अंक तिसरा - प्रवेश दुसरा

डॉ . पद्माकर विष्णु वर्तक यांनी प्रस्तुत संगीत नाटकात नल दमयंतीची उत्कट प्रेमकथा अतिशय छान फुलवली आहे


( पुष्करचा महाल . पुष्कर आनंदाने येरझारा घालत आहे . )

पुष्कर - चला , फार दिवस जे मनात होतं ते एकदाचं सफळ झालं . रक्ताचा एकहि थेंब न सांडता मी सम्राट तर झालो . आता मला काय कमी आहे ? नलाला गादीवरुन खाली ओढून मी ती बळकावली , यातच मला भूषण वाटतं . ज्याप्रमाणे राज्याच्या गादीचं झालं त्याप्रमाणे दमयंतीच्या शेजेचंहि व्हायला हवं होतं . तिथूनसुद्धा नलाला हुसकावून मी ती बळकावयाला पाहीजे होती . पण तेवढं जमलं नाही . जाऊ दे . मिळालं तेवढं काय कमी झालं ? तरी पण राज्याबरोबर दमयंतीहि मिळाली असती तर दुधात साखर पडली असती . त्यामुळे नलाला जे अतोनात दुःख झालं असतं , त्यानं माझा दमयंतीच्या उपभोगाचा आनंद द्विगुणित - शतगुणित झाला असता .

सेवक - ( प्रवेशून ) पुष्कर महाराजांचा जयजयकार असो . महाराज द्वापर आणि दमनक आपली भेट घेऊ इच्छितात .

पुष्कर - हां , जा , पाठव त्यांना आंत . ( सेवक जातो . )

द्वापर - ( प्रवेशून ) निषधाधिपति पुष्कर महाराजांचा विजय असो .

दमनक - ( प्रवेशून ) सम्राट पुष्कर राजांचा जयजयकार असो .

द्वापर - महाराज , आम्ही दोघेहि आपल्या सेवेला आलो आहोत .

पुष्कर - छे छे , द्वापारा , सेवा कसली घेऊन बसलात ? तुम्ही दोघेहि माझे परमप्रिय मित्र आहात . तुमच्यामुळे तर मला हे वैभव दिसलं . असं असतांना मी तुम्हाला सेवकाप्रमाणे कसं वागवीन ? असं काही तरी बोलू नका .

दमनक - असं काय म्हणता महाराज ? आमची कितीहि मदत झाली तरी खरं कर्तृत्व आपलंच ! आपण सम्राट , आम्ही सेवक , हेच खरं !

पुष्कर - सेवक नव्हे मित्र , मंत्रि !

द्वापर - कसली मंत्रणा पाहीजे सरकार ?

पुष्कर - आता यापुढं कसं वागायचं ? नलाला अजून कसं छळायचं ?

द्वापर - छे छे , अजून काय छळायचं नलाला ? त्याचं राज्य लुबाडलं , बास झालं ! काही झालं तरी आपला रक्ताचा भाऊ तो ! त्याचा इतका छळवाद मांडणं चांगलं नाही .

पुष्कर - कसला भाऊ घेऊन बसलात ? साता जन्मांचा वैरी तो . मला काय कमी छळलंय त्यानं आजपर्यन्त ? नवरा - बायको दोघेहि तसलीच ! ‘ बाळ बाळ ’ म्हणून चारचौघात माझा सतत पाण उतारा करीत असत ते . ते मी कसं विसरीन ?

द्वापर - पाण उतारा कसा ? त्यांचं प्रेमच तेवढं -

पुष्कर - वर वर प्रेम दाखवायचं पण आंतून मात्र माझा ठायी ठायी अपमान कसा होईल ते बघायचं ! याला काय भावासारखं वागणं म्हणतात ?

द्वापर - कां बरं , मोठया सन्मानानं नलराज तुम्हास स्वारीवर पाठवित नसत वाटतं ?

पुष्कर - मान्य आहे . पण स्वार्‍यांवर पाठवायचं पुष्करला आणि विस्तृत राज्याबद्दल गौरव मिळवायचा नलानं ! खरं सांगू ? पाळीव पशुपक्ष्याप्रमाणे वागवलं मला दोघांनीहि . त्या प्राण्यांच्या दुःखावर कुणी डागण्या तरी देत नाहीत ; पण माझ्या वांटयाला ते एक जास्त होतं . केव्हाहि भेटो , ‘ काय बाळ , कुशल आहे ना तुझं ’ म्हणून विचारलंच नलानं . आणि कुठेहि भेटली की ‘ काय भाऊजी , अगदी आनंदात आहात ना ? ’ असं विचारुन ती बया डिवचायची . चुकलंच ते . दमयंतीच आज माझ्या शेजेची सोबतीण - सोबतीण कसली ? दासी , भोगदाशी व्हायला पाहीजे होती . म्हणजे कळलं असतं कसा आनंदात आहे ते . थोडक्यात हुकलं . अजून एक पण व्हायला हवा होता . म्हणजे नलाला दमयंतीच्या मंचकावरुन खाली खेंचून मी त्यावर विराजमान झालो असतो .

दमनक - ( एकीकडे द्वापरास ) द्वापारा , काय बडबडतोय पुष्कर ? शुद्धीवर आहे कां लेकाचा ? अरे जिकडे कलि महाराजांचं लक्ष्य तिकडेच हाहि डोळे लावून बसलाय की ! सिंहिणीवर खोकड नजर ठेवायला लागला म्हणजे आटोपलंच !

द्वापर - खरंच ! हे कलिराजांना कळलं तर नसेल ? म्हणूनच मघाशी ते म्हणाले की या पुष्करचाहि नाश होईल . मला तर वाटतं की या दमयंतीपायीच कलि या पुष्करचंहि तळपट उडविणार ! ( पुष्करला उद्देशून ) छे छे राजाधिराज , दमयंतीवर कसली नजर ठेवता ? काही झालं तरी दोन पोरांची आई ती ! आपल्यासारख्या तरुण , सुंदर , विद्वान , पराक्रमी छप्पन अप्सरा मिळतील की !

पुष्कर - ( खुलून ) तेहि खरंच ! मी आपला रागाच्या भरात बोलून गेलो इतकंच . आता मी दमयंतीचा नाद सोडला . त्याचवेळी , पणातच मिळाली असती तर बरं झालं असतं .

दमनक : अहो , अगदी पणात असलेल्या पोरी आणून उभ्या करतो तुमच्यापुढे . मागच्या गोष्टी कशाला पाहिजेत आता ?

द्वापर - हो ना ! येवढं मोठं साम्राज्य मिळालं ते काय थोडं झालं ? त्यात आणखी दमयंती कशाला पाहीजे ? ते म्हणजे रत्नाकराला एखाद्या सामान्य हिर्‍याची हांव सुटण्यासारखं ठरेल . तुम्ही सांगण्याचा अवकाश , अप्सरांनाहि लाजवतील अशा नवयुवती , लावण्यवती उभ्या करतो आपल्यापुढे .

पुष्कर - ते पाहू पुढे . आधी नलाला अन् दमयंतीलाहि कसं छळता येईल ते सुचवा .

द्वापर - द्या दवंडी पिटून नगरात की नलदमयंतीला कोणीहि कसलीहि मदत करु नये म्हणून आणि मदत केली तर वध करण्यात येईल म्हणून .

पुष्कर - आहा ! याला म्हणतात मित्र . माझ्या मनातलंच बोललात अगदी . मी हेच करणार होतो . पण म्हटलं आधी तुमचा विचार घ्यावा . अरे , कोण आहे रे तिकडे ? ( सेवक येतो ) अरे , सबंध नगरात दवंडी पिटा की ‘ कोणीहि नलदमयंतीला कसलीहि मदत करु नये आणि जो कुणी त्यांचेशी सहानुभूतीने वागेल तो वधास पात्र ठरेल . ’ जा लवकर . सबंध नगरात दवंडी पिटली गेली पाहीजे . आणि ती नलदमयंतीच्याहि कानावर पडली पाहीजे . ( सेवक जातो . )

दमनक - इतक्या तडफेने आपण कामे उरकता ही फारच चांगली गोष्ट आहे .

पुष्कर - सम्राट झालोय मी आता . तेव्हा सर्व कामं त्वरेनेच केली पाहीजेत . नलसभेत असतांना ‘ करु , होईल ’ असं चाललं होतं ; पण आता तसं वागून कसं चालेल ? आता मला वाटतं असंहि करावं .

दमनक , द्वापर - कसं ?

पुष्कर - देशोदेशींच्या राजांनाहि कळवावं की कोणीहि नलाला थारा देऊ नये . जर एखाद्यानं मानलं नाही तर त्याला आपलं शत्रू मानावं .

द्वापर - कल्पना चांगली आहे ; पण इतर राष्ट्रांशी टक्कर देण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे कां नाही हे नको कां पहायला ?

पुष्कर - त्याची कशाला काळजी ? आपण पूर्ण बलशाली आहोत . अरे ज्यानं नलासारख्या नरशार्दुलाचा नायनाट केला त्याला इतर राजांची काय पर्वा ? मी सर्व राजांना कस्पटासमान मानतो . वास्तविक माझ्या पायांशी बसण्याची त्यांची लायकी आहे . हे नलप्रकरण एकदा संपलं की मी दिग्विजयाला आरंभ करणार आहे .

दमनक - पहा , द्वापारा , गर्वानं कसा फुलून गेला आहे तो . याला वाटतंय की जे सगळं घडलं आहे ते याच्याच पराक्रमाने घडले आहे . हा कपट करुनहि नलाला जिंकू शकला नसता आपल्या मदतीविना ; मग पराक्रम तर राहिला दूरच ! केलं सगळं आपण आणि टेंभा मिरवितो आहे हा .

द्वापर - शुत् ! आपण नव्हे , कलिराजांनी सगळं केलं . आपण नुसते नांवाला .

दमनक - तेच ते ! आपण काय आणि कलिराजांनी काय , एकच ! या पुष्करानं काही केलं नाही हा मूळ मुद्दा ! उगाच चढून जाऊ नकोस म्हणावं . एखादा राजा पार चेचून टाकेल . पुन्हा डोकं सुद्धा वर काढू देणार नाही .

द्वापर - जाऊ दे रे , आपल्याला काय करायचंय ? नलाचा कांटा काढण्यासाठी याला हाताशी धरला आणि चढविला राज्यपदावर कलिराजांनी ! पुढंच पाहून घेईल स्वतःचं स्वतः ! आपण कशाला काळजी करा ? गर्वाचं घर खाली हे ठरलेलंच आहे .

दमनक - मला वाटतं गर्वामुळे हा प्रजेचेहि हाल सुरु करेल आणि एखाद दिवशी याची प्रजाच बंड करुन उठेल , मग इतर राजे त्याचा पुरेपुर लाभ उठविल्याशिवाय राहतील काय ?

पुष्कर - बरं आहे , मित्रांनो , आता आपण जावे हे उत्तम ! मला अजून फार कामे करायची आहेत .

द्वापर व दमनक - ( प्राणिपात करुन ) जशी आपली आज्ञा !

( द्वापर आणि दमनक जातात . )

( पडदा )

अंक ३ प्रवेश २ समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP