(१)

पांच देवीच पाळणा

गुणि बाळ असा जागसि का रे वांया ।
नीज रे नीज शिवराया ॥धृ०॥
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ।
तरि डोळा लागत नाहीं ॥
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाहीं जिवाला ॥
निजवायाला हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय ॥
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका ।
कां कष्टविशी तुझी सावळी काया
नीज रे नीज शिवराया ॥१॥
ही शांत निजे बारा मावळ थेट ।
शिवनेरी जुन्नर पेठ ॥
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली ।
कोकणच्या चवदा ताली ॥
ये भिववाया वागुल तो बघ काळा ।
किति बाई काळा काळा ॥
इकडे तो सिद्दि जमान ।
तो तिकडे अफझुलखान ।
पलिकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया ॥२॥

(२)

तो एकच प्यारा बोल । मनीं या खोला । बसला
हृदयावर कायम ठसला ॥१॥

लाखाचें ज्याचें मोल । असा तो बोल । बोल या काळा ।
शोभलीस राजसबाळा ॥२॥

तो डावा डोळा-अहा । पुन्हा हा पहा । झाकला अरधा ।
करि जिवास मोहनबाधा ॥३॥

भिवईची तिरपी तर्‍हा । मुरडुनी जरा । त्यावरी ढळली ।
टोंकाशीं कांहीं चळली ॥४॥

हंसतांना थोडें कुठें । गाल तो उठे । आणि त्या भारें ।
निपजली मजा परभारें ॥५॥

त्या रेघा चिमण्या भल्या । तोंच उमटल्या । तीन कीं दोन ।
डोळ्याचा साधुनि कोन ॥६॥

तो भरून आला ऊर । रंगरसपूर । चालला श्वासें ।
ओंठावर अडलें हासें ॥७॥

भयभीत नवा आनंद । पदर वेबंद । कंप कटिबंधा ।
जिव झाला अरधा अरधा ॥८॥

नवतीची राजस लाज । गुलाबी साज । और तो कांहीं ।
गालांवर चढवी दोहीं ॥९॥

थरथरत्या ओंठावरी । प्रीत बावरी । बोल तो टाकी ।
नजरेचा पडदा झांकी ॥१०॥

तो एकच प्यारा बोल । जिवाचें मोल । घेउनी फिरुनी ।
एकदा ऐकवा कानीं ॥११॥

(३)

अडला रायगडींचा राणा । पडला आज शिपाईबाणा ।
ज्या राजवटी त्या रानवठीपरि जाणा ।
जन अवघे उघडे, नाहीं ठावठिकाणा ॥१॥

बारा मावळ एकच दैना । चवदा ताल कोंकणीं रैना ।
गगनांत झांकिती देवदेवता नैनां ।
रानांतहि प्याला शेंदुर राघूमैगा ॥२॥

(४)

निघते घेऊनि तुमच्या नांवा ।
देवा शिवनेरीच्या शिवा ॥
जरि करीन सोबत भ्याल्या जिवा
पदराखालिं चिमुकला दिवा ॥

झड घालि तरि कसा वारा उजवा-डावा ।
घ्या सांभाळुनि, हा न्या आशेच्या गांवा ॥

(५)

आजवरि पाहुनि वाट सुंदरा देह कि रे झुरला ॥
जिवलगा रे डोळ्यांत प्राण बघ उरला ॥

भरास आला खेळ-जाव हा कोणि तरि उकला ।
माझाच डाव कां हुकला ? ॥

पुरती झाली सांज, कळप हा विसांवत वसला ।
तो करि कुणिकडे फसला ? ॥

घरिं घरिं चाले थाट देवावर फुलवरा कसला चढला ।
हा एक हार कां पडला ? ॥

बहरुनि आला बाग, चहुंकडे रंगास झुकला
माझाच मोगरा सुकला ॥

(चाल) कां पाडिसि देवा, वज्रचुडयाला तडा ?
कुणिकडे उडाला मुद्रिकेंतला खडा ?
हरपला मणिच, मग उदास नागिणफडा ।

धरुनि भरंवसा जीव ज्यावरतिं आजवर ठरला ?
जिवलगा रे, तो आज वायदा सरला ॥१॥

(६)

का सख्या शिणांवशी अशी । आपुली दासी ।
मन होत हिंपुटी; तसा शीण जीवासी ।
तो तुझ्या मुखींचा बोल पडूं दे राया
पसरीन जिवाचें जाळें त्यासि झेलाया ॥धृ०॥
फुलवंती राजसबाळी । तिचा तूं माळीं ।
जिवलगा, तीनही काळीं ।
ही माळ धरा हृदयाशीं । वहा देवासी ।
परवा न सख्या आम्हांसी ।
देहाची नाहीं माया । जिवाच्या राया ।
शिवगंगा तुमची छाया ।
करुनिया मनाचा रमणा । अहो भगवाना ।
लुटवा या पंचप्राणां ।
तो बोल एकदां बोल, वाहते आणा ।
तूं सुखी तरी सुख मजला-हा एकच बाणा ॥१॥

(७)

साजणि बाई । सजवी मजसि करि घाई ।
लगिनघडि जाई । वेळ आली भरा
देव आले घरा । करी चतुराई ॥१॥
साजणि बाई । नटुनि थटुनि लवलाही ।
निघतें अगाई । राजराजेश्वरा ।
जवळिं या हो जरा । बघिन मुख कांहीं ॥२॥
साजणि बाई । चपळ पळत मन पाही ।
जवळिं नच राही । मंगलाचे सडे ।
टाकि चोंहीकडे । दावि नवलाई ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP