अंक तिसरा - प्रवेश तिसरा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( नगराच्या वेशीजवळील देखावा . दमयंती रस्त्यावर बसलेली आहे . नल जवळच उभा आहे . दोघांच्याहि अंगावर एक एक अगदी साधे वस्त्र आहे . नल केवळ एक धोतर नेसलेला असून उत्तरीय वस्त्र सुद्धा त्याचे खांद्यावर नाही . )

नल - प्रिये , तूं इथे अशी रस्त्यावर बसलेली आणि मी असा तुझ्याजवळ उभा अशा रीतीने तीन दिवस तर गेले . पूर्वी जे हे नागरिक आपला सन्मान करीत तेच आता आपल्याकडे ढुंकूनहि पाहत नाहीत . मी गादीवर असतांना भिकारी सुद्धा असा दीनपणे वाटेवर बसलेला आढळत नसे . नागरिक त्याची काळजी घेत असत . किंवा माझे नगर रक्षक तरी त्याची वास्तपुस्त करीत आणि व्यवस्था लावीत . आणि आता एक उच्च कुलातला पुरुष अन् ‍ त्याची पत्नी - निषधाचा सम्राट आणि सम्राज्ञी याच निषधामध्ये तीन दिवस आणि तीन रात्री इथेच राहून नुसत्या पाण्यावर जगत असतांना या लोकांनी त्यांच्याकडे ढुंकूनहि पाहू नये ना ? प्रेमार्द्र दृष्टि तर राहिली दूरच ! काय हा अधः पात !

दमयंती - पण यात नागरिकांचा तरी काय दोष ? पुष्करभाऊजींच्या आपल्याविषयीच्या पराकाष्ठेच्या द्वेषामुळेच ते असे वागत असावेत . होतंय ते चांगलं नाही ; पण त्यावर उपाय नाही , असं त्यांना वाटतंय हे त्यांच्या मुद्रेवरुन नाही कां दिसत ?

नल - पण पुष्कराला तरी माझा इतका द्वेष करायचं काय कारण ? आपण त्याचेशी काय असे वाईट वागत होतो म्हणून त्याने हा डाव साधावा ?

दमयंती - कलीची करणी , दुसरं काय ?

नल - कलीला कां दोष देतेस ? त्या बिचार्‍याचा यात काय संबंध ? आपलंच दैव फुटकं ! हे काय ऐकू येतंय ? ही दवंडी कसली ?

( दमयंती उठून उभी राहते . दोघेहि दवंडी नीट ऐकतात . )

दवंडी - नागरिकहो , ऐका . निषधाधिपति पुष्कर महाराज यांची सर्वांना आज्ञा आहे की कोणीहि कसल्याहि प्रकारचे सहाय नल दमयंती यांना करु नये . जो कोणी त्यांचेशी सहानुभूतीने वागेल त्याचा तत्काळ वध करण्यात येईल .

( दवंडी ऐकून दमयंती मटकन् ‍ खाली बसते . )

नल - अरेरे , काय हे दुर्दैव ! जेथे नेहमी जयजयकारच कानावर यायचा तेथे आता असली दवंडी ऐकू यावी ना ? चला ! दमयंती आता या क्षणी नगरातून बाहेर पडले पाहीजे . म्हणजे कुणी आपल्याशी चांगुलपणे वागायला नको आणि बळीहि पडायला नको . चल दमयंती , उठ लवकर . तीन दिवसांच्या उपासामुळे तुझ्या अंगी बळ नाही उरलं हे मला समजतं आहे ; पण उपाय नाही . निषधाची सीमा येथून अगदी जवळ आहे . तिथल्या अरण्यात आपल्याला निदान कंदमुळे तरी मिळतील . अगदीच नाही तरी निदान झाडांचा पाला तरी खाता येईल . किंवा पूर्ण स्वतंत्र अशा निर्झराचं शुद्ध जल तरी मुक्तपणे प्राशन करता येईल .

( नल चालू लागतो . दमयंती त्याचे पाठोपाठ जाऊ लागते . )

( वनाचा देखावा . नलदमयंती प्रवेशतात . )

नल - येथे येवढया मोठ्या अरण्यात भूक शमविण्यासाठी काहीहि मिळू नये ना ? दमयंती मी जर भुकेने इतका व्याकूळ झालो आहे तर तुझी काय अवस्था झाली असेल ? या हालांमध्ये आणखी वखवखलेल्या लांडग्यांप्रमाणे हल्ला करणार्‍या थंडीची भर ! या एकुलत्या एक वस्त्राने ही थंडी कशी भागणार ? ( थोडया वेळाने ) प्रिये , लवकर इकडे ये . ते तिथे काय आहे पाहिलंस कां ?

दमयंती - ( पाहून ) खरंच की ! ते तर सोन्यासारखे पंख असलेले पक्षी दिसताहेत . नक्कीच कांचन पक्षीच हे !

नल - चला . निदान आज तरी कित्येक दिवसांनी हे भक्ष्य दिसते आहे . शिवाय यांच्या पंखांचं सोनंहि आपणाला मिळेल . प्रिये , मी आत्ता त्यांना धरुन आणतो पहा .

दमयंती - पण नाथ , पकडणार तरी कशानं ?

नल - या माझ्या नेसत्या वस्त्राशिवाय दुसरं कोणचे साधन बरं ? तू काही काळजी करु नकोस . मी याच वस्त्रात त्यांना गुरफटतो .

( नल कमरेच्या वस्त्राला हात घालीत कक्षामध्ये शिरतो . दमयंती दुसरीकडे पाहू लागते . थोडयाच वेळात खालील वाक्य कुणी तरी मोठयाने बोललेले तिच्या कानी पडते . ती चमकून नलाकडे बघते . आणि एक बारीक चित्कार तिच्या मुखातून बाहेर उमटतो . )

" अरे महामूर्खा नला , आम्ही खरे कांचन पक्षी नाही . आम्ही फांसे आहोते फांसे ! तुझे हे एक उरलेले वस्त्रहि हिरावून घेण्यासाठीच आम्ही आलो होतो . एकुलत्या एक का होईना , पण तू सवस्त्र गेल्यामुळे आम्हास चैन पडेना . "

( दमयंती दिङमूढ होऊन उभी असतांना आतून नलाचे बोलणे ऐकू येते . )

नल - दमयंती , ज्यांच्या तीव्र क्रोधामुळे मी वैभवभ्रष्ट झालो , दुःखारितेकाने आणि भुकेने व्याकुळ झालो आणि ज्यांच्यामुळे निषधामध्ये माझा पावलोपावली अपमान झाला ते हे फांसे शेवटी पक्षीरुप घेऊन माझे हे शेवटचे वस्त्रसुद्धा छिनावून नेत आहेत गं !

दमयंती - ( घाई घाईने पदराचा धडपा फाडत ) महाराज , जोपर्यन्त ही आपली प्रिय पत्नी आपल्या पाठीशी उभी आहे , तोपर्यन्त तरी आपण उघडे वाघडे पडू शकणार नाही . हे घ्या . हे मी माझं वस्त्र फाडून तुम्हाला देत आहे . ( कक्षामध्ये पदराचा धडपा फेकते ) काही संकोच न करता हे वस्त्र खुशाल परिधान करावं .

( नल ते वस्त्र कमरेला गुंडाळून बाहेर येतो . )

नल - धन्य आहे तुझी ! तुझं हे अलौकिक प्रेम पाहून माझी मलाच आता लाज वाटू लागली आहे . माझ्याच मूर्खपणामुळे तुला हे सगळे क्लेश सोसावे लागत आहेत . वास्तविक , मी माझ्या प्राणांचे मोल देऊन तुला सांभाळावी , तुझी लाज राखावी , पण आज माझीच लाज राखायची पाळी तुझ्यावर आली . हे तुझे उपकार मी कसे फेडू ?

पद १०

नाथ तव हा नादान निर्धन ।

कैसे फेडिल थोर तव ऋण ? ॥१॥ ध्रु

प्रेमपूर्ण या अश्रूपंक्तिविणं

किंवा दुसर्‍या प्राणधनाविणं

नाही दुसरे जवळी लव धन

या भ्रष्ट नैषधापाशी ॥२॥

दमयंती - महाराज , मी आपली अर्धांगी आहे , उपकाराची कसली भाषा बोलता ?

नल - देवि , हा तुझा पति अत्यंत दुरवस्थेला येऊन पोचला आहे ग ! शोकाकुल झाल्यामुळे माझी विचारशक्ति पूर्णपणे लुप्त झालेली आहे . तरीहि मी जे सांगणार आहे ते नीट ऐकून ठेव . ते तुला हितकर असंच आहे .

दमयंती - मी कधी आपल्या आज्ञेबाहेर आहे कां ?

नल - हे जे अनेक मार्ग दिसताहेत ना ते सगळे अवन्ती आणि ऋक्षवत् ‍ पर्वत ओलांडून दक्षिण देशांकडे जातात . इकडे हा जो पर्वत दिसतो आहे ना तो आहे विन्ध्य . आणि ही पयोष्णी नदी . इकडे या बाजूला विपुल फळामुळांनी भरलेले महर्षींचे आश्रम आहेत . इकडे हा सरळ गेलेला मार्ग आहे विदर्भ देशाचा - तुझ्या माहेराचा . त्याच्याच बाजूला हा रस्ता कोसल देशाचा . याच्या पलिकडे दक्षिणेला हा दक्षिणापथ देश आहे .

दमयंती - नाथ , मी बोलते त्याचा राग मानू नका हं . महाराज , आपण कितीहि चतुराईने विदर्भाचा मार्ग मला दाखवला असला तरी त्या मागला आपला हेतु मला कळून चुकला आहे . त्यामुळे माझ्या ह्रदयाचा कसा थरकांप झाला आहे म्हणून सांगू ? मी अगदी गलितगात्र झाले आहे .

नल - थांब , दमयंती घाई करु नकोस . माझं म्हणणं तरी ऐक .

पद ११

छळी जीवा खंत सखे अशी

मजसाठी क्लेश हे साहशी ।

भीमगृही जाऊनि नांद सुखे

अन् ‍ काही करु नको चिंता सखे ॥

दमयंती - आपलं हे राज्य आपल्याच धाकटया भावाने हिरावून घेतलं आहे , आपलं सारं द्रव्य लुबाडलं आहे , इतकंच नव्हे तर शेवटचं एकुलतं एक वस्त्रसुद्धा हिसकावून घेतलं गेलं आहे . क्षुधा आणि श्रम यांनी आपण किती व्याकुळ झाला आहात . हे सगळं मला दिसत असूनसुद्धा तुम्हाला या निर्जन , निबिड अरण्यात सोडून मी सुखासाठी माहेरी धांव घेऊ ? तुम्ही येथे अरण्यरुदन करीत असतांना माहेरी मला अन्न गोड लागेल असं वाटलं तरी कसं आपल्याला ?

नल - तसं नाही गं दमयंती -

दमयंती - त्यापेक्षा महाराज , मला इथेच आपल्या पायापाशी राहू दे . नाथ , या घोर अरण्यात आपण थकला भागलात , भुकेने पोटात वेठ वळू लागले आणि उगीचच पूर्वीच्या आठवणींनी , आधीच्या वैभवाचा विचार करुन मनानेहि खचून जाऊ लागलात तर मी आपला सर्व शीण नाहीसा करीन . त्यातच मला सुख वाटेल . पतिदेवा , मी आपल्याला खरंच सांगते की शोकाकुल पुरुषाला भार्येसारखं दुसरं औषध नाही , सर्व दुःख हरण करणारं !

नल - हे सुंदरी , दुःखाकुल पुरुषाला प्रियपत्नीप्रमाणे दुसरं औषध नाही , हे सर्वस्वी खरं आहे . अगं , तुला सोडून जाण्याची माझी मुळीच मनीषा नाही . अगं वेडे , इतकी कशी गं तूं भित्री ? प्रिये , एक वेळ मी स्वतःचा त्याग करीन , पण तुझा त्याग मुळीच करणार नाही .

दमयंती - महाराज , माझा येथे त्याग करण्याची जर आपली इच्छा नाही तर विदर्भाचा मार्ग मला कां बरं सांगत आहात ? देवा , पति सुखात , वैभवात असतांना कोणीहि स्त्री त्याची सेवा करेल , पण विपन्नावस्थेतहि तितक्याच प्रेमाने जी स्त्री पतिसेवा करेल तीच खरी पत्नी , खरी पतिव्रता ! काही झालं तरी अशा स्थितीत मी तुम्हाला सोडून माहेरी जाणार नाही .

नल - मी तुला सोडून जाणार नाही म्हणून सांगितलं ना ? वाटलं तर वचन देतो .

दमयंती - नाथ , एरवी आपण माझा त्याग करणार नाही याची मला खात्री आहे . पण दुःखामुळे चित्त थार्‍यावर राहिलं नसल्यामुळे आपण मला एखादवेळी सोडून जाल अशी मला भीति वाटते .

नल - वेडी आहेस अगदी ! काढून टाक ती भीति मनातून !

दमयंती - नलराज , आपण मला पुनःपुन्हा विदर्भाचा मार्ग दाखविल्यामुळे माझं दुःख अनिवार झालं आहे . मन सैरभैर झालं आहे . महाराज , वाटल्यास आपण दोघंहि विदर्भाला जाऊ या . माझे बाबा आपला सत्कारच करतील याची मी निश्चिती देते . ही विपन्नावस्था संपेपर्यन्त आपण तेथे आनंदाने राहू बाळांसह ! आपल्या बाळांनाहि तेथे मी आधीच पाठवून दिलेलं आहे .

नल - प्रिये , तुला जसे तुझे पिता आधार वाटतात , तसे मलाहि भीम महाराज आश्रयस्थान वाटतात . तरीहि अशा परिस्थितीत त्यांच्याकडे जाणं माझ्या जीवावर येतंय .

दमयंती - त्यात काय गडे जिवावर येण्यासारखं आहे ?

नल - समृद्ध आणि वैभवशाली असतांना मी तुझ्या माहेरी येणं वेगळं आणि अशा दरिद्री अवस्थेत येणं वेगळं . वाटलं तर तू एकटी जा . मी नाही येणार . नाही तरी मुलांजवळ त्यांची आई पाहीजेच . मी थोडेच दिवसात गेलेलं सर्व वैभव परत मिळवून तुला न्यायला म्हणून विदर्भास येईन .

दमयंती - नाही प्रियकरा , तसं नको . जिथे तुम्ही तिथेच मी राहणार ! मुलांची काळजी करायचं काहीच कारण नाही . आई तेथे आहे , ती पाहेल नीट . पण मी गेले तर तुमची काळजी कोण घेणार ? हे पाय सोडून मी कदापि जाणार नाही . हे मी आपणास निक्षून सांगते .

नल - प्रिये , मीहि तुला वचन देतो की हा नल एकवेळ प्राणत्याग करेल , पण तुझा त्याग कधीहि करणार नाही .

पद १२

घेई मम वचन घे , सुंदरी तू

तुला मी त्यजणार ना कधि

ह्रदय विद्ध होईल जरी

प्राण जरी जातील तरी ।

दमयंती , ते बघ , तेथे काही तरी झोपडीसारखं दिसतं आहे . आपण जाऊन पाहू या काय आहे ते . मला तर वाटतंय की खोपटंच आहे ते .

दमयंती : खरंच ! केवढे उपकार झाले दैवाचे आपल्यावर ! विसाव्याला चांगली जागा तरी मिळाली . माझ्यात तर आता अगदी त्राण उरलेलं नाही . आणि ही झोपडी दिसल्यावर तर पाय गळालेच आहेत माझे . केव्हा एकदा तिथे जाऊन अंग टाकते आहे असं झालंय मला .

नल - प्रिये , तुझी ही दुःस्थिति पाहून खरोखरच मला फार वाईट वाटत आहे . हे सगळं घडलं माझ्यामुळे ! आजपर्यन्त अगदी सुखात वाढलेली तूं ! आणि आता हे असह्य क्लेश ! कसे सहन करणार तूं ? माझी सुद्धा दुर्दशा होते आहे , मग तूं तर काय , एक नाजुक सौंदर्यलता ! पण आता त्याला उपाय काय ? मीच मूर्ख ठरलो .

दमयंती - असं बोलू नका महाराज . तुमचा दोष काय यात ? सगळा नीचपणा त्या चाण्डाळानं केला असतांना तुम्ही स्वतःला अपराधी कां ठरविता ? मीच अभागिनी !

नल - खरंच तूंच अभागिनी , अन्यथा तूं माझ्याशी लग्नच कां केलं असतंस ? माझ्याशी जर तुझा विवाहच झाला नसता , तर हे हाल तुला कां पहावे लागले असते ?

दमयंती - नाथ , असं बोलू नका ना ! मी त्या दृष्टीनं नव्हतं म्हटलं . उलट माझ्यामुळेच तुमच्यावर ही आपत्ति ओढविली असं मला वाटतं . माझ्याशी लग्न होण्यापूर्वीपासूनच तुम्हाला माझ्याकरता क्लेश सोसावे लागले . सगळया राजांचा रोष पत्करावा लागला . दिक्पालांशी युद्ध करावं लागलं , कलीचं वैतुष्ट्य स्वकारावं लागलं . त्यामुळेच हे भोग तुम्हाला भोगावे लागताहेत . मीच दोषी , मीच अभागिनी , माझ्या दुर्दैवामुळे तुम्हाला उगीचच हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत .

नल - छे छे वेडे , अगं भलतंच बोलू नकोस . उलट तुझ्या प्रेमळ सहवासामुळे दुःखातसुद्धा मला थोडं तरी सुख लाभत आहे , स्वास्थ्य मिळतंय . तूं कशी दोषी ? जाऊ दे . ते विचारच मनातून काढून टाक . ही बघ झोपडी . चल आंत , जरा विश्रांती घेऊ ( कक्षेमध्ये जातात . )

( खोपटाचा आंतील भाग . एका कोपर्‍यामधे एक नागवी तलवार उभी आहे . आंत आल्याबरोबर दोघेहि मटकन् ‍ खाली बसतात . )

नल - प्रिये , नीज आता . भरपूर झोप घे . म्हणजे आतापर्यन्तचा शीण जाऊन पुढच्या प्रवासासाठी शक्ति प्राप्त होईल .

दमयंती - महाराज , आपणहि झोपावं . माझ्यापेक्षा आपल्यालाच अधिक मनस्ताप झालेला आहे . ( आडवी होऊन ) ही पहा माझ्या भुजांची सुंदर उशी मी आपल्यासाठी केली आहे . यावर मस्तक ठेवा आणि शान्त झोपा . पूर्वीच्या वैभवाचा किंचितहि विचार करु नका . कारण त्यामुळे त्रासच अधिक होतो . माझ्या बाहुपाशात आलात की सगळं विसराल .

नल - लाडके , माझ्यापायी इतके हाल होत असूनहि माझ्यावरचं तुझं प्रेम किंचितहि कमी झालेलं नाही , हे पाहून किती आनंद होतोय म्हणून सांगू ! तरी अजून माझ्या डोक्यातले विचार जात नाहीत . कालपर्यन्त सुवर्णमंचकावर शयन करणारी तूं , अतिशय मृदुमुलायम गाद्यागिरद्यांवर निजणारी तूं , आज या रानातल्या पडक्या खोपटात नुसत्या भूमीवर अंग टाकणार ना ?

दमयंती - प्रियकरा , नाथा , आपण जवळ असल्यावर ही कठीण भूमिसुद्धा मला रुईच्या कापसासारखी मृदु वाटेल . तेव्हा लवकर या आणि माझ्या दंडावर मस्तक टेकून स्वस्थ झोपा .

( नल अजूनहि बाजूलाच बसलेला आहे . )

नल - प्रिये , तूंसुद्धा माझ्या छातीवर मान ठेवून निःशंकपणे विसावा घे . मी तुला टाकून जाईन कि काय असा विचारसुद्धा मनात आणू नकोस . अगदी निर्धास्तपणे माझ्या या विशाल वक्षावर मस्तक टेक . नाही तरी आता आपणाला एकमेकांच्या आधारानेच काळ कंठायचा आहे . ( पाहून ) हे काय ? बोलता बोलता तुला निद्राहि लागली ना ? अरेरे , थकला भागलेला निष्पाप जीव ! किती यातना सहन करणार ? भुईला टेंकल्याबरोबर बिचारीला निद्रा लागली . धन्य तिची की असल्याहि परिस्थितीत मजवरील विश्वासाने ती गाढ झोपी गेली . आणि मी मात्र मघाशी मूर्खासारखं बोलून तिला दुखावलं .

पद १३

राग बिलावल ( चाल - सदया मम प्रभु राम दयाघन )

दुखवी निजरमणी मी सुंदरी

अनल नल होऊनि दुखविसी जाया ॥ध्रु॥

निजली जी कांचन मंचकी

लोळे ती भूमिवरी अजि सुंदरी ॥२॥

दिसला न जिला मत्त वायू ऐसा

तोचि हिला झोंबतसे खल जैसा ॥३॥

एरवी क्रीडा करतांना आपल्या हातून चुकून दमयंतीचा पदर थोडासा उडाल्याबरोबर घाबरुन जाणारा वारा आता हिच्या अंगाला कसा झोंबतो आहे पहा . या नलाची त्याला आता किंचितहि भीति वाटत नाही . एरवी माझ्या प्रियेकडे तिरप्या दृष्टीने पाहू न शकणारा सूर्य आज उन्हाच्या तिरीपीने तिला असह्य ताप देत आहे . कारण हा नल आज हतबल झाला आहे . वैभवाच्या शिखरावरुन दारिद्र्याच्या खोल खोल दरीमध्ये लोटला गेला आहे . एके काळचा हा सम्राट या निर्जन अरण्यातील पिसाट बनला आहे . अरे , इतका मी नीच , निर्बल कसा झालो ? त्या पुरुषाधम पुष्कराने परम प्रिय पत्नीचा पण लाव म्हणून सुनावलं तरी मी गप कसा बसलो ? इतका घोर अपमान मी सहन तरी कसा केला ? अरेरे , मुडद्याहून मुडदा बनलास ना नला ? केवळ द्यूतापायी ? नला , द्यूत खेळलाच नसतास तर ?

पण काय हा वेडा विचार ? इतिहासाच्या आणि भवितव्याच्या घटना इतक्या कां दुबळया असतात की त्यांनी केवळ आपल्या सदिच्छांप्रमाणे घडत जावे ? ही नाठाळ भवितव्यता कोणालाच अनुकूल होत नसते . या जगात , जगातच काय , सर्व विश्वात , स्वर्गात सुद्धा भवितव्य बदलण्यास कोणीहि समर्थ नसतो . देवांपासून क्षुद्र कीटकापर्यन्त झाडून सगळे दैवाच्या हातची खेळणी असतात . त्यांचाच खेळ मांडून दैव खेळत राहते आणि त्यात स्वतःच्या मनाप्रमाणे या बाहुल्यांची विल्हेवाट लावते . दैवाला कोणीच आडवू शकत नाही . ब्रह्मा - विष्णु - महेशसुद्धा भवितव्य बदलू शकत नाहीत . मग मी तर काय एक क्षुद्र मानव !

पण स्वतःच्या मूर्खपणाचं हे समर्थन कशाकरता ? या भीषण घटनेमुळे मी तर दुःखी झालोच , पण सोबत या माझ्या लाडक्या पतिव्रतेलाहि संकटसागरात बुडविलं . आता हिला या आपदेतून कसं वाचवावं ? हिला अशीच येथे सोडून निघून जाऊ ? त्याग करु ? भयंकर , फारच भयंकर ! अन्तः करणाला सहस्र इंगळया डसाव्यात , ह्रदयाला लाखो जळवा झोंबाव्यात , तसा हा विचार वाटतोय मला . तिचं मजवर किती प्रेम आहे ! या शोकसागरात ती मला क्षणभरहि एकटं सोडायला तयार नाही . आणि मी मात्र हिला या हिंस्र श्वापदांनी गजबजलेल्या घनदाट अरण्यात एकटीला टाकून निष्ठूरपणे निघून जाऊ ? मी गेल्यावर ही जागी होईल तेव्हा मी जवळ नाही हे दिसल्याबरोबर हिची किती वेडयासारखी अवस्था होईल बरं ! माझ्या नांवाचा टाहो फोडत ही या निबीड अरण्यात सैरावैरा धांवू लागेल . आणि आणि इथले हे हिंस्र पशू , ते वखवखलेले लांडगे , ते प्रचण्ड अजगर , ते विषारी सर्प , नको नको ! त्यातच पुष्करासारखे पुरुषाधम जगात काही थोडे नाहीत . हिच्या अंगावर तर पुरेसं वस्त्रहि नाही . ......... पण , प्रत्यक्ष परमेश्वराच्या परमोच्च पदाला पोचलेल्या पवित्र पतिव्रतेला पुष्करासारख्या पुरुषाधमांची पर्वा कशाला ? ही कीर्तिमती , महाभाग्यशालिनी , महापतिव्रता असल्यामुळे हिचं तेजच असं आहे की हिच्या अंगावर हात टाकायला वाटेत कोण धजेल ? सम्राट नलाच्या प्रियपत्नीला या जगात देव , दानव , राक्षस , यक्ष , गंधर्व , किन्नर या कुणापासूनच भय नाही . --- अं हं , ---- माझी पत्नी आहे म्हणून भीति नाही असं म्हंणायचा मला काय अधिकार आता ? माझी या जगात आता काय पत उरली आहे ? धाकटया भावानं हांकलून दिलेला एक महामूर्ख राजा म्हणूनच मला सारं जग ओळखणार ना ?

मग ? हिला सोडून जावं कि नाही ? सोडून गेलो तर नक्की काय होईल ? काहीच कळत नाही . कदचित माहेरी जाऊन ही सुखीहि होईल . काय सांगावं ? पण अशा प्रतिकूल परिस्थितीत मी त्याग केल्यावर हिची काय अवस्था होईल बरं ? मघाशी मी हिला नुसता विदर्भाचा मार्ग दाखविला तर हिच्या डोळयात कसं टचकन् ‍ पाणी आलं ! मग खरोखरच मी त्याग केल्यावर ?

नको , नको तो विचार ! यातून सूटायला एकच मार्ग ! आत्महत्या ! ( इकडे तिकडे पाहत ) एक वेळ मी माझा त्याग करीन , पण तुझा त्याग कधीच करणार नाही . ( पुन्हा हेच वाक्य म्हणतो , एक वेळ मी माझा त्याग करीन पण तुझा त्याग कधीच करणार नाही . ) ( कोपर्‍यात उभी असलेली तलवार दिसते . ) वा ! दैवानं कृपाच केली , मार्ग दाखवला . आत्महत्येचा विचार आल्याबरोबर साधन समोर ! ( खङ्ग हातात घेतो . ) हे असिलते , घूस या अन्तःकरणात ! हे कठोर , कणखर , खङ्गा , या काजळासारख्या काळयाकुट्ट काळजाला कापून काढ अन् ‍ सोडव या असह्य जाचातून ! ( खङ्ग छातीत खुपसू बघतो , पण ते छातीपर्यन्त न येता हातातून गळून पडते . )

नाही , मरणाने काहीच लाभ होणार नाही . मी आत्महत्या केली तरी हे उघडी पडणार , निघून गेलो तरी अनाथ होणार . सर्व दृष्टींनी त्याग करणंच श्रेयस्कर ! मी आत्मघात केला तर अरण्यातील कोल्ह्याकुत्र्यांनी आणि घारीगिधाडांनी ओरबाडून फाडून कुरतडून छिन्नविछिन्न केलेलं माझं अमंगळ प्रेत जागी झाल्यावर हिनं पाहिलं तर हिची काय अवस्था होईल बरं ? एखादे वेळी निराशेनं ही सुद्धा प्राण देईल . पण , मी जर हिचा त्याग केला तर पुन्हा भेट होईल या आशेवर तरी ही जगेल . माझा शोध घेण्यासाठी बाबांकडे जाईल आणि आणि मग सुखी होईल . ( स्वतःशीच हंसतो . ) अगदी योग्य विचार सुचला . बरं आहे , जिवलगे , जातो मी . दमयंती सर्व देवदेवता तुझं रक्षण करोत . धर्मरुपी कवचामुळे तुझं रक्षण होईलच . हा तुझ्या प्रेमळ , परंतु निर्बळ पतीचा शुभाशिर्वाद घे .

( नल हळुहळू निघून जातो . पण लगेच परत येऊन दमयंतीजवळ बसून रडू लागतो . दमयंती अजून गाढ झोपेतच आहे . )

नल - दमयंती , दमयंती , मी आलो पुन्हा ! तुझा त्याग करण्याचा अगदी ठाम निश्चय करुन मी गेलो खरा , पण नाही जाववलं मला ! तुझ्या प्रेमाने पुन्हा मला खेंचून आणलं . आता तुला एकटीला सोडून मी कधी जाणार नाही . शांत नीज . लाडके , मी तुला वचन दिलं आहे ना तुझा त्याग करणार नाही म्हणून ? मग ते वचन मी कसं बरं मोडीन ? ( दमयंतीच्या पायापाशी बसतो . ) हे पहा , या पायांपासून मी आता दूर जाणार नाही . ( थोडा वेळ तिचे पाय धरुन बसतो . )

पद १४

शोक भयंकर भडकला खळ ।

ह्रदयी जसा वडवानळ ॥

जाळितसे मम ह्रदयोत्पल ।

साहवे नच ताप हा पळ ॥१॥

त्या पापे वितळली ह्रदयतटिनी ।

सलीलरुपे धांवली मम नयनीं ॥

सांठवुनि ते उष्ण सलिल , मम रमणी ।

अर्पीन प्रेमभावे तव चरणीं ॥२॥

( दमयंतीचे पाय धरुन बसलेला नल एकदम उठून उभा रहातो व बोलू लागतो . )

नल - नाही नला , तुला गेलंच पाहीजे . तूं तुझं कर्तव्य विसरतो आहेस . प्रेमाच्या ढोंगाखाली आपल्याबरोबर या साध्वीलाहि देहदण्ड भोगायला लावणार तूं ? इतका नीच , कृतघ्न केव्हा झालास ? हिला क्लेश देऊन तुझे क्लेश थोडेच कमी होणार आहेत ? इथे एक क्षणभरहि राहू नकोस . जा , दमयंतीचा त्याग करुन निघून जा . म्हणजे तिला सुख लाभेल . हिला सुखी ठेवण्याचा याहून अन्य मार्ग नाही .

( नल जातो पण दुःखी कष्टी होऊन परत येतो . दमयंतीपाशी बसून ढसढसा रडतो . )

एखाद्या आजारी जखमी वनराजावर शेंकडो लांडगे तुटून पडले तर त्याची जशी अवस्था होईल तशी , किंबहुना त्यापेक्षाहि भयंकर घोर दुर्दशा झाली आहे माझी विचारांनी . त्यात पुन्हा प्रेम आणि कर्तव्य यांनी माझी कुतरओढ करायचं योजलं आहेसं वाटतं . दमयंतीला टाकून नाही जाववत मला . एकदा मी गेलो की पुन्हा हे दिव्य रत्न या दुर्दैव्याला दिसेल असं मनात देखिल येत नाही . मी गेल्यामुळे अगदी विव्हल झालेली हिची मूर्ति नेत्रांसमोर उभी राहून माझं काळीज चरचरा कापलं जातंय . पण उपाय काय ? प्रिये , तुझ्या भावी सुखाचा विचार करुन मला आता निर्दय बनून जावं लागतंय . रागावू नकोस . दमयंती आता मात्र मी जातोय तो पुन्हा परत न येण्यासाठीच . - अरे , पण हे काय ? कोमल पल्लवीप्रमाणे नाजुक आणि केशराप्रमाणे आरक्त अशा आपल्या हातांनी आपलं हे कोमेजलेल्या कमलाप्रमाणे भासणारं मुखकमल झांकून माझी लाडकी दमयंती एकदम इतकी बिचकली कां बरं ? माझा बेत तर हिला कळला नाही ना ? चला , आता क्षणाचाहि विलंब करत कामा नये . दमयंती , प्रिये , जातो मी . हा घे माझा शेवटचा गोड आशिर्वाद !

( नल कायमचा निघून जातो . )

( नल गेल्यानंतर एकवस्त्रा दमयंती एकदम दचकून जागी होते . लगेच उठून बसते . )

दमयंती - अगं बाई ! किती भयंकर स्वप्न पडलं ! अजून अंगावर शहारे येतात . नाथ , नाथ अग बाई , कुठे गेले ? अजून मी स्वप्नात तर नाही ना ? महाराज , तुम्ही मला दिसत कसे नाही ? प्रियकरा , असा लपंडाव कां खेळता ? आणि अशा या घोर अरण्यात ? सख्या , नकोअ ना ! पुरे गडे ! या , आणि पुढे येऊन मला आलिंगन द्या . माझं मन कसं गांगरुन गेलं आहे दिसत नाही कां ? कां माझीच मेली दृष्टी नाहीशी झाली ! ही काय दैवाची विचित्र लीला ? इतका वेळ आम्ही एकमेकांच्या बाहुपाशात निजलो होतो आणि आताच कसे हे नाहीसे झाले ? कां नाथ , तुम्हीच माझी नजरबंदी केलीत ? ही काय जीवघेणी थट्टा मेली ! महाराज , कुठे जवळच गेला असाल तर मला सांगून कां नाही गेलात ? माझी झोपमोड होऊ नये म्हणून ? पण इकडे माझा जीव कसा कासावीस झाला बरं ! ( थोडा वेळाने उठून उभी राहते ) पण महाराज , जवळंच जायचे झालं तर इतका वेळ कसा लागला ? मग माझं स्वप्न खरं होणार कि काय ? आपण पुन्हा येणार नाही काय ? नको , नको हा विचार . नुसत्या कल्पनेनेच जिवाचा कसा थरकांप उडतो .

महाराज , आपल्याला काही दगा ? - नाही , ते शक्य नाही . मग नाथ , आपण गेलात कुठे मला एकटीला टाकून ? कसे गेलात ? आपलं मजवरील प्रेमच नाहीसं झालं काय ? माझी काही चूक झाली कां ? महाराज , या दैवदुर्विलासामुळे नकळत मजकडून काही अपराध घडला असेल ; पण नाथ , त्याबद्दल या दीन दासीला क्षमा नाही कां करायची ? माझं इतकं मरण पाहू नका गडे ! मला वेड लागायची पाळी आली आहे . या ना , मला क्षमा करुन , बाहुपाशात घेऊन धीर द्या ना ! या विपत्तीत आपल्याशिवाय मला कुठला आधार ? :

पद १५

पर्जन्यजलबिंदुमात्र तृप्त करी चातकीला ।

जवळ घेऊनि त्यापरि तूं शांतवि मला नृपाला ॥

वृक्षराज जसा आलिंगुनि आधार देई लतेला ।

तसाच राया झणि येऊनि धीर दे या देहलतेला ॥

नाही ना येत ? मग ते दुष्ट स्वप्न खरं ठरलं म्हणायचं ! नाथ , इतके कसे हो निष्ठूर झालात ? आपण एकवचनी म्हणून सार्‍या विश्वात प्रसिद्ध ना ? मग माझा घात कसा हो केलात ? आपणच मला वचन दिलं होतं ना की तुला एकटीला सोडून कुठे क्षणभरहि जाणार नाही म्हणून ? मग ते वचन कसं हो मोडलंत ? दिक्पालांनी आपणाकडून फसवून घेतलेलं वचन पाळलंत , पुष्करला दिलेला शब्द मोडू नये म्हणून द्यूत खेळलात आणि ही आपत्ति ओढवून घेतलीत . मग माझ्याच बाबतीत असा वचनभंग कां केलात ? बायकांचा वेडा विश्वास ! आपल्या आश्वासनांवर मी विश्वास ठेवला आणि आपण माझा केसानं कि हो गळा कापलात ! सुवर्ण हंसाच्या बायकामुलांची आपल्याला करुणा आली , मग इकडे स्वतःच्या तडफडणार्‍या पत्नीची दया कां नाही येत हो ?

वृक्षांनो , सांगा ना कुठे गेले माझे प्राणनाथ ? वल्लरींनो , सांगा ना . दगडांनो , तुम्ही तरी सांगा , तुम्हाला माहीत असलंच पाहीजे . बोलत कां नाही ? रागावलात माझ्यावर ? इतका वेळ विचारलं नाही म्हणून चिडलात ? पण माझा काय दोष ? माझं मनच ठिकाणावर नाही , करु तरी काय ? पण आता विचारते आहे ना ? आता कां अबोला धरला आहात ? सर्वांना आश्रय देणार्‍या वृक्षांनो , लोण्याहून मृदू असं तुमचं अन्तः करण , तरी माझं दुःख तुम्हाला उघडया डोळयांनी बघवतं कसं ? चटकन् ‍ सांगून टाका ना माझे नलराज कुठे गेले आहेत ? कां तुम्ही सर्वांनीच मिळून कट केला आहे ? अशोक वृक्षा , तूं तरी सांग .

पद १६

अशोका ! कां न मज करी अ - शोका ?

देखुनि मम विरहशोका , कां न होसि पूर्णशोका ?

मज गमे तूं मृदुलह्रदा ! कां न होसि मत्सुह्रदा ?

भेटवी झणि मम वल्लभातें । तेंवि सुखवि मम चित्तें ।

( थोडा वेळ आकाशाकडे बघत उभी राहते . नंतर तारकांना उद्देशून बोलते . )

आकाशातील तारकांनो , तुम्ही डोळे मिचकावून हंसता आहात , त्या अर्थी हे कुठे आहेत ते तुम्हाला ठावूक असलं पाहीजे . मग सांगून टाका ना लवकर ! तुम्हाला चंद्राचा विरह खपतो कां ? नाही ना ? मग माझी कां बरं थट्टा करता ? विरहाच्या दुःखाची पुरेपुर कल्पना असूनहि माझी कींव येत नाही कां तुम्हाला ? कां तुम्हाला वारंवार विरह सोसावा लागतो म्हणून मलाहि सोसायला लावणार आहात ? कृपा करुन असला दुष्ट विचार मनातसुद्धा आणू नका . मी तुमची करुणा भाकते . तुमच्यापुढे पदर पसरते . माझे नलराज पुन्हा माझे पदरात घाला . नका तोंड फिरवूं . येवढी दया कराच मजवर . हे काय तुम्ही येथून निघूनच चाललात ना ? पहा बायकांचा जन्म ! एका पतिदेवानं त्यांचेकडे पाठ फिरविली की सारं जग त्यांना दुरावतं . पहा , हा अंधकारहि निघून चालला . उघडीवाघडी पडलेली , नवर्‍यानं टाकून दिलेली ही दीन दमयंती , भिकारीण झालेली ही एके काळची निषधसम्राज्ञी , सार्‍या जगाच्या दृष्टीस पडावी असा तर याचा बेत नाही ना ? अरे अंधारा , असा निष्ठूर होऊ नकोस . अजून थोडा वेळ तरी थांब अन् ‍ असाच मला झांकून ठेव . कारण माझ्या अंगावर सबंध वस्त्रसुद्धा नाही रे ! अशा स्थितीत ही पुण्यश्लोक नलराजाची पत्नी जगाला दाखवू नकोस रे !

नाथ , तुम्ही मला टाकलंत , तरी मी तुमच्या मागे धांवत येणार . तुम्ही काही अजून फार दूर गेला नसाल . तुम्हाला मी गांठू शकेन . अंगी बळ असेपर्यन्त या कांटयाकुट्यातून आणि दगडाधोंड्यांमधून ठेंचाळत , आपटत आपल्याला शोधण्यासाठी सैरावैरा घांवेन . डोळयात प्राण आणून झाडांच्या पानापानांमधून आपल्यास मी शोधीन . दुःख तुम्हाला एकटयाला भोगू देणार नाही मी . सुखांमध्ये वांटा घेतला तसाच दुःखांमधेहि घेणार . महाराज , ही आले पहा मी .

( धांवत कक्षेमध्ये जाते आणि किंकाळी फोडते . )

कक्षेतून दमयंती - धांवा , धांवा , नाथ या प्रचण्ड अजगरानं माझा घांस केला आहे पहा . आता मी तुमच्या दुःखात वांटा कसा घेणार ? या दुष्टाच्या तावडीतून सुटून आपल्या बाहुपाशात येईन असं काही मला वाटत नाही . महाराज , हा माझा शेवटचा प्रणाम घ्या आणि आपला शुभ आशिर्वाद मला द्या . म्हणजे मी सुखाने प्राण सोडेन .

( पुन्हा एक ह्रदयभेदी किंकाळी फोडते . )

( पडदा )

समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP