहात । नाम मधुकर असत । असे अत्रि गोत्राचा ॥२२॥

दत्तभक्ती गृहात । पिढ्यान्‍ पिढ्या असे चालत । मधुकर दत्त भक्तीत रमत । मनोभावे करोनिया ॥२३॥

अक्कलकोट स्वामी समर्थ । ते साक्षात प्रभू दत्त । देव मामलेदार शिष्य असत । तया स्वामी समर्थांचे ॥२४॥

त्यांचे शिष्य घाग महाराज । येती पाहा रत्नागिरीत । मधुकरासी भेटत । आदेश देती दत्ताचा ॥२५॥

म्हणती भगवान दत्त । तुझ्या उदरी येत असत । हा निरोप देण्याप्रत । स्वामी समर्थे सांगितले ॥२६॥

ऐसे परी भगवान दत्त । भूवरी जाणा प्रकटत । भाद्रपद पौर्णिमा असत । तये दिवशी अवधारा ॥२७॥

विजय नाम संवत्सर । शके अठराशे पंचाहत्तर । मीन रास मिथुन लग्न गुरुवार । पाहा दत्त प्रकटले ॥२८॥

राशी लग्न पाहोन । ज्योतिषी करिती वर्णन । जगदोद्धारा कारण । पाहा दत्त प्रकटले ॥२९॥

पूर्ण परब्रह्म अवधूत । लोकोद्धारार्थ अवतरत । गुप्तरुपाने कार्य करीत । कळो नेदील कोणासी ॥३०॥

जैसा ईश्वर सारे करतो । परंतु तो कोणा न दिसतो । तैशापरी सर्व कर्ता । असोनी अलिप्त राहील हा ॥३१॥

पाप जगाचे खेचेल । भक्तिभाव वाढवील । कुप्रथा नष्ट करील । दैवी लहरी सोडोनिया ॥३२॥

जग आध्यात्मिक करेल । ध्यानमार्ग दाखवेल । सदप्रवृत्ती निर्माण करेल । ऐसा अदभुत देव हा ॥३३॥

करील पृथ्वीचे कल्याण । मानवतेचे वातावरण । मोक्ष असंख्या लागोन । देईल जाणा दत्त हा ॥३४॥

ऐसे ज्योतिषी सांगत । म्हणती दत्त साक्षात्‍ । भूमीवरी प्रकटला म्हणत । जगदोद्धारा कारणे ॥३५॥

मूळ पुरुष निराकार । प्रकटला पाहा ईश्वर । परी सोडोनी घरदार । वनांतरी जाईल हा ॥३६॥

द्वादश वर्षांपर्यंत । राहील गृही निश्चित । तदनंतर जगदोद्धारार्थ । सोडील आपुल्या गृहासी ॥३७॥

ऐसे सांगोनी ज्योतिषी । गेले आपुल्या गृहासी । नामकरण दत्तात्रेय विधिसी । करिती पाहा माता पिता ॥३८॥

दत्त नामे साक्षात । दत्तात्रेय स्वयं अवधूत । वाढो तेथे लागत । जगदोद्धारा कारणे ॥३९॥

दोन मासांचे बाळ असत । प्राण ब्रह्मरंध्री चढवीत । माता पिता दुःखित । जाहले मृत म्हणोनिया ॥४०॥

सगे सोयरे जमत । उत्तरक्रिया करो पाहत । अकस्मात एक अवधूत । प्रकट तेथे जाहले ॥४१॥

छोकरा किधर है ! म्हणत । सरळ घुसती घरात । अंकावरी पित्याच्या दत्त । असे समाधिस्थ पडलेला ॥४२॥

खेचोनी बाळासी घेत । थप्पड ब्रह्मरंध्री लावित । बाळ होवोनी जिवंत । रडो पाहा लागला ॥४३॥

पित्या हाती देवोनी बाळ । गुप्त झाले तात्काळ । विस्मये लोक सकळ । पाहात तेव्हा राहिले ॥४४॥

सर्वां आनंद होत । म्हणती दत्त साक्षात । प्रकट होवोनी येथ । पाहा बाळाते वाचविले ॥४५॥

ऐसेपरी बालदत्त । हळूहळू असती वाढत । एकपाठी एकाग्र चित्त । अनुभवा ऐसे येतसे ॥४६॥

पिता रोज पूजा करीत । गीता स्तोत्रे वाचत । ते सर्व पाठ होत । केवळ श्रवण करोनिया ॥४७॥

दोन वर्षांचे बालदत्त । असती अंगणी खेळत । हिमालयातील महासिद्ध । गृहा येते जाहले ॥४८॥

सिद्ध म्हणे मधुकरासी । दत्तात्रेय नांदे तव गृहासी । हे देव रहस्य महा हर्षी । आलो तुजला सांगावया ॥४९॥

लोकोद्धारा अवतार । धरोनी येती हरिहर । तैसा हाही दत्तावतार । जाहला असे परियेसा ॥५०॥

हा न राहील गृहात । द्वादश वर्षी गृह त्यजित । भ्रमण करील भारतात । लोकोद्धारा कारणे ॥५१॥

ऐसे पितयाते सांगत । तीन दिवस गृही राहात । त्या सिध्दापाशी असत । एक चमत्कारी मडके ते ॥५२॥

त्या मडक्यातून पदार्थ । काढून मुलांसी देत । रात्री मडक्यासी दाबीत । उशी करुनी निजतसे ॥५३॥

तीन दिवस राहोनी तेथ । हिमालयी प्रयाण करीत । ऐसे अनेक सिद्ध । येती भेटण्या दत्ताला ॥५४॥

चार वर्षांचे असता दत्त । सिद्ध येती अकस्मात । गाणगापुराहूनी आलो म्हणत । बाळ पाहाया कारणे ॥५५॥

मधुकर करी स्वागत । बाळ चरणावरी घालीत । भोजन सिद्धासी वाढीत । चरण प्रक्षालन करोनिया ॥५६॥

भोजनानंतर ते सिद्ध । सर्वांशी आशीर्वाद देत । श्रीगुरु चरित्र ग्रंथ देत । पठण याते करी म्हणती ॥५७॥

सर्वांचा निरोप घेत । आणि गृहाबाहेर येत । उभे राहोनी अंगणात । गुप्त होती तेधवा ॥५८॥

विस्मये सर्व पाहात । म्हणती दत्त साक्षात । गाणगापुराहूनी येत । ग्रंथ देण्या कारणे ॥५९॥

तै पासोनी घराण्यात । गुरुचरित्र वाचले जात । ती प्रथा अद्याप पर्यंत । आहे पाहा चाललेली ॥६०॥

सहा वर्षांचे असता दत्त । आणखी एक येती सिद्ध । चांदीची दत्तमूर्ती देत । मंत्रोपदेश करोनिया ॥६१॥

तेव्हा पासोनी बालदत्त । बैसो लागले ध्यानस्थ । प्रहर निघोनी जात । परी न भंगे ध्यान ते ॥६२॥

तैसेची जावोनी एकांतात । वृक्षातळी ध्यान करीत । श्रीदत्त जय दत्त जप करीत । अहोरात्र श्रीस्वामी ॥६३॥

सातवे वर्षी मारुति । बालदत्तासी भेट देती । ब्रह्माण्ड फिरवोन आणिती । ऐसे करिती नित्य ते ॥६४॥

बालदत्तासी नित्य । मारुति ब्रह्माण्ड फिरवीत । देव देवता दाखवीत । अनेक लोका नेवोनिया ॥६५॥

सात वर्षांचे बालदत्त । मारुति योग शिकवीत । सोऽहम्‍ ध्यान करी म्हणत । आत्मसुखाते पावावया ॥६६॥

सो म्हणावे श्वास घेता । हम्‍ म्हणावे श्वास सोडीता । ऐसे सोऽहम्‍ ध्यान करिता । समाधी लाभ होतसे ॥६७॥

तैसेचि कुंडलिनी जागृत । चक्रेही होती जागृत । चिदाकाशात प्रवेश होत । सोऽहम्‍ ध्यान साधनेने ॥६८॥

सोऽहम्‍ हंसा ब्रह्म । ऐसे करी गायन । हे निर्गुणाचे ध्यान । म्हणोनि मारुति सांगतसे ॥६९॥

नराते करी नारायण । चिदाकाश महाशून्य । सिद्ध महासिद्धांचे साधन । सांगे मारुति दत्ताला ॥७०॥

निर्विचार करावे मन । सदा राहावे विचार शून्य । परब्रह्म प्राप्तीचे साधन । म्हणोनि मारुति सांगतसे ॥७१॥

काही न करावी कल्पना । तेणे ब्रह्म हाता येते जाणा । त्यजिता विचार कल्पना । सिद्धावस्था येतसे ॥७२॥

ईश्वर प्राप्तीचे गुह्य साधन । मारुति सांगे दता लागोन । तेणे पावोनी समाधान । साधनी निमग्न होतसे ॥७३॥

दर्शनासी लोक येत । तयांचे कष्ट निवारीत । विभूति तीर्थ देत । मंत्रोनिया भक्तांना ॥७४॥

एके दिनी पिता पाहत । स्वामी बैसले ध्यानस्थ । सर्प छत्र धरीत । डोक्यावरी स्वामींच्या ॥७५॥

वर्ष बारावे लागत । स्वामी सर्वांचा निरोप घेत । लोककल्याण कारणार्थ । निघाले गृहा त्यजोनिया ॥७६॥

परोपकारार्थं इदं शरीरम्‍ । ईश चिंतनार्थ इदं मनः ।
विवेकार्थं इदं बुद्धी । ब्रह्मज्ञानार्थ जीवनम्‍ ॥७७॥

मानवी जीवनाचा अर्थ । एका श्लोकात स्वामी सांगत । परोपकार दान करा म्हणत । कल्याण व्हावया जन्माचे ॥७८॥

दाने लक्ष्मी प्रसन्न होत । दाने बुद्धी स्थिर राहत । इह - परत्र साधत । परोपकार दान करोनिया ॥७९॥

सर्व येथे राहणार । काही न येई बरोबर । सत्‍ कर्म आणि सदाचार । हेचि जीवाचे सांगाती ॥८०॥

भरो शांतीने विश्व । व्हावे आध्यात्मिक विश्व । भक्ती, ज्ञान, प्रेमयुक्त । व्हावे अखिल विश्व हे ॥८१॥

ऐसे लोका उपदेशीत । स्वामी तीर्थयात्रा करीत । औदुंबर नृसिंहवाडी पाहत । गाणगापुरी पोचले ते ॥८२॥

लोककल्याणार्थ शक्ती ठेवीत । म्हणोनी सर्वत्र फिरत । ऐसेपरी फिरत फिरत । त्र्यंबक क्षेत्री पोचले ते ॥८३॥

ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर । यासी पाहोनी गुरुवर । अंजनी पर्वतावर । जावोनी पाहा राहिले ते ॥८४॥

तया अंजनी पर्वतावर । राहती एक ऋषिवर । गुप्तरुपे तेथवर । कृतयुगा पासोनिया ॥८५॥

तयांच्या सहवासात । काही काळ दत्त राहात । तेथोनी मग पुढे निघत । कार्य आपुले करावया ॥८६॥

सप्तश्रृँगी देवीसी नमोन । नर्मदा अरण्यात करिती प्रयाण । ॐ कारेश्वरासी येवोन । काही काळ राहिले ते ॥८७॥

स्वामीसी खाद्य पदार्थ । स्वये नर्मदा आणोन देत । सर्प छत्र कौपीनधारी भेटत । एक योगी स्वामींना ॥८८॥

एकदा त्या अरण्यात । बैसले असती स्तोत्र म्हणत । एक शिळा सरकत । गुहाद्वार दिसतसे ॥८९॥

एक ऋषी बाहेर येत । स्वामीसी घेवोन सांगात । गुहेमाजी प्रवेशत । भूगर्भांत असलेल्या ॥९०॥

अनेक ऋषी समाधिस्थ । तेथे बैसलेले असत । ऋषी स्वामीते सांगत । आपण यातील एक असा ॥९१॥

सृष्टी आरंभापासोन । ऋषी समाधी लावोन । येथे बैसले असोन । आपण कार्य करितसा ॥९२॥

लोकोद्धारार्थ आपण । अनेक अवतार घेतले जाण । सन्मार्ग जना दावोन । मुक्त अनेका केले हो ॥९३॥

काही दिन राहोनी तेथ । गिरनार पर्वती येत । तेथील पादुका स्थानात । येवोनिया पोचले ते ॥९४॥

दत्त पादुका स्थानात । साधू स्वामींची पूजा करीत । ते स्थान करोनी जागृत । पुढे पाहा ते चालले ॥९५॥

अबु पर्वतावरी येत । बैसती दत्त घुमटीत । साधू पूजा करीत । श्रीस्वामींची तेधवा ॥९६॥

गुर्जर प्रांतीचे साधक । स्वामींसी प्रार्थना करीत । अध्यात्मयोग आम्हाप्रत । कृपा करोनी सांगावा ॥९७॥

ते सर्व ब्रह्मज्ञान । आत्मज्ञान योगज्ञान । पुढील अध्यायी वर्णन । करोनी तुम्हा सांगतसे ॥९८॥

या अध्यायाचे करिता पठण । त्यासी मिळे योग साधन । परब्रह्म प्राप्तीची खूण । वर्णिली असे येथे हो ॥९९॥

त्या ओवीते काढावे शोधून । आणि तैसे करावे साधन । मुक्ती मार्गाचा सोपान । आहे येथे सांगितला ॥१००॥

स्वस्ति श्रीदत्त विजय ग्रंथ । ही अक्षरे नव्हे अमृत । प्राशिता अमर होत । मोक्षमार्गाचे साधन हे ॥१०१॥

॥ अध्याय पहिला ॥ ॥ ओवी संख्या १०१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP